Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अधिकमास माहात्म्य अध्याय सहावा

Webdunia
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020 (11:41 IST)
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ नमूं आतां सद्‍गुरु ॥ जो पराचाही परपरु ॥ जयाचे कृपेनें पसरु ॥ ग्रंथ निर्धार चाले हा ॥ १ ॥
आतां ऐका श्रोतेजन ॥ अधिक मास महिमा आख्यान ॥ जें श्रवण केलिया घडे पुण्य ॥ होय निरसन पापाचें ॥ २ ॥
पहा भगवंत केवढा दयाळू ॥ दीननाथाचा प्रतिपाळू ॥ झाडावया पापाचा मळू ॥ कथा अळुमाळू वदतसे ॥ ३ ॥
भगवन्मलमासे वै दीपदानस्य यत्फलं ॥ तत्सर्वं ब्रूही मे देव लोकाना हित काम्यया ॥ १ ॥
श्रीविष्णु रुवाच ॥ श्रुणु देवि प्रवक्ष्यामि रहस्यं पापनाशनं ॥ यत्कृत्वां पितृहा गोघ्नोब्रह्महा गुरुतल्पगः ॥ २ ॥
विघाती कूटसाक्षी वा सर्वपाप करोति वा ॥ मुच्यते नात्र संदेहो विष्णुलोकं स गच्छति ॥ ३ ॥
प्रश्न करितसे श्रीलक्ष्मी ॥ वदतसे कैवल्यधामी ॥ तेंचीं श्रवण कीजे तुम्हीं ॥ पाप क्षयातें जाणपा ॥ ४ ॥
जया वाटे कीं पाप जावें ॥ तयानें आधीं श्रवण करावे ॥ एकाग्र अवधान द्यावे ॥ ग्रंथानुमोदनी पै ॥ ५ ॥
तंव लक्ष्मी वदे जी स्वामिनाथा ॥ दीपदानाची व्यवस्था ॥ मज निरोपिजे तत्वता ॥ जेणें भवव्यथा निवारे ॥ ६ ॥
कवण पापाचिया रासी ॥ नष्ट होती दीपदानेशीं ॥ पूर्वी ऐसिया वृत्तासी ॥ आचरून पुण्यराशी तो झाला ॥ ७ ॥
हें आद्यंत निरूपण ॥ मज करवाजी श्रवण ॥ तंव बोले जनार्दन ॥ ऐकें कथन पुढारी ॥ ८ ॥
पितृहत्या गोहत्यारी ॥ ब्रह्महत्या गुरुहत्यारी ॥ कृतघ्न आणी परद्वारी ॥ दुराचारी मद्यप्राशक ॥ ९ ॥
कुटिल लबाड असत्यवादी ॥ असत्यसाक्षी तें प्रतिपादी ॥ मातापित्यातें त्यजुनि आधीं ॥ मातृगमनीं दुराचारी ॥ १० ॥
भ्रूणहत्या पूत्र हत्या पाहीं ॥ श्‍नुषाभगिनी कन्येतेंही ॥ याते रत जो स्वदेहीं ॥ ऐशी महापातकें अपार ॥ ११ ॥
तया पापाचें क्षाळण ॥ होय केलिया दीपदान ॥ आतां पावेतो मोक्षसदन ॥ संशय अन्य न धरावा ॥ १२ ॥
अधिकमासी मासवरी ॥ केशवा अर्पण दान करी ॥ प्रतिपदा आरंभ निर्धारी ॥ संपूर्ण मास वरी पै द्यावें ॥ १३ ॥
स्नान कीजे प्रातःकाळीं ॥ गंगायमुनासागरजळीं ॥ अथवा सरोवराचें पाळीं ॥ की जे प्रतिदिनी स्नानातें ॥ १४ ॥
हेंही न घडे कवणातें जरी ॥ वापीकूप तडागाचे परी ॥ स्नान कीजे निर्धारी ॥ अथवा स्वगृहीं शीतोदकें ॥ १५ ॥
शरीरीं सामर्थ्य नसलिया पाहीं ॥ प्रवाहा जावया शक्ति नाहीं ॥ शीतोदक नसे संवर्तेही ॥ तरीं बाध नाहीं उष्णोदका ॥ १६ ॥
संपूर्ण फलदं सम्यक् स्नानमुष्णेन वारिणा ॥ शीतेद्विगुणमेवस्यात्कूपेतश्च चतुर्गुण ॥ ४ ॥
