Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शेतकरी आंदोलन : भूपिंदर सिंह मान सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या समितीतून का बाहेर पडले?

शेतकरी आंदोलन : भूपिंदर सिंह मान सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या समितीतून का बाहेर पडले?
, गुरूवार, 14 जानेवारी 2021 (18:30 IST)
भूपिंदर सिंह मान
 
कृषी कायद्यांविषयी चर्चा करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या समितीतून आपण बाहेर पडत असल्याची घोषणा शेतकरी नेते भूपिंदर सिंह मान यांनी केली आहे.
 
भूपिंदर सिंह मान हे भारतीय किसान युनियनसोबत आहेत आणि कृषीतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.
 
केंद्राने आणलेल्या तीन कृषी कायद्यांना स्थगिती देत त्यावर विविध पक्षांशी चर्चा करण्यासाठी अनिल घनवट, भूपिंदर सिंह मान, अशोक गुलाटी आणि डॉ. प्रमोद कुमार जोशी अशा चार तज्ज्ञांच्या समितीची स्थापना सुप्रीम कोर्टाने केली होती.
 
आपण या समितीतून बाहेर पडत असल्याची घोषणा करणारं एक निवेदन मान यांनी प्रसिद्ध केलंय.
 
यात ते म्हणतात, "केंद्र सरकारने आणलेल्या तीन कायद्यांविषयी शेतकरी संघटनांशी चर्चा करण्यासाठीच्या चार सदस्यीय समितीमध्ये माझा समावेश केल्याबद्दल मी माननीय सुप्रीम कोर्टाचा आभारी आहे. मी स्वतः एक शेतकरी आणि शेतकरी संघटनेचा नेता आहे. आणि सध्याच्या शेतकरी संघटना आणि एकंदरीत लोकांमध्ये असलेल्या भावना लक्षात घेत मी मला देण्यात आलेल्या या पदाचा त्याग करायला तयार आहे.
 
पंजाब आणि देशातल्या शेतकऱ्यांच्या हितांशी मला तडजोड करायची नाही. मी माझं नाव समितीमधून काढून घेत आहे. मी कायमच माझे शेतकरी बांधव आणि पंजाबच्या बाजूने असेन."
 
भूपिंदर सिंह मान कोण आहेत?
 
भूपिंदर सिंह मान भारतीय किसान युनियनसोबत जोडलेले आहेत. कृषीतज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. यासोबतच ते अखिल भारतीय शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष आणि माजी राज्यसभा खासदार आहेत.
 
मान यांचा जन्म 1939 साली गुजरांवालामध्ये (आता पाकिस्तानमध्ये) झाला. शेतकऱ्यांच्या विविध मुद्यांवर सातत्याने संघर्ष केल्या बद्दल 1990 साली राष्ट्रपतींकडून त्यांची शिफारस राज्यसभेसाठी करण्यात आली.
 
1966 साली स्थापन करण्यात आलेल्या 'फार्मर फ्रेंड्स' असोसिएशनचे ते संस्थापक सदस्य आहेत. पंजाबमध्ये ही संघटना पंजाब-खेती-बाडी युनिअन या नावाने ओखळली गेली.
 
तर, देशपातळीवर या संघटनेला भारतीय किसान युनियनच्या नावाने ओखळ प्राप्त झाली. या संघटनेने इतर शेतकरी संघटनांसोबत एकत्र येऊन शेतकरी समन्वय समितीची स्थापना केली.
 
भूपिंदर सिंह मान यांनी फूड कॉरपोरेशन ऑफ इंडियातील भ्रष्टाचार. साखर कारखान्यातील ऊस सप्लाय आणि विजेचं टॅरिफ वाढवण्याच्या मुद्यांवर आंदोलनं केली आहेत.
 
14 डिसेंबरला भारतीय किसान युनिअनशी संलघ्न शेतकरी संघटनांनी कृषी कायद्यांच्या मुद्यावर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेतली. मान, यांनी कृषी विधेयकांचं समर्थन केलं होतं
 
त्यावेळी 'द हिंदू' वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भूपिंदर सिंह मान म्हणाले होते, "कृषी क्षेत्रात स्पर्धा निर्माण होण्यासाठी सुधारणा गरजेच्या आहेत. मात्र, असं करत असताना शेतकऱ्यांच्या सुरक्षेचे उपाय करणं अनिवार्य आहे. यासाठी काही त्रुटी असतील तर त्यात सुधारणा करण्यात आली पाहिजे."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरद पवार : 'धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे