केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी 11 वाजता लोकसभेत सन 2021-22 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. हा अर्थसंकल्प म्हणजे कोविडमुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व स्थितीवर मात करण्यासाठी गेल्या 10 महिन्यात घोषित आणि लागू केलेल्या विविध वित्तीय कार्यक्रमांचाच एक भाग राहील अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, बजेटआधीच सोने-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. एमसीएक्सवर फेब्रुवारीच्या डिलीव्हरी सोन्यामध्ये 274 रुपयांच्या वाढीसह 49370 रुपयांवर दर दहा ग्रॅम मार्केट बंद झालं. पण आज सकाळी 9.05 वाजता हे मार्केट थेट 185 रुपयांच्या वाढीसह 49281 रुपयांच्या पातळीवर सुरू झालं आहे.
दरम्यान, वित्त मंत्र्यांनी शुक्रवारी सादर केलेल्या सन 2020-21च्या आर्थिक सर्वेक्षणात, पुढील वित्त वर्षामध्ये सकल देशांतर्गत उत्पादनाचा वृद्धिदर 11 टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला आहे. यावर्षीचा अर्थसंकल्प प्रथमच केवळ डिजिटल स्वरुपात उपलब्ध राहणार असून तो ऍपवरच पाहता येऊ शकेल.