Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठी पत्रकार दिन: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता कशी होती?

Webdunia
शनिवार, 6 जानेवारी 2024 (16:43 IST)
-तुषार कुलकर्णी
6 जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पणपासून सुरू झालेली मराठी पत्रकारिता आता डिजिटल झाली आहे. लाखो तरुण तरुणी ब्लॉगिंग, वेबसाइट्स आणि युट्युब चॅनेलहून व्यक्त होत आहेत आणि आपल्या भागाचे, समुदायाचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहेत.
 
स्वातंत्र्यलढा असो वा सामाजिक सुधारणा, मराठी पत्रकारितेनी जनमानसांत एक चळवळ उभी केल्याचे आपण पाहिले आहे.
 
सत्यशोधकी पत्रकारिता, ख्रिस्ती मिशनऱ्यांची पत्रकारितेने बहुजन समाजातील लोकांच्या उद्धारासाठी आपल्या जीवाचे रान केले होते.
 
संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि आणीबाणीच्या काळातही मराठी पत्रकारितेने आपली धार कायम ठेवत एक नवा अध्याय लिहिला होता.
 
महाराष्ट्रातील पत्रकारितेच्या विविध प्रवाहांमध्ये आणखी एका प्रवाहाचा उल्लेख करणे महत्त्वाचे ठरते ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचा.
 
डॉ. आंबेडकरांनी मराठीतून पत्रकारिता करत कोट्यवधी लोकांना संघर्षाचे बाळकडू पाजले. त्यांनी केवळ पत्रकारिताच केली नाही तर त्यातून कोट्यवधी लोकांचे आयुष्य आणि मराठी पत्रकारिता समृद्ध केली.
 
त्यांची पत्रकारिता हा मराठी पत्रकारितेतील सोनेरी अध्याय आहे हे कुणीही नाकबूल करणार नाही. म्हणूनच मराठी पत्रकारदिनी त्यांच्या पत्रकारितेचे स्मरण करणे अगत्याचे ठरते.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेकडे पाहणे आणखी एका गोष्टीमुळे महत्त्वाचे ठरते ते म्हणजे की त्यांचे जीवन आणि त्यांची पत्रकारिता ही समांतरच चालली आहे.
 
1920 मध्ये मूकनायक सुरू करण्यापासून ते 1956 ला प्रबुद्ध भारत सुरू करण्यापर्यंत म्हणजेच एकूण 36 वर्षांच्या काळात डॉ. आंबेडकरांनी आपल्या प्रचंड मोठ्या कामाचा व्याप सांभाळून पत्रकारिता केली.
 
तो काळ नेमका कसा होता, त्यांच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी येत होत्या, त्यांच्यासमोर कोणती आव्हानं होती, तेव्हाची परिस्थिती कशी होती या सर्वांची साक्ष त्यांच्या नेतृत्वात निघत असलेल्या पत्रांतून आपल्या मिळते. त्यामुळेच डॉ. आंबेडकरांचे जीवन समजून घेण्याच्या दृष्टीने सुद्धा त्यांची पत्रकारिता महत्त्वाची ठरते.
 
वृत्तपत्रं म्हणजे इतिहासाचा कच्चा मसुदा असं म्हटलं जातं पण डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेमुळे आपल्या डोळ्यांसमोर जिवंत इतिहासच उभा राहतो.
 
जसं विविध स्तरांवर डॉ. आंबेडकरांचे संघर्षमयी जीवन आपल्याला दिसते तशीच त्यांची पत्रकारिताही खडतर काळातीलच होती.
 
पण जशी त्यांनी आपल्या आयुष्यात सर्व आव्हानांवर मात करत आपल्या ध्येयाकडे वाटचाल चालू ठेवली तसंच त्यांच्या पत्रकारितेच्या बाबतीत देखील घडलं. त्यामुळेच त्यांची पत्रकारिता ही आगीतून तावून सुलाखून निघालेल्या बावनकशी सोन्यासारखी वाटते.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे शिल्पकार, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ज्ञ, दलितोद्धारक, भारताचे पहिले कायदे मंत्री, शिक्षणाचे पुरस्कर्ते, मानवी हक्क चळवळीचे अध्वर्यू, मजूर चळवळीचे नेते अशा विविधांगी गोष्टीसाठी ओळखले जातात.
 
पण त्यांची पत्रकारितादेखील सर्वोच्च प्रतीची असताना देखील त्याबद्दल फारसं बोललं जात नाही अशी खंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा अभ्यास करणाऱ्यांनी अनेकवेळा व्यक्त केली आहे. आणि यातूनच साहित्यिक आणि विचारवंत डॉ. गंगाधर पानतावणेंनी 'पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर' हा संशोधनात्मक ग्रंथ लिहिला.
 
तेव्हापासून अनेकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेवर अभ्यास करत त्यांच्या पत्रकारितेचे विविध पैलू समोर आणले आहेत.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता कशी सुरू झाली, त्यांच्या पत्रकारितेतून त्यांनी कोणत्या प्रकारचे प्रश्न मांडले, ते कसे मांडले आणि त्याचा एकूणच मराठी पत्रकारितेवर काय परिणाम झाला हे आपण या लेखातून पाहू.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर 5 नियतकालिके सुरू केली. वयाच्या 29 व्या वर्षी त्यांनी 'मूकनायक' सुरू केले होते. भारतातील वर्तमानपत्रं ही एका विशिष्ट वर्गाचीच मक्तेदारी असून त्यांना बहिष्कृत वर्गातील जनतेच्या सुख-दुःखाची पर्वा नाही.
 
तेव्हा त्यांच्या हक्काचा लढा लढण्यासाठी आपल्याजवळ साधनही तसंच हवं अशी भूमिका घेत डॉ. आंबेडकरांनी 'मूकनायक'ची मुहूर्तमेढ रोवली.
 
'मूकनायक'ची कशी सुरुवात झाली?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1919 मध्ये साऊथबरो कमिशनसमोर मुंबईत साक्ष दिली होती आणि यावेळी त्यांनी अस्पृश्य वर्गावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली होती. या समितीला निवेदन करुन अस्पृश्यांना विधिमंडळात 9 जागा देण्याची विनंती केली होती.
 
त्याचवेळी त्यांच्या मनात हा विचार सुरू झाला की आपल्या हक्काचे असे व्यासपीठ हवे की ज्यातून आपण आपल्या समस्या मांडू शकू, त्यावर विचार मंथन करता येईल आणि त्यावर उपाय योजना देखील सुचवता येईल.
 
ही गरज ओळखून त्यांनी मूकनायकची सुरुवात केली. दत्तोबा पवार या गृहस्थांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भेट राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्याशी घडवून आणली होती. अस्पृश्य समुदायाचा पुढारी हा त्यांच्यातूनच असावा अशी भावना शाहू महाराजांची होती.
 
डॉ. आंबेडकरांशी झालेल्या भेटीगाठीनंतर शाहू महाराजांना खात्री पटली की हा पुढारी म्हणजे डॉ. आंबेडकरच ठरतील. पुढे एका कार्यक्रमात तर त्यांनी त्यांचा मनोदय बोलून पण दाखवला होता. या सर्व पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकरांना 2,500 रुपयांचे आर्थिक सहाय्य केले.
 
त्यातून 31 जानेवारी 1920 रोजी 'मूकनायक'ची सुरुवात झाली आणि पुढे इतिहास घडला.
 
मूकनायकची जाहिरात 'केसरी'मध्ये द्यावयाची होती. त्यावेळी लोकमान्य टिळक हयातही होते पण तेव्हा पैसे देऊनही ही मूकनायकाची जाहिरात द्यायला 'केसरी'ने तयारी दर्शवली नव्हती.
 
याबाबत डॉ. आंबेडकरांनी लिहिले होते, "आम्हांस पक्के आठवते की जेव्हा आम्ही मूकनायक पत्र सुरू केला होते तेव्हा केसरीला आमची जाहिरात फुकट छापा अशी विनंती केली होती. पण ती धुडकावून लावण्यात आली. तदनंतर तुमचा आकार देतो, छापा असे लिहिल्यावर जागा रिकामी नाही असे उत्तर देण्यात आले!" (संदर्भ - 20 मे 1927, बहिष्कृत भारत, महाराष्ट्र शासन सोर्स मटेरिअल ग्रंथ)
 
यावरुन आपल्या हे लक्षात येऊ शकते की अस्पृश्य वर्गाच्या उत्थानासाठी त्याकाळात मुख्य प्रवाहातील वृत्तपत्र पोषक नाहीत, तेव्हा आपल्यालाच स्वतःला हे कार्य हाती घ्यावे लागेल असा विचार डॉ. आंबेडकरांनी केलेला दिसतो.
 
