Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छत्तीसगड हल्ला : मुलाच्या मृत्यूची बातमी आईला टीव्हीवरून कळली आणि...

Webdunia
मंगळवार, 6 एप्रिल 2021 (18:23 IST)
-आलोक प्रकाश पुतूल
महानदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या पंडरीपानी गावाच्या गल्ल्यांमध्ये शांतता पसरली आहे. येणारं-जाणारं एखाद-दुसरं वाहन आणि पोलिसांच्या गाड्या फक्त या शांततेचा भंग करतात.
 
गावातल्या काही बायका गल्लीतल्या शेवटच्या घरात शिरतात, आणि मोठमोठ्याने रडण्याचे आवाज यायला लागतात.
 
हे घर रमेश कुमार जुर्री यांचं आहे. डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्डचे 35-वर्षांचे रमेश कुमार जुर्री शनिवारी बिजापूरमध्ये माओवादयांशी झालेल्या चकमकीत मारले गेले.
 
पंडरीपानी गाव काकेर जिल्हा मुख्यालयापासून 35 किलोमीटर अंतरावर आहे.
 
या गावाची लोकसंख्या जवळपास 1900 आहे. इथे गावाच्या मधोमधे एक रस्ता आहे आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला एका पोलिसाचा पुतळा उभा आहे. शेजारी राहाणारे सांगतात की, हा पुतळा तामेश्वर सिन्हा या पोलीस जवानाचा आहे.
 
9 जुलै 2007 साली सुकमा जिल्ह्यातल्या मरइगुडात माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 23 जवान मारले गेले होते. यात जिल्हा पोलीस दलाचे सहायक उपनिरीक्षक तामेश्वर सिन्हाही होते.
 
रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा पुतळा आहे.
 
शेजारच्या मुलाने सांगितली मृत्यूची बातमी
या जागेपासून साधारण 100 मीटर दूर रमेश कुमार जुर्री यांचं घर आहे. इथे हळूहळू लोकांचे जथ्थे यायला लागले आहेत.
 
ऑक्टोबर 2005 साली रमेश कुमार यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचे धाकटे बंधू संजय यांनी गावातच घरची शेती पाहायला सुरूवात केली. त्यांच्या कुटुंबाची गावात साधारण 9 एकर शेती आहे. त्यांच्या दोन बहिणी आहेत ज्यांचं लग्न शेजारच्याच गावात करून दिलं आहे.
 
रमेश आपली पत्नी आणि मुलगी सेजल यांच्यासोबत बिजापूरमध्ये राहात होते.
 
संजय यांना त्यांच्या मोठ्या भावाच्या निधनाची बातमी शेजारच्या एका मुलाने सांगितली.
 
संजय म्हणतात, "आधी तर माझा विश्वास बसलाच नाही. नंतर आम्ही टीव्हीवर बातम्यांमध्ये पाहिलं. दादाच घरात सगळं पाहायचे. होळीनंतर फोनवर बोललो तेच शेवटचं...ते मुलांशी बोलले, घरच्या परिस्थितीविषयीचं बोलणं झालं. त्यांना आईची कायम काळजी असायची."
 
ते सांगतात की त्यांच्या भावाला कायमच पोलिसात भरती व्हायचं होतं. पण ते माओवादाने प्रभावित असलेल्या भागात काम करायचे त्यामुळे भीती वाटायचे. घरच्यांची इच्छा होती की, त्यांनी दुसरं काही काम करावं पण रमेश यांनी ऐकलं नाही.
 
व्याकूळ नजरेने आपल्या मुलाला शोधणारे नातलग
रमेश यांची आई सत्यवती यांच्या डोळ्यांचं पाणी थांबत नाहीये. त्यांच्या अवतीभवती बसलेल्या बायका त्यांना धीर द्यायचा प्रयत्न करत आहेत. कोणी त्यांना पंख्याने वारा घालतंय, तर कोणी पाणी पाजतंय.
 
रमेश यांची मावशी विद्या उसेंडी कांकेरमध्ये राहातात. त्या माहिती देताना सांगतात की सत्यवती जुर्री यांची तब्येत फारच खराब असायची. या आधारावर बदली व्हावी यासाठी अर्ज द्यायला रमेश तीन-चार दिवसांपूर्वी जगदलपूरला गेले होते. त्यांनी अर्जात म्हटलं होतं की ते घरात मोठे आहेत, त्यांच्या आईची देखभाल करणं त्यांची जबाबदारी आहे.
 
या चकमकीची बातमी आली तेव्हा त्या टीव्ही पाहात होत्या. तेव्हाच बिजापूरमधून रमेश यांची पत्नी सुनीता यांनी फोन केला. विद्या म्हणतात, "सुनेने फोन केला आणि सांगितलं मावशी टीव्ही लावा. टीव्हीवर आमच्या मुलाचा फोटो शोधत होते, मला वाटत होतं की तिथल्या गर्दीत कुठेतरी माझा मुलगा दिसेल. पण माझा बाबू कुठेच दिसला नाही."
 
हे बोलता बोलता त्या हुंदके देऊन देऊन रडायला लागल्या. दुसऱ्या महिला त्यांना सांभाळण्यासाठी पुढे सरसावल्या.
 
शांत स्वभावाचे रमेश
रमेश यांचे वडील बस्तरच्या बैलाडी स्थित भारत सरकारचा उपक्रम नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये कर्मचारी होते. रमेश यांचा स्वभाव अगदीच शांत आणि आज्ञाधारक होता. त्यांचं शालेय शिक्षण बैलाडीला झालं तर कांकेरमध्ये त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केल्याचं रमेश यांचे एक काका सांगतात.
 
2010 मध्ये त्यांनी पोलीस भरतीची परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात त्यांची निवड झाली.
 
नोकरी लागल्यानंतर पाच वर्षांनी त्यांचं लग्न झालं. त्यांना आता 4 वर्षांची सेजल नावाची मुलगी आहे.
 
गार्ड ऑफ ऑनर
रमेश यांच्या घरापासून काही अंतरावर गार्ड ऑफ ऑनरची तयारी केलेली आहे. मैदानाच्या एका बाजूला तंबू उभारला आहे. शेकडो महिला तिथे बसल्या आहेत, पुरुषांची आसपास वर्दळ आहे.
 
जिल्ह्याच्या मोठ्या अधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित आहेत. आसपासच्या भागातले लोकप्रतिनिधीही पोहचले आहेत.
 
प्रांगणात दोन तीन गाड्या पोहचतात. पोलीस सांगतात की यापैकी एका गाडीतून रमेश यांची पत्नी सुनिता आणि मुलगी सेजल बिजापूरहून इथे आल्या आहेत.
 
थोड्याच वेळात दुचाक्यांवर 'जय जवान, जय किसान' अशा घोषणा देत एक जवानांची तुकडी तिथे येते. या तुकडीच्या मागे काही गाड्या आहेत ज्यातल्या अँब्युलन्समध्ये रमेश यांचं शव आणलं आहे.
 
मृतदेह पाहून शेकडो महिला-पुरुष उठून उभे राहतात. त्यांच्या संयमाचा बांध फुटतो. आता प्रत्येकाला रमेशला शेवटचं पाहायचं आहे.
 
आजीचे अश्रू आणि भांबावलेली नात
दुमदुमणाऱ्या घोषणा आणि फुलांच्या वर्षावामध्ये एका उंचावरच्या जागी रमेश यांचं पार्थिव असलेली पेटी ठेवण्यात आली. शोक व्यक्त करण्यासाठीची धुन वाजवत पोलिसांनी गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर कुटुंबातल्या सदस्यांनी आणि इतरांनी श्रद्धांजली वाहिली.
 
रमेश यांच्या पत्नीला पुन्हापुन्हा पतीचा चेहरा बघायचाय...पण महिला पोलिसांनी एकीकडे स्वतःचे अश्रू पुसत त्यांची समजूत काढली. या सगळ्यात चार वर्षांची सेजल भांबावून गप्प झाली होती...तिला जवळ घेऊन रडणाऱ्या आजीकडे ती पहात राहिली.
 
जवळपास तासभर श्रद्धांजली वाहिल्यानंतर अंत्यसंस्कारांसाठी मृतदेह समोरच्या शेताकडे नेण्यात आला.
 
'इथे काही होऊ शकत नाही, लिहून घ्या'
रमेश यांच्या घरासमोर उभा असलेला एक जवान आपल्या मोबाईल फोनवर काहीतरी ऐकतोय. दोन-तीन इतर पोलीस कर्मचाऱ्यांची नजर समोर शेताकडे असली तरी तेही मोबाईवर काय चालू आहे ते ऐकण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
व्हॉट्सअॅपवर गृहमंत्री अमित शाह यांच्या पत्रकार परिषदेचा व्हीडिओ सुरू आहे ज्यात ते म्हणतात, "मी छत्तीसगड आणि भारतेच्या जनतेला हा विश्वास देऊ इच्छितो की या घटनेनंतर आम्ही आपली लढाई अजून तीव्र करू. या लढाईत आम्ही नक्कीच विजय मिळवू. जे जवान शहीद झालेत त्यांच्या नातेवाईकांनाही..."
 
फोनवर बटण दाबून पोलीस कर्मचारी आपल्या खिशात ठेवून देतो आणि म्हणतो, "इथे काही होऊ शकत नाही. तुम्ही पत्रकार आहात ना, लिहून घ्या."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments