प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागल्याचं पहायला मिळत आहे.
ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी पोलिसांनी उभे केलेले बॅरिकेड्स तोडले आहेत, तर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.
किसान मजदूर संघर्ष समितीने बीबीसी पंजाबीशी बोलताना सांगितलं की ते आधी ठरलेल्या रूटवरच ट्रॅक्टर रॅली करणार आहेत. ते सांगतात की ते मध्य दिल्लीभोवतीच्या रिंग रोडवर फेरी मारून परत जातील. पण अनेक शेतकरी मध्य दिल्लीतल्या ITO परिसरात पोहोचले आहेत. तिथे पोलीस निदर्शकांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे ठिकाण इंडिया गेट, संसद भवन आणि इतर महत्त्वाच्या वास्तूंपासून अवघ्या एक-दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे.
बीबीसी प्रतिनिधी सलमान रवी सांगतात की, पोलिसांची संख्येपेक्षा निदर्शकांची संख्या खूप जास्त असल्यामुळे पोलीस अनेक ठिकाणी अगतिक दिसत आहेत. थेट मध्ये दिल्लीपर्यंत शेकडो निदर्शक पोहोचतील, हे गृहित धरून तयारी केलेली दिसत नाहीये.
शेतकरी आणि पोलिसांमध्ये आधी चर्चा झाली होती, त्यानुसार शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर्स दिल्लीभोवतीच्या रस्त्यांवर फेरी मारून परत जाणार होते. निदर्शक शेतकरी आणि त्यांचे ट्रॅक्टर्स अतिसंवेदनशील आणि अतिमहत्त्वाच्या मध्य दिल्ली परिसरात येणं अपेक्षित नव्हतं. अजूनही ट्रॅक्टर्स मध्य दिल्लीत शिरले नसले, तरी निदर्शक मात्र मोठ्या संख्येने पोहोचू लागले आहेत. त्यामुळे मध्य दिल्लीत संघर्ष सुरू आहे.
दिल्लीतली काही मेट्रो स्टेशन्स बंद
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने काही मेट्रो स्टेशन बंद करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
दिल्ली मेट्रोच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशन तसंच ग्रीन लाइनवरील काही मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आले आहेत.
ग्रीन लाइनवर बहादुरगढ सिटी, टिकरी बॉर्डर, टिकरी कलां, मुंडका, नांगलोई, नांगलोई रेल्वे स्टेशन ही प्रमुख स्टेशन्स आहेत. याच मार्गाने आंदोलक शेतकरी दिल्लीत येण्याचा प्रयत्न करत आहेत.
दिल्ली मेट्रोनं पश्चिम दिल्लीतील काही मेट्रो स्टेशन्सही बंद केले आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुरक्षेच्या दृष्टीने मेट्रो स्टेशन्स तसेही 12 वाजेपर्यंत बंद केले जातात.
गाझीपूर आणि सिंघु बॉर्डरवर काय परिस्थिती?
सिंघु बॉर्डरहून दिल्लीकडे येत असलेली ट्रॅक्टर रॅली कव्हर करत असलेले बीबीसीचे प्रतिनिधी वेंकट प्रसाद यांनी सांगितलं की, मधुबन चौकाच्या इथे तरुण शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडले. किमान पाच वेळा पोलिसांनी फायरिंग केल्याचं वेंकट प्रसाद यांनी सांगितलं.
त्यानंतर शेतकरी पोलिसांच्या वाहनांवर चढले आणि वॉटर कॅननच्या गाडीचा ताबा घेतला. दुसरीकडे काही ज्येष्ठ शेतकरी या तरूणांना शांतता राखण्याचं आवाहन करत होते.
सिंघु बॉर्डरवर बीबीसीचे प्रतिनिधी अरविंद छाब्रा उपस्थित आहेत. त्यांनी सांगितलं होतं की, शेतकऱ्यांनी ट्रान्सपोर्ट नगरजवळ बॅरिकेड्स तोडले आणि त्यांनी दिल्लीत प्रवेश केला.
सुरक्षेच्यादृष्टिने इथं हजारो पोलिस तैनात करण्यात आले आहेत, मात्र त्यांच्यापेक्षा शेतकऱ्यांची संख्या कितीतरी अधिक आहे. शेतकऱ्यांनी पोलिसांच्या अश्रूधुराच्या गाड्यांवर आणि रॅपिड अक्शन फोर्टच्या गाड्यांवर ताबा मिळवला.
त्यांनी सांगितलं, "शेतकरी सरकारवर नाराज आणि रागावलेले दिसत आहेत. शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडले असून रिंग रोडकडे निघाले आहेत. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की, ते पोलिसांनी ठरवून दिलेल्या मार्गाने जाणार नाहीत. आपण ठरवलेल्या मार्गानेच रिंग रोडवर पोहोचून परेड पूर्ण करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी बोलून दाखवला."
दिल्ली-नोएडा आणि दिल्ली-गाझियाबाद मार्गावर अक्षरधाम मंदिराजवळ पोलिसांनी अश्रूधुराचा मारा केला. इथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दिल्लीहून टिकरी बॉर्डरकडे जाणारा रस्ता गेल्या दोन तासांपासून पूर्णपणे बंद करण्यात आलाय. या भागातील तीन ते चार किलोमीटरच्या अंतरातले चौक पोलिसांनी जेसीबी लावून अडवले आहेत.
नांगलोई चौकात पोलिस आणि सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. काही शेतकऱ्यांनी झेंडे लावलेल्या मोटारसायकल आणि काही कार आणल्या होत्या. पण पोलिसांनी त्यांना परत पाठवलं. अनेक लोक बॅरिकेडिंगबद्दल काही माहीत नव्हतं, ते आपल्या गाड्यांमधून उतरून पुढे चालत जात होते.
ट्रॅक्टर दिल्लीला येण्यासाठी निघाले आहेत. दरम्यान, ANI या वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार दिल्ली-हरियाणाजवळील टिकरी बॉर्डरपाशी शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, टिकरी बॉर्डरहून निघालेली शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली दिल्लीत पोहोचली आहे. शेतकऱ्यांच्या रॅलीसाठी 10 वाजताची वेळ होती, मात्र सर्व सीमांवरून शेतकरी नियोजित वेळेच्या आधीच निघाले आहेत.