मूकनायकच्या पहिल्या अंकातील मनोगतात ते आपली भूमिका मांडतात की, "आमच्या या बहिष्कृत लोकांवर होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास, तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरूपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही.
 
"परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्रांकडे न्याहाळून पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रें विशिष्ट जातीचे हितसंबंध पाहाणारी आहेत इतर जातींच्या हिताची त्यांना परवा नसते."
 
डॉ. आंबेडकर पुढे म्हणतात, "दीनमित्र, जागरूक, डेक्कन रयत, विजयी मराठी, ज्ञानप्रकाश, सुबोधपत्रिका या पत्रांतून बहिष्कृत समाजाच्या प्रश्नांची चर्चा वारंवार होते. परंतु ब्राह्मणेतर या अवडंबर संज्ञेखाली मोडत असलेल्या अनेक जातींच्या प्रश्नांचा ज्यात खल होतो, त्यात बहिष्कृतांच्या प्रश्नांचा सांगोपांग ऊहापोह होण्यास पुरेशी जागा मिळणे शक्य नाही, हेही पण उघड आहे.
 
"त्यांच्या अतिबिकट स्थितीशी संलग्न असलेल्या प्रश्नांची वाटाघाट करण्यास एक स्वतंत्र पत्र पाहिजे हे कोणीही कबूल करील ही उणीव भरून काढण्यासाठी या पत्राचा जन्म आहे." ( संदर्भ - मूकनायक- 31 जानेवारी, 1920, महाराष्ट्र शासन सोर्स मटेरिअल ग्रंथमालिका )
 
डॉ. आंबेडकर तेव्हा सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, त्यामुळे त्यांनी या पत्राची जबाबदारी पांडुरंग नंदराम भटकर यांच्यावर सोपवली होती. काही अंक निघाल्यावर डॉ. आंबेडकर आपले अपुरे राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी परदेशात गेले. त्यानंतर मूकनायक बंद पडले. ते विलायतेला गेल्यानंतर केवळ एक अंक निघाला.
 
मूकनायकचे एकूण 13 अंक निघाले. आपले शिक्षण पूर्ण होऊन जेव्हा आपण भारतात परत येऊ तेव्हा या वृत्तपत्राची भरभराट झालेली आपल्याला पाहायला मिळेल अशी आशा डॉ. आंबेडकरांना वाटत होती पण त्यांची ही इच्छा पूर्ण झाली नाही.
 
या गोष्टीची खंत त्यांच्या मनात राहिली. पण नाउमेद न होता त्यांनी 3 एप्रिल 1927 ला 'बहिष्कृत भारत' सुरू केले.
 
बहिष्कृतांवरील अन्यायाला जगासमोर आणणारे 'बहिष्कृत भारत'
बहिष्कृत भारतासाठी डॉ. आंबेडकरांना आपले इतर व्याप सांभाळून काम करावे लागत असे.
 
प्रा. अरुण कांबळेंनी 'जनता पत्रातील लेख' या पुस्तकाचे संपादन केले आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत अरुण कांबळेंनी 'बहिष्कृत भारता'चे कामकाज डॉ. आंबेडकर कसे पाहायचे यावर प्रकाश टाकला आहे.
 
अरुण कांबळे लिहितात की "बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड आर्थिक ओढग्रस्ती सोसूनही बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरू ठेवले. बहिष्कृतच्या काळात ते 24-24 रकाने स्वतः भरुन काढत. कोणीही साहाय्यक त्यांना नव्हता, असा उल्लेख त्यांनी केला आहे."
 
बहिष्कृत भारत हे पाक्षिक दोन वर्षं चालले. बहिष्कृत भारत हे अल्पकाळासाठी चाललं असं कुणी म्हणू शकतं परंतु डॉ. आंबेडकरांनी सुरू केलेल्या अस्पृश्यतेविरोधातील लढ्याला लोक चळवळ बनवण्याचे श्रेय याच पत्राला द्यावे लागेल.
 
महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला केवळ 13 दिवस झाले होते. त्यानंतर हे पत्र सुरू करण्यात आले. ही दोन वर्षं डॉ. आंबेडकरांच्या सामाजिक जीवनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती. या दोन वर्षांत महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, पुण्यातील पर्वती मंदिरात प्रवेशाचा सत्याग्रह अशा महत्त्वपूर्ण घटना घडल्या.
 
याच काळात डॉ. आंबेडकरांची विधिमंडळातील कारकीर्द देखील बहरू लागली होती. राज्यभरात अस्पृश्य परिषदा, शेतकरी परिषदांच्या निमित्ताने डॉ. आंबेडकर पूर्ण महाराष्ट्रभर फिरून लोकसंग्रह करत असत. 'बहिष्कृत भारत' हे त्यांच्या चळवळीचे मुखपत्रच बनले होते.
 
महार वतने खालसा करण्यात यावी असं डॉ. आंबेडकरांना वाटत असे. ही प्रथा बंद व्हावी यासाठी त्यांनी बहिष्कृत भारतमधून आपली भूमिका लोकांना समाजावून सांगितली.
 
डॉ. आंबेडकर जिथे भाषण करत असत तेथील भाषण बहिष्कृत भारतमध्ये प्रसिद्ध केले जात असे.
 
बहिष्कृत भारतमध्ये केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेच लेख येत असत असे नाही. त्यांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांना त्यांनी लिहिण्यास प्रोत्साहित केले. राज्यभरात ज्या-ज्या ठिकाणी चळवळीसंबंधी ठराव होत असत, त्याचे वृत्त बहिष्कृत भारतात येत असे.
 
विचार मानस, पत्रव्यवहार अशा स्तंभातून समाजातील सर्व स्तरातील लोक आपल्या भावना व्यक्त करत. त्यांच्या लेखाला यथोचित स्थान पत्रातून मिळत असे. काही जण टोपणनावाने या पत्रातून लिहित असत.
 
बहिष्कृत भारतातले वृत्तांकन
डॉ. आंबेडकरांच्या कार्याने प्रोत्साहित होऊन पुरोगामी विचारसरणी अवलंबणाऱ्यांचे अभिनंदन करणाऱ्यांचे पत्र देखील लोक पाठवत असत.
 
याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे 12 ऑगस्ट 1927चा अंक.
 
या दिवशी प्रकाशित झालेल्या अंकात एका पत्रात डॉ. पंजाबराव देशमुखांनी अस्पृश्यता निवारणासाठी कार्य केल्याचा उल्लेख आहे. त्यांच्या घरी दरवर्षी ब्राह्मण भोजन देण्याचा प्रघात होता.
 
तो त्यांनी बंद करून वसतिगृहात शिकणाऱ्या मुलांना भोजन दिले होते. वसतिगृहातील मुलांमध्ये कुठलाही भेदभाव न ठेवता डॉ. देशमुखांच्या मातोश्रींनी सर्वांचे आदरातिथ्य करून समभावाने जेऊ घातले असे 'अमरावतीकर' या नावाने पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे.
 
राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये प्राथमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांवर कसा भेदभाव होतो याची माहिती तक्त्यातून दिली जात असे. मुलांना नेमकं कुठे बसवले जाते, त्या शाळेची इमारत कशा प्रकारची आहे, कोणत्या गावात कशी पद्धत आहे याचा तपशील या तक्त्यातून दिला जात असे.
 
9 तालुक्यातील वेगवेगळ्या लोकांकडून कोणत्या गावात कसा भेदभाव होतो याची माहिती घेऊन हा तक्ता तयार करण्यात आल्याचे आपल्याला दिसते. डॉ. आंबेडकरांना शिक्षणाविषयी तळमळ होती.
 
'शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते प्यायलावर कुणी गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,' असे ते म्हणत असत. त्यांच्या याच तळमळीतून त्यांनी तत्कालीन शिक्षण व्यवस्थेचे प्रश्न आपल्या पत्रकारितेतून मांडले होते.
 
राज्यात जर कुठे अस्पृश्यांवर अत्याचार झाला असेल तर त्याचे वृत्त बहिष्कृत भारतमध्ये दिले जाई. गावगुंडांचे जुलुम, अस्पृश्यांवरील बहिष्कार, तथाकथित शुद्धीकरण अशा प्रकारच्या अनेक बातम्यांना बहिष्कृत भारतात स्थान मिळाले.
 
