Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोना औषध : डेक्सामेथासोन किती गुणकारी? भारतात उपलब्ध आहे का?

Webdunia
शुक्रवार, 19 जून 2020 (13:39 IST)
अवयवांच्या सुजेशी संबंधित डेक्सामेथासोन(Dexamethasone) हे औषध कोरोना व्हायरसवर जालीम उपाय ठरू शकतं असं सांगितलं जात आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या गंभीर रुग्णांसाठी डेक्सामेथासोन वरदान ठरू शकतं.
 
ब्रिटनमध्ये केलेल्या एका अभ्यासात कोरोना व्हायरसच्या संसर्गावर हे औषध प्रभावी ठरू शकतं, असा दावा करण्यात आला आहे. या औषधाबाबत सविस्तर माहिती घेण्याची उत्सुकता सर्वांमध्येच निर्माण झाली आहे.
 
हे औषध काय आहे?
डेक्सामेथासोन हे स्टेरॉईड आहे. शरीरातील सूजविरोधी हार्मोन्सची संख्या वाढवून सूज कमी करण्यासाठी हे औषध वापरण्यात येतं.
 
सामान्यपणे गोळी किंवा इंजेक्शनच्या माध्यमातून दिलं जाणारं हे औषध शरीरातील सूजेसह, अस्थमा, दमा आणि किंवा अॅलर्जी यांसारख्या आजारांवर दिलं जातं. सेप्सिससारख्या गंभीर आजारांवरसुद्धा हे औषध दिलं जातं.
 
डेक्सोना आणि या नावाशी मिळत्याजुळत्या नावांची अनेक औषधं भारतात मोठ्या प्रमाणात वापरली जातात. डॉक्टर पूर्वीपासूनच ही औषधं घेण्याचा सल्ला रुग्णांना देत आले आहेत. या सर्वांमध्ये डेक्सामेथासोन नावाचं मिश्रण वापरलं जातं.
 
डेक्सामेथासोन कसं काम करतं?
हे औषध शरीरातील रोगप्रतिकार शक्तीच्या मदतीने काम करतं.
 
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरस शरीरात शिरल्यानंतर सूज वाढवण्याचा प्रयत्न करतो. शरीर ही प्रक्रिया बंद करण्याच्या प्रयत्नात असतो. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती त्या कामात गुंतते. त्यामुळे आपल्याला आजारी असल्यासारखं वाटू लागतं.
 
काहीवेळा शरीराची प्रतिकारशक्ती या व्हायरसवर ओव्हर-रिअॅक्ट होते. अशा स्थितीत आपल्या प्रतिकारशक्तीचा आपल्याच शरीराच्या पेशींवर हल्ला होतो. या सर्वांचा उलट परिणाम होऊन संबंधित रुग्णांचा मृत्यू होण्याचा धोका वाढतो.
 
कोरोना व्हायरस शरीरात शिरल्यानंतर सूज येण्याची हीच प्रक्रिया संथ करण्यासाठी डेक्सामेथासोन हे औषध प्रभावी ठरत असल्याचं समोर आलं आहे.
 
सहाजिकच हे औषध रुग्णालयात दाखल असलेल्या, व्हेंटीलेटर किंवा ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या गंभीर रुग्णांवरच वापरलं जाऊ शकतं.
 
अलाक्षणिक रुग्णांवर हे औषध उपायकारक ठरू शकत नाही. कारण अशा स्थितीत त्यांची प्रतिकारशक्ती मंद करून काहीच उपयोग होत नाही.
 
डेक्सामेथासोन किती परिणामकारक?
ब्रिटनमधील शास्त्रज्ञांच्या मते, डेक्सामेथासोनच्या वापरामुळे व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांमधलं मृत्यूचं प्रमाण एक तृतीयांशनं कमी करता येऊ शकतं.
 
ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या रुग्णांच्या बाबतीत हे प्रमाण एक पंचमांश आहे. म्हणजेच पाचपैकी एक मृत्यू या औषधामुळे टाळता येऊ शकतो.
 
पण कृत्रिम श्वसनयंत्रणेचा सपोर्ट नसलेल्या रूग्णांसाठी फक्त औषधाचा वापर परिणामकारक ठरू शकत नाही.
 
डेक्सामेथासोनचा प्रयोग कसा करण्यात आला?
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या एका पथकाने हे संशोधन केलं आहे. त्यांनी रुग्णालयांमध्ये दाखल 2100 हजार रुग्णांना सलग 10 दिवस डेक्सामेथासोन हे औषध दिलं. या काळात औषध न दिलेल्या इतर 4300 रुग्णांचाही या संशोधनात अभ्यास करण्यात आला.
 
व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांना हे औषध दिल्यानंतर त्यांच्या मृत्यूची शक्यता 28 ते 40 टक्क्यांनी कमी झाली. तर ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या रुग्णांमध्ये हे प्रमाण 20 ते 25 टक्के कमी झालं.
 
त्यामुळे या औषधाचा कोरोना व्हायरसच्या रुग्णांसाठी उपयोग होऊ शकतो, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे.
 
पण सदर औषध फक्त प्रौढ रुग्णांनाच देता येऊ शकतं, गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी हे औषध वापरता येऊ शकत नाही, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.
 
औषधाची उपलब्धता किती?
डेक्सामेथासोन हे औषध स्वस्त आणि सहजपणे उपलब्ध आहे. मंगळवारी डेक्सामेथासोन हे औषध कोरोनावर उपायकारक आहे, अशी बातमी आल्यानंतर ठिकाठिकाणी 'डेक्सोना' औषधाची मागणी वाढली आहे. या औषधाच्या गोळ्या आणि इंजेक्शनच्या विक्रीमध्ये वेगाने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
 
हे औषध पूर्वीसुद्धा सामान्यपणे विकलं जात होतं. पण गेल्या दोन-चार दिवसांपासून औषधाबाबत चिट्ठी असणारे लोक एका-एका महिन्याचं औषध घेऊन जात आहेत.
 
रोहन कपूर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये मेडीकल दुकान चालवतात. त्यांच्याशी बीबीसीचे प्रतिनिधी नितीश श्रीवास्तव यांनी बातचीत केली.
 
ते सांगतात, "0.5 एमजी पॉवरची डेक्सोनाच्या 30 गोळ्यांचं पाकिट फक्त 7 रुपयांना मिळतं. फक्त शहरातच नव्हे तर खेड्या-पाड्यातही याचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होतो.
 
डेक्सामेथासोनचा शोध 1957 मध्ये लागला. बऱ्याच काळापासून हे औषध उपलब्ध असल्यामुळे आता त्यावरचा पेटंटचा हक्कसुद्धा सार्वजनिक झाला आहे.
 
म्हणजेत औषध क्षेत्रातील कोणत्याही कंपन्या याचं उत्पादन घेऊ शकतात. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात हे उपलब्ध होऊ शकतं.
 
जगभरात काय प्रतिक्रिया?
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या संशोधनाचं स्वागत केलं आहे. आता सौम्य लक्षणं असलेल्या लोकांसाठी उपचारपद्धती विकसित करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
 
विकसनशील आणि अविकसित देशांसाठीही हे औषध म्हणजे चांगली बातमी आहे.
 
स्वस्त दरामुळे गरीब देशांना या औषधाचा फायदा होईल. आफ्रिकेतल्या अनेक देशांना त्याचा उपयोग होईल.
 
साऊथ आफ्रिकेत या औषधाचं उत्पादन घेतलं जातं. तिथल्या ऑक्सिजन किंवा व्हेंटीलेटर सपोर्टवरच्या रुग्णांवर या औषधाचा वापर सुरू करण्यात आला आहे.
 
WHO च्या आकडेवारीनुसार आफ्रिका खंडात 5 हजारांहून जास्त रुग्णांचा बिकट वैद्यकीय परिस्थितीमुळे मृत्यू झाला आहे.
 
कोणत्या परिस्थितीत डेक्सामेथासोन वापरावा?
हे औषध शरीराच्या आतील भागातील सूजेमुळे येणाऱ्या आजारांवर परिणामकारक ठरू शकतं. बातमीत सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अशा आजारांमध्ये रोग प्रतिकारशक्तीचा 'ओव्हर-ड्राईव्ह' होतो. उदाहरणार्थ, अस्थमामध्ये श्वसननलिका आणि फुफ्फुसांमध्ये सूज येते, त्याशिवाय इतर अॅलर्जी आणि सांध्यांची सूज अशा आजारांवर औषध प्रभावी उपाय आहे.
 
आपल्याच रोगप्रतिकारशक्तीच्या हल्ल्यामुळे काहीवेळी शरीरातील पेशींची हानी होत्या. उदाहरणार्थ अर्थरायटीस किंवा ल्यूपस यांसारख्या आजारांमध्ये अशी स्थिती निर्माण होते. अशा स्थितीत डेक्सामेथासोन जालीम औषध आहे.
 
याचे काही दुष्परिणाम आहेत का?
सामान्यपणे इतर नॉन-कोव्हिड आजारांमध्ये डेक्सामेथासोनच्या वापरामुळे अस्वस्थ वाटणे, निद्रानाश, वजन वाढणे आणि फ्लूएड रिटेन्शन यांसारखे दुष्परिणाम दिसू लागतात.
 
काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये डोळ्यांचे विकार, दृष्टीवर परिणाम किंवा अंतर्गत रक्तस्त्राव यांसारखे दुष्परिणाम दिसून येतात.
 
पण कोरोना व्हायरसच्या रुग्णांना दुष्परिणाम टाळण्यासाठी कमी प्रमाणात हे औषध घेण्याची गरज आहे.
 
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध अजिबात घेऊ नका, असं आवाहन आयसीएमआरकडून करण्यात आलं आहे.
 
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेतलं तर त्याचे गंभीर परिणाम रुग्णाच्या आरोग्यावर होतात असा इशाराही देण्यात आला आहे.
 
इतर स्टेरॉईडचा उपयोग होईल का?
डेक्सामेथासोन आणि कोरोना व्हायरसबाबत संशोधन करणाऱ्या इंग्लंडमधील पथकाचे प्रमुख प्रा. पीटर हॉर्बी यांच्याकडून बीबीसीने माहिती घेतली.
 
"आत्ताचा कोरोना व्हायरस किंवा आधीच्या सार्स साथीसह इतर विषाणूंच्या उद्रेकावेळी स्टेरॉईडचा वापर रुग्णांवर कितपत प्रभावी ठरतो, याविषयी मत-मतांतरं आहेत. याबाबत दोन्ही बाजू मांडल्या जातात. या विषयावर वादविवाद होऊ शकतो, असं प्रा. हॉर्बी सांगतात.
 
शास्त्रज्ञ मिथीलप्रेडनिसोलोनसारख्या इतर स्टेरॉईड्सचा प्रयोग करत आहेत. काही कोव्हिड-19 रुग्णांनी याला चांगला प्रतिसाद दिल्याचंही सांगितलं जात आहे.
 
भारतातील डेक्सामेथासोनची स्थिती
भारतात डेक्सामेथासोनचा उपयोग 1960 पासून करण्यात येतो. लोकसंख्येत वाढ होत गेली, तसा या औषधाचा वापरही वाढला.
 
देशात डेक्सामेथासोनची विक्री प्रतिवर्ष 100 कोटी रुपयांपेक्षाही जास्त होते, असा अंदाज आहे. औषध स्वस्त दरात उपलब्ध असल्यामुळे याची मागणी जास्त असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
 
भारताच्या औषध दर नियंत्रण धोरणानुसार, या औषधाच्या पाकिटाची किंवा इंजेक्शनची किंमत पाच ते दहा रुपयांपर्यंत असू शकते.
 
औषध संशोधन आणि उत्पादन तज्ज्ञ डॉ. अनुराग हितकारी सांगतात, डेक्सामेथासोन सोडियम फॉस्फेट हे एक स्टेरॉईड आहे. भारतात सर्वत्र हे उपलब्ध आहे.
 
देशात लहान-मोठ्या अशा आठ कंपन्या याचं उत्पादन घेतात. गोळ्या किंवा इंजेक्शन स्वरूपात डेक्सामेथासोन मिळतं. यासाठी आवश्यक असणारी सामुग्री विदेशातून आयात केली जाते.
 
भारतात याचा वापर ब्लड कॅन्सर किंवा तत्सम आजारांवर सुद्धा होत आला आहे.
 
इंद्रप्रस्थ, अपोलो आणि मेदांता हॉस्पिटलमध्ये कॅन्सर विभागाचे माजी प्रमुख डॉ. राकेश चोपडा सांगतात, स्टेरॉईड मानवी शरीरात कॅन्सर सेल्सला लक्ष्य करत असल्यामुळे याचा वापर प्रभावी ठरतो. यामुळे किमोथेरपीदरम्यान याचा उपयोग होतो.
 
खेळाडूंसाठीचा वापर
विविध खेळात सहभागी होणारे खेळाडू डेक्सामेथासोनचा वापर नियमितपणे करत आले आहेत.
 
किरकोळ किंवा गंभीर जखमांतून लवकर बरे होण्यासाठी औषध प्रभावी ठरतं.
 
पण आंतरराष्ट्रीय डोपिंग नियंत्रण संस्थेने डेक्सामेथासोनच्या वापरावर निर्बंध घातलेली आहेत. कोणत्याही स्पर्धेदरम्यान वापरण्यास बंदी असलेल्या औषधांच्या यादीत डेक्सामेथासोनचा समावेश आहे.
 
पण स्पर्धेपूर्वी किंवा स्पर्धा झाल्यानंतर डेक्सामेथासोनचा वापर करता येऊ शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
 
ते सांगतात, श्वसनसंबंधित विषाणूजन्य संसर्गावर स्टेरॉईड्सचा वापर वादग्रस्त राहिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments