युरोपातल्या सर्व देशांमध्ये उष्णतेची लाट आहे आणि पाऱ्याने नवे उच्चांक गाठले आहेत. आणि युरोपातलं तापमान आणखी वाढण्याचा अंदाज असल्याने नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत.
उष्णतेच्या या लाटेचे अनेक परिणाम पहायला मिळत आहेत. फ्लॅश फ्लड्स (अचानक येणारे पूर), जंगलात वणवे लागणं, विमानांच्या उड्डाणांवर परिणाम, ट्रेनचे ट्रॅक वितळणं अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. याशिवाय शाळाही बंद कराव्या लागल्या असून हवेच्या दर्जाविषयीही सूचना देण्यात आल्या आहेत.
फ्रान्समध्ये शुक्रवारी सर्वोच्च तापमानाची नोंद होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 2003मध्ये फ्रान्समध्ये 44.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यावेळच्या उष्णतेच्या लाटेमध्ये हजारो जणांचा बळी गेला होता.
म्हणूनच आता दक्षिण फ्रान्समधल्या भागांसाठी हवामान खात्याने रेड ऍलर्ट जाहीर केला आहे. तर देशाच्या इतर भागामध्ये ऑरेंज ऍलर्ट जाहीर करण्यात आलाय.
सार्वजनिक ठिकाणी तात्पुरती पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून सार्वजनिक स्विमिंग पूल्सना रात्री उशीरापर्यंत सुरू राहण्याची परवनागी देण्यात आली आहे.
युरोपातले जर्मनी, फ्रान्स, पोलंड आणि चेक रिपब्लिक या देशांनी जूनमध्ये त्यांच्या सर्वोच्च तापमानांची नोंद केली आहे. तर स्पेनमधील अग्निशामन विभाग कॅटलोनियामधील गेल्या 20 वर्षांतील भयानक वणवा विझवण्याचा प्रयत्न करत आहे.
हे का घडतंय ?
उत्तर आफ्रिका, पोर्तुगाल आणि स्पेन यांच्याकडून येणारे उष्ण वारे उच्च दाबाने युरोपच्या उत्तरेकडील भागाकडे आल्याने ही उष्णतेची लाट येते. यामुळे तापमान वाढतं आणि आर्द्रतेतही वाढ होते. पण यावेळची उष्णतेची लाट सहारा वाळवंटाकडून आलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे आलेली आहे.
उष्णतेची लाट येणं काही नवीन नाही, पण हवामान तज्ज्ञांनुसार जगभरामध्येच वाढणाऱ्या तापमानामुळे उष्णतेच्या लाटेची तीव्रता आणि प्रमाण वाढत आहे. हा ग्लोबल वॉर्निंगचा परिणाम आहे.
ब्रिटनच्या हवामान खात्यातील तज्ज्ञ ग्रॅहम माज यांनी बीबीसीला सांगितलं की, हवामानातले बदल हे नैसर्गिक असले तरी जगभरातलं सर्वसामान्य तापमान हे गेल्या काही काळामध्ये एक डिग्रीने वाढलेलं आहे. म्हणूनच हवामानामध्ये असे टोकाचे बदल होणं अपेक्षित आहे.
"म्हणूनच आता जेव्हा उष्णतेची लाट येईल, ती पूर्वीपेक्षा एका डिग्रीने किंवा त्यापेक्षा अधिक असेल. हवामानामध्ये असे टोकाचे बदल घडणं आता वारंवार घडतंय."
जुलै 1977 मध्ये युरोपामध्ये सर्वोच्च 48 डिग्री सेल्सियस तापमान नोंदवण्यात आलं होतं. वर्ल्ड मेटिओरोलॉजिक ऑर्गनायझेशन (WMO)नुसार 2015-2018 ही वर्षं सर्वांत जास्त गरम होती.
माणसांमुळेच तापमान वाढतंय का?
वर्ल्ड वेदर ऍट्रिब्युशन ग्रुपने गेल्या वर्षीच्या युरोपातल्या हीट वेव्हचा वैज्ञानिक अभ्यास केला. मानवी कृत्यांमुळे वातावरणात बदल (Climate change) घडला आणि त्यामुळेच या भागातल्या तापमानात वाढ झाल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला.
आणि गोष्टी अशाच घडत राहिल्या तर 2040पर्यंत युरोपामध्ये एक वर्षाआड अशी उष्णतेची लाट येत राहील. याशिवाय 2100पर्यंत तापमान 3 ते 5 सेल्सियसने वाढलेलं असेल.
उष्णतेची लाट म्हणजे नेमकं काय?
उष्णतेच्या लाटेची जगभरातून स्वीकारण्यात आलेली अशी विशिष्ट व्याख्या नाही. कारण जगभरातल्या विविध भागातलं वातावरण वेगवेगळं आहे. तरीही ढोबळपणे उष्णतेची लाट म्हणजे उष्म्यामध्ये होणारी बेमोसमी वाढ.
यादरम्यान साधारणपणे नेहमीच्या कमाल तापमानात पाच डिग्री किंवा त्यापेक्षा जास्तची वाढ होते आणि किमान तीन दिवसा तरी असंच वातावरण राहतं.
याशिवाय रात्रीचं तापमान, आर्द्रता आणि वाऱ्याचा वेग याचाही विचार करण्यात येत असल्याचं ह्युसन यांनी सांगितलं. आर्द्रता आणि वाऱ्याचा कमी वेग यामुळे उष्णतेची लाट वाढू शकते.
मोठ्या शहरांमध्ये जास्त माणसांचा वावर, काँक्रीट, रस्ते आणि दाटीवाटीने असलेल्या इमारतींमुळे हीट वेव्हचे परिणाम जास्त जाणवतात.
"वर्षामधला हा काळ आणि गरमी पाहता युरोपातली आताची उष्णतेची लाट ही 2015प्रमाणेच वाटते," ह्युसन सांगतात.
उष्णतेच्या त्या लाटेची सर्वाधिक झळ दक्षिण आणि मध्य युरोपाला बसली होती. पण जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्येही सर्वोच्च तापमानाची नोंद झाली.
उष्णतेची लाट धोकादायक का?
उच्च तापमानाचा परिणाम कोणावरही होऊ शकतो. पण डिहायड्रेशन (शरीरातील पाणी कमी होणं), थकवा येणं आणि उष्माघात याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. हृदयरोग, किडनीचे विकार किंवा श्वसनाचे विकार असणाऱ्या व्यक्तींसोबतच ज्येष्ठ नागरिक आणि तान्ह्या मुलांनाही धोका असतो.
"उष्णतेच्या लाटेमुळे मानवी शरीराची स्वतःचं तापमान नियंत्रित करण्याची क्षमता मंदावते आणि म्हणूनच हे धोकादाय ठरतं," ह्युसन सांगतात.
जर रात्रीचं तापमान 25 डिग्रीजच्या खाली आलं नाही तर त्याचा परिणाम लोकांवर होऊ शकतो.
2003च्या उष्णतेच्या लाटेनंतर आधीच्या वर्षांपेक्षा 70,000 जास्त मृत्यू नोंदवण्यात आल्याचं वैज्ञानिक आणि वैद्यकीय पाहण्या सांगतात.