झुबैर अहमदसौदी अरबमधील सर्वोच्च धार्मिक परिषदेनं जगभरातील मुसलमानांना रमजानच्या पवित्र महिन्यात मशिदींमध्ये जाऊन नमाज न पढण्याचं आवाहन केलं आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्याच्या दृष्टिनं ही खबरदारी घेण्यात आलीये. मुसलमानांनी अशाप्रकारे एकत्रित येणं टाळलं पाहिजे, असं परिषदेनं म्हटलं आहे.
भारतात रमजान 23 किंवा 24 एप्रिलपासून सुरू होत आहे. एका महिन्यानंतर ईद साजरी केली जाते. ईदच्या निमित्ताने लोक एकमेकांच्या घरी जातात आणि गळाभेट घेत शुभेच्छा देतात.
कोरोनामुळे भारतात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय आणि देशभरातील धार्मिक स्थळं बंद आहेत, ज्यामध्ये मशिदींचाही समावेश आहे.
केवळ भारतातच नाही तर सौदी अरबमध्येही मशिदी बंद करण्यात आल्या आहेत. जगभरातील मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या मक्का मशिदीचाही यात समावेश आहे.
इराणमधील इस्लामी सरकारनं म्हटलं आहे, की लॉकडाऊनमुळे जर कोणी मुसलमान रमजानमध्ये रोजे पाळू शकला नाही तरी हरकत नाही.
भारतातील काही मान्यवर मुसलमान नागरिकांनीही रमजानच्या दरम्यान मशिदीमध्ये जाऊन नमाज पढू नये, असं आवाहन मुस्लिम समुदायाला केलं आहे.
पाकिस्तानमध्ये मात्र इमाम आणि मौलवींनी आपल्याच सरकारविरोधात बंडाचा झेंडा रोवला आहे. मौलवींच्या एका परिषदेनं घोषणा केलीये, की मुसलमान रमजानच्या दरम्यान मशिदीमध्ये जाऊन नमाज पढतील.
रमजानसाठी गाइडलाइन्स
भारतातील बुद्धिजीवींनी मौलवींसोबत चर्चा करून भारतीय मुसलमानांसाठी काही गाइडलाइन्स प्रसिद्ध केले आहेत. त्यापैकी काही महत्त्वाच्या गोष्टी खालीलप्रमाणे-
मशिदीमध्ये जाण्याऐवजी आपल्या घरातच नमाज पठण करावं. लॉकडाऊनदरम्यान मशिदींमधील लाउडस्पीकरवरून अजान देणंही बंद केलं जावं.
रोजा सोडल्यानंतर रात्री पढला जाणारा नमाज आणि तरावीह (रोजा सोडल्यानंतरचा महत्त्वपूर्ण नमाज) सुद्धा घरातच पढण्यात यावी.
मशिदीमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन केलं जाऊ नये.
रमजानच्या खरेदीसाठी घरातून बाहेर पडू नये.
अजून बरीच आव्हानं
याशिवाय देशभरातील अनेक मशिदींमधून रमजानच्या महिन्यातही लॉकडाऊनचं पालन केलं जावं, अशी घोषणा करण्यात येत आहे.
दिल्लीतील महारानी बाग भागात एक जुनी मशीद आहे. या मशिदीच्या गेटला कुलूपच आहे. या मशिदीची देखभाल करणाऱ्या मोइनुल हक यांनी सांगितलं, की मशीद अजून बंद असली तरी पाच वेळा लाउड स्पीकरवरून अजान दिली जाते.
मुस्लिमधर्मीयांनी रमजानची तयारी सुरू केली आहे. मात्र लोकांशी बोलल्यावर जाणवलं, की यावेळी खाण्या-पिण्याच्या तयारीपेक्षाही आध्यात्मिक गोष्टींवर अधिक भर आहे.
हैदराबादमधील एक व्यापारी फरीद इकबाक यांच्या मते, ही वेळ मशिदींमध्ये गर्दी करण्याची नाहीये. घरामध्येच राहून मनापासून ईश्वराची प्रार्थना करण्याची संधी आपल्याला या लॉकडाऊनमुळे मिळाली आहे.
रमजानचा महिना मुसलमानांसाठी सर्वाधिक पवित्र आहे. या महिन्यात मुस्लिम लोक तीस दिवस मशिदीमध्ये जाऊन नमाज आणि कुराण पठण करतात.
माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरैशी यांनी सांगितलं, की जे लोक अगदी नियमित मशिदीमध्ये जात नाहीत, तेसुद्धा रमजानच्या काळात आवर्जून मशिदीत येतात. या पवित्र महिन्यात जर मशिदीत नाही गेलो, तर पाप लागेल अशी त्यांची समजूत असते. या गाइडलाइन्समधून हे समजावण्याचा प्रयत्न केलाय, की जर मक्केला (सौदी अरब) कुलूप लागू शकतं तर आपल्या मशिदी तर खूप छोटी गोष्ट आहे.
लॉकडाऊन असतानाही गाइडलाइन्सची काय गरज?
मेरठमधील एका मशिदीचे इमाम नजीब आलम यांच्या मते रमजान हा प्रार्थनेचा पवित्र महिना आहे. प्रार्थना घरीही करता येते, पण या महिन्यात मशिदींमध्ये जास्त गर्दी होते.
खरं तर जगभरातील ज्या देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय, त्या सगळ्याच देशातील मुस्लिम समुदायासाठी हे आव्हान आहे. मात्र भारतातील मुसलमान आणि धर्मगुरूंनी गाइडलाइन्स प्रसिद्ध करून मुसलमान रमजानमध्येही लॉकडाऊनचं पालन करतील हे निश्चित करण्याचा प्रयत्न केलाय.
भारतीय अल्पसंख्याक आर्थिक विकास एजन्सीचे अध्यक्ष एम जे खान यांनी म्हटलं, की हा खूपच प्रशंसनीय उपक्रम आहे. कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी मुस्लिम समुदायाचे नेते आवश्यक ती पावलं उचलत आहेत.
काही दिवसांपूर्वीच दिल्लीच्या निजामुद्दीन भागात तबलिगी जमातच्या कार्यक्रमादरम्यान हजारो लोक एकत्र आले होते, त्यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचंही समोर आलं.
त्यानंतर काही माध्यमांमधून तसंच सोशल मीडियावरून भारतात कोरोनाच्या संसर्गासाठी मुस्लिम समुदायाला जबाबदार ठरवलं जाऊ लागलं. अनेक ठिकाणी मुसलमानांसोबत भेदभाव झाल्याच्या तक्रारीही होऊ लागल्या.
दिल्लीमधील मुसलमानांसाठीची संस्था इंडियन मुस्लिम्स फॉर इंडिया फर्स्टच्या मौलवी आणि इमामांच्या मार्गदर्शनाखाली या गाइडलाइन्स तयार केल्या गेल्या आहेत.
या मुस्लिम संस्थेचे एक प्रसिद्ध सदस्य आणि इन्कम टॅक्स विभागाचे माजी आयुक्त सय्यद जफर महमूद यांनी म्हटलं, की भेदभाव करणं हा माणसाचा स्वभावच आहे. मुसलमानांसोबत (कोरोना व्हायरसच्या प्रादूर्भावाला जबाबदार ठरवत) भेदभाव झालाय. मात्र आपल्या सगळ्यांनाच कोरोनावर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे.
सरकारकडून उशीरा स्पष्टीकरण
मुस्लिम समुदाय खरं तर सावध आहे. तब्लिगी जमातनं धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करून चूक केली असल्याची भावना सामान्य मुस्लिमांमध्ये आहे. मात्र त्यानिमित्ताने पूर्ण समुदायालाच लक्ष्य करून बदनाम करण्याचाही प्रयत्न होतोय.
सरकारनं या गोष्टीचा निषेध कसा केला नाही, असा प्रश्न अनेक मुसलमानांना पडला. तबलिगी जमात प्रकरणानंतर सुरुवातीला सरकारकडून कोणतंही स्पष्टीकरण आलं नाही. मात्र त्यानंतर मुसलमानांना लक्ष्य करण्यात येऊ नये, असं आवाहन करण्यात आलं.
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांनीसुद्धा मुसलमानांना बदनाम करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची घोषणा केली होती.
रविवारी (19 एप्रिल) पंतप्रधान मोदींनी म्हटलं, "कोव्हिड-19 जात, धर्म, रंग, पंथ, भाषा या सीमा पाहून होत नाही. त्यामुळेच आपण एकता आणि बंधुभावाला प्राधान्य द्यायला हवं. या परिस्थितीत आपण एकत्र राहायला हवं."
'आता जबाबदारीनं वागण्याची वेळ'
लखनौमध्ये एका मशिदीचे इमाम असलेल्या जाहिद घनी यांच्या मते यावेळी रमजान आणि ईद अगदीच बेरंग असतील, पण मुसलमानांनी लॉकडाऊनचं पालन केलं नाही, तर त्यांची बदनामी होईल.
रमजानचा महिना संपेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा, असंही काही मुसलमानांचं म्हणणं आहे. मौलाना आझाद नॅशनल विद्यापीठाचे कुलगुरू फिरोज बख्त अहमद यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून लॉकडाऊनचा कालावधी 24 मे पर्यंत वाढवावा, अशी विनंती केली आहे.
भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरैशी म्हणतात, "केवळ मशिदीत जाण्यापासून अडवलं जातंय, असा विचार मुसलमानांनी करू नये. लॉकडाऊनच्या दरम्यान मंदिर, गुरुद्वारे आणि चर्चमध्येही जाण्यावर निर्बंध आहेत."
"रमजानच्या तरावीहमध्ये (रोजा सोडतानाचा महत्तवाचा नमाज) मशिदीमध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गाइडलाइन्सनुसार मुसलमानांनी लॉकडाऊनचं पालन करावं आणि मशिदीमध्ये जाऊ नये."
पण सामान्य मुसलमान गाइडलाइन्स पाळतील?
जफर महमूद सांगतात, "लॉकडाऊनच्या काळात त्रास होणार नाही. तसंही लॉकडाऊन तीन आठवड्यांपासून लागू आहे. लोकांना आता याची सवय झालीये. तो लोकांच्या आणि देशाच्या फायद्यासाठीच आहे. रमजानसोबतच लॉकडाऊन सुरू झाला असता तर त्रास झाला असता."