Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीतील 11 महत्त्वाच्या गोष्टी

Webdunia
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं पहिली यादी जाहीर केलीये. 125 उमेदवारांच्या पहिल्या यादीनं राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत.
 
काही दिवसांपूर्वीच पक्षांतर करून भाजपवासी झालेल्यांना पहिल्याच यादीत स्थान दिलं असताना, दुसरीकडे पक्षातील दिग्गजांची नावं यादीतून गायब आहेत. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 
1) एकनाथ खडसे पहिल्या यादीत नाहीत
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचं भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही. एकनाथ खडसे हे 1990 पासून 2014 पर्यंत सलग सहावेळा मुक्ताईनगर (जळगाव) विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
 
यादीत नाव जाहीर झालं नसतानाही एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यादीत नाव नसल्याबद्दल खडसेंनी उघडपणे नाराजीही व्यक्त केली आहे.
 
2) विनोद तावडे, बावनकुळेंसारखे मंत्रीही वेटिंगवर
सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांसारख्या विद्यमान मंत्र्यांनाही भाजपनं पहिल्या यादीत स्थान दिलं नाहीये.
 
विनोद तावडे हे मुंबईतील बोरिवली मतदारसंघातून 2014 साली विजयी झाले होते. सध्या राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मंत्री असतानाही पहिल्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश झाला नाहीये.
 
दुसरीकडे राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपुरातल्या कामठी मतदारसंघातून 2004 पासून विजयी होणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळे यांनाही पहिल्या यादीत स्थान देण्यात आलं नाहीये.
 
काही महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू मिळालेल्या गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांचीही उमेदवारी अद्याप जाहीर झाली नाहीये. मुंबईतल्या घाटकोपर पूर्व मतदारसंघातून प्रकाश मेहता 2014 साली जिंकले होते.
 
3) पुणे शहरातील सर्व 8 मतदारसंघ भाजपकडे
पुण्यात विधानसभेचे 21 मतदारसंघ आहेत. त्यातील वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ हे 8 मतदारसंघ पुणे शहरात आहेत. विशेष म्हणजे या आठही जागा भाजप लढवणार आहे.
 
4) पुण्यातून विद्यमान महापौर रिंगणात
पुण्याच्या विद्यमान महापौर मुक्ता टिळक या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. माजी संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट हे पुण्यातून खासदार म्हणून जिंकल्यनंतर त्यांचा कसबा पेठ मतदारसंघ रिक्त झाला होता. या मतदारसंघातून भाजपनं आता मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिलीये.
 
मुक्ता टिळक या पुण्याच्या विद्यमान महापौर आहेत. शिवाय, बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू शैलेश टिळक यांच्या त्या पत्नी आहेत.
 
मुक्त टिळक या चौथ्यांदा पुणे महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. 2017 साली त्यांची पुण्याच्या महापौरपदी निवड झाली होती.
 
5) राष्ट्रवादीमधून आलेल्या सहा जणांना उमेदवारी
गेल्या काही दिवसात इतर पक्षातून भाजपमध्ये मोठ्या संख्यात इनकमिंग झालं. भाजपने यातील अनेकांना पहिल्याच यादीत स्थान दिलंय.
 
गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा 2014 च्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या 6 जणांना भाजपनं पहिल्या यादीत समाविष्ट केलंय.
 
विजयकुमार गावित
संदीप नाईक
वैभव पिचड
बबनराव पाचपुते
राणा जगजितसिंह पाटील
शिवेंद्रसिंह भोसले
यातील विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते भाजपमध्ये येऊन चार-पाच वर्षे लोटली असली, तरी संदीप नाईक, वैभव पिचड, राणा जगजितसिंह पाटील, शिवेंद्रसिंह भोसले यांना महिनाही अद्याप झाला नाही.
 
6) हर्षवर्धन पाटलांसह काँग्रेसचे 7 जण पहिल्या यादीत
राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी व्यक्त करत काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेल्या हर्षवर्धन पाटलांना पहिल्या यादीतच स्थान मिळालंय.
 
त्याचबरोबर नारायण राणे यांचे समर्थक मानल्या जाणाऱ्या आणि काँग्रेसचे आमदार राहिलेल्या कालिदास कोळंबकरांनाही तिकीट मिळालंय.
 
हर्षवर्धन पाटील - काँग्रेस
राधाकृष्ण विखे पाटील - काँग्रेस
कालिदास कोळंबकर - काँग्रेस
प्रशांत ठाकूर - काँग्रेस
रवीशेठ पाटील - काँग्रेस
मदन भोसले - काँग्रेस
जयकुमार गोरे - काँग्रेस
7) महिला उमेदवार किती?
भाजपनं जाहीर केलेल्या 125 उमेदवारांच्या पहिल्या यादीत 11 महिला उमेदवार आहेत. यात मुक्ता टिळक, देवयानी फरांदे यांचा समावेश आहे.
 
पंकजा मुंडे - परळी
श्वेता महाले - चिखली
देवयानी फरांदे - नाशिक मध्य
मंदा म्हात्रे - बेलापूर
दहिसर - मनिषा चौधरी
गोरेगाव - विद्या ठाकूर
माधुरी मिसाळ - पर्वती
मुक्ता टिळक - कसबा पेठ
स्नेहलता कोल्हे - कोपरगाव
मोनिका राजळे - शेवगाव
ज्ञानज्योती पाटील - धुळे ग्रामीण
8) मुख्यमंत्र्यांच्या पीएला तिकीट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना भाजपनं लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आहे.
 
काँग्रेसचे बसवराज पाटील हे औसा मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत. युतीच्या आधीच्या 2009 च्या फॉर्म्युल्यानुसार हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. मात्र, आता भाजपकडून अभिमन्यू पवार रिंगणात उतरले आहेत.
 
9) गणेश नाईकांना तिकीट नाही
माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. गणेश नाईक हे 2004 आणि 2009 या दोनवेळा बेलापूरमधून जिंकले होते. मात्र, 2014 साली भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी त्यांचा पराभव केला.
 
यंदा गणेश नाईक यांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्यानं बेलापूरमधून कुणाला उमेदवारी मिळणार, याची चर्चा होती. अखेर भाजपनं मंदा म्हात्रे यांनाच बेलापूरमधून तिकीट दिल्यानं गणेश नाईक यांचा पत्ता कट झाल्यची चर्चा आहे.
 
दरम्यान, गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक यांना मात्र भाजपनं ऐरोली या मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलीय.
 
10) पृथ्वीराज चव्हाणांना अतुल भोसले भिडणार
साताऱ्यातील कराड दक्षिण मतदारसंघातून भाजपनं अतुल भोसले यांना उमेदवारी दिलीये. अतुल भोसले हे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत.
 
अतुल भोसले यांची लढत थेट राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी असेल.
 
11) परळीतून पुन्हाभाऊ विरूद्ध बहीण
 
भाजपनं पहिल्या यादीत राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर केलीये. त्या पुन्हा एकदा बीडमधील परळी मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.
 
राष्ट्रवादी काँग्रेसनंही परळीतून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि पंकजा मुंडे यांचे चुलत भाऊ धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर केलीये.
 
त्यामुळं परळीतून पंकजा मुंडे विरूद्ध धनंजय मुंडे असा भाऊ-बहिणीचा सामना पाहायला मिळणार आहे. राज्यातल्या लक्षवेधक लढतींपैकी परळीची लढत ठरेल, हे आता भाजपच्या यादीतून निश्चित झालंय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Yearly Numerology Prediction 2025 सर्व 9 मूलांकांसाठी महिन्याप्रमाणे अंक ज्योतिष भविष्य एका क्लिकवर

Khandoba Navratri 2024 मार्तंडभैरव षडरात्रोत्सव महत्त्व आणि खंडोबाची आरती

Mulank 4 Numerology Prediction 2025 मूलांक 4 अंक ज्योतिष 2025

Mulank 3 Numerology Prediction 2025 मूलांक 3 अंक ज्योतिष 2025

Mulank 2 Numerology Prediction 2025 मूलांक 2 अंकज्योतिष 2025

पुढील लेख
Show comments