नद्यां दशगुणं प्रोक्तं महानद्यां ततो दश ॥ सहस्रगुणितं प्रोक्तं महानद्योश्च संगमे ॥ ५ ॥
संपूर्णफल असे उष्णोदकीं ॥ तया द्विगुणित जाण शीतोदकीं ॥ वापीकूप आणि तटाकीं ॥ चतुर्गुणित जाण पां ॥ १७ ॥
नदी तीराचिया ठायीं जाण ॥ दशगुणित घडे पुण्य ॥ तया दशगुणें जाण ॥ घडे पुण्य गंगास्नानें ॥ १८ ॥
महागंगा क्षेत्री पाहीं ॥ अथवा सागराचे तीरींही ॥ संकल्पयुक्त स्नान केलें जिहीं ॥ तरी सहस्रगुणें पुण्य जोडे ॥ १९ ॥
ऐसें स्नानविधीतें सारून ॥ मग कीजे देवतार्चन ॥ स्वयें ताम्रपात्रीं आज्य घालून ॥ दीप लावून ठेविजे ॥ २० ॥
मग सत्पात्र ब्राह्मण ॥ पाचारावें तया लागून ॥ दीपपूजन करूनि जाण ॥ द्यावें दान ब्राह्मणातें ॥ २१ ॥
दक्षिणेसहीत दीप ॥ एक मासवरी साक्षेप ॥ केलिया होय नि:पाप ॥ सुख अमूप ते पावती ॥ २२ ॥
आयुरारोग्य संतती अपार ॥ चुके यमयातना कीं अघोर ॥ ॥ दीपदानें कांति सुंदर ॥ वर्धमान होय पै ॥ २३ ॥
अपमृत्यु गंडांतर ॥ दूर होय हा निर्धार ॥ ये विषयीं आन विचार ॥ न घडे साचार जाणपां ॥ २४ ॥
शतजन्मोत्थितं पामं मासार्धे नैव गच्छति ॥ जन्मांतर सहस्त्रैस्तु यदघं समुपार्जितं ॥ ६ ॥
सप्त जन्मार्जित जें पाप ॥ तेही झडे आपोआप ॥ शत जन्माचा जो लेप ॥ तोही अमूप झडतसे ॥ २५ ॥
परी श्रद्धापुरस्कर पाहीं ॥ नित्य नित्य हव्यास देहीं ॥ घडतो ऐसा संदेह नाहीं ॥ शास्त्रीं पाहीं हा निर्णयो ॥ २६ ॥
दीपदानाचा पर्वविधी ॥ जळकुंभ ठेविजे आधीं ॥ परिपूर्ण जळसंधी ॥ पूजाविधी करूनियां ॥ २७ ॥
तयावरी मग दीप ठेवूनी ॥ जळकुंभा सहीत दीजे दानीं ॥ एकमास वरी प्रतिदिनी ॥ करितां निर्वाणीं फळ लाभे ॥ २८ ॥
स्त्री अथवा पुरुषातें ॥ समान लाभ दोहीं तें ॥ सौभाग्य अथवा विधवेतें ॥ समान पुण्यातें पाविजे ॥ २९ ॥
वरकड करितां यज्ञदान ॥ द्रव्य पाहिजे तया लागून ॥ येथें अल्प वेचे महापुण्य ॥ सांगितले जाण साक्षेपे ॥ ३० ॥
यथाशक्ति ब्राह्मणभोजन ॥ भक्तिपुरस्कर करावें जाण ॥ श्रीलक्ष्मी नारायण म्हणोन ॥ संतर्पण करावें ॥ ३१ ॥
तयावरी शक्ति असेल पाहीं ॥ वस्त्रें अलंकार दक्षिणातेही ॥ भाव धरोनीं देहीं ॥ अति आदरे अर्पिजे ॥ ३२ ॥
नानापरी घृतमिश्रित ॥ अपूप अन्नें यथास्थित ॥ षड्रसें पक्वान्नें बहुत ॥ ब्राह्मणातें अर्पावीं ॥ ३३ ॥
गोभूहिरण्य दानांनीं ॥ जो अर्पी भूदेवा लागुनीं ॥ मलमासाशी प्रतिदिनीं ॥ तो मोक्षसदनीं पावतो ॥ ३४ ॥
आयुरारोग्य धनसमृद्धी ॥ अपमृत्यु न बाधी ॥ पुरे आयुष्याची अवधी ॥ तोवरी आरोग्यता देहासी ॥ ३५॥
वैश्यातें पशुधन प्राप्त ॥ शूद्राते सुखोत्पत्ति होत ॥ क्षत्रिय तो विजयी रणांत ॥ न बाधित शस्त्र घाय ॥ ३६ ॥
स्त्रियांतें वैधव्य नाहीं ॥ कुमारी तें निज भ्रतार तोही ॥ सुलक्षणीक प्राप्त होई ॥ व्रत प्रभावें ऐशिया ॥ ३७ ॥
