काही काळानंतर शंभरासुर दैत्य गुरू शुक्राचार्याकडे गेला आणि त्यांना ममासुराविषयी सांगितले. हे ऐकून ते शंभरासुराबरोबर ममाच्या घरी आले. ममाने त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले. शुक्राचार्यांनी सर्व असुरांसमोर ममासुराची दैत्याधीशपदी नेमणूक केली. शिवाय प्रेत, काळ कलाप, कालजित आणि धर्माहा नावाच्या पाच प्रधानांचीही नियुक्ती केली. ममासूर आणि त्याची पत्नी मोहिनी आपल्या धर्म आणि अधर्म नावाच्या दोन मुलांसह सुखी राहत होते. एकदा ममासुराने गुरू शुक्राचार्याजवळ संपूर्ण ब्रह्मांडावर राज्य करण्याचे इच्छा व्यक्त केली. त्यांनी त्याला सांगितले, की तू दिग्विजय कर! परंतु विघ्नेश्वराला विरोध करू नकोस. कारण त्यांच्यामुळेच तुला हे संपूर्ण वैभव प्राप्त झाले आहे, याचा विसर पडू देऊ नकोस. नंतर ममासुराने आपल्या पराक्रमी पुत्रांसमवेत पृथ्वी, पाताळ आणि स्वर्गावरही अधिकार प्रस्थापित केला. सर्व देवांना बंदिवासात टाकले. सर्वत्र अनिती आणि अनाचाराचे साम्राज्य पसरले.
बंदिवासात असलेले देव ममासुराच्या त्रासापासून मुक्ती मिळविण्यासाठी एकत्र येऊन विचार करू लागले. तेव्हा लक्ष्मीपती विष्णूने सर्वांना विघ्नेश्वराची आराधना करण्यास सांगितले. तोच आपल्याला या संकटातून वाचवू शकेल असेही त्यांनी सांगितले. सर्व देवांनी विघ्नेश्वराची आराधना सुरू केली. त्यांची आराधना ऐकून विघ्नेश्वर प्रकट झाले आणि ममासुराच्या त्रासापासून मी तुमची सुटका करतो असे त्यांना आश्वासन दिले. त्याचवेळी महर्षी नारद ममासुराकडे गेले आणि त्याला म्हणाले की मला विघ्नराजाने पाठविले आहे. त्यांनी दिलेल्या वरामुळेच तू शक्तीमान झाला आणि तूच देवांना बंदीगृहात टाकले. सर्व अधर्म आणि अनाचार समाप्त करून मला शरण ये, अन्यथा तुझा सर्वनाश केला जाईल अशी आज्ञा विघ्नेश्वराने दिली आहे, असे नारदाने त्याला सांगितले. परंतु ममासूरावर त्याचा काहीच प्रभाव पडला नाही. आपल्या दोन मुलांसोबत युद्धासाठी तो नगराबाहेर आला. इकडे विघ्नराजाने कमल असुराला सैन्यात पाठवून त्याच्या सर्व सैनिकांचा विनाश केला होता. हे सर्व पाहून ममासुर मुर्च्छित पडला. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याच्यासमोर कमलला पाहून तो अत्यंत भयभीत झाला आणि विघ्नेश्वराला शरण आला. विघ्नेश्वराने त्याला क्षमा करून आपला भक्त मानले.