Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Essay on Dr Babasaheb Ambedkar निबंध : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Webdunia
भारताच्या पावन भूमीवर अनेक महापुरुषांनी जन्म घेऊन देशासाठी व समाजासाठी अहोरात्र कार्य करुन सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा जोपासली आहे. त्यांचा सेवेचा वारसा आजही देशवासियांसाठी आदर्श, मार्गदर्शक व दिशा दर्शक ठरलेला आहे. अशा या थोर महापुरुषात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव सर्वात वर आहे.
 
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. बाल भीमाचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह हा होताच. मुलांना ही ते चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत. म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी आढळते. तुकाराम व कबीर बाबासाहेबांच्या अभ्यासाचे विषय भावी आयुष्यात झालेले दिसतात.
 
डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले.
 
डॉ. आंबेडकर म्हणजे प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती होय: 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविते आणि मानवतेची दिव्य ज्योत निर्माण करते ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती ठरते. 
 
शैक्षणिक विचार: 
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी या साठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. ''शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही,'' असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. ''प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करुनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिक दृष्टा सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. प्रज्ञा, शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्‍यांनी ध्यानी घ्यावे. पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी मुंबइला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलींद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहीत व समाजहीताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत. 
 
सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले: 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनीति, अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत. डॉ. आंबेडकर म्हणजे तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क ही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले.
 
प्रखर राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा : 
डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तात्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली त्यांना वाटले डॉ. आंबेडकर आता देश सोडून जाणार परंतु डॉ. आंबेडकरांनी सांगितले, '' आम्ही या भारतदेशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच, राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धा '' यात डॉ. आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा समावलेली आहे. 
 
स्त्रियाचे शेतकरी, शेतमजूर श्रमजीवी, व दलितांचे कैवारी : 
स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या. स्त्रियांची गुलामगिरी डॉ. आंबेडकरांनी दूर केली. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक, कायदेशीर आणि राजकीय दर्जा, वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला. १९४२ साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले की, स्वच्छता पाळा, सर्व दु्र्गुणांपासून दुर रहा, मुलामुलींना शिक्षण द्या त्यांना महत्वाकांक्षी बनवा, त्यांचा न्यूनगंड दूर करा असा महत्वाचा उपदेश केला. दलितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा दिला. श्रमजिवीच्या साठीही ते खंबीरपणे उभे राहिले. दलितांना मानाचे जीवन जगता यावे म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहीले. केवळ दलितासाठीच नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधी जोरदार लढा दिला.
 
अशा या महामानवाचे महान कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठीचे सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय. अशा या महामानवाने 6 डिसेंबर 1956 साली अखेरचा श्वास घेतला आणि आपल्या कार्याचा ठसा मागे उमटवला.
 
- महेश जोशी

ALSO READ: Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार

ALSO READ: भारतीय राज्यघटना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनमोल देणगी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

जालना येथे भीषण अपघात, कार उभ्या ट्रकला धडकली, कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर 11 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, गडचिरोली जिल्ह्याला वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही भेट

मंत्र्यांना या बंगल्यात राहण्याची भीती वाटते, बंगला कोणाला मिळेल? समर्थकांमध्ये भीतीचे वातावरण

पुण्यातील भीमा कोरेगाव येथे आज युद्धाचा 207 वा वर्धापन दिन साजरा होतोय

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी नवीन वर्षाची सुरुवात 'रक्तदान - श्रेष्ठदान'ने केली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शुभेच्छा दिल्या

पुढील लेख
Show comments