विघ्नराजावतारश्च शेषवाहन उच्यते।
ममतासुरहंता स विष्णू ब्रम्होती वाचक:।।
विघ्नराज नावाच्या अवतारात गणेशाचे वाहन शेषनाग आहे. एकदा एका विवाहाप्रसंगी पार्वती गप्पा करता करता हसली आणि तिच्या हास्यातून एक पर्वतासमान महान पुरूषाचा जन्म झाला. त्याला पाहून ती आश्चर्यचकित झाली. तिने त्याला विचारले की- 'तू कोण आहेस? कोठून आला आहेस? आणि तुला काय हवे आहे? तो पुरूष नम्रतापूर्वक उत्तर देत म्हणाला की मी आत्ता आपल्या हास्यापासून जन्म घेतला आहे. मी आपला आज्ञाधारी आहे. हे ऐकून पार्वतीने त्याला मम (ममता) असे नाव दिले आणि गणेशाचे स्मरण केल्याने तुला सर्व काही मिळेल असे सांगितले. तिने त्याला गणेशाचा षष्टाक्षरी मंत्र (वक्रतुंण्डाय हुम्) दिला. ममाने प्रणाम केला आणि तो तपश्चर्या करण्यासाठी जंगलात निघून गेला.
तिथे त्याची भेट शंभरासूराशी झाली. त्याने त्याला विचारले की तू कोण आहेस? आणि इथे कसा आला? तेव्हा शंभराने त्याला सांगितले की मी तुला विद्या शिकविण्यासाठी आलो आहे. त्या विद्येने तू सामर्थ्यशाली होशील. मग शंभराने त्याला सर्व प्रकारच्या असूरी विद्याचे शिक्षण दिले. यामुळे मम प्रसन्न झाला आणि तो शंभरासुराला हात जोडून प्रणाम करत म्हणाला- मी तुमचा शिष्य आहे मला आज्ञा करा मी काय काम करू'. शंभरासूर म्हणाला, तू आता महान शक्ती प्राप्त करण्यासाठी विघ्नराजाची उपासना कर. ते प्रसन्न झाल्यावर त्यांना संपूर्ण ब्रह्मांडाचे राज्य व अमरत्व माग. याशिवाय दुसरे काहीही मागू नको. वर प्राप्त झाल्यानंतर माझ्याकडे ये. शंभराच्या सांगण्यानुसार ममाने तिथेच बसून कठोर तप सूरू केले. ममाचे कठोर तप पाहून गणराय प्रकट झाले आणि त्याला इच्छेनुसार वर मागण्यास सांगितले. तेव्हा ममाने गणरायाकडे संपूर्ण ब्रह्मांडाचे राज्य व अमरत्व मागितले. विघ्नराजाने तथास्तू म्हटले. ही बातमी शंभरासूराला समजल्यावर तो अत्यंत खूश झाला आणि लगेच आपली मुलगी मोहिनीचा विवाह त्याच्याशी केला.