नित्य करावें पुराणश्रवण ॥ रात्रौ कीजे हरिजाग्रण ॥ प्रातःकाळीं प्रातःस्नान ॥ दीपदान यथाविधि ॥ ३८ ॥
पूर्वी सरस्वती तीराचे ठायीं ॥ सुशर्मा नामें द्विज पाहीं ॥ पुत्र कलत्र सर्व आप्तही ॥ स्त्रीयुक्‍त नांदतसे ॥ ३९ ॥
भिक्षा मागून नित्यानित्य ॥ कुटुंबातें संरक्षित ॥ तयावरीही अतीत ॥ असलिया सांभाळीत माध्यान्हीं ॥ ४० ॥
धन्य ऐशियाचा संसार ॥ स्त्री असोनी स्वधर्मी नर ॥ रूपवती सेवेसीं सादर ॥ मनीं तिरस्कार न मानीं ॥ ४१ ॥
समयीं आलिया अतीत ॥ लाहें लाहे दुणावत ॥ तयातें असे तोषवित ॥ भोजनपानें आदरेंसी ॥ ४२ ॥
भिक्षार्थी याचे गृहातें ॥ सर्व संग्रहक कैचा तेथे ॥ परी समयीं असेल तें ॥ यथारुचि संपादी ॥ ४३ ॥
स्वपुत्राची आशा न धरी मनीं ॥ परम आल्हाद ब्राह्मणभोजनीं ॥ न उरो आपणा दुसरें दिनीं ॥ परि खेद मनीं मानिना ॥ ४४ ॥
ऐशी स्त्री धर्मानुकूळ ॥ तया पुरुषाचा सुफळ काळ ॥ तयावरी तुष्टे हो गोपाळ ॥ पावे दयाळ संकटीं ॥ ४५ ॥
परी ऐसें वर्ततां संसारीं ॥ तया अपुरें न पडे निर्धारी ॥ सदां वर्ततां सदाचारी ॥ पाहे मुरारी कसवटी ॥ ४६ ॥
तेथें सर्वदा जो संतुष्ट ॥ हर्षची मानी उत्कृष्ट ॥ मग तयावरी जगन्नाथ ॥ सदां संतुष्ट मानसीं ॥ ४७ ॥
असो आतां पाल्हाळ बहुत ॥ सुशर्मा यथाचारें वर्तत ॥ गृहीं धेनूसेवा नित्य करित ॥ उदर भरी ऐसिया परी ॥ ४८ ॥
नित्य करून प्रातःस्नान ॥ वरी करीतसे जपध्यान ॥ मग करूनियां भिक्षाटण ॥ अतीतासहीत भोजन करितसे ॥ ४९ ॥
धन्य ऐशियाचा संसार ॥ तोची प्रिय होय रमावर ॥ नाहीं तरी असाक्षी भोजन प्रकार ॥ न घडो निर्धार देहातें ॥ ५० ॥
अतिथि बैसवूनिया द्वारीं ॥ स्वगृहीं भोजन जो करी ॥ सोयरियाची प्रार्थना करी ॥ बरवियापरीं मिष्टान्न ॥ ५१ ॥
ऐसें भोजन घडे जयासीं ॥ तरी नरकीं वास तयासीं ॥ तें भोजन मांसभक्षणासी ॥ उदक प्राशनें रुधिर ॥ ५२ ॥
अतिथि अभ्यागता विरहित ॥ भोजन घडे जयातें नित्य ॥ तरीं सोमपानाचें फळ प्राप्त ॥ असे निश्चित निर्धारें ॥ ५३ ॥
ऐसा सुशर्मा निर्धारी ॥ पुराणश्रवण तृतीय प्रहरीं ॥ रात्रौ करि हरिजागरि ॥ तेणें तुष्टे नारायण ॥ ५४ ॥
ऐसी करिता काळक्रमणा ॥ पैसा वेची सत्कारणा ॥ तव मलमास प्रवर्तता जाणा ॥ करी विचारणा मानसीं ॥ ५५ ॥
म्हणे संचय नाहीं धनासी ॥ केवी घडे पुण्यराशी ॥ कवणें करावें दानासी ॥ व्रत प्रभावासी याचि पै ॥ ५६ ॥
मी तंव दरिद्री अत्यंत ॥ न घडेची परमार्थ ॥ दानधर्म यथास्थित ॥ न घडे किंचित मजलागीं ॥ ५७ ॥
ऐशी चिंता परम ह्रदयीं ॥ उद्‌भवली तयाशीं पाहीं ॥ म्हणें सार्थक घडलें नाहीं ॥ मूर्खदशा पाही या वाचे ॥ ५८ ॥
