सौतिक बिस्वास
बॉलिवुडच्या एका सुपरस्टारने मंगळवारी रात्री भारतातल्या एका आघाडीच्या विद्यापीठ परिसराला अचानक भेट दिली. ही तीच जागा होती जिथे दोन दिवसांपूर्वी हाणामारी झाली होती.
मंगळवारी संध्याकाळच्या थंडीच्या वातावरणात दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी दीपिका पादुकोण त्यांच्यासोबत उभी राहिली. रविवारी रात्री या विद्यापीठाच्या कॅंपसवर झालेल्या हल्ल्याचा हे विद्यार्थी निषेध करत होते. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी या हल्लेखोरांचा संबंध असल्याचा दावा करण्यात येतोय. दीपिका काही बोलली नाही. शांतपणे आली, उभी राहिली आणि तितक्याच शांतपणे निघून गेली.
पुढच्या काही मिनिटांतच सोशल मीडियावर खळबळ उडाली. सिनेमावेड्या भारतामध्ये एक बॉलिवुड स्टारच अशी खळबळ निर्माण करू शकतो.
मोदी सरकारला पाठिंबा देणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या गटांच्या निशाण्यावर असलेल्या विद्यापीठाच्या, वादात सापडलेल्या मुलांना 'शूरपणे पाठिंबा' दिल्याबद्दल दीपिकाचे फॅन्स, सहकारी आणि विद्यार्थी नेते तिचं कौतुक करतायत.
एरवी बॉलिवुडच्या नावाने नाकं मुरडणाऱ्यांनीही आपण दीपिकाचा नवीन सिनेमा पुन्हापुन्हा पाहणार असल्याचं जाहीर केलंय. अॅसिड हल्ला झालेल्या तरुणीच्या आयुष्यावर आधारित या सिनेमाची निर्मिती दीपिका पदुकोणनेच केलीय.
पण हा दीपिकाचा तिच्या फिल्मसाठी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न असल्याची टीका मोदी सरकारच्या पाठिराख्यांनी केली आहे. दीपिकाला पाठिंबा देणारे आणि दीपिकाच्या सिनेमावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करणारे असे दोन्ही प्रतिस्पर्धी हॅशटॅग्स ट्विटरवर ट्रेंड होत होते.
दीपिकाच्या वादग्रस्त विद्यापीठ कॅम्पसमध्ये जाण्यामुळे झालेला गदारोळ हा समजण्याजोगा आहे.
सर्वांत जास्त भरभराट होणारी सिनेसृष्टी म्हणून बॉलिवुड प्रसिद्ध आहे आणि जवळपास तीन डझनभर सिनेमांमध्ये अभिनय करणारी ही 34 वर्षांची अभिनेत्री या बॉलिवुडच्या मेगास्टार्सपैकी एक आहे. सोशल मीडियाबाबत बोलायचं झालं तर ट्विटरवर तिचे 2.6 कोटींपेक्षा जास्त आणि इन्स्टाग्रामवर 4.2 कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.
2016मध्ये फोर्ब्स मासिकाने सर्वांत जास्त मानधन दिल्या जाणाऱ्या जगातल्या 10 अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली होती. त्याच्या पुढच्याच वर्षी दीपिका आणि तिचे पती रणवीर सिंग यांची एकत्र मिळकत 2.1 कोटी डॉलर्स असल्याचा अंदाज एका मासिकाने व्यक्त केला होता.
एका हॉलिवुड फिल्ममध्ये तिच्यासोबत काम करणाऱ्या विन डिझेलने तिच्याविषयी म्हटलं होतं, "ती किती सुंदर आहे हे तुम्हाला कोणीही सांगेल. आणि तिची विनोदबुद्धी किती चांगली आहे, हे देखील सांगतील. पण ती फक्त एक स्टार नाही. ती एक सच्ची अभिनेत्री आहे आणि या कलेला तिने वाहून घेतलंय."
एक संवेदनशील, विचारपूर्वक काम करणारी अभिनेत्री म्हणून गेल्या काही वर्षांत दीपिका नावारूपाला आलेली आहे. मानसिक आरोग्य, नैराश्याविषयीच्या आपल्या लढ्याबद्दल ती जाहीरपणे, मोकळेपणाने बोललेली आहे. आणि या महिन्यात ती तिच्या मानसिक आरोग्याविषयीच्या जागरूकता निर्माण करण्याच्या कामाविषयी बोलण्यासाठी डाव्होसला जाणार आहे.
2017मध्ये रीलिज झालेल्या तिच्या पद्मावत सिनेमाच्या वेळीही तिला उजव्या विचारसरणीच्या लोकांच्या नाराजीचा सामना करावा लागला होता. यावेळी आंदोलकांनी सिनेमागृहांची तोडफोड केली आणि दीपिकाचं नाक छाटण्याचीही धमकी दिली होती.
