Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अधिकमास माहात्म्य अध्याय एकोणतिसावा

Webdunia
गुरूवार, 17 सप्टेंबर 2020 (10:33 IST)
श्रीगणेशाय नमः ॥ ओम् नमोजी अपरिमिता ॥ आदिअनादी मायातीता ॥ षड्‌विकार गुणरहिता ॥ सर्वनिरंजना ॥ १ ॥
तूं तंव सकळचाळक ह्रदयस्था ॥ अप्रमेय अद्वैत अवस्था ॥ चरणीं तव माझा माथा ॥ अनाथनाथा दीनबंधो ॥ २ ॥
अनाथांचा तू नाथ ॥ हें तों ब्रीद त्रिभुवनीं विख्यात ॥ ऐसें असतां घडे विपरीत ॥ हें तें मात अनुपम्य देवा ॥ ३ ॥
संसारीं आमुची आपदा ॥ रोगेंव्याप्त सकळसंपदा ॥ कौतुक पाहसी गोविंदा ॥ हें तव ब्रीदा विलक्षण ॥ ४ ॥
दुर्जनीं आम्हांतें गांजावें ॥ निरापराधें छळावें ॥ हें तंव तुवां अवलोकावें ॥ उचित केशवा न शोभे ॥ ५ ॥
असो आमुचाची भोग पाहीं ॥ तुजवरी बोल ठेवूनि काई ॥ जैसें असेल माझे दैवीं ॥ तेची पदवी सुखें भोगूं ॥ ६ ॥
ऐका श्रोतेहो समस्त ॥ श्रीकृपाबळें हा ग्रंथ ॥ संपूर्ण होऊं आला तेथ ॥ असो अवगत इत्थंभूत ॥ तरीं फलश्रुती अवधारा ॥ ७ ॥
नारायण ॥ श्रृणुसुंदरिवक्ष्यामि व्रतानमुत्तमं व्रतं ॥ कथितं त्वद्धितार्थाय सर्वलोकोपकारकं ॥ १ ॥
यदा भवेद्‌व्रतं पूर्णं तदोद्यपनमाचरेत् ॥ विनोद्यापनयोगेन तस्य सर्वं विनश्यति ॥ २ ॥
लक्ष्मीप्रती वदे नारायण ॥ जे हें व्रत आचरण पूर्ण ॥ तरीं बरवें की जे उद्यापन ॥ न घडे तरी निर्फळ जाणिजे ॥ ८ ॥
उद्यापन केलिया सकळ ॥ लाभे तयाचें पूर्णफळ ॥ जैसें बीज पेरितां कृषीवळ ॥ फळ लाभे राशीवर ॥ ९ ॥
मग लक्ष्मी वदे हो जी स्वामी ॥ कैसे उद्यापन कीजे आम्ही ॥ ते सकळ निवेदावें तुम्ही ॥ कैसा विधि ते समग्र ॥ १० ॥
ऐकून लक्ष्मीचें वचन ॥ बोलता झाला जनार्दन ॥ म्हणे ऐकाहो एकाग्र मन ॥ अत्यादरें सुंदरी ॥ ११ ॥
तुवां जें जें आम्हा प्रश्‍निलें ॥ तें तें सर्वही निवेदिलें ॥ परम उपकारणीये भले ॥ बोल चांगले तुझे हे ॥ १२ ॥
संपूर्ण मासवरी हें व्रत ॥ अथवा द्विरात्री त्रिरात्री आचरत ॥ किंवा एके दिनीं अर्चिल तें ॥ तरी उद्यापन नेमस्त करावें ॥ १३ ॥
आतां उद्यापन तें कैसें कीजे ॥ तेही सांगतों ऐकिजे ॥ संपूर्ण मास भरतां जाणिजे ॥ उद्यापनविधियुक्त ॥ १४ ॥
प्रातः काळी उठोनियां ॥ स्नानविधि नित्यनेम करूनियां ॥ देवदेवतार्चन सारूनियां ॥ उपहरी हे क्रिया आचरिजे ॥ १५ ॥
आणूनियां कर्दळी स्तंभ ॥ मंडप उभविजे सुप्रभ ॥ गुडियातोरणें उभवी नभ ॥ आणिक नानाविध वाद्ये पैं ॥ १६ ॥
स्थापूनियां सर्वतो भद्र ॥ रंगमाळा चित्रविचित्र ॥ घालून कीजे यंत्र विचित्र ॥ अतिसुंदर मध्यभागी ॥ १७ ॥
तयावरी कलश स्थापूनी ॥ सुवर्ण प्रतिमा करूनी ॥ पुरुषोत्तम देवता म्हणूनी ॥ स्थापिजे ते स्थानीं आदरें ॥ १८ ॥
मग यथासांग षोडशोपचारी ॥ पूजा कीजे अति आदरीं ॥ गंधाक्षता पुष्प सुवासित वरी ॥ परिमळ धूसुरी अर्पावे ॥ १९ ॥
नाना नैवेद्य पक्वान्न ॥ तांबुल दक्षिणा निरांजन ॥ वस्त्रे अलंकार अर्पून ॥ मंगळ आरती पै कीजे ॥ २० ॥
मग पाचारूनि ब्राह्मण ॥ सहदंपत्यें असावी जाण ॥ तया पूजा करून ॥ वस्त्रालंकार अर्पावे ॥ २१ ॥
ऐसे दंपत्य त्रयत्रीणिद्शक ॥ अक्षरे असावी तेही देख ॥ तयातें वायनादी जे प्रत्येक ॥ नाना प्रकारेंसीं जाण पां ॥ २२ ॥
तोही प्रकार सांगतों ऐक ॥ वंशपात्र सुपलें प्रत्येक ॥ वस्त्रे तोरे फणी करंडक ॥ असावी देख गरसोळी ॥ २३ ॥
ऐसें वाय विस्तारुनी ॥ दंपत्यें पूजावीं वस्त्रालंकारें करूनी ॥ सुवासीत पुष्पमाळिका देऊनि ॥ अर्पावीं दानीं वायनें ॥ २४ ॥
मग यथासांग ब्राह्मन संतर्पण ॥ दंपत्यसहीत करावें जाण ॥ षड्रस अन्न निर्मून ॥ द्यावें भोजन ब्राह्मणातें ॥ २५ ॥
संतुष्ट झालिया ब्राह्मण ॥ मी संतुष्टें नारायण ॥ ते तंव माझें मुख जाण ॥ म्हणोन आधीं पूजावें ॥ २६ ॥
वस्तुमात्र जितुकी ॥ विप्रातें अर्पाल तितकी ॥ ते तो पावे मजनिकी ॥ जाण लतिके शुभानने ॥ २७ ॥
भोजन जालियावरी ॥ बरवे अलंकार भूसुरीं ॥ देऊन दक्षिणा सहपरिवारी ॥ आशीर्वचना ते घेइजे ॥ २८ ॥
आतां ज्यांणीं जो धरिला नेम ॥ त्याचा ऐकें अनुक्रम ॥ प्रातःस्नानें करिती जे सप्रेम ॥ तेणें गंगापूजन करावें ॥ २९ ॥
वायनदान अर्पावें गंगेसी ॥ धेनुदान दीजे ब्राह्मणासीं ॥ सालंकार सवत्सेसी ॥ दोहन पात्रेंसी अर्पावें ॥ ३० ॥
जे प्रतिदिनी अर्पिती कुंभदान ॥ तयानें घातुकुंभ आणून ॥ तयाची पूजा करून ॥ द्यावें दान ब्राह्मणातें ॥ ३१ ॥
जे प्रत्यही करिती नक्त भोजन ॥ तयातें दीजे पोंवळीदान ॥ तयाते मुक्ती मी देत पूर्ण ॥ अक्षई भुवन प्राप्त होय ॥ ३२ ॥
आतां जे मौन्य करिती भोजनातें ॥ तयानें मौक्तिक दीजे दानातें ॥ वरी एक घंटा देवालयी बांधोन ते ॥ करितां पुण्य अगम्य ॥ ३३ ॥
प्रत्यहीं अर्पितां दीपदानतें ॥ रौप्यपात्रीं सुवर्ण वातितें ॥ आज्येंसी प्रतिपाद्य यथानिगुतें ॥ पूजोनीं विप्रातें अर्पिजे ॥ ३४ ॥
अथवा विस्तीर्ण समई ॥ धातूची असावी बरवी ॥ सघृतेसी पाजळोनि पूजावी ॥ मग अर्पावी ब्राह्मणातें ॥ ३५ ॥
आता मासवरी पुराण ॥ श्रवण करितां संपूर्ण ॥ अथवा पंचत्रय दिन ॥ घडे श्रवण शेवटीं ॥ ३६ ॥
जरी संपूर्ण मासवरी जाण ॥ जया तें घडलें नाही श्रवण ॥ तयानें शेवटील अध्याय ऐकतां पूर्ण ॥ लाभे संपूर्ण फळ तयातें ॥ ३७ ॥
मग वाचकाची पूजा बरवी ॥ यथा निगुती करावी ॥ वस्त्रालंकारें अर्पावी ॥ दक्षिणा द्यावी यथोचित ॥ ३८ ॥
व्यासस्वरूपी तयातें जाणून ॥ आदरें कीजे हो पूजन ॥ व्यासरूपी नारायण ॥ तें पूजन मज पावें ॥ ३९ ॥
जें जें कांहीं अर्पित वाचक ॥ तें तें मज प्रीत्यर्थ देखा ॥ मग मी तया भाविका ॥ स्वपदी देखा स्थापीत ॥ ४० ॥
नारा० ॥ वाचकः पूजितः श्रुत्वायैर्वस्त्रादिभिरादरात् ॥ मलमासाधिदेवोहं तेषांतुष्टोनसंशयः ॥ ३ ॥
ऐसें जे करिती वाचकाचें पूजन ॥ तयावरि संतुष्टे मी नारायण ॥ व्याधीपीडारोग तया लागून ॥ न बाधी जाण तया लागीं ॥ ४१ ॥
आधीव्याधी जरामृत्यु ॥ न बाधी तया आघात ॥ तया कुळी वैधव्याची मात ॥ बोलूच नये सर्वथा ॥ ४२ ॥
स्त्रियांतें सौभाग्यवर्धन ॥ इच्छिला भ्रतार पावे पूर्ण ॥ पोटी होय पुत्रसंतान ॥ अतिसुलक्षण पूर्णयुषी ॥ ४३ ॥
दरिद्री होय भाग्यवंत ॥ ऋणार्थियाचें ऋणमुक्त ॥ धनार्थियातें धनप्राप्त ॥ पुत्रार्थियातें पुत्र होई ॥ ४४ ॥
एवं संपूर्ण व्रत आचरता ॥ तयाचे पूर्ण करितां मनोरथा ॥ इच्छिलें फल दे समर्था ॥ स्वयें अनंत मी तयातें ॥ ४५ ॥
ऐसें लक्ष्मीप्रती कथन ॥ स्वयें वदला नारायण ॥ तेंची तुम्हा श्रोतियां लागून ॥ केलें निवेदन सर्वही ॥ ४६ ॥
यालागीं भावार्थ धरूनी ॥ व्रत आचरावें सज्जनीं ॥ आचरतां न सोडी हो भामिनी ॥ मध्यंतरी व्रतातें ॥ ४७ ॥
व्रत संपूर्ण न होतां ॥ मध्येंच न सोडीजे तत्वतां ॥ हीन आयुष्यीं क्षीणता ॥ प्राप्त होय जाणिजे ॥ ४८ ॥
व्रत संपुर्ण एकमास ॥ अथवा आचरावें पांच दिवस ॥ अथवा आचरतां तीन दिवस ॥ अथवा दिवस एक पैं ॥ ४९ ॥
परि संपूर्ण लाभे फळसिद्धि ॥ आणि केलि पाहिजे यथाविधी ॥ उद्यापनें नानाविधि ॥ करितां सिद्धि लाभेल ॥ ५० ॥
ते संसारी न भोगिती आपदा ॥ प्राप्त होय सकळ संपदा ॥ स्त्रियांतें वैधव्याची बाधा ॥ झगटेना कालत्रयीं ॥ ५१ ॥
इति श्रीमलमाहात्म्यग्रंथ ॥ पद्यपुराणींचे संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ एकोनत्रिंशत्तमोऽध्याय गोड हा ॥ २९ ॥ ओव्या ५१ ॥ श्लोक ३ ॥
 
॥ इति एकोनत्रिंशत्तमोऽध्यायः ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

Santoshi Mata Vrat Vidhi in Marathi संतोषीमाता व्रत संपूर्ण माहिती

आरती शुक्रवारची

गंभीर आजारांपासून मुक्त राहण्यासाठी अश्वत्थ स्तोत्राचे पठण करा Ashwattha Stotram

मकर संक्रांती उखाणे makar sankranti ukhane marathi

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

पुढील लेख
Show comments