बारामतीच्या देसाई इस्टेट परिसरात राहणारे रितेश साळवे लॉकडाऊनमुळे सध्या घरीच आहेत. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून त्यांना घराबाहेर पडण्याची वेळच आली नाही. दूध, भाजीपाला, फळं यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा त्यांना घरपोच होतो. त्यामुळे एखादी वस्तू हवी असली तर नगरपरिषदेने दिलेल्या क्रमांकावर फोन करायचा, त्यांना आवश्यक वस्तूंची यादी पाठवायची, सामान आल्यानंतर पैसे द्यायचं, एवढीच प्रक्रिया त्यांना पार पाडावी लागते.
खरंतर, रितेश राहतात त्या भागात कोरोना व्हायरसचा रुग्ण अद्याप आढळलेला नाही. तरीसुद्धा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेल्या कंटेनमेंट झोनप्रमाणेच प्रतिबंध रितेश यांच्या परिसरातही घालण्यात आले आहेत. पण असं असूनही लॉकडाऊनच्या काळात रितेश यांना जीवनावश्यक वस्तूंबाबत कोणत्याही अडचणीचा सामना करावा न लागल्याने ते समाधानी आहेत.
बारामती शहरात सगळीकडे सध्या हीच परिस्थिती आहे. इथं 8 एप्रिलपर्यंत 6 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले होते. पण नंतर शहरात योग्य पावले उचलल्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यात यश आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
बारामतीमध्ये त्यामुळे शहरात राबवलेला 'बारामती पॅटर्न' आदर्श असून राज्यभरात इतरत्रही तो राबवता येऊ शकतो, असं पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना वाटतं.
त्यामुळे देशात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी मॉडेल म्हणून दाखवण्यात येत असलेल्या केरळ पॅटर्न, भिलवाडा पॅटर्न आणि सांगली पॅटर्नप्रमाणेच महाराष्ट्रातील बारामती पॅटर्नची चर्चा राज्यभर सुरू आहे. हे बारामती पॅटर्न नेमकं आहे तरी काय, याचा आढावा घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीने केला आहे.
हाच बारामती पॅटर्न आता पुण्यात राबवा अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
भिलवाडा पॅटर्नमधूनच प्रेरणा
जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठीच लोकांची रस्त्यावर गर्दी होत आहे. ही गर्दी रोखण्यासाठी राजस्थानातील भिलवाडा पॅटर्नमधून प्रेरणा घेऊन बारामतीत अशा प्रकारची यंत्रणा राबवण्याचा निर्णय घेतल्याचं बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश कडूसकर सांगतात.
ते सांगतात, “29 मार्चला बारामतीत पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण श्रीरामनगर भागात आढळून आला. हा रुग्ण एक रिक्षाचालक होता. त्याला कोरोना व्हायरसची लागण कुठून झाली, याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याबाबत कळू शकलं नाही. त्यानंतर 6 ते 8 एप्रिल या कालावधीत आणखी पाच कोरोनाग्रस्त आढळून आले. हे रुग्ण एका भाजी विक्रेत्या कुटुंबातील होते. नंतर मेडिकलमध्ये काम करणाऱ्या मुलाच्या वडिलांनाही कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं.”
दरम्यान, एका रुग्णाचा मृत्यूही बारामतीत झाला होता. त्यामुळे प्रकरण गांभीर्याने घेऊन उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये भिलवाडा पॅटर्न राबवण्याची सूचना केली. त्यानुसार वेगवान निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात आली. पण बारामतीत भिलवाडा पॅटर्नच्याही पुढे जाऊन सर्व नियोजन करण्यात आलं. त्यामुळे एक स्वतंत्र बारामती पॅटर्न तयार झाल्याचं मुख्याधिकारी योगेश कडूसकर सांगतात.
पोलीस, नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांची फळी
पुणे जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केलेल्या सूचनेनुसार कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी बारामतीमध्ये पोलीस, प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, विक्रेते, स्वयंसेवक आणि नागरिकांच्या समन्वयातून काम करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं मुख्याधिकारी कडूसकर सांगतात.
बारामती शहरात नगरपरिषदेचे 44 नगरसेवक आहेत. या प्रत्येक नगरसेवकाकडे त्याच्या वॉर्डातील कामांची जबाबदारी देण्यात आली. नगरसेवकाच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांना स्वयंसेवक म्हणून सोबत घेण्यात आलं. त्यांना प्रत्येकी एक मदत सहाय्यता अधिकारी, एक पोलीस अधिकारी, विक्रेते यांना जोडून देण्यात आलं. या सर्वांचे संपर्क क्रमांक संबंधित वॉर्डमधील लोकांपर्यंत पाहोचविण्यात आले आहेत. यांच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्य सेवा, रेशन, अन्नधान्य, दूध, गॅस सिलेंडर, फळे आणि भाजीपाला यांची यादी त्यांच्या वॉर्डातील संबंधित लोकांच्या मोबाईल टाकल्यावर काही कालावधीतच अगदी दारात नागरिकांना या वस्तू देण्यात आल्या.
ॲपच्या माध्यमातून घरपोच सेवा
प्रशासनाकडून एका मोबाईल ॲपचीही निर्मिती करण्यात आल्. या ॲपवरही नागरिकांना आपल्या आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची यादी टाकता येते. त्यावर यादी टाकल्यावर काही वेळातच नागरिकांना अगदी दारातच वस्तू आणि भाजीचा पुरवठा करता येतो. पण या वस्तू घरपोच देताना नागरिकांकडून कोणताही जास्तीचा दर घेण्यात आला नाही, असं प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे सांगतात.
स्थानिक रहिवासी रितेश साबळे सांगतात, “या ॲपला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. पण सर्वच नागरिकांना अॅपचा वापर जमत नसल्यामुळे इतरांनी फोन क्रमांकावर संपर्क साधून आपल्याला आवश्यक वस्तूंची ऑर्डर दिली. त्यांनासुद्धा घरपोच वस्तू मिळण्याची सोय करण्यात आल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्याची वेळच आली नाही.”
जीवनावश्यक वस्तूंचं किट
सामान्य नागरिकांसाठी किराणा मालाबरोबरच भाजी आणि दुधाची आवश्यकता असते. त्यासाठी प्रशासनाने स्थानिक शेतकऱ्यांशी समन्वय साधून अत्यंत माफक दरात भाजीची उपलब्धता केली, अशी माहिती कडूसकर यांनी दिली.
त्यासाठी भाजीचं 35 रुपयांचं एक किट तयार करण्यात आलं. या किटमध्ये वांगी, अर्धा किलो टोमॅटो, 1 किलो कोबी, 1 कोथिंबीरीची जुडी यांचा समावेश आहे. तसंच संपूर्ण आठवड्याच्या भाजीचं 300 रुपयांचं किटही उपलब्ध करून देण्यात आलंय. शिवाय अधिक भाजी हवी असल्यास मागणी नोंदवल्यानंतर उपलब्ध करून दिली जाते.
कोणत्याही वस्तूचा पुरवठा लोकांना करताना त्या वस्तू कमीत कमी लोकांच्या संपर्कात येतील, अशी व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी 44 नगरसेवकांना 44 ठराविक पुरवठादारांना जोडून देण्यात आलं आहे.
संपूर्ण शहर सील
रुग्ण सापडल्यानंतर फक्त कंटेनमेंट झोन पूर्णपणे बंद न करता संपूर्ण शहरच सीलबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन केल्यानंतर बारामती शहरात फिरताना अत्यावश्यक सेवेतील लोकांनाही काही प्रमाणात अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिसांनाच या लोकांना पास देण्यास सांगण्यात आलं, असं बारामतीचे पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर सांगतात.
अत्यावश्यक सेवांसाठी पोलिसांनी डिजीटल पास दिले. त्यात पोलिसांसाठी 'कोरोना वॉरिअर', वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी 'कोरोना फायटर' आणि स्वयंसेवक-सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांसाठी 'कोरोना सोल्जर' आशा तीन प्रकारच्या, तीन वेगवेगळ्या रंगाच्या पासची व्यवस्था करण्यात आली. तसंच विनापरवाना फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली. प्रत्येक चौकात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शहरात अनावश्यक फिरणाऱ्यांवर कडक निर्बंध आले आहेत. हीच स्थिती लॉकडाऊन संपेपर्यंत राहील, असं शिरगावकर यांनी स्पष्ट केलं.
सर्वेक्षणातून सापडला सातवा रुग्ण
बारामतीमध्ये सहा रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाने विविध भागात स्वतःहून सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. बारामती नगरपरिषद आणि आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधित क्षेत्रात एकूण 246 टीम तसंच ग्रामीण भागासाठी 28 टीम तयार करण्यात आल्या. त्यांच्यामार्फत दररोज सर्वेक्षण करून विविध भागातील नागरिकांची माहिती गोळा करण्यात आली.
रक्तदाब, मधुमेह, ताप यांसारखी लक्षणं असलेल्या लोकांची यादी तयार करण्यात आली. आरोग्य अधिकारी या लोकांना दर तीन ते पाच दिवसांनी भेट देतात. या सर्वेक्षणातूनच बारामतीत सातवा रुग्ण आढळून आल्याचं कडूसकर यांनी सांगितलं.
शहरातील 92 जणांना होम क्वॉरंन्टाईन करण्यात आलं आहे. या होम कोरोन्टाईन लोकांचीही नियमित तपासणी करण्यात येत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
बारामतीत कामाच्यानिमित्तानं आलेल्या परप्रांतीय कामगारांनाही निवारा देण्यात आला. त्यांच्या रोजच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनाकडून करून देण्यात आली आहे. यासाठी तीन निवारा केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी त्यांना सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
437 जणांवर कारवाई, 275 वाहनं जप्त
एवढं सगळं करूनही विनाकारण रस्त्यावर फिरणारे काहीजण बारामतीमध्येही आहेतच.
अशा प्रकारे विनाकारण रस्त्यावर येऊन नियम मोडणाऱ्या 437 लोकांवर कारवाई केल्याचं उपअधीक्षक नारायण शिरगावकर सांगतात.
ते सांगतात, "आतापर्यंत 437 लोकांवर कारवाई करून 275 वाहनं जप्त करण्यात आली आहेत. त्यापैकी 15 जणांना न्यायालयाने शिक्षाही सुनावली आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखायचा असेल, तर लोकांनी पोलिसांना सहकार्य करावे. अन्यथा अशीच कारवाई यापुढेही करण्यात येईल."