Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचेही 'मुख्यमंत्री आमचाच'? : महाराष्ट्र सरकार स्थापना

शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचेही 'मुख्यमंत्री आमचाच'? : महाराष्ट्र सरकार स्थापना
भारतीय जनता पार्टीने सरकार स्वबळावर सत्ता स्थापन करण्यात असमर्थता दर्शवल्यानंतर आता उर्वरित शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये एकमत होऊन किमान सामाईक कार्यक्रम तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
 
गुरुवारी मुंबई झालेल्या तिन्ही पक्षांच्या एकत्र बैठकीत एक किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. हा मसुदा तिन्ही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात येईल, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
 
हे तिन्ही पक्ष वेगवेगळे मुद्दे घेऊन निवडणूक लढवत होते. तसंच शिवसेनेनं भाजपबरोबर युती करून दोन्ही काँग्रेसविरोधात निवडणूक लढवली होती. तसंच शिवसेनेचे काही मुद्दे या दोन्ही काँग्रेसच्या अगदीच विरोधातील आहेत.
 
उदाहरणार्थ आगामी काळात सरकार स्थापन झाल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याची शिफारस केंद्राला करावी किंवा तशा आशयाचा ठराव मांडला तर शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेतील? कलम 370 रद्द करण्याच्या भाजप सरकारच्या निर्णयाला शिवसेनेने थेट पाठिंबा दिला होता. इतकेच नव्हे तर तेव्हा कॅबिनेटमध्ये असणारे शिवसेनेचे मंत्री अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरून कौतुक केलं होतं. अशा स्थितीमध्ये आगामी काळामध्ये हे तिन्ही पक्ष कसे एकमेकांना सांभाळून घेतील हा प्रश्न उरतोच.
 
सध्या तरी अशा सरकारच्या अजेंड्यातील मुद्द्यांपेक्षा सत्तेतील पदांच्या आणि जबाबदारी वाटपावर जास्त भर दिला जात असल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेबरोबर सरकार करायचं झालं तर कोणते मुद्दे समोर ठेवावे लागतील याची दोन्ही काँग्रेस चर्चा करत आहेत तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आपली मुख्यमंत्रिपदाची मागणी कायम ठेवून आहेत.
 
कसा असेल फॉर्म्युला?
मंगळवारी काँग्रेसचे नेते अहमद पटेल व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मंगळवारी तासभर चर्चा झाली. त्याबाबत सर्वत्र बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या बातम्यांमध्ये शिवसेनेने स्वतःसाठी मुख्यमंत्रिपद आणि दोन्ही काँग्रेससाठी उपमुख्यमंत्रिपद देण्याचा फॉर्म्युला सुचवल्याचं प्रसिद्ध झालं होतं.
 
तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये दोनच जागांचे अंतर असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रिपदही हवे असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सुरुवातीची अडीच वर्षं शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यात यावं असा प्रस्ताव दोन्ही काँग्रेसने दिल्याचं सांगण्यात येतं. त्यावर शिवसेनेने अजून स्पष्ट प्रतिसाद दिलेला नाही.
webdunia
गुरुवारी शिवसेनेच्या दोन नेत्यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी समन्वय बैठक झाली. या बैठकीत गेल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई सहभागी झाले होते.
 
शिवसेनेचे खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयातून बाहेर पडताच त्यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचा पुनरुच्चार केला. दोन्ही काँग्रेसची मुख्यमंत्रिपदाची संभाव्य मागणी आणि त्याबद्दल होणारी चर्चा याबद्दल बीबीसीच्या भारतीय भाषांचे डिजिटल एडिटर मिलिंद खांडेकर यांनी राऊत दोन्ही काँग्रेसला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे.
 
ते म्हणतात, "अनेक प्रश्न विचारले तरी राऊत यांनी पुन्हा निवडणुका होणार नाहीत आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असं उत्तर दिलं आहे."
 
'शिवसेना मुख्यमंत्रिपदाबाबत आग्रही'
राज्यपालांकडे जाताना पुरेसं पाठबळ नसल्याचं स्पष्ट झाल्यावर शिवसेनेची स्थिती ना घरकी ना घाटकी अशी झाली होती. भाजपाबरोबर असते तर किमान उपमुख्यमंत्रिपद त्यांना मिळालं असतं पण आता भाजपाशी मैत्री तोडल्यावर मुख्यमंत्रिपदाच्याखाली तडजोड नाही हे शिवसेना स्पष्ट बोलून दाखवत आहे.
 
भाजपाबरोबर असताना चांगली मंत्रिपदं आणि जास्त मंत्रिपदं वाट्याला आली असती मात्र आता मंत्रिपदं तिघांमध्ये वाटावी लागणार आहेत त्यामुळे शिवसेना आपला मुख्यमंत्रिपदाचा आग्रह सोडण्याच्या विचारात नाही.
 
राष्ट्रवादी आणि काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबाबत बोलताना खांडेकर म्हणतात, "राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाबाबत किमान सामाईक कार्यक्रमानंतर ठरवू असे स्पष्ट केलं आहे. परंतु खासगीत मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केवळ 2 च जागांचे अंतर असल्यामुळे मुख्यमंत्रिपदाची अडीच वर्षांसाठी मागणी होऊ शकते हे नाकारत नाहीत."
 
राष्ट्रवादी काँग्रेस इथे मुख्यमंत्रिपदाचा आग्रह करू शकते. तसंच काँग्रेसच्या जागाही फारशा कमी नाहीत. काँग्रेसला 44 जागा आहेत. म्हणजेच भाजप आणि शिवसेनेमध्ये जितकं अंतर होतं तितकं शिवसेना आणि या दोन्ही काँग्रेसमध्ये नाही. म्हणूनच शिवसेना मुख्यमंत्रिपदामध्ये भागीदार येण्याला थेट प्रत्युत्तर देत आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांना सांगितलं, "शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेचा सन्मान आम्ही ठेवू असं सांगितले आहे. मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरच शिवसेना भाजपापासून दूर झाली आहे. त्यामुळे त्यांचा आम्ही सन्मान ठेवू."
 
"काँग्रेस या सरकारला बाहेरून पाठिंबा देऊ इच्छित आहे. त्यांना सरकारमध्ये येण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विनंती केली आहे. त्यामुळे किमान सामाईक कार्यक्रमावर चर्चा सुरू आहे. त्यावर शिवसेनेशी चर्चा होऊन सहमती झाल्यावर सरकार स्थापन होईल," असं मलिक सांगतात.
 
"शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळाल्यावर दोन्ही काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपदं मिळतील अशी चर्चा झालेली नाही. कारण काँग्रेस मुळात सरकारमध्ये येण्याऐवजी बाहेरून पाठिंबा देण्याचा विचार करत होती त्यामुळे पदाचा विषयच येत नाही. सध्या केवळ सरकार कोणत्या अजेंड्यावर काम करेल यावर चर्चा सुरू आहे," असं मलिक यांनी सांगितलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चांगली बातमी : निवृत्तीवेतनधारकाचे निवृत्तीवेतन संयुक्त खात्यात जमा करण्यास मान्यता