गेले दोन दिवस पुण्यातील गजानन मारणे याचं नाव सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये जोरदार चर्चेत आहे. गजानन मारणेच्या सुटकेनंतर त्यासंदर्भात विविध बातम्या आणि अनेक नव्या गोष्टी बाहेर पडत आहे. पुण्यामध्ये गेल्या अनेक दिवसांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे दिसून आले आहे.
काही दिवसांपूर्वी येरवडा कारागृहामध्ये बंदी असलेल्या एका आरोपीच्या समर्थकांनी त्याचा वाढदिवस कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.
गजानन मारणे याचा आता राजकीय पक्षांशी संबंध असल्याचेही उघड झाले आहे. फेसबुकवर गजानन पंढरीनाथ मारणे महाराज, गजानन मारणे युवा मंच, गजानन मारने प्रतिष्ठान पुणे अशी फेसबुक पेजेस आणि अकाऊंटस् असल्याची दिसून येतात.
त्याची पत्नी जयश्री यांनी 2012 साली पुण्यामध्ये कोथरुडमधून पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. यावेळेस त्या मनसेच्य़ा तिकिटावर निवडूनही आल्या होत्या. सध्या जयश्री आणि गजानन यांचा मनसेशी किंवा इतर कोणत्या पक्षाशी संबंध आहे का हे अद्याप समजलेले नाही. त्याबद्दल मनसेकडून माहिती उपलब्ध झाल्यावर ती या बातमीत अपडेट करण्यात येईल.
मराठी माणसासाठी निवडणूक लढतेय- जयश्री मारणे
जयश्री मारणे यांनी आपल्या निवडणुकीबाबत इंडियन एक्सप्रेसकडे माहिती दिली होती. 2012 साली त्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. आमचा मुख्य अजेंडा मराठी माणसासाठी काम करणे हा आहे. कोथरुडमधील स्थानिकांचे प्रश्न सोडवणे आणि शिवसृष्टीचे काम मार्गी लावेन हे माझे आश्वासन असल्याचे त्यांनी याबातमीत सांगितले होते.
मनसेचे तिकीट मेरिटवर मिळाले- गजानन मारणे
"माझ्या पत्नीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याने हा तिच्या उमेदवारीबद्दल मुद्दा बनवण्यात येऊ नये. तिला तिच्या मेरिटवर तिकीट मिळाले आहे", असं मारणे यांनी या बातमीत सांगितलं होतं.
मारणे 2012 साली बोलताना पुढं म्हणाले होते, "आपल्याकडे मोठ्या पक्षांनी गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेल्या लोकांना तिकिटं दिलेली आहेत. मी बहुतांश खटल्यांतून मुक्त झालो आहे तसेच मकोकाही वगळण्यात आला आहे. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. सध्या न्यायालयात माझ्याविरुद्ध 4 खटले सुरू आहेत. त्यातूनही मी बाहेर पडेन अशी मला खात्री वाटते."
परीक्षा देऊन मिळाली होती उमेदवारी
जयश्री मारणे यांना मनसेचे तिकीट मिळाल्यावर टाइम्स ऑफ इंडियानेही यासंदर्भात 2012 साली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वृत्तामध्ये मनसेचे तेव्हाचे शहर उपाध्यक्ष अजय शिंदे म्हणाले होते, "जयश्री यांनी तिकिटासाठी संपर्क केला. त्यांनी उमेदवार निवडीच्या परिक्षेसारखी प्रक्रिया पार पाडली आणि त्यांची उमेदवारीसाठी निवड झाली. म्हणून आम्ही त्यांना तिकीट दिलं आहे."
पक्षाची सध्याची यासंदर्भातील बाजू समजलेली नाही. ती आल्यानंतर या बातमीत अपडेट केली जाईल.
गुन्हेगारी आणि राजकारण यांच्या संबंधावर पुण्यातील कोथरुड मतदारसंघातील माजी आमदार आणि माजी नगरसेविका मेधा कुलकर्णी यांनी आपलं मत बीबीसी मराठीकडे मांडलं.
त्या म्हणाल्या, "सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना संबंधित व्यक्तिचं शिक्षण, विचार, पार्श्वभूमी तपासली पाहिजे. नागरिकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने राजकारण स्वच्छ असणं अत्यंत आवश्यक आहे. सामान्य लोक आपले प्रश्न सोडवण्याच्यादृष्टीने राजकारण्यांकडे पाहात असतात, त्यामुळे तिकीट देताना काळजी घेतली पाहिजे."
काय आहे प्रकरण?
खुनाच्या गुन्ह्यातून मुक्तता झाल्यानंतर नवी मुंबई येथील तळोजा कारागृहातून गजानन मारणेची सोमवारी (15 फेब्रुवारी) सुटका करण्यात आली. यावेळी मारणेच्या स्वागतासाठी कारागृहाबाहेर त्याचे शेकडो कार्यकर्ते जमले होते. त्यानंतर तळोजा ते पुणे अशी मारणेची मिरवणूक काढण्यात आली.
साधारण तीनशेच्या आसपास चारचाकींचा ताफा मारणे याच्यासोबत पुण्यात आला. याचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
यादरम्यान, कोरोनाचे सर्व नियम धुडकावून लावून दिल्याचे समोर आले. याप्रकरणी आता मारणे आणि त्याच्या साथीदारांवर दहशत पसरविल्याचा गुन्हा तळेगाव दाभाडे पाोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गजानन मारणे कोण आहे?
गेल्या काही वर्षांमध्ये पुणे शहर आणि आसपासच्या जमिनींना भाव आला. मुंबईचे अनेक बांधकाम व्यावसायिक पुण्याकडे वळू लागले. त्यातून जमीन - खरेदीच्या व्यवहारातून टोळ्या तयार होऊ लागल्या.
जमीन मालक आणि बांधकाम व्यवसायिक यांच्यातील मिडल मॅन म्हणून या टोळ्या काम करू लागल्या. त्यासाठी त्यांनी टक्केवारी ठरवली होती. या व्यवहारांमधील वर्चस्वातूनच पुढे निलेश घायवळ आणि गजानान मारणे यांची टोळी निर्माण झाली. या दोन टोळ्यांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यातून अनेक संघर्ष झाले. त्यातूनच खुनाची अनेक प्रकरणं समोर आली.
पप्पू गावडे आणि अमोल बधेच्या खूनाच्या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी गजानन मारणे आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली. परंतु त्यांच्याविरोधात सबळ पुरावे आणि साक्षीदार उभे करु न शकल्याने न्यायालयाने मारणे आणि त्याच्या साथीदारांची मुक्तता केली.
पप्पू गावडे याच्या खून प्रकरणात गजानन मारणे आणि त्याच्या अन्य साथीदारांवर पौड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सबळ पुराव्यांअभावी पुण्यातील विशेष मोक्का न्यायालयाने 12 फेब्रुवारीच्या सुनावणीत मारणे आणि त्याच्या साथीदारांची मुक्तता केली.
2014 साली मारणे आणि त्याच्या साथीदारांना अटक झाली होती.
3 नोव्हेंबर 2014 रोजी लवाळे गावाच्या हद्दीतील गावडे वस्तीजवळ पूर्वीच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी पप्पू उर्फ संतोष हिरामण गावडे याचा खून झाला होता.
गजानन मारणे आणि निलेश घायवळ यांच्या टोळ्यांमध्ये पूर्वीपासून कोथरुड व मुळशी तालुक्यातील जमिनीचे खरेदी विक्रीचे जुने वाद आहेत. या वादातून त्यांनी एकमेकांवर खुनी हल्ले केले आहेत.
याआधी देखील 2008 साली नीलेश घायवळ आणि संतोष गावडे यांच्यावर गजानन मारणे, पप्पू कुडले व त्यांच्या साथीदारांनी फायरिंग करुन व कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
पप्पू गावडे याने दिलेल्या फिर्यादीवर कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात साक्ष दिल्यास संपवून टाकण्याची धमकी पप्पू गावडे याला दिली होती. त्यातूनच पप्पू गावडेचा खून करण्यात आला होता.
2 फेब्रुवारीला देखील पुण्यातील मोक्का न्यायालयाने अमोल बधेच्या खून प्रकरणातून गजानन मारणे आणि त्याच्या 20 साथीदारांची पुराव्याअभावी मुक्तता केली. याप्रकरणी संतोष कांबळे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. कांबळे आणि खून झालेला बधे हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दोघेही निलेश घायावळ टोळीचे सदस्य आहेत.