Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अधिकमास माहात्म्य अध्याय चौदावा

Webdunia
शनिवार, 12 सप्टेंबर 2020 (15:27 IST)
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीपांडुरंग रुक्मिणीरंगा ॥ मुनीमानस ह्रदयभृंगा ॥ नाम अनामातीत अभंगा ॥ नेई भंगा दुरितातें ॥ १ ॥
ऐका श्रोते सादर आतां ॥ मागील कथाभाग निरुता ॥ अनुमोदन देऊनि तत्वता ॥ परिसा आतां कथानक ॥ २ ॥
ऋषींमाजी शिरोमणी ॥ महाराज दुर्वासमुनी ॥ वासवाते विचारूनी ॥ निघता जाला तात्काळीक ॥ ३ ॥
साठसहस्र ऋषींचा मेळा ॥ घेऊन पातला भूतळा ॥ मार्गी चालतां तयाला ॥ विचार आठवला मानसीं ॥ ४ ॥
ते धन्याः कृतकृत्याश्चतैः प्राप्तं जन्मनः फलं ॥ सर्वार्थोधिगतस्तैस्तुयैर्दत्तंद्वादशीदिने ॥ १ ॥
कलायामपि द्वादशया मन्नदानं करोति यः ॥ सौभाग्यं वर्धतेतस्य तस्यायुर्नैवहीयते ॥ २ ॥
पापकोटि सहस्त्राणि पापकोटि शतानिच ॥ विलयं यांति देवेशि मलमासेतिथौमम ॥ ३ ॥
दुर्वास विचारी निजमनीं ॥ ते धन्य या त्रिभुवनीं ॥ जे अर्पिती द्विजा अन्नदानीं ॥ कृतकृत्य तयानें पै ॥ ५ ॥
सुफळ तयाचा जन्म पाहीं ॥ व्रत तपें दानें सर्वही ॥ तीर्थाटणें आदिकरूनही साधिली त्याणें द्वादशी ॥ ६ ॥
या अन्नदानें करुन पाहीं ॥ सकळ सौभाग्य तो लाही ॥ तयातें कधीं न घडे अपाई ॥ पापक्षय होय तेणें ॥ ७ ॥
कोटि पापें घडली तयासी ॥ तरी संहारी एक द्वादशी ॥ तयामाजीही मळमासीं ॥ विशेषाविशेषीं जाणिजे ॥ ८ ॥
या ऐसिया पर्वकाळातें ॥ जे करित नाहींत दानातें ॥ अन्नदान न घडे जयातें ॥ धिक् तयातें जन्मोनियां ॥ ९ ॥
जन्मा येवोनि केलें काई ॥ आचारविचार पाहिलाच नाहीं ॥ अन्नदान केलेंच नाहीं ॥ पुण्यलेश नाहीं गाठींसी ॥ १० ॥
जरी जाला श्रीमान बरवा ॥ तरी काय करावें तयाचे गौरवा ॥ जो विन्मुख झाला केशवा ॥ तो काय जाळावा स्मशानीं ॥ ११ ॥
ते धन्य आचरती व्रतातें ॥ अनुसरले अन्नातें ॥ तेचि प्रिय केले भगवंतें ॥ पापलेश तयातें नातळे ॥ १२ ॥
म्हणोनि धन्य तो अंबरिष ॥ जो दानामाजी दानाधीश ॥ सकळ भूसुरामाजी ईश ॥ नसे लवलेश पापाचा ॥ १३ ॥त्यातें छळावया पाहीं ॥ आम्हीं जातसों लवलाहीं ॥ तया रक्षिता शेषशायी ॥ न चले नवाई आमची तेथें ॥ १४ ॥
पुण्यवंत तो भूपती जाण ॥ करूं तयाचें दर्शन ॥ मग अग्रभागीं जें कथन ॥ सुखें करूनि घडो तें ॥ १५ ॥
ऐसी चित्तीं विचारणा ॥ करूनि चालिला ऋषीराणा ॥ त्वरें पावला नृपभुवना ॥ केली गर्जना समस्तीं ॥ १६ ॥
