लेखक आणि पत्रकार आतिश अली तासीर यांचं ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्ड भारत सरकारकडून रद्द करण्यात आलंय. या निर्णयावर भारतानं पुनर्विचार करावा, अशी विनंती करणारं पत्र जगभरातील 260 लेखकांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलंय. यात नोबेल विजेते लेखकांचाही समावेश आहे.
नोबेल विजेते ओरहान पामुक, जे. एम. कोएट्जी, तसेच बुकर विजेते सलमान रश्दी यांच्यासारख्या लेखकांचा पत्र पाठवणाऱ्यांमध्ये समावेश आहे.
OCI कार्डामुळे भारतीय वंशाच्या परदेशी लोकांना भारतात येणं, इथं राहणं आणि काम करण्याचे अधिकार प्राप्त होतात. परंतु अशा व्यक्तीला मतदान करणं आणि कुठलंही संविधानिक पद स्वीकारण्याचे अधिकार नसतात.
आतिश अली तासीर यांचे वडील सलमान तासीर पाकिस्तानचे उदारमतवादी नेते होते. ईशनिंदेच्या कायद्याविरोधात बोलल्यामुळे पाकिस्तानात त्यांच्याच अंगरक्षकानं त्यांच्यावर गोळी घालून हत्या केली होती. भारतातील प्रसिद्ध पत्रकार तवलीन सिंह या तासीर यांच्या आई आहेत.