Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Canada heatwave: कॅनडात उष्णतेची लाट, वीज कोसळल्यानं ब्रिटिश कोलंबियामध्ये भडकले वणवे

Webdunia
शनिवार, 3 जुलै 2021 (20:46 IST)
कॅनडामध्ये सध्या उष्णतेची लाट पसरली आहे. तापमानाचे रोज नवनवीन विक्रम मोडले जात आहेत. त्यामुळे वीजा पडून जंगलांमध्ये वणवे भडकत आहेत. पश्चिम कॅनडामध्ये असे जवळपास 130 हून अधिक वणवे जंगलांना नष्ट करत आहेत.
 
ब्रिटिश कोलंबियामध्ये भडकलेल्या या वणव्यांच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि आणीबाणीच्या या परिस्थितीत याठिकाणी काम करणाऱ्यांच्या मदतीसाठी लष्करी विमानं पाठवणार असल्याचं कॅनडाच्या सरकारनं म्हटलं आहे.
 
या आठवड्याच्या सुरुवातीलाच काही नागरिकांना या भागातील लिटन या गावातून इतर ठिकाणी स्थलांतरीत व्हावं लागलं होतं.
 
मंगळवारी लिटनमध्ये कॅनडातील विक्रमी 49.6 सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली. या आगीमुळे हा भाग पूर्णपणे नष्ट झाला.
व्हँकूव्हरपासून उत्तर-पूर्वेला अंदाजे 260 किमी लांब असलेल्या या गावाला आगीमुळे प्रचंड झळा बसत होत्या. त्यामुळे येथील 250 रहिवाशांपैकी अनेकांना बुधवारी सायंकाळी अक्षरश: सामान सोडून पळावं लागलं.
 
"अवघ्या 15 मिनिटांच्या काळात संपूर्ण गाव हे आगीच्या ज्वाळांनी जळून खाक झालं," अशी माहिती महापौर जॅन पोलरमन यांनी बीबीसीबरोबर बोलताना दिली.
 
काही दिवसांपूर्वी उत्तर अमेरिकेमध्येही विक्रमी तापमानाची नोंद झाली होती. पण ही काही नेहमी घडणारी किंवा सामान्य बाब नाही.
 
वातावरणातील बदलामुळे अशाप्रकारे अचानक हवामानात बदल होऊन उष्णतेच्या लाटेसारखे हे प्रकार वाढण्याची शक्यता असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. मात्र, एका घटनेमुळे याचा संबंध थेट ग्लोबल वॉर्मिंगशी जोडणंही योग्य नाही.
 
या भागामध्ये एका दिवसापूर्वी अंदाजे 12,000 वीजा कोसळल्या. त्यामुळे लागलेल्या आगींपैकी अद्याप 136 वणवे सक्रिय असल्याची माहिती ब्रिटिश कोलंबिया वाईल्डफायर सर्व्हीसनं शुक्रवारी दिली.
 
शेकडो लोकांना घरं सोडून इतर ठिकाणी स्थलांतरीत होण्यासंदर्भात इशारा देण्यात आला होता.
 
आगीमुळे घाबरलेल्या किंवा अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी कॅनडा सरकार मदत पुरवणार असल्याचं कॅनडाचे संरक्षण मंत्री हरजित सज्जन यांनी म्हटलं. त्यासाठी लष्कर आणि लष्करी हेलिकॉप्टरची मदत घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
आगीच्या झळांमुळे या भागातील अनेक महत्त्वाचे मार्गही बंद झाले आहेत.
 
हवमान आणि वणव्यांचा ब्रिटिश कोलंबियातील या भागावर विनाशकारी परिणाम झाल्याची माहिती नागरिक संरक्षण मंत्री बिल ब्लेयर यांनी दिली.
 
दीर्घ आणि आव्हानात्मक ठरणाऱ्या अशा उन्हाळ्याच्या प्राथमिक टप्प्याला सुरुवात झाल्याचं, या वणव्यांवरून स्पष्ट झालं असल्याचंही ते म्हणाले.
 
गेल्या आठवड्यात अचानक वाढलेल्या तापमानामुळं जवळपास 719 जणांचं निधन झालं असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं.
 
"गेल्या आठवड्यात झालेल्या मृतांमध्ये प्रामुख्यानं ज्येष्ठांचा समावेश आहे. त्यातही बहुतांश हे मोकळी हवा नसलेल्या ठिकाणी आणि एकटे राहत होते,'' असं चीफ कोरोनर (सरकारी किंवा न्यालयीन अधिकारी) लिसा लॅपोइंटे यांनी वक्तव्य प्रसिद्ध करत म्हटलं.
 
कॅनडाच्या किनारी भागामध्ये तापमान हळू हळू कमी होत आहे. मात्र, देशातील इतर भागांमध्ये मात्र अद्याप दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे वीकेंडला अशाप्रकारे जंगलात आगी पेटण्याच्या अधिक घटना वाढण्याची शक्यता ब्रिटिश कोलंबिया वाइल्डफायर सर्व्हीसनं व्यक्त केली आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments