जो बायडन जगाची महासत्ता म्हणवून घेणाऱ्या अमेरिकेचे नवे अध्यक्ष म्हणून शपथ घेत असताना आणखीही एक विषय ट्वीटरवर चांगलाच ट्रेंड होत होता आणि हा विषय होता नोबिता आणि शिजुका यांच्या लग्नाचा.
जगभरात लोकप्रिय असलेले नोबिता आणि शिजुका या दोन कार्टुन कॅरेक्टर्सचं आगामी सिनेमात लग्न होणार असल्याचं पोस्टर्स सिनेमाच्या निर्मात्यांनी ट्वीटरवर टाकलं आणि जगभरात नेटकऱ्यांचा आनंद ओसंडून वाहू लागला. #Nobita हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. अनेकांनी भावुक ट्वीट्सही केले.
बच्चेकंपनीचा आवडता नोबिता
डोरेमॉन या जपानी कार्टुन सीरिजने जगभरात लोकप्रियता मिळवली आहे. डोरेमॉन हे फुजिको-फुजियो यांनी लिहिलेली मांगा कादंबरी आहे. पुढे त्याचे अनेक खंड आले. मांगा हा जपानी कादंबरीचा प्रकार आहे. 1970 साली डोरेमॉन लहान मुलांच्या भेटली आला. या कादंबरीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पुढे त्याच्यावर कार्टुन सीरिज तयार करण्यात आली.
तुम्ही डोरेमॉन बघत लहानाचे मोठे झाला असाल तर या मालिकेतलं मुख्य पात्र असलेला नोबिता तुमच्या चांगलाच परिचयाचा असेल.
नोबिता एक सुमार विद्यार्थी आहे. त्याला एकही काम नीट करता येत नाही. तो गोंधळलेला आणि घाबरट मुलगा आहे. अशात त्याच्याा आयुष्यात येतो डोरेमॉन. डोरेमॉन एक रोबो-मांजर आहे, जो नोबिताच्या मदतीसाठी बावीसाव्या शतकातून मागे एकवीसाच्या शतकात येतो.
डोरेमॉनच्या जादुई गॅझेट्समुळे नोबिता आता कुठलंही काम लिलया पार पाडू लागतो. मात्र, एक गोष्ट त्याला अजूनही जमत नाही आणि ती म्हणजे त्याला त्याची मैत्रीण शिजुका हिला तो त्याच्या मनातल्या भावना सांगू शकत नाही.
नोबिताच्या या गमती-जमती, त्याची फजिती, डोरेमॉनने त्याल केलेली मदत, हे सर्व लहान मुलांना खिळवून ठेवेल अशा अत्यंत मनोरंजक शैलीत डोरेमॉन सीरिजमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.
निष्ठा, चिकाटी, धैर्य, वडिलधाऱ्यांचा आदर हा संदेश यातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवाय, स्ट्रिंग थेअरी, टाईम ट्रॅव्हल यासारख्या गोष्टीही सोप्या पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत.
कार्टून कॅरेक्टर मोठे होतात का?
एकीकडे नोबिता आणि शिजुकाच्या लग्नावरून ट्वीटरवर आनंद ओसंडून वाहत असताना काही यूजर्सने काहीशा नकारात्म प्रतिक्रियाही दिल्या.
गौरव तिवारी लिहितात, "2020 अजून संपलं नाहीय वाटतं. अनपेक्षित गोष्टी अजूनही घडत आहेत."
तर एका यूजरने कार्टुन कॅरेक्टर मोठे कसे होऊ शकतात, हा महत्त्वाचा विषय उपस्थित केला आहे.
याचं कारण असं की कार्टुन कॅरेक्टर्स मोठी होत नाहीत, ते त्याच वयाचे राहतात. प्रेक्षकांच्या पिढ्या बदलतात पण कार्टुन तेवढेच राहतात. मग ते मिकी-मिनी असो, भीम-चुटकी असो किंवा महाराष्ट्राचे लोकप्रिय चिंटु-मिनी.
या नोबिता आणि शिजुकाशी आम्ही जुळवूनच घेऊ शकत नाही, अशीही एक प्रतिक्रिया आल्याचं चिंटू या महाराष्ट्रातल्या सर्वात लोकप्रिय कार्टुन कॅरेक्टरचे जनक चारुहास पंडित सांगतात.
प्रत्येक पिढीला त्यांचा मित्र हवा असतो आणि म्हणूनही कार्टुन कॅरेक्टर मोठे होत नाहीत आणि ते प्रत्येक पिढीची सोबत करतात, असं चारुहास पंडित सांगतात.
ते म्हणाले, "मलासुद्धा अनेकदा अनेकजण विचारतात की तुम्ही चिंटुला मोठा का नाही करत? पण, चिंटू 91 साली आला आणि मी त्याला मोठा करत गेलो असतो तर एव्हाना शिक्षण संपून नोकरीला लागून आतापर्यंत मुली बघायला लागला असता. शिवाय, पुढची जी पिढी येते, त्यांच्यासाठी त्यांच्या बरोबरीचा मित्र हवा, म्हणून चिंटूला त्याच वयाचा ठेवला."
कार्टुन कॅरेक्टर कधी मोठे होत नसले तरी कालानुरूप त्यांचे विषय बदलतात, असंही पंडित सांगतात.
चारुहास पंडित म्हणतात, "जसजशी पुढची वर्षं जातात तसतसं आसपासच्या वातावरणाप्रमाणे कार्टुन बदलत जातात. समजा एखादी कार्टुन सीरिज 1980 मध्ये सुरू झालेली असेल तर 2010 साली किंवा 2020 साली त्या सीरिजमधलं मुख्य कार्टुन कॅरेक्टर त्या-त्या काळातलं बोलेल. उदाहरणार्थ त्याच्या बोलण्यात कॉम्प्युटर, मोबाईल हे विषय येतील. जसं कोरोना काळात कार्टुन शोमध्ये कोरोना विषाणू हा त्या भागाचा मुख्य विषय ठेवून त्याभोवती कथा गुंफलेली असते."
कार्टुन कॅरेक्टरची स्वतःची ओळख असते, त्यामुळे त्यांचं वय कधी बदलत नाही, असं व्यंगचित्रकार असलेले किर्तीश भट्ट सांगतात.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "नोबिताला मोठं का दाखवलं, हे मला कळत नाहीत. डिस्नीची अनेक कार्टुन्स आहेत, भारतातलीही अनेक कार्टुन कॅरेक्टर्स आहेत. ती तेवढीच आहेत कारण त्यांची आयडेंटीटी, ओळख तिच आहे. शिवाय त्यांचा यूएसपीसुद्धा तोच आहे. मुलांना तेच बघायला आवडतं. मी माझं कॅरेक्टरचं वय वाढवलं तर माझ्या कॅरेक्टरची ओळखच संपते. म्हणजे ज्या गोष्टीसाठी तो ओळखला जातो ती गोष्टच बदलते."
नोबिताला मोठं करणं म्हणजे जोखीम आहे का?
किर्तीश भट्ट यांच्या म्हणण्याप्रमाणे कार्टुन कॅरेक्टरचं वय वाढवणं, जोखमीचं आहे. ते म्हणतात, "कंपनीने कदाचित बिझनेसच्या दृष्टीकोनातून ही जोखीम उचलली असावी. इतर कुणी ही जोखीम उचललेली नाही. कारण त्यांना माहिती आहे की बदलत्या पिढीबरोबर आपण आपल्या कार्टुनचंही वय वाढवलं तर कदाचित लोकांना ते आवडणार नाही. कारण तिच त्याची ओळख असते."
ते पुढे सांगतात, "15-20 वर्षांपूर्वी जी मुलं डोरेमॉन बघायची ती पिढी आता मोठी झाली आहे आणि आपल्याबरोबर आता आपलं कार्टुनही मोठं झालं आहे, हे वाटल्यामुळे कदाचित लोक ट्वीटरवर भरभरून रिअॅक्ट झाले असावे. कार्टुनचं वय वाढवत गेलो तर त्याचा अंत करणंही, ओघाने येईल. त्यामुळे मला असं वाटतं की हा प्रयोग केवळ नोबितापुरता यशस्वी ठरेलही. मात्र, इतर कुणी हे धाडस करणार नाही किंवा करायला कचरतील."
मात्र, सहसा कार्टुन कायम त्याच वयाचे राहतात आणि मोठे होत नाही, हे जरी खरं असलं तरी प्रयोग व्हायलाच हवे, असं चारुहास पंडित यांचं म्हणणं आहे.
ते म्हणतात, "शेवटी प्रयोग तर व्हायला पाहिजे. हे प्रयोग कदाचित मी चिंटुच्या बाबतीत नाही करणार. पण त्यांना जर तो नोबिताच्या बाबतीत करावासा वाटत असेल आणि त्यांनी केला असेल तर त्यावर लोक प्रतिक्रिया देतीलच. काहींना ते आवडेल, काहींना आवडणार नाही. पण, शेवटी प्रयोग तर सतत व्हायलाच पाहिजे. एकाच जागी थांबून पूर्वी जसं होत होतं तसंच झालं पाहिजे, असं काही नाही."
नोबिता-शिजुकाच्या बाबतीत ही निर्मात्याने घेतलेली लिबर्टी आहे, असं पंडित यांना वाटतं. ही लिबर्टी कितपत यशस्वी ठरते आणि तिचा इतर लोकप्रिय कार्टुन कॅरेक्टर्सवर काही परिणाम होतो का, हे हा सिक्वेल आल्यानंतरच कळेल.
नोबिता-शिजुकाचं लग्न!
डोरेमॉनच्या कादंबरी आणि कार्टुन सीरिजची जादू इतकी होती की 2014 साली त्याचा सिनेमा आला - 'स्टँड बाय मी, डोरेमॉन'. हा सिनेमाही प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला. या लोकप्रियतेमुळेच आता या सिनेमाचा सिक्वेल येऊ घातला आहे. या सिनेमाचं नाव आहे - 'स्टँड बाय मी - डोरेमॉन 2'.
हा सिनेमा जपानमध्ये प्रदर्शित झाला आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात तो थायलँडसह जगातल्या इतर भागात प्रदर्शित होणार आहे. सीबीआय पिक्चर्सने नवीन सिनेमाचं पोस्टर ट्वीट केलं आहे.
नोबिता आणि शिजुका बालपणापासूनचे मित्र-मैत्रिण आहे. दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. कार्टुन मालिकेमध्ये नोबिताला शिजुका आवडते, असं दाखवलं आहे आणि अनेक भागांमध्ये त्यांचं लग्न होणार, असंही दाखवलं आहे. मात्र, आता नवीन सिनेमात खरोखरीच त्यांचं लग्न झालेलं दाखवलं आहे.
पहिल्या सिनेमात नोबिता आणि डोरेमॉन यांची भेट कशी झाली आणि त्यांनी पुढे काय-काय केलं, हे दाखवलं आहे. तर सिनेमाच्या सिक्वेलमध्ये नोबिता आणि शिजुका यांचं लग्न झालेलं दाखवलं आहे.
कार्टुन मालिका जेवढी लोकप्रिय आहे तेवढाच पहिला सिनेमा लोकप्रिय झाला होता आणि आता लग्नाची बातमी कळाल्यावर ट्वीटरवर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला.
नोबिता आणि शिजुकाची लगीन वार्ता ऐकून अनेकांना आनंद झाला तर अनेकजण भावुकही झाले.
एक यूजर लिहिते, "सिनेमा कधी रीलिज होतोय. मला शेवटचं माझ्या बालपणाला निरोप द्यायचा आहे. नोबिता आणि शिजुका यांचं लग्न माझ्यासाठी भावुक क्षण असणार आहे आणि डोरेमॉनसाठी अभिमानाचा."
समायरा सुलतानही अशीच भावना व्यक्त करतात. "अखेर नोबिता आणि शिजुका यांचं लग्न होतंय. हा माझ्यासाठी खूप भावुक क्षण आहे", असं म्हणत तिने दोघांना पुष्पगुच्छही पाठवले आहेत.
काहींनी दोघांचं लग्न झाल्याचं ऐकून आपण म्हातारे होत असल्याची जाणीव झाल्याचं म्हटलं आहे.
एक यूजर लिहिते, "नोबिता आणि शिजुका लग्न करत आहेत, हे ऐकून आनंद झाला. शिवाय, याने मी म्हातारी होत असल्याची जाणीवही करून दिली."
हर्षित म्हणतात, "शेवटी तो दिवस उजाडलाच. आमच्या नोबिताचं स्वप्न पूर्ण होत आहे. आमचंही स्वप्न. डोरेमॉनमुळे आम्हाला बालपणीच्या रम्य आठवणी दिल्या आहेत."
'माझ्या बालपणीचं स्वप्न पूर्ण झालं.' 'आज मला आनंदाश्रू येत आहेत', अशाही प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.
एकाने तर 'आता मी मरायला मरायला मोकळा', अशीही प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रतिक्रियांवरून कार्टुन कॅरेक्टर्स सगळ्यांच्याच किती जिव्हाळ्याचा विषय असतात, हे दिसतं. खरंतर कार्टुन कॅरेक्टर्स आपल्याला आपल्या बालपणात घेऊन जातात.