प्रतिदिनीं मौन्य धरून ॥ पुराणीं बैसतो जाऊन ॥ तंव तेथें निघालें दीपाख्यान ॥ केलें श्रवण यथा निगुती ॥ ५९ ॥
तोचि बोध चित्तीं ठसाऊन ॥ म्हणें हेंची करावें आपण ॥ मग प्रतिदिनीं दीपदान ॥ करी ब्राह्मण निजनिष्ठें ॥ ६० ॥
पुरुषोत्तम प्रीत्यर्थ भक्ती ॥ दान देत असे ब्राह्मणाप्रती ॥ ऐसा नेम चालवितां प्रीती ॥ काय निश्चिती वर्तलें ॥ ६१ ॥
एकादशीचे दिवशीं ॥ सुशर्मा बैसला जागरणासी ॥ दीप लावून घृतेसी ॥ संनिधेसी ठेवीत ॥ ६२ ॥
पूजा करून संकल्पयुक्त ॥ प्रातःकाळीं अर्पू ब्राह्मणातें ॥ ऐसा नेम करून ह्रदयांत ॥ प्रातःस्नानाते जातसे ॥ ६३ ॥
तंव घरची निद्रिस्त सर्वही ॥ जागृत तेथें कोणीच नाही ॥ तंव एक बिडाळक तेथें पाही ॥ मूषका लागीं डंसितसे ॥ ६४ ॥
तेथें दीपज्योति मंद झाली ॥ मूषक न देखे नेत्रयुगुळीं ॥ मग मार्जारे ते वेळीं ॥ केली नव्हाळी ते ऐका ॥ ६५ ॥
आपुल्या पुढल्या हातानें ॥ दीप सरसावित युक्तीनें ॥ मूषक दृश्य व्हावा तेणें ॥ म्हणोनि केला उपावो ॥ ६६ ॥
तों कृपाळु तो सर्वेश्वर ॥ मूषक पळाला तो सत्वर ॥ परी नवल वर्तले थोर ॥ ऐका समग्र भाविक हो ॥ ६७ ॥
तया मार्जारा ते वेळीं ॥ विमान उतरलें भूमंडळीं ॥ विमानीं बैसविताचि तात्काळीं ॥ देखे नेत्रकमळीं ब्राह्मण ॥ ६८ ॥
सुशर्मा स्नान करूनि आला ॥ तों हा चमत्कार देखिला ॥ मग बोलता जाला ते वेळां ॥ विमानस्थाते ते काळीं ॥ ६९ ॥
म्हणें देवदूत हो विज्ञापना ॥ माझा आणि जे हो मना ॥ या बिडाळकें पुण्याचरणा ॥ केलें म्हणोनि वाहिला विमानीं ॥ ७० ॥
तंव ते देवदूत सर्व समाचार ॥ तया ब्राम्हणातें कथिला साचार ॥ म्हणति हा तव संगीं उपकार ॥ केला उद्धार बिडाळका ॥ ७१ ॥
तरी संगसंगती दोष जैसा ॥ हाही पुण्यलेश जाण तैसा ॥ संवाद ऐकूनियां ऐसा ॥ चित्त उद्विग्न तें जालें ॥ ७२ ॥
म्हणे हे जनार्दना वासुदेवा ॥ हे वैकुंठमुरारे केशवा ॥ अच्युता अनंता माधवा ॥ करुणार्णवा दीनबंधो ॥ ७३ ॥
कवण पुण्याची या रासी ॥ बिडाळक आचरला देहासी ॥ नेणे पूर्वसकृताच्या राशी ॥ म्हणोनि विमानासीं प्राप्तता ॥ ७४ ॥
हे जगदिशा जनार्दना ॥ हे कैवल्यदानीं मधुसूदना ॥ क्षीराब्धिशायी नारायणा ॥ करुणाघना दीनबंधो ॥ ७५ ॥
मी तंव अभागीं पूर्ण ॥ नेणेच कधीं पुण्यचरण ॥ मज पापीयातें स्वर्गभुवन ॥ प्राप्त कोठून होय पै ॥ ७६ ॥
ऐसा सद्गदीत अंतरीं ॥ परम द्रवला ह्रदयमंदिरीं ॥ अश्रु चालिले नेत्रद्वारीं ॥ करुणास्वरीं भाकीत ॥ ७७ ॥
तयाची करुणा ऐकून ॥ कृपेनें द्रवला नारायण ॥ तयातें चतुर्भुज करून ॥ तात्काळ वाहिला विमानीं ॥ ७८ ॥
यालागीं केलें पुण्याचरण ॥ तें कदापि वाया न जाय जाण ॥ वायां गेलिया येईल उणें ॥ ब्रीदपूर्ण तोरडीं असे ॥ ७९ ॥