'बहिष्कृत भारत' 15 नोव्हेंबर 1929 मध्ये बंद पडले. त्यानंतर एका वर्षाने 'जनता' सुरू करण्यात आले.
 
बहिष्कृत भारताचे नाव बदलूनच जनता हे नाव देण्यात आले होते. डॉ. आंबेडकरांनी चालवलेल्या नियतकालिकांपैकी सर्वाधिक काळ जनता हेच पत्र चालले.

'जनतेच्या भाग्योदयासाठी जनता'
24 नोव्हेंबर 1930 ला सुरू झालेले जनता पत्र 1955 पर्यंत चालले. काही काळ बंद पडून त्यानंतर 'जनता' पत्राचे नाव हे 'प्रबुद्ध भारत' ठेवण्यात आले होते.
 
डॉ. आंबेडकरांच्या वृत्तपत्र कारकीर्दीतील सर्वाधिक काळ चाललेले हे नियतकालिक होते. आपल्या वृत्तपत्रीय कारकीर्दीतील सर्वाधिक काळ लेखन डॉ. आंबेडकरांनी जनतासाठी केले.
 
'जनतेच्या भाग्योदयासाठी जनता पत्र प्रमुख साधन उपयोगी म्हणून पडेल,' अशी आशा डॉ. आंबेडकरांनी व्यक्त केली होती.
 
'गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करुन द्या म्हणजे तो पेटून उठेल,' हे ब्रीदवाक्य घेऊन जनता पत्र तत्कालिक प्रश्नांवर चर्चा घडवून आणू लागले. 'जनता' पत्र हे केवळ डॉ. आंबेडकरांच्याच नाही तर मराठी पत्रकारितेतील मैलाचा दगड ठरले.
 
1930 नंतरच्या काळात देशात अनेक राजकीय बदल घडू लागले होते. येत्या काळात स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित आहे पण कोट्यवधी अस्पृश्य आणि मागासवर्गीय जातीतील लोकांच्या स्थितीत बदल झाला नाही तर ते स्वातंत्र्यानंतरही गुलामगिरीतच राहतील, अशी मांडणी डॉ. आंबेडकरांनी केली.
 
आर्थिक ताण सोसूनही सुरू ठेवला 'जनता'
जनता या पत्रामुळे डॉ. आंबेडकरांवर खूप मोठा आर्थिक ताण पडत होता तरी देखील त्यांनी हे नियतकालिक सुरू ठेवले. त्यांनी 25,000 रुपये खर्च करून स्वतंत्र छापखाना उभा करुन दिला होता.
 
पण जसं त्यांचं वय आणि जबाबदाऱ्या वाढू लागल्या तसं जनताची जबाबदारी त्यांना एकट्याला सांभाळताना त्यांच्यावर ताण पडू लागला होता.
 
आपण आता पन्नाशीकडे झुकु लागलो आहोत आपण वेळोवेळी जनता या पत्राला जीवदान दिले आहे पण आता इतर सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ही जबाबदारी पार पाडावी असे त्यांनी म्हटले होते. 'जनता' सुरू ठेवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी वर्गणीदार होऊन या पत्राची जबाबदारी घ्यावी, असे त्यांनी आपल्या लेखात म्हटले होते. (संदर्भ - विसाव्या शतकातील महाराष्ट्र, खंड - 5, लेखक य. दि. फडके)
 
इतर कुणाकडून आर्थिक मदत स्वीकारण्याऐवजी आपल्याच वाचक वर्गाने नियतकालिकांना सहकार्य करावे अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे वर्गणीदार जोडणे, सभासद जोडणे ही कामे करावीत असा सल्ला ते सहकाऱ्यांना देत.
 
'अस्पृश्य वर्ग कितीही गरीब असला तरी आठवड्याला एक आणा खर्च करण्याइतका तरी तो निश्चितच गरीब नाही', असं ते म्हणत. दुसरी गोष्टी म्हणजे समाजातील लोकांनी समोर येऊन जनतासाठी देणग्या द्याव्यात अन्यथा 'जनता' बंद पडेल असं ते म्हणत.
 
समता साप्ताहिक
डॉ. आंबेडकरांनी 29 जून 1928 रोजी 'समता' हे नियतकालिक सुद्धा सुरू केले होते. त्यांनीच स्थापन केलेल्या 'समता सैनिक दला'चे हे मुखपत्र होते.
 
'समता'ची जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांनी देवराव विष्णू नाईक यांच्याकडे सोपवली होती.
 
पुढे हे नियतकालिक बंद पडले असले तरी चळवळीच्या ध्येयावर आधारित नियतकालिक असल्यामुळे महत्त्वपूर्ण ठरते.
 
'भारताला प्रबुद्ध करण्यासाठी प्रबुद्ध भारत'
'जनता'चे नाव बदलून 4 फेब्रुवारी 1956 रोजी 'प्रबुद्ध भारत' ठेवण्यात आले होते. डॉ. आंबेडकरांची संपूर्ण देशाच्या सर्वांगीण उन्नतीबाबत असलेलं दूरदृष्टी, त्यांचे व्हिजन या नावातून दिसते. रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्याची घोषणा त्यांनी प्रबुद्ध भारत मधूनच केली होती.
 
रिपब्लिकन पक्षाची दिशा कशी असेल, या पक्षाची घटना काय आहे, कोणत्या आदर्शांवर हा पक्ष चालणार यासंबंधित सर्व गोष्टी 'प्रबुद्ध भारत' मधून प्रकाशित करण्यात आल्या होत्या.
 
त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर हे वृत्तपत्र त्यांचे सुपुत्र यशवंतराव आंबेडकरांनी चालवले, पुढे ते बंद पडले.
 
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी अलीकडेच पुन्हा प्रबुद्ध भारत वृत्तपत्र आणि वेबसाईट सुरू केली आहे.
 
'भारताला प्रबुद्ध करण्याची त्याकाळी गरज होती, म्हणून प्रबुद्ध भारत हे नाव ठेवण्यात आलं होतं,' असं अॅड. प्रकाश आंबेडकरांनी नव्याने प्रबुद्ध भारत सुरू केल्यानंतर म्हटले होते.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध भारत का सुरू केलं होतं हे सांगताना वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजलीताई आंबेडकर यांनी एका भाषणात सांगितले आहे की, "प्रबुद्ध सुरू करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनात पक्कं केलं होतं की आता आपल्याला आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे.
 
"बाबासाहेब आंबेडकरांना या गोष्टीची जाणीव होती की केवळ कुठल्याही धम्माच्या नुसत्या चालीरिती माहित असून माणसं बदलत नाहीत. त्याच्यामध्ये एक विचार असावा लागतो त्याच्यामध्ये एक जाणीवपूर्वक असं उचललेलं पाऊल असावे लागते.
 
"बाबासाहेबांनी दीक्षा घेतली म्हणून मला दीक्षा घ्यायची हे बाबासाहेबांना नको होतं. ज्या धर्माने आपले माणूसपण नाकारले त्या धर्माचा त्याग करून समता असणारा धम्म स्वीकारावा, सर्वांनी विचारपूर्वक कृती करावी हे त्यांना अपेक्षित होतं त्यातून त्यांनी प्रबुद्ध भारत सुरू केला," असं अंजलीताई सांगतात.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्वसमावेशक आणि विविधांगी पत्रकारिता
डॉ. आंबेडकरांनी आपल्या पत्रकारितेच्या कारकीर्दीत विविधांगी आणि विपुल लेखन केले. त्यांची विद्वता आणि ग्रंथांच्या व्यासंगामुळे ते कुठलाही विषय चटकन समजून घेऊ शकत आणि समजावून देखील सांगू शकत असत.
 
कठीणातील कठीण विषय सामान्य माणसापर्यंत कसा पोहचावता येईल हे ते पाहत. ते विषय देखील लोकांच्या जिव्ह्याळ्याचेच घेत. त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व होते. मराठीच्या अभिजात साहित्याचा त्यांचा अभ्यास होता. अत्यंत ओघवत्या भाषेत ते आपला विषय मांडत.
 
कधी गोष्ट सांगून, कधी दृष्टांत देऊन ते लोकांच्या मनाचा ठाव घेत. तर कधी वीज कडाडल्याप्रमाणे गर्जना करत ते अन्यायाविरुद्ध तुटून पडत.
 
ग्रामीण भागात प्रचलित म्हणी असो वा जगभरातील उत्तमोत्तम साहित्यिकांचे वचन असो, त्या गोष्टीचा वापर ते अत्यंत चपखलपणे आपल्या लिखाणात करत. त्यांच्या लेखनात मराठी भाषेचं सौंदर्य आणि समृद्धी पाहायला मिळते.
 
मागास जातीतील लोकांना त्यांचे हक्क मिळावेत, शिक्षणाचा प्रचार-प्रसार व्हावा, अस्पृश्यता पूर्णपणे नष्ट व्हावी, महिला, अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे रक्षण व्हावे, धर्मावरील धर्ममार्तंडांचा पगडा कमी होऊन जनतेनी वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा तरच त्यांची उन्नती होईल अन्यथा त्यांना गुलामगिरीतच खितपत पडावे लागेल, अशी भीती डॉ. आंबेडकरांना वाटत होती. त्यातूनच जनोद्धारासाठी त्यांनी पत्रकारिता केली.
 
विशिष्ट जातसमूहाच्याच लोकांचे हितसंबंध जपणाऱ्या आणि इतर जातींबद्दल अनास्था दाखवणाऱ्या तत्कालीन वृत्तपत्रांना त्यांनी इशारा दिला होता की तुमच्या या वृत्तीचा फटका हा तुम्हालाही बसू शकतो.
 
बहिष्कृत भारतातील मनोगतात ते म्हणतात, 'एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातीस बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही एक नौकाच आहे....एका जातीचे नुकसान केल्यामुळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार,' हे सांगत असताना ते समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून भाष्य करतात.
 
आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात अस्पृश्यांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे अन्यथा त्यांची अवस्था आता आहे त्याहून बिकट होईल असा इशारा त्यांनी दिला होता.
 
महारवतनं हे गुलामगिरीचे चिन्ह असून ती रद्द झाली पाहिजे हे देखील त्यांनी आपल्या पत्रकारितेतून सांगितले.
 
महिलांचे सबळीकरण, शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, अल्पसंख्यांकांचे प्रश्न, भाषावार प्रांतरचनेचा मुद्दा अशा विविध विषय त्यांनी हाताळले.
 
मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत ही नियतकालिकं डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर सुरू केली आणि त्यातून आपल्याला त्यांच्या वैचारिक प्रतिभेची आणि प्रतिमेचे दर्शन घडते. त्यांच्या पत्रकारितेचा वारसा अनेकांना घेत आपल्या परीने ही चळवळ जिवंत ठेवण्याचे कार्य केले.
 
डॉ. आंबेडकरांच्या चळवळीशी जोडली गेलेली नियतकालिके
डॉ. आंबेडकरांनी स्वतः तर पत्रकारिता केलीच पण त्यांच्यामुळे चळवळीतील इतरांनाही प्रेरणा मिळाली आणि त्यांनी चळवळीला सहकार्य करण्याच्या हेतूने आपली नियतकालिके सुरू केली.
 
गरुड, दलित बंधू आणि अरुण या नियतकालिकांचा या मध्ये समावेळ होतो. गरुड हे पाक्षिक दादासाहेब शिर्केंनी सुरू केले होते. दादासाहेब शिर्के हे कोल्हापूरचे होते आणि आंबेडकरी चळवळीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.
 
दलित बंधू नियतकालिक डॉ. आंबेडकरांचे सहकारी आणि मुंबई काउन्सिलचे सदस्य पी. एन. राजभोज यांनी सुरू केले होते.
 
नागपूरहून प्रकाशित होणारे 'अरुण' हे साप्ताहिक श्री. म. ठवरे यांनी सुरू केले होते.
 
'अरुण'ला डॉ. आंंबेडकरांनी आशीर्वाद दिले होते याची नोंद सापडते.
 
29 मे 1947 ला लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख आहे. या साप्ताहिकाची गरज दलित वर्गाला आहे असं डॉ. आंबेडकरांनी तेव्हा म्हटले होते.
 
"वेळोवेळी उपस्थित होणाऱ्या अनेक प्रश्नासंबधी जनतेला योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी हे वृत्तपत्र उत्तम तऱ्हेनी पार पाडील अशी आशा आहे, माझ्या दलितवर्गाने अरुणला पूर्ण सहकार्य द्यावे," असे आशीर्वाद डॉ. आंबेडकरांनी 'अरुण'ला दिले होते. (संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड - 20, महाराष्ट्र शासन)
 
डॉ. आंबेडकरांच्या प्रेरणेतून अनेक नियतकालिके त्या काळात निर्माण झाली होती असं चाळीसगाव येथील प्रा. गौतम निकम सांगतात.
 
