करोनाची लक्षणं असल्याने केरळमधील हॉटेलमध्ये क्वारंटाइन असलेला आसाममधील एक जण इतर दोघांसह पळाले आहेत. त्याच्यासोबतच्या दोघांपैकी एक जण ओडिशाचा आणि दुसरा पश्चिम बंगालचा आहे. १६ मार्चला हे तिघेजण पळालेत. ते ट्रेनने गेल्याचा प्रशासनाला संशय आहे.
क्वारंटाइन असलेले तिघे जण पळाल्याची माहिती आम्ही केरळ पोलिसांना दिली आहे. त्यापैकी एक जण आसामच्या मोरीगाव जिल्ह्यातील आहे. त्याचा मोबाइल आम्ही ट्रेस केला आहे. तो आसामला येणाऱ्या ट्रेनमध्ये असल्याची माहिती आमच्या हाती आली आहे, असं मोरीगावचे पोलीस अधीक्षक स्वप्ननील देका म्हणाले.
पोलिसांनी त्याचा मोबाइल शेवटचा ट्रेस केला त्यावेळी तो पश्चिम बंगालमध्ये कुठेतरी होता. यामुळे रेल्वे मार्गावर असलेल्या आसाममधील सर्व रेल्वे स्टेशनना यासंदर्भात अलर्ट देण्यात आला आहे. संबंधित प्रवाशावर नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याची माहिती देण्यात आली आहे. सरकारच्या रेल्वे स्टेशनवरील पोलिसांनाही अलर्ट करण्यात आलं आहे. लवकरच त्याला ताब्यात घेतलं जाईल, असं देका म्हणाले.
केरळमधून पळालेला आसामचा रहिवासी हा विदेशातून आला आहे की तो केरळमध्ये कामाला होता याची कुठलीही माहिती मिळालेली नाही. तो पळालेला रहिवासी कुठे राहतो याची माहिती हाती आली आहे. पण त्याची करोना चाचणीचा रिपोर्ट काय आलाय याची माहिती नसल्याचं स्वप्ननील देका यांनी सांगितलं