दीपिका पदुकोणचं जेएनयूमध्ये हजर राहणं हे लक्षवेधक होतं. एखाद्या गोष्टीबद्दल भूमिका न घेण्याबद्दल अनेकदा बॉलिवुडमधल्या दिग्दर्शकांवर वा अभिनेत्यांवर टीका केली जाते. शिवसेनेसारख्या सरकारमध्ये असणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या पक्षांनी त्यांच्या विचारसरणीला न पटणाऱ्या विषयांवर सिनेमा करणाऱ्यांना उघडउघड धमक्या दिलेल्या आहेत.
दिग्दर्शक महेश भट्ट यांनी एकदा म्हटलं होतं, "सिनेमाचा रीलिज जवळ आला की दिग्दर्शक अगदी अवघड परिस्थितीत असतो. तुम्ही त्याला ब्लॅकमेल करून झुकायला लावू शकता." पंतप्रधान मोदींनी स्वतः मात्र बॉलिवुडमध्ये अनेकदा स्वारस्य घेतलं असून अनेक अभिनेते आणि दिग्दर्शकांसोबत सेल्फीही काढले आहेत.
मग आता दीपिका पदुकोणच्या कृतीमुळे काही बदल घडेल का? यामुळे बॉलिवुडचे 'ए-लिस्टर' म्हटले जाणारे भूमिका घेऊन आपली मतं मांडण्यास प्रवृत्त होतील का? भारतामध्ये मोदी सरकारच्या विरोधातली विद्यार्थ्यांची निदर्शनं ही महत्त्वाची आहेत. कारण यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने पुढाकार घेतला नसून समाजाच्या पुढाकारातून ही निदर्शनं होत आहेत. समाजशास्त्रज्ञ शिव विश्वनाथन यांनी मला सांगितलं, "एकप्रकारे दीपिकाने या वातावरणाची नस अचूक पकडली. पाठिंब्याचं हे राजकारण कोणत्याही विचारसरणीच्या पलीकडचं आहे. म्हणूनच तिचं जेएनयूमध्ये हजर राहणं महत्त्वाचं होतं."
पण इतरांना मात्र याची खात्री वाटत नाही. देशामध्ये सध्या टोकाचे दोन मतप्रवाह आहेत. मोदींच्या हिंदू राष्ट्रवादाच्या राजकारणाचा पुरस्कार करणारे विरुद्ध धर्मनिरपेक्ष भारताच्या संकल्पनेवर विश्वास ठेवणारे असे दोन गट पडले आहेत.
"तिच्यावर आता टीका करणारे तिचे सिनेमे पहायचं थांबवतील असं मला वाटत नाही. आपल्याकडे लोकांचे विचार सतत बदलत असतात. ते बहुतकेदा तात्पुरत्या कालावधीपुरते असतात. शिवाय एकमेकांशी अजिबात न जुळणारी मतं बाळगण्याचीही आपली क्षमता असते. चांगलं आणि वाईट, डावं - उजवं असा स्पष्ट फरक नसतोच. समाज म्हणून आपण बहुतेकदा उंबरठ्यावर असतो. उदाहरणार्थ, लोकं एकाचवेळी कठोर भूमिका घेणारं सरकार आणि खुली अर्थव्यवस्था अशा दोन्हींना पाठिंबा देतात," प्राध्यापक आणि समाजशास्त्रज्ञ संजय श्रीवास्तव यांनी मला सांगितलं. ते सध्या इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथमध्ये काम करतात.
मोदींच्या राजकारणाच्या विरोधात बोलणारी दीपिका पादुकोण ही काही बॉलिवुडमधली एकमेव मोठी व्यक्ती नाही. वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि जेएनयूवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधातल्या निदर्शनांना अनेक तरूण अभिनेत्री आणि प्रसिद्ध दिग्दर्शकांनी हजेरी लावली होती. भारतातल्या प्रसिद्ध दिग्दर्शकांपैकी एक अनुराग कश्यप याने एका माध्यमाशी बोलताना म्हटलं होतं, "मोदी सरकारने देशाचं दोन प्रकारच्या लोकांमध्ये विभाजन केलंय - देशाच्या विरोधात असणारे आणि देशभक्त."
देशामध्ये जे काही सुरू आहे त्याने आपल्याला दुःख होत असल्याचं जेएनयूच्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यापूर्वी दीपिका पदुकोणने एका माध्यमाशी बोलताना म्हटलं होतं.
"मला या सगळ्यामुळे दुःख होतं. आणि हे सगळं सर्रासपणे घडणं नेहमीचं होणार नाही अशी आशा आहे. देशाची निर्मिती या विचारांवर झाली नव्हती," तिने म्हटलं होतं. सेलिब्रिटींच्या राजकीय भूमिकांविषयी टीका करणं सोपं आहे. पण दीपिका मनापासून बोलत असल्याचं वाटत होतं. चित्रपट समीक्षक शुभ्रा गुप्ता म्हणतात, "मला वाटतं ही घटना अतिशय महत्त्वाची आहे. अशी भूमिका घेतल्याचा परिणाम काय असू शकतो हे तिला माहित आहे. पण तरीही तिने पवित्रा घेतला आणि अनेक गोष्टी पणाला लावल्या. यातून पुढे काय होईल, हे कोणाला माहित? आता आणखी इतर स्टार्सही बोलणार का?"