Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सावरकर-गोडसे संबंधांवरून काँग्रेस सेवादलाने वादाला फोडलं तोंड

Webdunia
शुक्रवार, 3 जानेवारी 2020 (17:19 IST)
मध्यप्रदेशात काँग्रेस सेवादलाच्या राष्ट्रीय शिबीरात वितरित करण्यात आलेल्या 'वीर सावरकर कितने 'वीर'?' या पुस्तिकेत विनायक दामोदर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्यातल्या लैंगिक संबंधाबद्दलचा मजकूर छापून आला आहे. यावरून काँग्रेस विरूद्ध भाजप असा नवा संघर्ष आता उफाळून आलाय. तर, सावरकरांच्या कुटुंबीयांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
 
काँग्रेसचा सावरकरांवर नवा आरोप
काँग्रेस आणि भाजप या पक्षांमध्ये वि. दा. सावरकर यांच्यावरून नेहमीच वाद झालेले आपण पाहिले आहेत. सावरकरांचा गांधी हत्येमध्ये सहभाग होता असा आरोप काँग्रेसकडून केला जातो. तर, सावरकरांना गांधी हत्येत गोवलं गेलं आणि त्यांची देशभक्ती काँग्रेसला कळलेली नाही असं प्रत्युत्तर भाजप, आरएसएस आदी हिंदुत्ववादी संघटनांकडून दिलं जातं.
 
मात्र, आता या आरोप-प्रत्यारोपांनी पुढची पातळी गाठली असून महात्मा गांधींची गोळ्या घालून हत्या करणारे नथुराम गोडसे आणि सावरकर यांचे लैंगिक संबंध होते, असा नवा आरोप काँग्रेस सेवादलाच्या एका पुस्तिकेतून करण्यात आला आहे.
 
'गोडसे आणि सावरकरांमध्ये शरीर संबंध होते'
मध्यप्रदेशातल्या भोपाळमध्ये काँग्रेस सेवा दलाचं 10 दिवसीय निवासी शिबीर सुरू आहे. या शिबीरात सेवादलाकडून आपल्या शिबीरार्थिंना विविध नेते, महापुरुषांबद्दलच्या माहितीपर पुस्तिका वाटण्यात आल्या. यातली एक पुस्तिका वि. दा. सावरकर यांच्यावर लिहीण्यात आली आहे. या पुस्तिकेचं नाव 'वीर सावरकर कितने 'वीर'?' असं असून त्यात महात्मा गांधीची हत्या करणारे नथुराम गोडसे आणि वि. दा. सावरकर यांच्यात लैंगिक संबंध असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. यासाठी लॅरी कॉलिंस आणि डोमॅनिक लॅपिएर यांच्या 'फ्रिडम अट मिडनाईट' पुस्तकातल्या पृष्ठ क्रमांक 423 चा संबंध देण्यात आला आहे.
 
'ब्रह्मचर्य स्वीकारण्यापूर्वी नथुराम यांचे राजकीय गुरू वीर सावरकर यांच्याशी शारिरीक संबंध होते,' या असं या पुस्तिकेत म्हटलं गेलं आहे. लैंगिक संबंधांच्या आरोपाच्या बरोबरीनेच सावरकरांनी हिंदूंना अल्पसंख्य महिलांवर बलात्कार करण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं, असाही गंभीर आरोप केला गेला आहे.
 
'सावरकरांची खरी बाजू लोकांपुढे आणायची आहे'
या सगळ्या प्रकाराबद्दल माध्यमांनी काँग्रेस सेवादलाचे प्रमुख लालजी देसाई यांच्याकडे विचारणा केली असता ते सांगतात की, "या पुस्तिकेत जे काही लिहीलं गेलं आहे ते तथ्यांवर आधारित आहे. यासाठी ही पुस्तिका लिहीणाऱ्या आमच्या कार्यकर्त्याने संशोधनही केलं आहे. तसंच, प्रत्येक ठिकाणी पुराव्यांसाठी संदर्भ दिले गेले आहेत. भाजप आणि आरएसएस नेहमीच सावरकरांचा गांधी हत्येशी संबंध नाही असा उल्लेख करतात. मात्र, या पुस्तिकेवरून हे कसं खोटं आहे हे आम्हाला पुढे आणायचं आहे."
 
'सावरकर आम्हाला कोणी शिकवू नयेत'
मात्र, सेवादलाच्या या पुस्तिकेनंतर हिंदुत्ववादी पक्ष आक्रमक झालेले दिसत आहेत. त्यांनी या लेखनाचा निषेधही केला आहे. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सत्तेतला भागिदार पक्ष शिवसेनेनेही याबद्दल आपलं मत प्रदर्शित केलंय.
 
याबद्दल बोलताना शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत सांगतात, "वीर सावरकर हे महान होते, आहेत आणि राहतील. त्यांच्याबद्दलची आमची श्रद्धा अशा फालतू पुस्तकाने कधीच कमी होणार नाहीत. भोपाळमध्ये तयार झालेली ही घाण म्हणजे हे पुस्तक आहे. ते अनधिकृत असून ते महाराष्ट्रात आणलं जाणार नाही. सावरकरांवर इतरांनी आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही."
 
'उद्धव ठाकरेंनी सेवादलावर गुन्हा दाखल करावा'
सावरकरांवर झालेल्या या गंभीर आरोपांबद्दल सावरकरांचे पणतू रणजीत सावरकर यांनीही एएनआय वृत्तसंस्थेकडे याविषयी आपली प्रतिक्रिया दिली. ते सांगतात की, "काँग्रेसने सत्तेच्या राजकारणासाठी वारंवार सावरकरांची बदनामी केलेली आहे. पण, ते या पातळीवर येऊन आरोप करतील असं मला कधीच वाटलेलं नव्हतं. यांचा केवळ निषेध करून चालणार नाही, तर माझी मागणी आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या लोकांवर तात्काळ गुन्हा दाखल करायला हवा."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख