शनिवारी सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते म्हणून शपथ घेतली की स्वतंत्र आमदार म्हणून, हे लगेचच स्पष्ट नव्हतं.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष मिळून महाविकासआघाडीचं सरकार सत्तास्थापन करणार, असं चित्र असतानाच शनिवारी शपथविधी सोहळा झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
मतदानापूर्वी आणि निकालांनंतरही अजित पवार नाराज असल्याचं अनेकदा दिसलं होतं. त्यामुळे अजित पवारांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला की फोडला, अशा प्रश्नांना ऊत आला आहे.
आज शपथ घेतल्यानंतर ANIशी बोलताना ते म्हणाले, "कुणी सरकार बनवू शकलं नाही. नुसती चर्चा सुरू होती. तिघं येऊन स्थिर सरकार बनलं नसतं. मी स्थिर सरकारसाठी हा निर्णय घेतला."
मात्र भाजपसोबत जाण्याच्या अजित पवार यांच्या निर्णयाची त्यांचे काका आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना कल्पना होती का? अजित पवार यांच्याबरोबर किती आमदार आहेत? अशा विविध शक्यता निर्माण झाल्या आहेत.
"अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे," असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.
"अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, शरद पवारांना धोका दिला. त्यांची देहबोली पहिल्यापासूनच संशयास्पद होती. शरद पवार यांना घरातूनच दगा देण्याचा प्रयत्न झाला आहे. पैसा आणि सत्तेचा गैरवापर करून हे करण्यात आलं आहे," अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दिली.