Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चर्चेच्या केंद्रस्थानी असलेलं शिवसेना भवन त्याचे महत्व काय आहे ?

चर्चेच्या केंद्रस्थानी असलेलं शिवसेना भवन त्याचे महत्व काय आहे ?
, मंगळवार, 21 फेब्रुवारी 2023 (16:09 IST)
उद्धव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर अद्याप अंतिम निर्णय येणे बाकी असताना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल देत ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आले. यानंतर यासंदर्भात राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया येत आहेत. यातच शिवसेनेचा फंड, शिवसेना भवन यावरून दावे-प्रतिदावे सुरू असतानाच धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना भवनही जाणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
 
मात्र शिवसेना भवनाला महाराष्ट्रात फार महत्व आहे, सत्ता केंद्र असे त्याचे चित्र असून, त्याचे इतके महत्व का हा त्या बद्दलचा रिपोर्ट.
 
· 1974 साली पहिली निर्मिती
जून 1966 मध्ये शिवसेना पक्षाची स्थापना झाल्यानंतर आठ वर्षांनी मुंबईतील सर्वात गजबजलेल्या दादरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 1974 साली शिवसेना भवनाची स्थापना केली.शिवसेना भवन उभारण्यात आले तेव्हा कार्यकर्त्यांमधील उत्साह पाहण्यासारखा होता. या शिवसेना भवनाच्या उभारणीसाठी हजारो छोट्या-मोठ्या कामगारांनी प्रचंड मेहनत घेतली होती.मुंबईतील काही प्रसिद्ध इमारतींप्रमाणेच शिवसेना भवनही आपल्या अनोख्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे.शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे मुख्य केंद्र व्हायला वेळ लागला नाही. युतीच्या काळातही याच शिवसेना भवनात भाजप आणि शिवसेनेच्या अनेक राजकीय बैठका झाल्या आहेत.
 
शिवसेनेची स्थापना 19 जून 1966 रोजी झाली. 1974 साली दादरमध्ये शिवसेनाभवन झाले. मधली दोन वर्षं शिवसेनेचे कार्यालय पर्ल सेंटरच्या दोन खोल्यांमध्ये होते. तिथंच शिवसेनाप्रमुख सर्वांना भेटत असत. सेनाभवन होण्यापूर्वी शिवसेनाप्रमुखांचे निवासस्थान हे सुद्धा कार्यालयासारखंच वापरलं जाई.
 
· अनेक मोठ्या घटनांचेही साक्षीदार
शिवसेना भवन हे केवळ मुंबईतील मोठ्या राजकीय उलथापालथींचेच नव्हे तर अनेक मोठ्या घटनांचेही साक्षीदार राहिले आहे. 1993 मध्ये मुंबईत एका पाठोपाठ 13 बॉम्बस्फोट झाले. यात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले.त्यानंतर शिवसेना भवनाजवळही स्फोट झाला. ही इमारत दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचे स्पष्ट झाले. या हल्ल्यानंतर इमारतीचे मोठे नुकसान झाले. काही वर्षांनी शिवसेनेच्या इमारतीची बरीच डागडुजी करण्यात आली.
 
त्यानंतर जुलै 2007 मध्ये शिवसेनेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन झाले. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले भाषण आजही शिवसैनिकांच्या लक्षात आहे.
 
शिवसेना भवनाने आजतागायत अशा एक ना अनेक घटनांचे पाहिल्या आहेत. पण राज्यात आठ-नऊ महिन्यांपूर्वी झालेल्या महासत्तांतरानंतर शिवसेनेत दोन गट पडलेत.शिवसेना भवनापासून शिवसेनेच्या राज्यभरातील शाखा ताब्यात घेण्यावरुन दोन्ही गटात मोठा चढाओढ सुरु झाली आहे.पक्षचिन्ह आणि नावावरुन दोन्ही गटात मोठा असंतोष आहे. आता या सर्व गोंधळात कोणत्या गटाला काय मिळणार हे येणारा काळच ठरवणार आहे.
 
· उमर नावाच्या व्यक्तीची जागा
शिवसेना समज गैरसमज या पुस्तकाचे लेखक योगेंद्र ठाकूर लिहितात, "शिवसेनेच्या कारभाराचा व्याप वाढला आणि शिवाजी पार्कच्या नाक्यावर ऐन मोक्याच्या जागेवर 1974 मध्ये संघटनेला आपले हक्काचे घर मिळाले. उमर या मुसलमान माणसाची ही जमीन. आधी तेथे काही दुकानांच्या शेड होत्या. त्या सर्वांना पुढे सेना भवनात जागा मिळाली. गोरे या आर्किटेक्टच्या संकल्पनेतून किल्ल्याच्या धरतीवरची सेनाभवनाची दगडी मजबूत इमारत उभी राहिली."
 
· देणगी मिळवून उभारली इमारत
योगेंद्र ठाकूर लिहितात, "हे भवन उभं राहाण्यासाठी शिवसैनिकांनी सांस्कृतिक कार्यक्रम घेतले. ऑफिसांमध्ये जाऊन पावत्या फाडल्या, देणगीदारांकडे खेटे घातले. त्यातून पैसा उभा केला. नंतरही कोणी फरशी लावण्याची जबाबदारी घेतली तर कोणी फर्निचरची. या भवनासाठी जागा मिळवण्यापासून ते या भवनाच्या उभारणीच्या कामापर्यंत दिवाकर रावते यांनी अथक मेहनत घेतली. या भवनाला किल्ल्याचा इफेक्ट देण्याचे काम ख्यातनाम आर्किटेक्ट गोरे यांनी केले. तर या भवनातील छ. शिवाजी महाराजांचा पुतळा स्वतः शिवसेनाप्रमुखांच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनाखाली श्री. सहस्रबुद्धे यांनी तयार केला."
 
· शिवसेना भवनाची जागा ही शिवसेनेची नसून शिवाई ट्रस्ट
न्यूजमध्ये माहिती मिळाली की, शिवसेना भवनाची जागा ही शिवसेनेची नसून शिवाई ट्रस्टची आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊन तक्रार दाखल केली. कारण पब्लिक ट्रस्ट जागा रेंट आऊट करु शकत नाही. ट्रस्टच्या जागेमध्ये कुठल्याही राजकीय उपक्रम राबवता येत नाही. असे असताना सुद्धा इतक्या वर्षांपासून तिथे राजकीय उपक्रम सुरु आहेत. याबाबतल धर्मादाय आयुक्तांनी काय भूमिका घेतली होती? तसेच याबाबत काय कारवाई करणार? हे विचारण्याकरता नोटीस पाठवली आहे. याशिवाय आपण PIL करणार आहोत, असे योगेश देशपांडे यांनी म्हटले आहे. 
 
दरम्यान, आतापर्यंत हा विषयच समोर आला नव्हता. परवा कोणीतरी दावा केला होता की, बाळासाहेबांनी ही एक सिक्रेट अरेंजमेंट केलेली होती. याबद्दल थोडी माहिती घेतल्यावर लक्षात आले की, अशा अनेक काही जागा घेतलेल्या आहेत का? याची चौकशी व्हावी. म्हणून धर्मादाय आयुक्तांकडे विचारणा केली आहे, असे योगेश देशपांडे म्हणाले.
 
· शिवसेनेची कोट्यवधींची मालमत्ता शिंदेंच्या शिवसेनेला
निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा फटका उद्धव ठाकरेंना बसणार हे नक्की आहे. शिवसेना पक्षाचा फंड वापरण्याचीही परवानगी एकनाथ शिंदे यांना देण्यात आली आहे. शिवसेना पक्षाकडे तब्बल 148 कोटी रुपयांची FD आमि 186 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. नाव आणि पक्ष चिन्ह सह मालमत्ता आणि डिपॉझिट रक्कम वापरण्यासही निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे.
 
· शिवसेना भवनबद्दल शिंदे गटाची नेमकी भूमिका काय?
दरम्यान, शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना भवनाबाबतची शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली आहे. ही लढाई पार्टी फंड किंवा शिवसेना भवन बळकावण्यासाठी नव्हती. पक्षाचं चिन्ह आणि नाव महत्त्वाचं होतं. त्यासाठी लढाई होती. शिवसेना भवनावर आम्ही दावा करणार नाही. अधिकार सांगणार नाही. शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिर आहे. काही लोकांना प्रॉपर्टी वाटत असली तरी आम्ही त्या रस्त्याने गेल्यावर शिवसेना भवनाला नमनच करू. ज्यांना पैशाचा लोभ आहे. त्यांनी बघावं. आमचं ते काम नाही. शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन जायचं आहे. तोच आमचा अजेंडा आहे, असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भटक्या कुत्र्यांनी घेतला चिमुकल्याचा जीव