Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाचां देवांची कहाणी

shravan puja
, गुरूवार, 29 जुलै 2021 (12:18 IST)
ऐका पांची देवांनो, तुमची कहाणी.
 
एके दिवशी ईश्वरपार्वती पृथ्वीप्रदक्षिणा करण्यास निघालीं. मुक्कामीं उतरलीं. पार्वती पादसेवा करूं लागली. तिचे हात कठीण लागले. तिला एका गरीब ब्राह्मणाच्या बायकोचं बाळंतपण करूं सांगितलं. ” तुझे हात कमळासारखे मऊ होतील” पार्वतीनं ब्राह्मणाच्या बायकोचं बाळंतपण केलं. ती फार उतराई झाली. पार्वतीला म्हणाली,” तूं माझी मायबहीण आहेस. मला कांही वाण सांग, वसा सांग.” तिनं वसा सांगितला. काय सांगितला? चातुर्मास आला, आखाडी दशमी आली, गणपतीची पूजा करावी, दुर्वा वहाव्या, मोदकांचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी, कार्तिक्या दशमीस ब्राह्मण जेवायला सांगून आपल्या वशाचं उद्यापन करावं. याप्रमाणं विष्णूचं पूजन करावं. तुळशीपत्र वहावं, खिरीचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी आणि कार्तिकांत ब्राह्मण सांगून उद्यापन करावं. तसंच नंदीला स्नान घालावं, आघाड्याचं पान वहावं; खिचडीचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी, ब्राह्मण सांगून उद्यापन करावं.
 
तसंच महादेवाला स्नान घालावं, बेलाची पानं वहावीं, दहींभाताचा नैवेध दाखवावा, वर तुपाची धार धरावी आणि ब्राह्मण जेवूं घालून उद्यापन करावं. तसंच पार्वतीला स्नान घालावं, पांढरीं फुलं वहावीं, घारगेपुर्‍यांचा नैवेद्य दाखवावा आणि कार्तिकांत ब्राह्मण जेवूं सांगून उद्यापन करावं. हा वसा कधी घ्यावा? आखाड्या दशमीस घ्यावा. कार्तिक्या दशमीस संपूर्ण करावा.” असा तिनं वसा सांगितला व आपण अदृश्य झाली.
 
बरेच दिवस झाले. इकडे पार्वतीनं काय केलं? गरिबीचा वेष घेतला. त्या बाईला भेटायला गेली. तिनं हिला ओळखलं नाहीं. पार्वतीला राग आला, ती गणपतीकडे गेली. सगळी हकीकत सांगितली. ” ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून टाक,” ” ही गोष्ट मजपासून घडायची नाहीं. ती कांहीं उतायची नाहीं, मातायची नाहीं. तिनं माझी चार महिने पूजा केली, दूर्वा वाहिल्या, मोदकांचा नैवेद्य दाखविला, वर तुपाची धार धरली आहे. मी कांहीं तिचं वैभव काढणार नाहीं.’ असं गणपतीनं म्हटल्यावर विष्णुकडे गेली, सगळी हकीकत सांगितली.
 
” ती उतली आहे, मातली आहे. तिचं वैभव काढून टाक.” ” ही गोष्ट मजकडून घडायची नाहीं. ती कांहीं उतायची नाहीं, मातायची नाहीं. तिनं माझी चार महिने पूजा केली. तुळशीपत्र वाहिलं, खिरीचा नैवेद्य दाखविला, वर तुपाची धार धरली आहे. मी कांहीं तिचं वैभव काढणार नाहीं.” तिथून उठली, नंदीकडे गेली. सगळी हकीगत सांगितली.
 
” ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून टाक.” ही गोष्ट मजकडून घडायची नाहीं. ती कांहीं उतायची नाहीं. मातायची नाहीं, तिनं माझी चार महिने पूजा केली. आघाड्याचं पान वाहिलं. खिचडीचा नैविद्य दाखविला, वर तुपाची धार धरली आहे. मी कांहीं तिचं वैभव काढणार नाहीं.” तिथून उठली, महादेवाकडे गेली. सगळी हकिकत सांगितली.
 
” ती उतली आहे. मातली आहे. तिचं वैभवं काढून टाकं.” ही गोष्ट मजपासून घडायची नाहीं. ती काही उतायची नाहीं. मातायची नाहीं. तिनं माझी चार महिने पूजा केली. बेलाची पानं वाहलीं, दहीभाताचा नैवेद्य दाखविला, वर तुपाची धार धरली आहे. मी कांहीं तिचं वैभव काढणार नाहीं. तूं गरिबीच्या वेषानं गेलीस म्हणून तुला ओळखलं नाहीं. पहिल्या वेषानं जा म्हणजे तुला ओळखील.”
 
श्रीमंती वेषानं पार्वती पुन्हा गेली. बसायला पाट दिला. पाय धरून आभारी झाली. तिला पार्वती प्रसन्न झाली, उत्तम आशीर्वाद दिला.जसे तिला पांच देव प्रसन्न झाले, तसे तुम्हां आम्हां होवोत.
 
ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं, सुफळ संपूर्ण.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्रावणमध्ये या 5 वस्तूंचे सेवन करा, भरपूर ऊर्जा मिळेल