Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पद्म पुरस्कार : सिंधुताई सपकाळ यांना सामाजिक कार्यासाठी 'पद्मश्री' घोषित

पद्म पुरस्कार : सिंधुताई सपकाळ यांना सामाजिक कार्यासाठी 'पद्मश्री' घोषित
, मंगळवार, 26 जानेवारी 2021 (09:05 IST)
सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे.
 
सिंधुताई सपकाळ यांनी 1994 साली पुण्यातील पुरंदर तालुक्यात अनाथ मुलांसाठी 'ममता बाल सदन' नावाची संस्था स्थापन केली. अनाथ मुलांसाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रासह देशभरात त्या 'अनाथांची माय' म्हणून परिचित झाल्या.
 
सिंधुताई सपकाळ या गेली 40 वर्षे सामाजिक कार्य करत आहेत. त्यांना आजवर 750 हून अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. अनाथ मुलांना आईसारखी माया देणाऱ्या सिंधुताई नेहमी अभिमानाने सांगतात की, मी हजारहून अधिक मुलांची आई आहे.
 
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सात जणांना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण, तर 102 जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत.
 
गायक एसपी बालसुब्रह्मण्यम यांना पद्मविभूषण (मरणोत्तर), माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पद्मभूषण, तर लोजपचे नेते रामविलास पासवान यांना पद्मभूषण (मरणोत्तर) पुरस्कार जाहीर करण्यात आलं आहे.
 
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
 
महाराष्ट्रातील पद्मश्री पुरस्काराचे मानकरी :
 
परशुराम आत्माराम गंगावणे (कला)
नामदेव सी. कांबळे (साहित्य आणि शिक्षण)
गिरीश प्रभुणे (सामाजिक कार्य)
जसवंतीबेन जमनादास पोपट (उद्योग आणि व्यापार)
सिंधुताई सपकाळ (सामाजिक कार्य)
पद्मविभूषण पुरस्कार :
 
शिंजो आबे, जपानचे माजी पंतप्रधान
एस पी बालसुब्रह्मण्यम, गायक (मरणोत्तर)
डॉ. बेल्ले हेगडे, वैद्यकीय
नरिंदर सिंह कपनी, विज्ञान आणि अभियांत्रिकी (मरणोत्तर)
मौलाना वहिदुद्दीन खान, आध्यात्मिक
बी बी लाल, पुरातत्वशास्त्र
सुदर्शन शाहू, कला
पद्मभूषण पुरस्कार :
 
कृष्णन नायर शांताकुमारी चिथरा, कला
तरुण गोगोई, सार्वजनिक क्षेत्र (मरणोत्तर)
चंद्रशेखर कंबारा, साहित्य आणि शिक्षण
सुमित्रा महाजन, सार्वजनिक क्षेत्र
नृपेंद्र मिश्रा, नागरी सेवा
रामविलास पासवान, सार्वनिज क्षेत्र (मरणोत्तर)
केशुभाई पटेल, सार्वजनिक क्षेत्र (मरणोत्तर)
कल्बे सादिक, आध्यात्मिक (मरणोत्तर)
रजनिकांत देविदास श्राॉफ, व्यापार आणि उद्योग
तरलोचन सिंग, सार्वजनिक क्षेत्र
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भारतरत्न पुरस्कारानंतरचे पद्म पुरस्कार प्रतिष्ठेचे मानले जातात. राजकारण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना केंद्र सरकारतर्फे गौरवण्यात येतं.
 
इतर राष्ट्रीय पुरस्कारांचीही घोषणा
दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील 59 व्यक्तींना आज 'जीवन रक्षा पदक पुरस्कार' जाहीर झालेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे.
 
महाराष्ट्रातील परमेश्वर बालाजी नागरगोजे यांना 'उत्तम जीवन रक्षा पदक' जाहीर झाले आहे. तर 'जीवन रक्षा पदक' पुरस्कार अनिल दशरथ खुले आणि बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांना जाहीर झाला आहे.
 
देशातील 52 तुरुंग अधिकारी व कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय कार्यासाठी आज सुधारात्मक सेवा पदक जाहीर झाले. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे.
 
हवालदार सर्वश्री उत्तम विश्वनाथ गावडे, संतोष बबला मंचेकर आणि बबन नामदेव खंदारे यांना उल्लेखनीय सेवेसाठी 'सुधारात्मक सेवा पदक'जाहीर झाले.
 
एका कर्मचाऱ्याला मरणोत्तर सुधारात्मक शौर्य सेवा पदक जाहीर झाले आहे.
 
पोलीस पदकांचीही घोषणा झाली असून, राज्यातल्या 57 पोलिसांना हा पुरस्कार झाला आहे. चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता 'राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक', 13 'पोलीस शौर्य पदक' तर प्रशंसनीय सेवेकरिता 40 'पोलीस पदक' जाहीर झाली आहेत. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रजासत्ताक दिन ट्रॅक्टर रॅली : शेतकऱ्यांनी कशी केली आहे तयारी?