बीबीसी मराठीला त्यांनी सांगितले की "1920 ते 1950 या कालखंडात बाबासाहेंबाच्या पत्राशिवाय अस्पृश्य समाजातून कितीतरी पत्रे निघाली. त्यात गरुड, दलितबंधू, पतितपावन, दलित सेवक, दलित निनाद, दलित भारत, अरुण जागृती, जयभीम, चोखामेळा, निर्धार, लोकसेवक, उद्धार, लोकप्रिय आणि सिद्धार्थ या नियतकालिकांचा समावेश होतो."
 
प्रा. निकम सांगतात, "या पत्रांच्या मालकांची संपादकांची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. अपुऱ्या सुविधा आणि वर्गणीदारांची मारामार होती. परंतु अशाही प्रतिकूल परिस्थितीत केवळ सामाजिक बांधिलकीपोटी त्यांनी उत्स्फूर्तपणे आंबेडकरी विचार आणि चळवळ तळागाळातील समाजापर्यंत पोहचविण्यासाठी अपार कष्ट केले."
 
डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेचे महत्त्व
डॉ. आंबेडकरांनी आर्थिकदृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या पीडित असलेल्या वर्गाला, सर्व बाजूने उपेक्षित असलेल्या वर्गाला केंद्रस्थळी आणण्याचे काम डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेनी केले, असं हिंदी भाषेचे साहित्यिक आणि आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक प्रा. डॉ. सूर्यनारायण रणसुभे सांगतात.
 
डॉ. रणसुभे यांनी 'पत्रकारिता के युगनिर्माता डॉ. भीमराव आंबेडकर' हे पुस्तक लिहिले आहे.
 
बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. रणसुभे म्हणाले की "डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तीन पद्धतीने लिहित होते. पहिले म्हणजे जागतिक पातळीवर काय सुरू आहे याचा संक्षिप्त आढावा ते घेत होते. दुसऱ्या पातळीवर महाराष्ट्रातील उपेक्षित वर्गावर होणारा अत्याचार, अन्यायाच्या बातम्या ते देत असत. आणि तिसऱ्या पातळीवर ते या वर्गाच्या प्रबोधनाचे काम देखील करत असत. केवळ नकारात्मक भूमिका ते घेत नव्हते तर ते त्यांना पर्याय देखील सुचवत असत."
 
डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता ही आधुनिक भारताच्या निर्माणासाठी होती असाही एक विचार त्यांच्या पत्रकारितेबाबत मांडण्यात येतो.
 
डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेचे विविध पैलू उलगडून दाखवणारा ग्रंथ 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता' हा ग्रंथ लातूरच्या राजर्षी शाहू कॉलेजच्या पुढाकारातून प्रकाशित करण्यात आला आहे.
 
या पुस्तकाचे संपादक डॉ. संभाजी पाटील याच पुस्तकातील आपल्या लेखात म्हणतात, "डॉ. आंबेडकरांनी चळवळीच्या माध्यमातून उभा केलेला लढा केवळ अस्पृश्यता निर्मूलन एवढ्यापुरताच मर्यादित नव्हता. त्यांचा लढा व्यवस्था परिवर्तनासाठी होता. मानवमुक्तिसाठी होता."
 
"भेदभावाच्या पलीकडे असणारा समाज त्यांना हवा होता. शेटजी-भटजी संस्कृती नष्ट करुन स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्यायावर आधारित नवसमाज निर्माण करण्यासाठी होता. त्यातूनच एकसंध आधुनिक भारत निर्माण होणार याची पूर्ण जाणीव त्यांना होती."
 
डॉ. पाटील पुढे लिहितात, "भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी बहिष्कृत समाज मानवी पातळीवर येणे काळाजी गरज आहे, याच गरजेतून डॉ. आंबेडकरांची पत्रकारिता उदयास आली."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ स्थापनेत भाजप नेतृत्व हस्तक्षेप करणार नाही

एक राष्ट्र, एक निवडणूक' लोकशाही नष्ट करण्याचा भाजपचा डाव : संजय राऊत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली

LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली

ग्रँडमास्टर डी गुकेश जगज्जेता बनला, बक्षीस म्हणून इतके कोटी रुपये मिळाले

पुढील लेख
Show comments