"बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्व शिकवलं आहे, मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. हे कुठून आले घंटाधारी हिंदुत्वावादी? घंटाधारी हिंदुत्वावाद्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. आमचं हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व आहे. जिकडे हनुमान चालीसा म्हणायची तिकडे म्हणा. भीम रुपी महारुद्र काय असतं. शिवसेना अंगावर आले तर शिवसैनिक दाखवतील. आमचं हिंदुत्व हनुमानाच्या गदेसारखी आहे," असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई महानगरपालिकेचा बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम बेस्टच्या नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्डचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडलं.
"सध्या सभेचे पेव फुटले आहे, मीही सभा घेणार आहे. या सभेत सगळ्यांचा सोक्षमोक्ष लावून टाकायचा आहे. नव हिंदू आणि तकलादू आणि नकली हिंदूत्वादी आले आहे, तुमचा शर्ट माझ्या शर्टापेक्षा भगवा कसा आहे, असं म्हणणाऱ्यांचा समाचार घ्यायचा आहे. हे जे नकली हिंदुत्ववादी आलेत त्यांचा मला समाचार घ्यायचा आहे", असा इशाराही त्यांनी दिला.
"शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं म्हणायला हे काय धोतर आहे का, की घातलं नेसलं आणि सोडलं. जे आम्हाला हिंदुत्व सोडल्याची टीका करत आहे. तुम्ही हिंदुत्त्वासाठी काय केलं. जेव्हा बाबरी पाडली गेली तेव्हा बिळात लपून बसला होता. राम मंदिर बांधण्याचा निर्णय हा कोर्टाने दिला आहे. राम मंदिरासाठी तुम्ही झोळ्या पसरवल्या आहेत", अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.