Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हापूस आंब्याला अल्फान्सो ऐवजी 'हापूस' हे नाव कसं पडलं?

Webdunia
बुधवार, 17 मार्च 2021 (20:52 IST)
आंबा म्हणजे फळांचा राजा! त्यातल्या त्यात हापूस म्हटलं तोंडाला पाणी सुटतंच.फळांच्या या राजाला जगभरातून मागणी असते. आणि देशाविदेशात तर हापूस जणू काही पेटंट झाला आहे. म्हणूनच फळांच्या या राजाबद्दल ही चवदार माहिती जाणून घेणं महत्त्वाचं.
 
या आंब्याला हापूस का म्हणतात?
हापूसला अल्फान्सो असंही म्हटलं जातं, आणि या नामकरणात भारतातील पोर्तुगिजांचाही मोठा वाटा आहे.
पोर्तुगीज लष्करात अल्फान्सो डे अल्बकर्की नावाचे एक अधिकारी होते. पोर्तुगिजांचं इथे राज्य उभारण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
जिओग्राफीकल इंडिकेशन जर्नलमध्ये दिलेल्या माहितीनुसार अल्बकर्की यांनी गोव्यात मोठी भटकंती केली होती. तिथल्या आंब्यांच्या विविध जातींवर त्यांनी प्रयोग करत आंब्याची ही नवी जात विकसित केली. त्यावरून या आंब्याला अल्फान्सो नाव मिळालं.
पण स्थानिक लोक या आंब्याला अफूस म्हणू लागले. आंब्याची ही जात महाराष्ट्रात लोकांपर्यंत पोहोचेस्तोवर लोकांच्या तोंडी याचा उच्चार हापूस असा झाला होता.तिथून हा आंबा दक्षिण गुजरात आणि दक्षिण भारतात पोहोचला.हापूस आंब्यांचा रंग तेजस्वी पिवळा असतो. मधुर गंध, गोड चव, दीर्घकाळ चांगल्या स्थितीत राहण्याची क्षमता आणि धागाविरहित रसरशीत मऊ गर, अशा गुणांसाठी हा आंबा लोकप्रिय आहे.
 
आंब्याचं झाडं किती वर्ष फळं देतं?
आंब्याचं झाड चार-पाच वर्षांचं झालं की फळं लागू लागतात. सर्वसाधारपणे आंब्याचं झाड 50 वर्षांपर्यंत फळे देतो. गुजरातमधल्या नवसारी कृषी विद्यापीठाचे सहाय्यक प्रा. सतीश सिन्हा यांनी सांगितलं की जर आंब्याच्या झाडाची योग्य निगा राखली आणि आवश्यक खतं दिली तर हे झाड 100 वर्षांपर्यंतही फळं देतं.
"वलसाड इथले शेतकरी गौतम नायक यांच्या आंब्यांच्या बागेला आम्ही भेट दिली होती. त्यांच्या बागेतील एका झाडाचे वय 112 वर्षं इतकं आहे. या झाडाच्या खोडाचा घेर 8 फुटाचा इतका मोठा आहे. सर्वसाधारणपणे दरवर्षी झाडाच्या बुंध्याचा घेर 1.3 ते 3 सेंटिमीटरनी वाढतो. हा विचार केला तर हे झाड 100 वर्षांपेक्षा जुनं असल्याचं लक्षात येतं," ते सांगतात.
नवसारी कृषी विद्यापीठाचे सहाय्यक प्रा. डॉ. अविनाश पांडे म्हणाले, "गुजरातमधील हापूसची लागवड कमी होत आहे. पण महाराष्ट्रातील रत्नागिरीच्या हापूसची मागणी कायम आहे. गुजरातमध्ये सोनपरी आणि केसर आंब्यांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतोय."सोनपरी हा कलमी आंबा असून त्याची चव हापूससारखी असते, पण त्याचा आकार हापूसपेक्षा मोठा असतो.
 
महाराष्ट्रात आंबा लागवड कुठे होते?
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या रत्नागिरी येथील विभागीय कार्यालयाचे सहाय्यक सरव्यवस्थापक मिलिंद जोशी यांनी 'कृषी पणन मित्र' या नियतकालिकात 'आंबा निर्यात' हा लेख नुकताच लिहिला आहे.
यात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील आंब्यांच्या महत्त्वाच्या जातींमध्ये हापूस, पायरी, दशेरी, लंगडा, केसर, सुवर्णरेखा, नीलम, तोतापुरी, गोवा माणकूर, बेंगनपल्ली, हिमसागर, बनेशन, ओलूर यांचा समावेश आहे.
आंबा लागवडीत उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, बिहार या राज्यांच्या नंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. पण देशातून होणाऱ्या एकूण आंबा निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा 80% इतका आहे.
महाराष्ट्रात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, नाशिक, बीड, जालना, अहमदनगर, बुलढाणा आणि उस्मानाबादेत आंब्यांच्या बागा आहेत. कोकणात, विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. इथलं जवळजवळ 1 लाख हेक्टर इतकं क्षेत्र हापूस आंब्याच्या लागवडीखाली आहे.
अॅग्री एक्सचेंजच्या 2010-11च्या अहवालानुसार भारतात 1,50,00,000 टन इतक्या आंब्याचे उत्पादन होतं. एकूण जागतिक उत्पादनाचा विचार करता हे प्रमाण 40.48 टक्के इतकं आहे. भारतातून अरब अमिराती, बंगलादेश, युनायटेड किंगडम, सौदी अरेबिया, कुवैत आणि बहरीन आदी देशांत आंब्याची निर्यात होते.
महाराष्ट्रातून प्रामुख्याने समुद्रमार्गे आंबा निर्यात केला जातो. एकट्या 2016-2017 मध्ये महाराष्ट्रातून 37,180.11 टन आंबे बाहेर पाठवण्यात आले होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments