राम मंदिराचा प्रतिष्ठापना सोहळा आज अयोध्येत पार पडत आहे.
या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक संतमहंत तिथे उपस्थित राहणार आहेत.
2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर राम मंदिर उभारणीची सुरुवात झाली होती.
काँग्रेस नेत्यांनी आता रामनवमीला अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतला आहे.
या सोहळ्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय.
महाराष्ट्रासह सहा राज्यांनी आज सुटी जाहीर केली आहे.
10,000 सीसीटीव्ही कॅमेरे, AI फिचर असलेले ड्रोन कॅमेरे, यांच्या माध्यमातून सर्व घडामोडींवर नजर ठेवली जात आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं असून महाप्रसादाची 20 हजार पाकिटं तयार करण्यात आली आहेत.
12:43 PM, 22nd Jan
आज भव्य समारंभात अयोध्यातील श्री राम मंदिरात मूर्तीची प्राण- प्रतिष्ठा झाली असून रामलला विराजित झाले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे गाभाऱ्यात उपस्थित होते.
11:46 AM, 22nd Jan
अभिनेत्री कंगना राणावत अयोध्येत पोहोचल्यानंतर म्हणाली की, "योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येचा कायापालट केला आहे. रोमच्या व्हॅटिकन सिटीपेक्षा अयोध्या प्रसिद्ध झालीय. केवळ विकासाबाबतच नव्हे, तर आध्यात्माच्या बाबतीतही."
11:14 AM, 22nd Jan
अडवाणी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला नाही जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे प्रमुख यजमान आहेत. पंतप्रधान मोदी येथे एका सभेलाही संबोधित करणार आहेत. राम मंदिराच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अयोध्येत येऊ शकणार नाहीत. प्रचंड थंडीमुळे त्यांनी अयोध्या दौरा रद्द केल्याचे समजते. बाबरी मशिदीसाठी कायदेशीर लढाई लढणारे प्रमुख पक्ष इक्बाल अन्सारी यांनी सांगितले की, आजपासून राम मंदिराचे उद्घाटन होत आहे. सर्व भारतीयांसाठी हा मोठा दिवस आहे.
11:12 AM, 22nd Jan
सिनेक्षेत्रातील अनेक कलावंत अयोध्येत
सिनेक्षेत्रातील अनेक कलावंत अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत.
माधुरी दीक्षित-श्रीराम नेने, विकी कौशल, कतरिना कैफ, आयुष्मान खुराणा, रणबीर कपूर, आलिया भट्ट, राजकुमार हिरानी, महावीर जैन, रोहित शेट्टी अयोध्येत दाखल झाले आहेत.
10:12 AM, 22nd Jan
मुंबईहून अनेक सेलिब्रिटी प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी रवाना झाले आहेत. आतापर्यंत खालील सेलिब्रिटी अयोध्येला निघाले आहेत.
-अमिताभ बच्चन
-सचिन तेंडुलकर
-रणबीर कपूर आणि आलिया भट
-माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने.
10:08 AM, 22nd Jan
एकनाथ शिंदे ठाण्यातील कोपीनेश्वर मंदिरात महाआरती करणार
आज श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असताना, आज सकाळी 11.00 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील कोपीनेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या महाआरतीला उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता दादर ते वडाळा शोभायात्रेतही ते सहभागी होतील.