स्वबुद्धी अथवा सत्संगती ॥ पुण्य घडावें भलत्या रीती ॥ तेणें संतोष श्रीपती ॥ अधोगती नवजाय ॥ ८० ॥
धन असूनियां पदरीं ॥ जो दान धर्मातें न करी ॥ तया पापिया नरक अघोरी ॥ जन्मवरी सुटेचिना ॥ ८१ ॥
म्हणोनि अवचिता नरदेहो ॥ सुकतें लाधला पाहा हो ॥ न विचारितां न्यायान्यायो ॥ करी संचयो धनातें ॥ ८२ ॥
ऐसी वयसा संसारी वेंचितां ॥ केवी घडे सार्थकता ॥ तेचि वयसा निघोनि जातां ॥ मग धन वार्ता केउती ॥ ८३ ॥
संचय केला ज्या धनातें ॥ तो राहे जेथील तेथें ॥ एकलेची जाणें घडे त्याते ॥ जेथील तेथे निजात्मा ॥ ८४ ॥
धर्म नेणे काहीं ॥ जडला प्रवाहीं जन्मपंक्‍ती ॥ ८५ ॥
हाची जाणोनि अभिप्रावो ॥ कृपाळू जो देवाधिदेवो ॥ म्हणोनि सुलभ उपावो ॥ निर्मूनि ठेविला जनाते ॥ ८६ ॥
म्हणोनि सुशर्मा द्विजवर ॥ वर्ततसे दरिद्राचार ॥ परी चित्तीं धरूनि निर्धार ॥ केला उद्धार स्वयें तेणें ॥ ८७ ॥
नवियोगमवाप्नोति दीपदान प्रभावतः ॥ आधयोव्याधयश्चैव दीपदानात्प्रणाशिताः ॥ ७ ॥
भीतोभयात्प्रमुच्येत बद्धोमुच्येत बंधनात् ॥ ब्रह्महत्यादिभिः पापैर्दीपदानप्रभावतः ॥ ८ ॥
सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोकं सगच्छति ॥ अत्राप्युदाहरंतीमितिहासं पुरातनं ॥ ९ ॥
यालागीं प्राणियातें पाहीं ॥ सुलभ उपाव निर्मिला महीं ॥ म्हणोनि आचरावें देहीं ॥ सार्थकता पाहीं अनायासें ॥ ८८ ॥
ऐसा इतिहास पुरातन ॥ लक्ष्मीतें निवेदी नारायण ॥ म्हणोनि तुम्हां श्रोतेजन ॥ केलें निरोपण यथामतीं ॥ ८९ ॥
तरीं ग्रंथांतरी ठेवूनि विश्वास ॥ स्वयें करा हो या व्रताचा सायास ॥ जेणें चुके हो गर्भवास ॥ चुके अनयासें जन्मपंक्ति ॥ ९० ॥
येथें मुख्य भावासीं कारण ॥ भावें संतुष्ट जनार्दन ॥ येर अभाविकतें पतन ॥ न चुके जाण निर्धारें ॥ ९१ ॥
ऐका भावार्थासीं कारण ॥ तुलसीदळें संतुष्टे जनार्दन ॥ म्हणोनि गर्वरहित जाण ॥ करावें पूजन महाविष्णूचें ॥ ९२ ॥
हाचि जाणोनि निर्धार ॥ वाग्वल्ली तुळसीदळ साचार ॥ तेणें अर्चिला रमावर ॥ प्रीति पडिभारें आपुलिया ॥ ९३ ॥
स्वस्तिश्री अधिकमाहात्म्य ग्रंथ ॥ पद्मपुराणींचे संमत ॥ मनोहर सुतविरचित ॥ षष्ठोऽध्याय गोड हा ॥ ६ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ओंव्या ॥ ९३ ॥ श्लोक ॥ ९ ॥
 
॥ इति षष्ठोऽध्यायः ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Kaal Bhairav Ashtami 2024 भगवान कालभैरवाला प्रसन्न करण्याचे उपाय

आरती शुक्रवारची

Utpanna Ekadashi 2024: उत्पन्ना एकादशीला 3 प्रभावी उपाय करा, धन संकटपासून मुक्त व्हा !

Friday Remedies: शुक्रवारी या 4 गोष्टी करा, लक्ष्मीची विशेष कृपा मिळवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments