Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अफगाणिस्तानः काबूल विमानतळावर हजारोंची गर्दी, 31 ऑगस्टपर्यंत कसं बाहेर काढणार?

Webdunia
बुधवार, 25 ऑगस्ट 2021 (13:49 IST)
अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या 10 दिवसांपासून गोंधळाचं वातावरण कायम आहे.
 
हजारो नागरिकांची गर्दी, आरडा-ओरडा, गोळीबार आणि चेंगराचेंगरी हे इथलं रोजचंच दृश्य बनलं आहे.
 
तालिबानने राजधानी काबूलवर नियंत्रण मिळवल्यानंतर अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांतील नागरिक इथून बाहेर निघण्याच्या प्रयत्नात आहेत.
 
परदेशी नागरिकांना अफगाणिस्तान सोडण्यासाठीची शेवटची मुदत 31 ऑगस्ट देण्यात आली आहे. ही डेडलाईन पुन्हा वाढवण्यात येणार नाही, असं तालिबानच्या प्रवक्त्यांनी मंगळवारी (24 ऑगस्ट) एका पत्रकार परिषदेत म्हटलं.
 
तालिबानच्या मते, अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी इतकी मुदत पुरेशी आहे. पण या वेळेत सगळ्या परदेशी नागरिकांना बाहेर काढणं शक्य नसल्याचं अमेरिका आणि ब्रिटनसह इतर देशांना वाटतं.
 
काबूलवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जगभरात येथील विमानतळावरील फोटो आणि व्हीडिओ व्हायरल झाले होते.
 
यामध्ये अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात अमेरिकन वायू दलाच्या विमानाच्या मागे-पुढे पळताना अनेकजण दिसून आले होते.
 
त्याशिवाय एक फोटो विमानाच्या आत मधीलही होता. यामध्ये शेकडोंच्या संख्येने प्रवासी दाटीवाटीने बसल्याचं दिसून आलं. तसंच एका विमानाला पकडून जात असलेल्या लोकांचा वरून पडत असलेला व्हीडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
 
या गोष्टीला 10 दिवस झाले तरी येथील परिस्थिती बदललेली नाही. येथील गोंधळाच्या स्थितीमुळे सामान पाठवता येत नसल्याचं WHO ने म्हटलं आहे.
 
सध्या काबूल विमानतळावर जगातील सर्वाधिक शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या अमेरिकन लष्कराचा ताबा आहे. पण वास्तवात तेथील परिस्थिती काय आहे, याचा अंदाज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या वक्तव्यावरून कळून येईल.
 
राष्ट्राध्यक्ष बायडन म्हणाले, "मन विचलित करणारी दृश्य अफगाणिस्तानातून येत आहेत. येथून लोकांना बाहेर काढताना त्यांच्या जीवाला धोका असल्याचं लक्षात येतं."
 
15 ऑगस्ट रोजी तालिबानने काबूलवर कब्जा केला. तेव्हापासूनच अमेरिका आणि नाटोच्या सैनिकांसह त्यांना सहकार्य करणाऱ्या हजारो नागरिकांना देश सोडून बाहेर पडायचं आहे.
 
बाहेर जाण्यासाठी तालिबानने 31 ऑगस्टची मुदत देण्यात आली आहे. मुदतीनंतरही इथं राहिलेल्या लोकांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा तालिबानने दिला आहे.
 
रॉयटर्स वृत्तसंस्थेने काबूलमधील एका अज्ञात तालिबानी बंडखोराच्या वक्तव्याचा उल्लेख केला आहे. हा बंडखोर एका मोठ्या गर्दीसमोर भाषण करत होता.
 
तालिबानच्या कट्टरवाद्याने म्हटलं, "आम्ही अमेरिकन लोकांना इथं राहू देणार नाही. त्यांना ही जागा सोडावीच लागेल. हातात बंदूक असो किंवा पेन आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढू."
 
विमानतळावरील सद्यस्थिती
विमानतळावर दिसत असलेल्या गोंधळाचं सर्वात मोठं कारण तालिबानने दिलेली धमकी हेच असल्याचं मानलं जात आहे.
 
गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी गोळीबार आणि चेंगराचेंगरी यांमुळे किमान 20 लोकांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे.
 
बीबीसी प्रतिनिधी लीस डुसेट यांच्या मते, विमानतळावर हजारोंच्या संख्येने लोक अडकले आहेत. एका अहवालात यांची संख्या 14 हजार असल्याचं सांगण्यात आलं.
 
इथून रोज हजारो नागरिकांना बाहेरदेशात पाठवलं जात असलं तरी अजूनही येथे गर्दी आहे.
 
रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, सोमवारी (23 ऑगस्ट) सुमारे 11 हजार लोकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यात आल्याचं अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं.
 
या लोकांना बाहेर काढण्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे. युद्धपातळीवर हे काम केलं जात आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
 
मात्र, या प्रक्रियेवरून अनेकांच्या तक्रारी समोर येत आहेत. अफगाणिस्तानात ब्रिटनच्या लष्करासाठी काम करत असलेल्या दुभाषी आणि इतर कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात असल्याचं म्हटलं आहे. त्यांना कोणत्याही स्थितीत अफगाणिस्तानातून बाहेर पडायचं आहे. सध्या ते काबूल विमानतळावर अडकले आहेत.
 
आपली ओळख उघड न करण्याच्या अटीवर एका व्यक्तीने बीबीसीशी बातचीत केली.
 
तो म्हणाला, "मी ब्रिटिश सैन्यासाठी दुभाषी म्हणून काम करत होतो. पण आता मी इथं अडकलो आहे. मी इथं माझी पत्नी आणि मुलांसह आलो आहे. पण मला आत जाण्यासाठीचा कोणताच मार्ग दिसत नाही. माझं काय होईल, मला माहीत नाही."
 
बीबीसी प्रतिनिधी सिकंदर किरमानी यांनीही काबूल विमानतळावरील सध्याची स्थिती स्पष्ट करून सांगितली.
 
त्यांच्या मते, विमानतळावर हजारोंच्या संख्येने अस्वस्थ लोक दिसत आहेत. यामध्ये अनेकांकडे अफगाणिस्तानबाहेर जाण्याची परवानगीही नाही. पण ते विमानतळाजवळ जमा झाले आहेत.
 
सिकंदर किरमानी यांनी ट्विटरवर लिहिलं, "मी काबूल विमानतळावर जातो, तेव्हा प्रत्येक वेळी आमच्या भोवती लोकांची गर्दी जमते. अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेबाबत त्यांना माहिती हवी असते. यामध्ये अनेकांकडे परवानगी नाही. पण कोणत्याही स्थितीत त्यांना बाहेर पडायचं आहे.
 
सर्वाधिक धोकादायक विमानतळ
वर्ल्ड एअरपोर्ट व्हॉयलन्स कमिशन (WAVC) च्या रँकिंगमध्ये सर्वाधिक धोकादायक विमानतळाच्या यादीत काबूल दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलं आहे.
 
माध्यमांमध्ये प्रसारीत झालेल्या वृत्तांमध्ये WAVC च्या प्रवक्त्यांनी म्हटलं, "गेल्या आठवड्यात विमानतळाबाहेर गोळीबाराच्या किमान 12 घटना झाल्या. अशा घटनांमध्ये गेल्या काही दिवकांपासून नाट्यमयरित्या वाढ पाहायला मिळत आहे."
 
काबूल विमानतळावरील धोका अमेरिका आणि नाटो देशाच्या अधिकाऱ्यांनीही मान्य केला आहे.
 
अमेरिकन अधिकाऱ्यांनी गेल्या शनिवारी (22 ऑगस्ट) आपल्या देशातील नागरिकांसाठी एक इशारा जारी केला होता.
 
काबूल विमानतळावर इस्लामिक स्टेट कट्टरवादी संघटनेच्या अफगाणिस्तान शाखेचे सदस्य काबूल विमानतळावर हल्ला करू शकतात, अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती.
 
गेटच्या बाहेर धोका असू शकतो. आम्ही या सर्व घटनाक्रमांवर लक्ष ठेवून आहोत, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं.
 
किती प्रवासी बाहेर काढले?
काबूल विमानतळावर लोकांना बाहेर काढण्याच्या कामाला वेग देण्यात आल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सांगितलं आहे.
 
सोमवारी (23 ऑगस्ट) एका दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत 10 हजार 900 नागरीकांना काढण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
 
14 ऑगस्टला येथून एअरलिफ्टचं काम सुरू झालं. तेव्हापासून अमेरिकेने सुमारे 48 हजार लोकांना काढण्यात आलं आहे, असं अमेरिकेने सांगितलं.
 
तर ब्रिटनचे संरक्षणमंत्री बेन वालेस यांनी सांगितलं की गेल्या 24 तासांत त्यांनी 2 हजार जणांना बाहेर काढलं. एप्रिलपासून त्यांनी सुमारे 10 हजार जणांना येथून बाहेर काढलं आहे.
 
भारताने अफगाणिस्तानातून आतापर्यंत 700 पेक्षा जास्त लोकांना बाहेर काढलं.
 
इंडिया टुडेमध्ये रविवारी (22 ऑगस्ट) छापून आलेल्या बातमीनुसार अमेरिकन प्रशासनाने भारताला रोज दोन विमान चालवण्याची परवानगी दिली आहे.
 
विमानतळावरून दररोज 25 विमानांचं उड्डाण होत आहेत. यामध्ये लोकांसोबतच सामानही पाठवलं जात आहे.
 
अफगाणिस्तानातून भारतीय नागरिकांशिवाय शीख आणि हिंदू समाजातील नागरिकांना बाहेर काढण्यात आलं. यातील अनेक नागरिकांना ताजिकिस्ताना आणि कतारमार्गेही आणलं गेलं.
 
मुदत वाढणार?
लोकांना बाहेर काढण्याचा वेग वाढवला तरीही 31 ऑगस्टपर्यंत हे काम शक्य नाही, असं अमेरिका तसंच इतर देशांनाही वाटतं.
 
ब्रिटनच्या अधिकाऱ्यांच्या मते, लोकांना बाहेर काढण्याचं काम कितीही वेगाने केलं तरी दिलेल्या मुदतीत हे काम पूर्ण होणार नाही. ही मुदत वाढवण्याचा निर्णय अमेरिका घेऊ शकेल.
 
तर दुसरीकडे अमरिकन प्रशासनाकडून मुदत वाढवण्याबाबत तालिबानसोबत चर्चा केली जात आहे. विमानतळ आणि इतर बंदोबस्ताकरिता अमेरिकेचे 6 हजार सैनिक अफगाणिस्तानात आहेत.
 
पण तालिबानकडून मुदत वाढवली जाण्याची शक्यता अतिशय कमी आहे.
 
पण तरीही नागरीक मोठ्या अपेक्षेने विमानतळावर दाखल होत आहेत. अशा परिस्थितीत आगामी पाच-सहा दिवसांत काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments