Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आदित्य ठाकरे: शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या 'उमेदवारा'चा आतापर्यंतचा प्रवास

आदित्य ठाकरे: शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपदाच्या 'उमेदवारा'चा आतापर्यंतचा प्रवास
'मला महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे,' असं म्हणत शिवसेना नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपल्या जन आशीर्वाद यात्रेचा शुभारंभ केला आहे.
 
जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यामधून आदित्य ठाकरे यांनी गुरूवारी (18 जुलै) जन आशीर्वाद यात्रेला सुरूवात केली.
 
जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचणे व पक्ष संघटनेचा विस्तार करणे हाच उद्देश असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितलं होतं. या यात्रेमुळं महाराष्ट्र शिवसेनामय होईल असा विश्वासही राऊत यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
 
शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळालं तर त्या पदावर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेच असावेत अशी पक्षासह लोकभावना आहे. ते महाराष्ट्रात सक्षम नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत, असंही संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.
 
ज्या आदित्य ठाकरेंमध्ये संजय राऊत यांना भावी मुख्यंत्री दिसत आहेत, त्यांचा राजकारणातला प्रवेश सात वर्षांपूर्वी म्हणजेच 2012 साली झाला.
 
ऑक्टोबर 2012मध्ये भावुक आवाजात बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, 'उद्धव आणि आदित्यला मी तुमच्या हवाली करत आहे. त्यांची काळजी घ्या.' त्यावेळी आदित्य 22 वर्षांचे होते आणि युवा सेनेचे अध्यक्ष होते. आता ते 29 वर्षांचे आहेत आणि शिवसेनेचे नेते झाले आहेत.

webdunia

 
मुंबईत शिवसेनेच्या कार्यकारिणीत आदित्य ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. शिवसेनेत नेता हे एक महत्त्वाचं पद आहे. आदित्य गेल्या पावणे सहा वर्षांपासून राजकारणात आहेत. भविष्यात त्यांचं नेतृत्व कसं असेल, याविषयीचा अंदाज त्यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीवरून बांधता येऊ शकतो.
 
त्यांचं शिक्षण सेंट झेविअर्स शाळेत आणि के. सी. महाविद्यालयातून झालं. त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे.
 
2007मध्ये वयाच्या 16व्या वर्षी त्यांच्या 'माय थॉट्स इन व्हाईट अँड ब्लॅक' या हिंिीदी, इंग्रजी आणि मराठी भाषेतल्या कवितासंग्रहाचं प्रकाशन झालं. नंतर 'उम्मीद' नावाचा 8 गाण्यांचा अल्बमही प्रसिद्ध झाला.
 
राजकारणात प्रवेश
राज ठाकरे शिवसेनेत असताना यांच्याकडे भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी होती. त्यांनी मनसे हा नवा पक्ष काढल्यानंतर शिवसेनेने विद्यार्थी सेनेच्या जागी युवा सेना स्थापन केली.
 
2010 सालच्या दसरा मेळाव्यात बाळ ठाकरेंनी युवा सेनेची घोषणा केली आणि नातू आदित्य ठाकरेंकडे या नव्या सेनेची जबाबदारी सोपवली.
webdunia
"आदित्य ठाकरेंना कोवळ्या वयात राजकारणात आणलं गेलं. असं आणायला पाहिजे होतं की नव्हतं ही पुढची गोष्ट आहे. पण ठाकरे घराण्यातली तिसरी पिढी असल्यानं त्यावेळी त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या," असं ज्येष्ठ पत्रकार आणि शिवसेनेचे माजी खासदार भारतकुमार राऊत सांगतात.
 
तर राजकीय पत्रकार युवराज मोहिते म्हणतात, "उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख म्हणून धुरा सांभळल्यानंतर आदित्य ठाकरेंचा उदय झाला. उद्धव यांच्या हृदयावरची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्यावर शारीरिक मर्यादा आल्या. या मर्यादांमुळेच आदित्य ठाकरेंना त्यांनी राजकारणात आणलं गेलं. ऑक्टोबर 2012मध्ये भावुक आवाजात बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, 'उद्धव आणि आदित्यला मी तुमच्या हवाली करत आहे. त्यांची काळजी घ्या.' त्यावेळी आदित्य 22 वर्षांचे होते आणि युवा सेनेचे अध्यक्ष होते. आता ते 27 वर्षांचे आहेत आणि शिवसेनेचे नेते झाले आहेत.
 
नाईट लाईफ ते व्हॅलेंटाईन
गेल्या काही वर्षांत आदित्य ठाकरेंनी मोजक्या विषयांवर मतं व्यक्त केली आहेत. त्यांनी निवडक मुद्द्यांवर 'आंदोलनं' केली आहेत. या विषयांच्या निवडींवरून आणि 'आंदोलनां'च्या स्वरूपांवरून त्यांच्याविषयी महत्त्वाची माहिती कळते.
 
2010मध्ये रोहिंग्टन मिस्त्री यांच्या 'सच अ लाँग जर्नी' या पुस्तकाच्या प्रती जाळून त्यांनी पहिलं आंदोलन केलं. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हे पुस्तक काढून टाकण्यासाठी त्यांनी हे आंदोलन छेडलं होतं. या पुस्तकामुळे मराठी माणसाचा अपमान होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. अखेर हे पुस्तक अभ्यासक्रमातून हटवण्यातही आलं.
 
आदित्य यांनी आतापर्यंत मुंबईतलं नाईट लाईफ जिवंत रहावं आणि रूफ टॉप हॉटेलना परवानगी मिळावी, यांसाठीचा आग्रह धरला. मुंबईतल्या राणीच्या बागेत पेंग्विन यावेत, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी मुंबईतल्या मरीन लाइन्स तसंच वडाळ्यात खुले जिमही सुरू केले.
 
"त्यांना मुंबई विद्यापीठासारखेच प्रश्न समोर दिसतात. नाईट लाईफ, रूफ टॉप हॉटेल हे मुद्दे राज्याच्या नेत्याला उचलायची आवश्यकता नाही. ग्रामीण तरुणांना आदित्यकडून कोणत्याच अपेक्षा नाहीत. शिवसेनेनं अजूनही त्यांना संपूर्ण महाराष्ट्राचा नेता म्हणून पुढे आणलेलंच नाही," असं भारतकुमार राऊत म्हणतात.
 
शिवसेनेने अनेक वर्ष व्हॅलेंटाईन डेला कडाडून विरोध केला. हा परकीय सण आम्ही साजरा करणार नाही, अशी भूमिका घेत शिवसैनिकांनी दुकानांची तोडफोड केली. पण तरुणांपर्यंत पोहोचायचं असेल, तर ही भूमिका बदलावी लागेल, असं आदित्य ठाकरेंनी वेळीच ओळखलं.
 
"व्हॅलेंटाईन-डेला असलेला शिवसेनेचा विरोध आदित्यमुळे मावळला. ते कवी मनाचे आहेत. त्यांना राजकारणाचा तितका आवाका नाही. तसंच अनुभवही नाही. सध्या त्यांच्यामुळे तरुण शिवसेनेकडे येणं कठीण आहे," असं युवराज मोहिते म्हणतात.
 
"नुकत्याच राज्यात 13 हजार शाळा बंद पडल्या. या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आणि शिवसेनेनं काय भूमिका घेतली? तरुणांसाठीच्या कार्यक्रमाचीही पक्षाकडे वानवा आहे. त्यामुळे आता मिळालेलं नेतेपद हेच त्यांच्यापुढचं आव्हान आहे." असंही ते स्पष्टपणे म्हणतात.
 
नाईट लाईफपासून पेंग्विनपर्यंत युवा सेनेने आतापर्यंत जे विषय मांडले, ते मुख्यतः मुंबईभोवतीच होते.
 
"आदित्य ठाकरेंभोवती जे वर्तुळ आहे ते मुंबईकेंद्री आहे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं व्हावं याचा विचार पक्षाकडून होत असला तरी ठोस कार्यक्रम दिसत नाही," असं 'द हिंदू'चे मुंबईत पत्रकार आलोक देशपांडे म्हणतात.
webdunia
'खणखणीत आवाजच नाही'
आदित्य ठाकरेंचं नेतृत्व कसं आहे, हा प्रश्न आता विचारला जाईल. लोकसत्ताचे राजकीय पत्रकार संदीप आचार्य सांगतात, "आदित्य ठाकरे हे शांत, संयमी नेते आहेत. मात्र शिवसेनेच्या बाजाचा आक्रमक आवाज त्यांच्याकडे नाही. इंदिरा गांधी, बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी यांच्या आवाजात धमक होती. तो खणखणीत आणि दमदार आवाज त्यांच्याकडे नाही."
 
ते पुढे सांगतात, "हे जरी असलं तरी ते महाराष्ट्रभर फिरतात, त्यांची शिस्तबद्ध वाटचाल सध्या सुरू आहे. तसंच उत्तम शिक्षण घेतल्यानं प्रत्येक मुद्दा ते अभ्यासपूर्ण रीतीनं मांडतात. मनसेकडे गेलेला तरुणही त्यांच्याकडे वळताना दिसतो आहे. काम करण्यासाठी त्यांच्याकडे अजून बराच कालावधी आहे. त्यामुळे इतक्यातच त्यांचं यशापयश मोजणं ही घाई ठरेल."
 
पण भारतकुमार राऊत यांचं थोडं वेगळं मत आहे. ते म्हणतात, "शिवसेना हा ड्रॅाईंग रुममध्ये वाढणारा पक्ष नसून तो मैदानात वाढणारा पक्ष आहे. आदित्य ठाकरे यांची कितीही इच्छा असली तरी आंदोलन करण्यासाठी लागणारा वकुब, मानसिक ठेवण लागते ती त्यांच्याकडे नाही. ते नेमस्त प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळे एखाद्या प्रश्नाबाबत राज्यपालांना, मुख्यमंत्र्यांना निवेदन देणं, पंतप्रधानांना भेटणं म्हणजेच मवाळ मार्गानं पुढे जाणं हा त्यांचा स्थायी भाव आहे."
 
फक्त मुंबईचे नेते?
आदित्य ठाकरे तरुण पिढीचे नेते असल्याने सोशल मीडियावर खास सक्रिय असतात. त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल विचारलं तर ते ट्विटरवर प्रतिसादही देताना दिसतात.
 
पण त्यांच्या सोशल मीडियाच्या वापराबाबत गंमतही दिसून येते. जिथे मराठी भाषिक मोठ्या संख्येने आहेत, त्या फेसबुकवर त्यांच्या अधिकृत पेजला 1 लाख 23 हजार लाइक्स दिसतात. तर इंग्रजीचं वर्चस्व असलेल्या ट्विटरवर त्यांचे जवळपास 14 लाख 80 हजार फॉलोअर्स आहेत.
 
आदित्य ठाकरेंवर आरोप होतो की त्यांचं नेतृत्व शहरी आणि मुंबई केंद्री आहे. त्याबद्दल युवा सेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक बीबीसी मराठीला सांगतात, "आदित्यजींचं नेतृत्व हे जरी मुंबईच्या विषयांभोवती म्हणजे रूफ टॉप हॉटेल, नाईट लाईफ या मुद्द्यांभोवती फिरत असलं तरी युवा सेना ही राज्याच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी शिरली आहे. 2011मध्ये जव्हार, मोखाडा या ठाण्याजवळच्या ग्रामीण भागातून आदित्यजींनी नेतृत्व म्हणून आपल्या कामांना सुरुवात केली. या भागातला कुपोषण आणि पाण्याचा मुद्दा त्यांनी उचलला होता."
 
लोकांच्या मूळ प्रश्नांवर आदित्य बोलत नाहीत, या आरोपाबद्दल पूर्वेश म्हणतात, "महाराष्ट्रात शिक्षणाबाबत मोठा गोंधळ झाला आहे. म्हणून आदित्यजींसोबत आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. पण त्यांच्याकडून आम्हांला प्रतिसादच मिळत नाही. अखेर आदित्यजींच्या सल्ल्याने शिक्षणाच्या प्रश्नावर आम्ही पक्षाच्या आमदारांकडून विधानसभेत लक्षवेधीही मांडल्या."
 
आदित्य ठाकरेंच्या रूपाने आता ठाकरेंची तिसरी पिढी शिवसेनेत नेतेपदी आली आहे. बाळ ठाकरेंनी आयुष्यभर काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका केली होती. पण आदित्य ठाकरेंच्या निवडीनंतर त्यांनी दावा केला की "ही घराणेशाही नसून घराण्याची परंपरा आहे."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धोनी ते कोहली: सेलिब्रिटींपासून सामान्यांपर्यंत सर्वच जण होत आहेत म्हातारे