-मयांक भागवत
भारताच्या आर्थिक राजधानीत कोव्हिड-19 संसर्गाने हाहा:कार उडाला होता. देशात सर्वात जास्त कोरोनाग्रस्तांचा मृत्यू मुंबईत झाला. आत्तापर्यंत 11 हजारपेक्षा जास्त लोकांचा कोरोना संसर्गाने बळी गेला आहे.
मुंबई आता लसीकरण मोहिमेसाठी तयार होत आहे. पहिल्या टप्प्यात कोरोना संसर्गाचा मुकाबला करून मुंबईकरांचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या कोरोना वॉरिअर्सना लस दिली जाणार आहे.
मुंबई महापालिकेची तयारी
मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, शहरातील 1.26 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोनाविरोधी लस दिली जाणार आहे.
या आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती Covid Vaccine Intelligence Work म्हणजेच 'CO-VIN' या अॅपवर अपलोड करण्यात आली आहे.
मुंबई लसीकरणासाठी किती सेंटर आहेत?
पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी पालिकेने 8 केंद्र तयार केली आहेत.
मुंबई महापालिकेची वैद्यकीय महाविद्यालयं- केईएम, नायर, सायन, कूपर
इतर पालिका रुग्णालयं- घाटकोपरचं राजावाडी, बांद्रा भाभा, शताब्दी आणि व्ही.एन.देसाई रुग्णालयात लसीकरण मोहीम सुरू होणार आहे.
मुंबईच्या लसीकरण मोहीम टास्सफोर्सचे प्रमुख मुंबई महापालिकचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, "या आठ सेंटरमध्ये कोव्हिड-19 विरोधी लशीचे 10
लाख डोस ठेवण्याची क्षमता आहे. येत्या 2-3 दिवसात लस साठवण्याची क्षमता 90 लाखांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न रहाणार आहे."'
"पहिल्या टप्प्यानंतर महापालिकेचे दवाखाने, जंबो रुग्णालयं आणि इतर पालिका रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहीम सुरू केली जाईल. लसीकरण केंद्रांची संख्या 50 पर्यंत वाढवण्यात येणार आहे," असं ते पुढे म्हणाले.
कसं होणार लसीकरण?
आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण नेमकं कसं होईल? हे जाणून घेण्यासाठी आम्ही कूपर रुग्णालयाला भेट दिली.
कूपर रुग्णालय कोरोनाविरोधी लसीकरणासाठी 'मॉडेल सेंटर' बनवण्यात आलं आहे.
कूपर रुग्णालयाच्या कम्युनिटी मेडिसीन विभागाच्या डॉ. अनिता शेणॉय या केंद्राच्या नोडल अधिकारी आहेत.
डॉ. शेणॉय सांगतात, "लसीकरणासाठी दोन शिफ्टमध्ये 10 टीम कार्यरत असतील. लस देण्यासाठी नर्सना खास ट्रेनिंग देण्यात आलं आहे. एका दिवसात 2000
लोकांना लस देण्याचं आमचं उद्दीष्ट असेल. एकाच वेळी 10 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल." कूपर रुग्णालयात लसीकरणासाठी प्रत्येक शिफ्टमध्ये 70 आरोग्य कर्मचारी असणार आहेत.
"लस घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाचं समुपदेशन केलं जाईल. त्यांना लशीबाबत माहिती दिली जाईल. 28 दिवसांनंतर पुन्हा लस घेण्यासाठी येण्याबाबत त्यांना माहिती देण्यात येईल," असं डॉ. अनिता पुढे सांगतात.
16 जानेवारीला जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची सुरूवात करताना पंतप्रधान मोदी आरोग्य कर्मचारी आणि लस घेणाऱ्या आरोग्य सेवकांशी चर्चा करण्याची शक्यता आहे.
पहिल्या टप्प्यात कूपर रुग्णालयातील जवळपास 2500 पेक्षा जास्त डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण केलं जाणार आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणतात, "दररोज 12,000 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचं आमचं टार्गेट आहे. लशीच्या उपलब्धतेनुसार यावर निर्णय घेण्यात येईल."
कोव्हिड-19 लसीकरण मोहिमेसाठी मुंबई महापालिकेने 1500 पेक्षा जास्त डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलं आहे.
व्ही एन देसाई रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत मोरे सांगतात, "रुग्णालयात एकावेळी 20 लोकांना लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लस देण्यात आलेला व्यक्ती रुग्णांमध्ये मिसळू नये यासाठी लसीकरण केंद्रात जाण्यासाठी वेगळा मार्ग बनवण्यात आला आहे."
"लस दिल्यानंतर 'CO-VIN' अपमध्ये माहिती अपलोड केली जाईल. लसीकरण योग्य प्रकारे झाल्याचा मेसेज लस घेणाऱ्या व्यक्तीलाही मिळेल," असं डॉ. मोरे पुढे म्हणाले.
लशीचे साइडइफेक्ट झाले तर?
प्रत्येक लशीचे काही साइडइफेक्ट होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, लस दिल्यानंतर थोडा ताप, लस दिल्याच्या जागी दुखणं किंवा सूज हे सामान्य साइडइफेक्ट आहेत.
पण, एखाद्या व्यक्तीला त्रास झाला तर?
कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. पिनाकिन गुजर म्हणतात, "लस घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला 30 मिनिटं ऑब्झर्वेशन रूममध्ये थांबावं लागेल. दोन तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर लक्ष ठेवतील. लशीचे काही साइडइफेक्ट दिसून येतात का हे पाहिलं जाईल. "ज्यांना साइडइफेक्ट नाहीत अशांना घरी सोडण्यात येईल. पण, एखाद्याला त्रास झालाच तर, त्यांच्यासाठी स्वतंत्र बेड्स तयार ठेवण्यात आले आहेत. व्यक्तीची संपूर्ण तपासणी करण्यात येईल. यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे."
कोल्डचेनचं काय?
कोरोनाविरोधी लशीना 2 ते 8 डीग्रीपर्यंतच्या तापमानात ठेवावं लागणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने कांजुरमार्गमध्ये 5000 स्वेअर फुटांचं व्हॅक्सिन सेंटर बनवलं आहे.
लसीकरण मोहीमेच्या टास्क फोर्सचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी सांगतात, "कांजुरमार्गमध्ये दोन वॉक-इन कूलर्स आणि 1 फ्रिझर असणार आहेत. या ठिकाणी मोठ्या संख्येने कोरोनाविरोधी लशी साठवून ठेवता येतील."
कांजुरमार्गच्या सेंटरमध्ये असलेल्या कूलर्सची क्षमता 1 कोटी पेक्षा जास्त डोस ठेवण्याची आहे.
त्याचसोबत मुंबई महापालिकेच्या केईएम, नायर, सायन, कूपर आणि एफ-साऊथ वॉर्ड ऑफिसमध्येही लस साठवण्यात येणार आहे.
रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेन भावसार सांगतात, "कांजुरमार्गच्या स्टोरेज सेंटरमधून लस वॉर्ड ऑफिसमध्ये येईल आणि त्यानंतर रुग्णालयात पाठवली जाईल. रुग्णालयात Ice-Lined Refrigerators (ILR) मध्ये लस ठेवण्यात येईल. त्यानंतर आईस बॅग असलेल्या बॉक्समधून लसीकरण केंद्रात नेण्यात येईल. लस योग्य तापमानात ठेवण्यासाठी कोल्डचेन तयार करण्यात आली आहे."
कूपर रुग्णालयात एकावेळी लशीचे 40000 डोस साठवण्याची क्षमता असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. रुग्णालयातील Ice-Lined Refrigerators (ILR) म्हणजे फ्रीजमध्ये कोव्हिड-19 विरोधी लस साठवून ठेवण्यात येणार आहेत.
लसीकरण प्रक्रिया कशी असेल?
मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, लसीकरणाची वेळ अजून निश्चित करण्यात आलेली नाही.
कूपर रुग्णालयाच्या लसीकरण केंद्राच्या प्रमुख डॉ. अनिता शेणॉय सांगतात, लसीकरण केंद्राचं चार भागात विभाजन करण्यात आलंय.
सिक्युरीची चेक आणि वेटिंग एरिया
ओळख पटवण्यासाठी डेस्क
लसीकरण करण्यात येणारी रूम
ऑब्झर्वनशन रूम (निरीक्षण केंद्र)
पालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीला लस देण्यात येणार आहे. त्याची यादी एक दिवस आधी लसीकरण केंद्रातील अधिकाऱ्यांना देण्यात येईल.
लस देण्यात येणाऱ्या व्यक्तीला मेसेज येईल
मेसेज सिक्युरिटी चेकवर दाखवावा लागेल
ओळख पटवण्यासाठी आधार-लिंक मोबाईलवर ओटीपी येईल
ओळख पटल्यास लस घेण्यासाठी जाता येईल
लस घेतल्यानंतर अर्धातास निरीक्षण रूममध्ये थांबावं लागेल
मुंबई पोलीस देणार सुरक्षा कोरोनाविरोधी लशींची सुरक्षा हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. लस चोरी होऊ नये यासाठी मुंबई पोलीस सुरक्षा देणार आहेत.
बीबीसीशी बोलाताना पोलीस उपायुक्त एस. चैतन्य सांगतात, "ज्या केंद्रात कोव्हिड-19 लस साठवण्यात येईल, त्या केंद्रांना पोलीस सुरक्षा देण्यात येईल. लस घेऊन जाणाऱ्या प्रत्येक गाडीसोबत पोलिसांचा एक्सॉर्ट असणार आहे"
"लस लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचावी यासाठी गरज असल्यास ग्रीन कॉरिडोर करण्यात येईल," असं पोलीस उपायुक्त एस. चैतन्य पुढे म्हणाले.
रुग्णालयातील डॉक्टरांनाही लशीच्या सुरक्षेच्या प्रश्न सतावतोय. त्यामुळे लस सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येणार असल्याचं डॉक्टर सांगतात.
दुसऱ्या टप्प्यात कोणाला लस?
दुसऱ्या टप्प्यात पोलीस, संरक्षण खात्यातील व्यक्ती, पालिका कर्मचारी, बेस्टचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना लस दिली जाणार आहे.