"मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी समसमान पद्धतीने वाटून घेण्याचे ठरले असतानाही भाजपनं ते वचन मोडले. इतकंच नव्हे तर मला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केल्यामुळेच मी कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह सरकार स्थापन केलं. मी इतका टोकाचा निर्णय घेईन, असे भाजपला वाटले नसेल तर त्यांनी मला ओळखलेच नाही," असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. लोकसत्तानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या 'घटनाबाह्य काम करणार नाही, अशी हमी शिवसेनेकडून घेतली होती,' या विधानावरही भाष्य केलं.
I"कोणतेही सरकार हे घटनाबाह्य़ काम करूच शकत नाही. ते घटनेच्या चौकटीतच अस्तित्वात येते. मी मुख्यमंत्रीपदाची शपथही घटनेला धरूनच घेतली," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
कदाचित ते विधानच घटनाबाह्य़ होते की नाही ते माहिती नाही, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.