जयजयकाराचेनि घोषें ॥ ऐकतां नृप संतोषें ॥ अतिउल्हासें निजमानसें ॥ सामोरा येत नृप तयातें ॥ १७ ॥
दंडप्राय लोटांगणीं ॥ समस्तातें नमूनी ॥ बद्धहस्तें प्रवर्ते स्तवनीं ॥ मधुर वचनीं आनंदें ॥ १८ ॥
ते धन्य या संसारीं नर ॥ ऐकतां आनंदती द्विजवर ॥ अर्पिती पूजा प्रकार ॥ आणि अग्रहार द्विजातें ॥ १९ ॥
भोजनातें इच्छिती पदार्थ ॥ वरी धनवस्त्रासहित ॥ तयावरी कृपाळु अनंत ॥ निवारी आघात निजांगें ॥ २० ॥
ब्राह्मण पातलिया निजगृहीं ॥ भ्रूलतेसी ग्रंथी घालिती पाही ॥ म्हणती आमुचा हात रिकामा नाहीं ॥ परता होई भटबावा ॥ २१ ॥
ऐसें जे ब्राह्मणातें ॥ धिःकार असो तयातें ॥ तैसा नव्हे अंबरीष नृपनाथ ॥ परम भावार्थ विनवीत ॥ २२ ॥
म्हणत धन्य आजिचा पर्वकाळ ॥ माझा भाग्योदय झाला सफळ ॥ घेऊनि समुदाय सकळ ॥ गृहा पातला न प्रार्थिता ॥ २३ ॥
कोटि पर्वकाळ एकवटले ॥ किंवा चंद्रसूर्य एकवटले ॥ तेंचि फल आजी लाधलें ॥ दर्शन दिधलें महाराजा ॥ २४ ॥
बोलोनि ऐसि मधुरवाणी ॥ आसन दिधलें समस्ता लागुनी ॥ पूजा प्रकार आणवूनीं ॥ पुरस्कार पूजनीं अनुसरला ॥ २५ ॥
तंव बोलता झाला ऋषि बोल ॥ पोटीं क्षुधेचा असे बंबाळ ॥ तेथें पूजा प्रकार न रुचे सकळ ॥ विषवत सकळ गमताती ॥ २६ ॥
कालची असे एकादशी ॥ अवघा वेळ उपवासी ॥ संधी साधून द्वादशी ॥ पातलों ठायासी तूझिया ॥ २७ ॥
क्षुधा हे पापिणी दारुण ॥ सुचों नेदि संध्या-स्नान ॥ पोटीं पेटलिया जठरान्न ॥ अन्ना परान्ना नेणेची ॥ २८ ॥
यालागीं नृपनाथा वरिष्ठा ॥ समुदायासी बरवंटा ॥ अन्नवोगरीं धर्मिष्ठा ॥ आणिक वाटा नवजावें ॥ २९ ॥
तीन प्रहर जाहलीया निशी ॥ आम्हीं जातसों स्नानासी ॥ विलंब नाहीं स्नान संध्येसी ॥ सत्वर माघारें येतसों ॥ ३० ॥
ऐकून ऋषींचें उत्तर ॥ मनीं हर्षयुक्त नृपवर ॥ म्हणे कृतकृत्य जालों फार ॥ केला उद्धार महाराजा ॥ ३१ ॥
आजी साधन द्वादशी ॥ मी लाधलों परम सुकृतेसीं ॥ पार नाहीं माझ्या भाग्यासी ॥ समुदायासी पातलेती ॥ ३२ ॥
तरी स्वामींचे दयेकरून ॥ सकळ पदार्थ अनुकूल जाण ॥ परी असे एक विज्ञापन ॥ कृपाघना परिसीजे ॥ ३३ ॥
माझा तंव अलोट नेम ॥ जो हरिहरातें दुर्गम ॥ तो सिद्धी न्यावा जी सुगम ॥ कृपा करूनि दातारा ॥ ३४ ॥
तरी साधिजे साधन द्वादशी ॥ विलंब न लावावा स्नानासी ॥ न होता भानु उदयासी ॥ भोजनासीं बैसावें ॥ ३५ ॥
हेची विनंती परिसावी ॥ कृपाळुत्वें सिद्धी न्यावी ॥ तथास्तु म्हणे भट गोसावी ॥ समुदाय ऋषिरावो ॥ ३६ ॥
स्नानातें गेला ऋषींचा मेळा ॥ नृप पातला त्वरें पाकशाळा ॥ साठ खंडी अन्नगोळा ॥ एकला कवळी दुर्वासु ॥ ३७ ॥
इतर मंडळी साठ सहस्र ॥ अन्नें पचविली षड्रस ॥ रायें सावरून स्नान संध्येस ॥ देवार्चनासीं बैसला ॥ ३८ ॥
षोडशोपचारें पूजा ॥ अर्पूनियां गरुडध्वजा ॥ पंचमहायज्ञ महाराजा ॥ करूनि बैसला निवांत ॥ ३९ ॥
राव बैसला मार्ग लक्षीत ॥ तंव दिनकर उदयो होऊं पाहत ॥ साधनवेळा तेणें साधीत ॥ राव मनांत गजबजला ॥ ४० ॥
म्हणोनियां लवडसवडी ॥ दूत धाडिले अति तांतडी ॥ ते लक्षूनियां गंगेची थडी ॥ ऋषिराया हाकारिलें ॥ ४१ ॥
येरीकडे गंगातीरी ॥ अघमर्षण ऋषी करी ॥ कोणी शिरोनि जळामाझारी ॥ स्नानें बरि सारिताती ॥ ४२ ॥
कोणी करिती स्तोत्रपाठ ॥ कोणाचे न हालती ओंठ ॥ जप करिती एकनिष्ठ ॥ कोणी नीळकंठ आराधिती ॥ ४३ ॥
ऐसें ब्राह्मण ठायींठायीं ॥ गुंतते जाले ते समयीं ॥ तंव राजदूत पाहोन ह्रदयीं ॥ घाबरेपणें बोलती ॥ ४४ ॥
म्हणती महाराजा सत्वर ॥ बाहात असेजी नृपवार ॥ भोजनातें होतसे उशीर ॥ चलावें सत्वर स्वामियां ॥ ४५ ॥
प्रत्युत्तर न देती बापुडीं ॥ एक धरून नासिक बोंडी ॥ एक उघडी करून शेंडी ॥ लवडसवडी झाडिती ॥ ४६ ॥
तंव करूनियां अघमर्षण ॥ दुर्वास बोले वचन ॥ अद्यापि झालें नाहीं ध्यान ॥ जपतर्पणीं विधियुक्त ॥ ४७ ॥
भानु उदय न होतां ॥ केवी अर्घ्य तर्पणाची वार्ता ॥ जाऊनि सांगा नृपनाथा ॥ विधि विधानता सारूनि येऊं ॥ ४८ ॥
आम्हीं ब्राह्मण नसों अन्नार्थी ॥ स्नान संध्या सारून परती ॥ बैसावें येऊन पंक्ति ॥ तैसी आमुची स्थिती नसेची ॥ ४९ ॥
जे न करिती संध्यास्नान ॥ विधियुक्त तिळतर्पण ॥ तैसेंची सारिती भोजन ॥ तरी ते ब्राह्मण नव्हेती ॥ ५० ॥
शूद्रवत ते नर जाण ॥ रवरवीं तयाचे पितृगण ॥ काय ब्राह्मण कुळीं जन्मोन ॥ सार्थक कवण जन्माचें ॥ ५१ ॥
तरी जाऊनि सांगा रायासीं ॥ क्षण एक अवकाश भोजनासी ॥ सारूनियां नित्य नेमासी समुदायासी येतसो ॥ ५२ ॥
ऐसें ऋषीचें उत्तर ॥ ऐकून दूत परतले सत्वर ॥ जेथें असे नृपवर ॥ सांगती सत्वर वृत्तांत ॥ ५३ ॥
नृपें ऐकून वचनासी ॥ परम संकोचित मानसीं ॥ म्हणे विघ्न दिसे द्वादशी ॥ न साधे साधनासी आजी पै ॥ ५४ ॥
तरीं उपावो करावा कवण ॥ परम कोपिष्ठ दुर्वास जाण ॥ शाप देईल न लागतां क्षण ॥ परम विघ्न उदेलें हें ॥ ५५ ॥
आजपर्यंत साधनासी पाहीं ॥ अपायो घडला नसे कांहीं ॥ अहो देवा हें काई ॥ कैसी नवाई उदेली ॥ ५६ ॥
ऐसी चिंता करितां ह्रदयांत ॥ परम सचिंत नृपनाथ ॥ तंव संधी पातली त्वरित ॥ साधन वेळा द्वादशी ॥ ५७ ॥
मग नृपें विचारून मानसी ॥ करिता जाला महायज्ञासीं ॥ नैवेद्य अर्पूनि महाविष्णूसी ॥ देव तीर्थासी प्राशिलें ॥ ५८ ॥
सिद्ध करून आयती ॥ मार्ग लक्षीत नृपती ॥ स्वस्थ बैसलासे चित्तीं ॥ ऋषिमार्ग लक्षीतेस ॥ ५९ ॥
येरीकडे गंगातीरीं ॥ ऋषीतें जाणवलें अंतरीं ॥ मग उठता झाला झडकरी ॥ समुदायेसी ऋषिरावो ॥ ६० ॥
परम लगबगेंते अवसरीं ॥ पातले नृपाचिया महाद्वारीं ॥ करूनियां जयजयकारी ॥ म्हणे सत्वर सारीं यज्ञातें ॥ ६१ ॥
करूनि पंच महायज्ञातें ॥ नैवेद्य अर्पी देवातें ॥ उशीर जाहलासे भोजनातें ॥ तुझिया व्रतातें नृपवरा ॥ ६२ ॥
रायें ऐकूनियां वचन ॥ म्हणे सकळ विधि सारून ॥ करूनियां तीर्थग्रहण ॥ साधन वेळां साधिली ॥ ६३ ॥
आतां भोजन मात्र असे उरलें ॥ ऋषी म्हणे आहा काय केलें ॥ तूंतें तव भोजन घडलें ॥ शेष उरलें तें ब्राह्मणातें ॥ ६४ ॥
तीर्थ प्रसाद ग्रहण करितां ॥ तरी भोजना समानची तत्वतां ॥ आम्ही न सेवूचि आतां ॥ शेष अन्न नृपवर्या ॥ ६५ ॥
तूं तंव परम सूज्ञराया ॥ केवी आचरलासी हे क्रिया ॥ म्हणोन परम क्रोध ऋषिवर्या ॥ ह्रदयामाजी उपजला ॥ ६६ ॥
म्हणें चांडाळा पाही आतां ॥ मज ऋषीतें उपेक्षून तत्वतां ॥ माझा महिमा तुवां नेणतां ॥ केवीया व्रता साधिलें ॥ ६७ ॥
क्रोधें थरथरां कांपतसे ॥ दोन्ही अधरपुटीं हालतसे ॥ सर्वांगी क्रोधें लवतसे ॥ काय बोलतसे रायातें ॥ ६८ ॥
गर्व जाहला तुझिया मानसीं ॥ मीच साधितों द्वादशी ॥ तरीं स्वीकारी आतां शापासीं ॥ भोगीं गर्भवासीं शतजन्म ॥ ६९ ॥
ऐसा शाप ऋषीं वदतां ॥ घाबरा जाला नृपनाथा ॥ म्हणे केउता उदेला अनर्था ॥ म्हणोन कांपत थरथरां ॥ ७० ॥
पहा केवढा अनर्थ रायातें ॥ अभिमान वोढवला तयातें ॥ अभिमान न साहे भगवंतातें ॥ प्रिय तयाते निराभिमान ॥ ७१ ॥
निराभिमान कर्मकरितां ॥ तो परमप्रिय भगवंता ॥ यालागीं न धरीजे अहंता ॥ जाणते पुरुषांनीं ॥ ७२ ॥
पुण्यमार्ग आचरतां पाहाहो ॥ तेथें उत्पन्न झाला अपावो ॥ म्हणोनि नाचरावें हा हो ॥ झणी ऐसें न म्हणावे ॥ ७३ ॥
जें पुण्यकर्म आचरलें ॥ तें केवीं वाया गेलें ॥ ऐसें न म्हणावें वहिलें ॥ तें ऐका सावधान ॥ ७४ ॥
भावेवीण देवाधिदेवो ॥ केवी आतुडले पाहाहो ॥ परि केलिया कर्माचा निर्वाहो ॥ देवाधिदेवो संपादी ॥ ७५ ॥
जैसे उत्तम भूमीसी कण ॥ पेरितां होय वर्धमान ॥ जरी अपूर्ण जाला घन ॥ परी न जाय कण तेथीचे ॥ ७६ ॥
तेवी सत्पात्रीं दान देता ॥ ते वायां न जाय तत्वतां ॥ किंचित कृपाघन वोसरतां ॥ पीक हाता लागतसे ॥ ७७ ॥
म्हणोनियां अनन्यभावें ॥ निराभिमानें कर्म करावें ॥ तेंची प्रियकर रमाधवे ॥ भावार्थबळें करूनियां ॥ ७८ ॥
असो आतां हे समग्र ॥ कथा भाग राहिला दूर ॥ कर जोडुनियां नृपवर ॥ उभा समोर ऋषींच्या ॥ ७९ ॥
म्हणे स्वामिया महाराजा ॥ कवण अपराध देखिला माझा ॥ म्हणून शाप दिधला वोजा ॥ हें अधोक्षजा मानेना ॥ ८० ॥
ऋषी म्हणे ते समयीं ॥ तुवा तीर्थग्रहण करून पाहीं ॥ माझें वचन असत्य नाही ॥ भोजना बैसविसी आम्हातें ॥ ८१ ॥
पहा केवढे संकटीं नृपवर ॥ व्यसनीं पडला साचार ॥ परी कृपाळू तो सर्वेश्वर ॥ जाणें अंतर सकळांचें ॥ ८२ ॥
न पाचारिता ऋषिवरा ॥ आले समुदायासी मंदिरा ॥ तरी माघारे दवडितां नृपवरा ॥ अश्लाध्यवाणें दिसे कीं ॥ ८३ ॥
यालागीं गृहीं पातलियां भूसुर ॥ तयाचें आतिथ्य करावें फार ॥ तोषवून तयाचें अंतर ॥ आशीर्वचनातें घेईजे ॥ ८४ ॥
रिक्त हस्तें दवडितां पाहीं ॥ कठोर वचन बोलतां तेही ॥ तेणें तों संतापून ह्रदयीं ॥ अंतःकरणी शापितसे ॥ ८५ ॥
जरीं द्यावया नाहीं धन ॥ तरीं बरवा कीजे सन्मान ॥ परी वित्त असुनि न देववे दान ॥ हें विहितपण साजेना ॥ ८६ ॥
तरी थोडें अथवा फार ॥ देऊनि तोषवावें अंतर ॥ मग कृतज्ञता द्विजवर ॥ सहजची येऊं पाहे ॥ ८७ ॥
असंतुष्टा द्विजा नष्टा ॥ हे प्रतीपाद्य वेद प्रतिष्ठा ॥ यालागीं कर्म श्रेष्ठा ॥ विधिवाटा आचरिजे ॥ ८८ ॥
ऐसें कर्म अंबरीष ॥ करितां प्राप्त झाला नाश ॥ मग ह्रदयीं आठवी रमाविलास ॥ केला ध्यास बहु तेणें ॥ ८९ ॥
म्हणे वैकुंठवासी रमाधवा ॥ धाव कैवारिया ॥ केशवा मी तव अनुसरलों जीवभावा ॥ तुझिया सेवा जगदीशा ॥ ९० ॥
ब्राह्मण तंव तुझें मुख ॥ ऐसें जाणूनिया निष्टंक ॥ व्रत आचरलों एकनिष्ठ ॥ केवीं हें अरिष्ट उदेलें ॥ ९१ ॥
कवण पातकाची राशी ॥ म्हणोनि क्रोध आला तुजसी ॥ यालागीं शापितसे ऋषी ॥ कवण उपायासी करूं आतां ॥ ९२ ॥
तुझेंची मुख हे ब्राह्मण ॥ जाणोनि मांडिलें अन्नदान ॥ आणी तुझेची मुखें शापवचन ॥ उचितपण केवी देवा ॥ ९३ ॥
तरी कृपाळू तो दीनोद्धार ॥ ऐसें बोलती विधिहर ॥ तरी ऋषिवचनाचा वणवा थोर ॥ शांत करी कृपाघनें ॥ ९४ ॥
हे देवाधिदेवा कृपाघना ॥ दयाळुवा अघनाशना ॥ दीनोद्धारा पतितपावना ॥ असुरमर्दना दयानिधे ॥ ९५ ॥
तूं तव कृपेचा सागर ॥ ऐसें वदताती ऋषेश्वर ॥ तेथें ऐसी हे लहरी क्रूर ॥ पातली हरिहरा न लोटे ॥ ९६ ॥
कवण पातकाचा ठेवा ॥ मी तंव आचरलोंसे देवा ॥ म्हणोनि न येची करुणा ॥ ह्रदयीं केशवा तुझिया ॥ ९७ ॥
गर्भवासाचा चुकवावा पंथ ॥ यालागीं कीजे दान तपव्रत ॥ तेथेंही होतसे आघात ॥ तरी समूळ मात उडे कीं ॥ ९८ ॥
तरीं दीन वत्सलता ते कैसी ॥ केउती गेलीसे ऋषीकेशी ॥ सांग पां आम्हां दीनासी ॥ विचारून मानसीं गोविंदा ॥ ९९ ॥
पाहा करितां अन्नदान ॥ रायातें वोढवलें महाविघ्न ॥ तोची प्रत्यय मजलागून ॥ आला जाण तात्काळीं ॥ १०० ॥
ब्राह्मण भोजन केलें प्रथम दिवशीं ॥ प्रचीत देखिली प्रातःकाळासी ॥ न येतां न देतां दुर्जनासी ॥ गांठी पडली तात्काळीं ॥ १ ॥
तयानें वोढून नेलें ॥ राजद्वारीं उभे केलें ॥ कारागृहातें भोगिलें ॥ अस्तमीत अस्नात ॥ २ ॥
प्रभू न करी वचनान्याये ॥ खोट्याचें खरें केलें पाहे ॥ दंड पावलों लवलाहे ॥ रौप्य नाणें ऋषि संख्या ॥ ३ ॥
ऐसा पुण्यमार्गाचा प्रादुर्भावो ॥ तात्काळ फळला पाहा हो ॥ अंबरीषातें तोची न्यावो ॥ घडे पाहावो अनयासें ॥ ४ ॥
मग करुणास्वरें अनंत ॥ आळविता जाला नृपनाथ ॥ सर्वातरात्मा जगन्नाथ ॥ कळलें ह्रदयगत रायाचें ॥ ५ ॥
म्हणे धावणें न करितां ॥ ब्रीद बुडो पाहे तत्वता ॥ मग माझीही वत्सलता ॥ केवी शोभे भूमंडळीं ॥ ६ ॥
मग पवनातें टाकून मागें ॥ गरुडातें सोडून वेगें ॥ धांवणें केलें लागवेंगे ॥ उभाउभी अंतरंगीं उभा ठेला ॥ ७ ॥
येरीकडे नृप चक्रचूडामणी ॥ जोडूनियां द्वयबद्धपाणी ॥ उभा ठेलासे ऋषि सन्निधानी ॥ तों चक्रपाणी देखिला ॥ ८ ॥
सहस्र चपळेसमान ॥ तेज फांकलें देदीप्यमान ॥ एकाएकीं शेषशयन ॥ येऊन उभा ठाकला ॥ ९ ॥
रायें पाहातांच नयनीं ॥ दंडप्राय लोटांगणीं ॥ उभा ठेला बद्धपाणी ॥ स्तुती स्तवनीं अनुवादें ॥ १० ॥
दुर्वासें घातला नमस्कार ॥ उभा समुदायेंसीं सत्वर ॥ स्तुतिवादें जगदीश्वर ॥ ऋषेश्वर पूजितसे ॥ ११ ॥
ऐसें होतां तये वेळीं ॥ बोलतां जाला वनमाळी ॥ नृपवरा पाहून ते वेळीं ॥ मुख कोमाले दिसतसे ॥ १२ ॥
मग बोलतसे नृपवर ॥ कथिता जाला समाचार ॥ म्हणे परम कोपिष्ठ ऋषेश्वर ॥ निरर्थक शापिलें ॥ १३ ॥
ऋषी शापाचा वणवा ॥ जाळूं पाहे देह भावा ॥ कृपाळू तू मेघ केशवा ॥ शीतळ करीं वर्षोनी ॥ १४ ॥
ऐकून नृपाची करुणा ॥ बोले वैकुंठीचा राणा ॥ म्हणे दुर्वासें न करितां विचारणा ॥ शापिला राणा अंबरीष ॥ १५ ॥
आधींच मलमास विशेष ॥ वरी द्वादशी तिथी सरस ॥ नृप आचरतां निर्दोष ॥ तरी शापास आधार केउता ॥ १६ ॥
द्वादश्यां पारणयेस्तु तोयदानं करोतियः ॥ तत्तोयं सागरेस्तुल्यं सप्तभिः सागरात्मजे ॥ ४ ॥
द्वादश्यां योदिने प्राप्ते तर्पणं कुरुते प्रिये ॥ जलं तदमृती भूय पितृणामुपतिष्ठति ॥ ५ ॥
द्वादश्यामन्नदानं वै यः करोति सुमध्यमे ॥ तेनैव तारिताः सर्वे नरकाच्छत पूर्वजाः ॥ ६ ॥
द्वादशीतें ब्राह्मणातें ॥ उदक अर्पिलें जरी त्यातें ॥ तरी फळ लाभे यज्ञातें ॥ स्वर्गी पितरांतें संतोष ॥ १७ ॥
जयानें व्रत केलें द्वादशी ॥ पार नाही त्याचिया पुण्यासीं ॥ मी जनार्दन संतोषी ॥ केवी तयासीं अघातू ॥ १८ ॥
वरी केलिया अन्नदान ॥ तयाचे पूर्वजा होय उद्धरण ॥ न करि तरी रवरव दारुण ॥ पितृगण भोगिती ॥ १९ ॥
ऐसीजे पुण्यतिथीसी ॥ नृप आचरतां पुण्यराशी ॥ तरी केवी बाधिजे तयासी ॥ शापभये ऋषीच्या ॥ २० ॥
परी तपश्चर्ये आगळा मुनी ॥ नेणोनि वदले शापवाणी ॥ तरी स्वयें मी चक्रपाणी ॥ सोसीन जाचणी गर्भवास ॥ २१ ॥
ऐसें वचन केशवाचें ॥ ऐकून ऋषी बोले साचे ॥ शत जन्म गर्भवासाचे ॥ वचन आमचें निघालें ॥ २२ ॥
तरी उश्शाप वाणी ऐक ॥ वरिचें शून्य टाकीं एक ॥ शेष उरे जो दशक ॥ तो अवश्यक भोगिजे ॥ २३ ॥
त्याहीमाजी चतुर्भाग रीतीं ॥ दोन्ही जलचरें दोन्ही वनचरें तीं ॥ दोन विप्र दोन भूपती ॥ रामकृष्ण तरती जडमूढ ॥ २४ ॥
ऐसा उश्याप वदता वाचा ॥ संतोष स्वामी दीनाचा ॥ गर्भवास निरसील रायाचा ॥ स्वयें तयाचा अंगिकारी ॥ २५ ॥
मग आनंदोनियां नृपती ॥ ऋषीमेळासीं श्रीपती ॥ साधूनिया द्वादशी तिथी ॥ कौतुक रीतीं दावित ॥ २६ ॥
विमान आणून तात्काळीं ॥ नृप उद्धारिला ते वेळीं ॥ ऐशी द्वादशी नव्हाळी ॥ ऋषि मंडळी विलोकीत ॥ २७ ॥
समस्तीं करुनि जयजयकार ॥ नमिते झाले शारंगधर ॥ अदृश्य जाला सर्वेश्वर ॥ इतुका प्रकार पै जाला ॥ २८ ॥
कथाभाग परम ऐकिला ॥ म्हणोनि श्रोतियां सकळा ॥ श्रवणद्वारें परिसविला ॥ एवं संपला पंचपर्व ॥ १२९ ॥
इतिश्रीमलमास माहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणाचें संमत ॥ मनोहरसुत विरचित ॥ चतुर्दशोध्याय गोड हा ॥ १४ ॥
ओंव्या ॥ १२९ ॥ श्लोक ६ ॥
 
॥ इति चतुर्दशोध्यायः ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

उत्पत्ति एकादशी कथा मराठी Utpanna Ekadashi Katha

पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या

आरती सोमवारची

सोमवारी या उपयांनी मिळेल तन, मन आणि धनाचे सुख

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments