Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बक्सर हत्याकांड : बलात्कारानंतर गवत जाळण्याचा देखावा करून मुलीला जाळलं?

बक्सर हत्याकांड : बलात्कारानंतर गवत जाळण्याचा देखावा करून मुलीला जाळलं?
, गुरूवार, 5 डिसेंबर 2019 (17:55 IST)
- नीरज प्रियदर्शी
हैदराबादमध्ये तरुणीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करून तिला जाळून टाकल्याची घटना ताजी असतानाच बिहारमधल्या बक्सर जिल्ह्यात एका महिलेवर बलात्कार करुन तिला जाळल्याची बातमी समोर आली.
 
या महिलेची हत्या गोळी झाडून करण्यात आली होती.
 
बक्सर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 डिसेंबरला रात्री 19 ते 23 या वयाच्या तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह इटाढी पोलीस स्टेशनच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या कुकुढा गावात मिळाला होता.
 
माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमध्ये असा दावा केला जातोय की या तरुणीची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती.
 
या महिलेचा मृतदेह बऱ्यापैकी जळाला होता. दोन्ही पायांमध्ये असणारे मोजे आणि सँडल फक्त शिल्लक राहिले होते. मृतदेहाची ओळख पटू शकली नाही.
 
बुधवारी सकाळी आम्ही जेव्हा कुकुढा गावातल्या घटनास्थळी पोहोचलो तेव्हा शाहाबाद रेंजचे डीआयजी आणि बक्सरचे पोलीस अधीक्षक फॉरेन्सिक टीमला घेऊन पोहचले होते.
 
पोलीस तसंच बक्सरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर दिवसाढवळ्या शेतात पराली (पिकांची कापणी झाल्यानंतर शेतात शिल्लक राहिलेली धाटं) जाळण्याचं काम चालू होते हे पाहून आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला.
 
गेल्या काही दिवसात वाढतं प्रदूषण पाहाता बिहार सरकारने पराली जाळण्यावर प्रतिबंध लावला आहे. आणि या आदेशाचं उल्लंघन केलं तर त्यासाठी कायदेशीर कारवाईचीही तरतूद आहे.
 
पोलीस अधिकारी तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांकडे चौकशी करत होते. आसपासच्या शेतांमध्ये मेटल डिटेक्टरने तपासणी सुरू होती.
 
फॉरेन्सिक टीमचे लोक महिलेल्या जळालेल्या अवशेषांचे सँपल जमा करत होते.
 
थोड्यावेळाने पोलीस अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळाहून सँपल घेऊन परत गेले, गावातल्या पाच-सहा लोकांना आपल्यासोबत चौकशीसाठी घेऊन गेले.
 
पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बलात्काराचा उल्लेख नाही
शाहाबाद रेंजचे डीआयजी राकेश राठी यांनी गुरुवारी बीबीसीला सांगितलं की, "काल रात्री या महिलेच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला. या रिपोर्टमध्ये बलात्काराचा उल्लेख नाहीये. त्याबद्दल कोणतंही निरीक्षणही नोंदवलेलं नाही. आता फॉरेन्सिक विभागाचा अहवाल येईल त्यात हत्येचं कारण कळेल. अजून तरी आम्हाला ठोस पुरावे मिळालेले नाहीत."
 
बलात्काराबद्दल पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये काही नाही असं डीआयजी म्हणत असले तरी पोस्टमॉर्टेम करणारे डॉक्टर बी. एन. चौबे यांनी दोनदा माध्यमांना सांगितलं की, "ज्याप्रकारे घटना घडली आहे त्यावरून महिलेवर लैंगिक अत्याचार झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही."
 
या महिलेचे पोस्टमॉर्टेमसाठी गरजेचे असणारे अवयव आधीच जळून गेले होते, त्यामुळे पोस्टमॉर्टेममध्ये बलात्काराचे पुरावे मिळतीलच असं नाही, असंही ते म्हणाले.
webdunia
डॉ. चौबेंनी बीबीसीशी बोलताना म्हणाले, "जेव्हा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी आला त्यावरुन वाटलं की हे कृत्य एका व्यक्तीचं नाही. या कृत्यात एकापेक्षा जास्त लोक सहभागी असणार असा अंदाज आहे. पोस्टमॉर्टेमचं म्हणाल तर ज्या अवस्थेत मृतदेह आमच्यापर्यंत आला त्याअवस्थेत गँगरेप सिद्ध होऊ शकणार नाही. मृतदेह फार वाईट पद्धतीने जळालेला होता. आम्ही व्हिसेराची पण तपासणी करत आहोत. त्याच्या रिपोर्टनंतरच नक्की काय घडलं हे कळेल. पण तरीही मी म्हणेन की ज्याप्रकारे हे कृत्य घडलं आहे त्याने महिलेवर सामुहिक बलात्कार झाला असल्याची शक्यता नाकारता येणार नाही."
 
बक्सरहून परतताना बुधवारी संध्याकाळी स्थानिक पत्रकारांनी सांगितलं की माध्यमांकडे सामूहिक बलात्काराची शक्यता वर्तवणाऱ्या डॉक्टरांवर आता त्यांचं विधान बदलण्यासाठी दबाव टाकला जातोय. त्या डॉक्टरांशी आमचा पुन्हा संपर्क होऊ शकला नाही.
 
आम्ही डीआयजींना याबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले, "पोलिसांचा तपास रिपोर्टवर आधारित असतो, कोणी काय विधान केलं यावर नाही."
 
पोलीस आणि फॉरेन्सिक टीम निघून गेल्यानंतर घटनास्थळ आणि त्याच्या आसपासची जागा पाहून वाटलं सामान्य माणसाला तिथे पराली जाळली आहे की एक महिलाचा मृतदेह यात फरक करणं अवघड आहे.
 
तिथे उपस्थित असणाऱ्या गावकऱ्यांनी सांगितलं की ज्या शेतात महिलेला जाळलं त्याचे मालक कुकुढा गावाचेच राहाणारे आहेत. पण या गावकऱ्यांनी पोलिसांच्या आणि चौकशीच्या भीतीने आपलं नाव नाही सांगितलं.
 
पराली जाळण्याच्या बहाण्याने मृतदेह जाळला?
कुकुढा गावातच राहाणाऱ्या गोविंद पटेल यांनी सांगितलं, "रात्री ही घटना घडली तेव्हा कोणाला याबद्दल कळलं नाही कारण शेतांमध्ये पराली जळत होती. संध्याकाळी लोक आपल्या शेतांमध्ये पराली जाळून परत येत होते.
 
पाण्याची मोटार सुरु करून अनेक लोक झोपायला जातात. तिथल्या काही लोकांना गोळी झाडल्याचा आवाज आला पण घाबरून ते गावाकडे आले नाहीत. हा भाग अगदीच निर्मनुष्य आहे. इथे कोणाला जाळलं जरी असेल तरी कसं कळणार?"
 
मृतदेह ताब्यात घेण्यासाठी अजून कोणी पुढे नाही
या घटनेनंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कोणीही अजून दावा केलेला नाही. गावातले एक जेष्ठ नागरिक श्यामलाल यांच्या मते ज्याप्रकारे मृतदेह जाळला आहे त्यावरून असं वाटत नाही की हे कोणी केलंय त्याचा पत्ता लागेल. ही आमच्या घरातली मुलगी होती असं म्हणणार कोणी समोरही आलं नाहीये. असं वाटतंय की कोणीतरी आपल्याच घरातल्या मुलीला मारून टाकलं आणि आता ते निश्चिंत बसलेत."
 
श्यामलाल यांच्या बोलण्यावरुन एका वेगळ्या गोष्टीकडे लक्ष वेधलं जातंय. हा ऑनर किलिंगचाही प्रकार असू शकतो. ही घटना होऊन 72 तासांहून जास्त काळ लोटला आहे तरी अजून कोणीही मृतदेह ताब्यात घ्यायला समोर आलेलं नाही.
 
घटनास्थळाचं निरीक्षण केल्यानंतर एक गोष्ट ठळकपणे जाणवली ती म्हणजे हे कृत्य करणारे लोक या भागाशी चांगलेच परिचित होते. त्यांना या भाग सुनसान असतो हे माहीत होतं तसंच इथल्या शेतांची आणि पायवाटांची चांगलीच जाण होती. त्यांना हेही माहीत होतं की पराली जाळण्याच्या बहाण्याने इथे काहीही जाळता येऊ शकतं.
 
आता प्रश्न असा आहे की पोलीस अपराध्यांना पकडणार कसं? पुरावे म्हणून त्यांच्याकडे फक्त एक वापरलेली बंदुकीची गोळी, अर्धवट जळालेला मृतदेह आणि त्याचे काही अवशेष याव्यतिरिक्त नाही.
 
पोलिसांचं म्हणणं काय?
"हे खरंय की पुरावे म्हणून आमच्या हातात फार कमी गोष्टी आहेत पण पोलिसांच्या तपासाचे अनेक रस्ते असतात. त्यातलाच एक रस्त्याने आम्ही तपास पुढे नेत आहोत," डीआयजी राठींनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
 
"त्या रात्री घटनास्थळी जे मोबाईल नंबर अॅक्टिव्हेट होते आम्ही त्या लोकांचा ठावठिकाणा लावत आहोत. अजून आम्हाला काही संशयास्पद सापडलेलं नाही पण आम्हाला आशा आहे आम्ही लवकरच खुन्यांचा शोध लावू," ते पुढे म्हणाले.
 
या महिलेच्या घरचे का समोर येत नाहीयेत?
असं असलं तरी एक प्रश्न उरतोच, या महिलेच्या घरचे समोर का येत नाहीयेत?
 
बक्सरचे स्थानिक पत्रकार मंगलेश तिवारी म्हणतात, "या भागात आधीही महिलांची हत्या करुन जाळण्याचा घटना समोर आल्या आहेत. पण आजपर्यंत कधी कळालं नाही या महिला कोण होत्या, कोणाच्या घरच्या होत्या. आता याला लाज म्हणा किंवा भीती पण असं कायम होत आलं आहे."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उद्धव ठाकरे कोरेगाव भीमा प्रकरणातील गुन्हे मागे घेतील का?