Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ममता बॅनर्जींनी कसा रोखला मोदी-शहांचा रथ?

ममता बॅनर्जींनी कसा रोखला मोदी-शहांचा रथ?
, रविवार, 2 मे 2021 (17:55 IST)
-नामदेव अंजना
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी मुख्यमंत्रिपदाची हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत. 200 हून अधिक जागांवर तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. आताची आकडेवारी पाहिल्यास भाजपला 100 जागांचा टप्पाही ओलांडता आलेला नाही.
 
अर्थात, हे सर्व कल असले, तरी निकालाचं चित्र जवळपास स्पष्ट आहे. ममता बॅनर्जी या तिसऱ्यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री होतील, हे आताचे कल सांगतायेत.
 
स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शेकडो सभा घेतल्या. मात्र, तरीही ममता बॅनर्जी यांना रोखण्यात भाजपला यश आलेलं दिसत नाही. उलट ममता बॅनर्जी यांनीच मोदी-शहा यांचा रथ यशस्वीरित्या रोखला आहे.
 
ममता बॅनर्जी यांना मोदी-शहा यांचा रथ कसा रोखता आलं, हे आपण पाहूया. तत्पूर्वी आपण काही आकडेवारी पाहू. विशेषत: याआधीच्या विधानसभा निवडणुकीशी भाजप आणि तृणमूलची तुलना करू.
 
भाजपला विजयाची आशा का होती?
2016 साली तृणमूल काँग्रेसला 211 जागा, तर भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. मग पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेत येण्याचं स्वप्न कसं पाहू लागलं? तर त्याला 2019 च्या लोकसभा निवडणुकीतली आकडेवारी कारणीभूत आहे.
 
2019 साली पश्चिम बंगालमधील 42 लोकसभा जागांमधील 18 जागा भाजप, तर 22 जागा ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस जिंकली होती. मात्र, हीच आकडेवारी विधानसभेच्या मतदारसंघानुसार पाहिल्यास, 121 विधानसभा मतदारसंघात भाजप पुढे होता.
 
लोकसभा निवडणुकीत भाजपला 40 टक्के, तर तृणमूल काँग्रेसला 43 टक्के मतं मिळाली होती. केवळ 3 टक्के मतांचा फरक दोन्ही पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत होता.
 
मात्र, लोकसभेत भाजपनं पश्चिम बंगालमध्ये घवघवीत यश मिळवलं असलं, तरी विधानसभेला ममता बॅनर्जींनी अशा कोणत्या गोष्टी केल्या, जेणेकरून मोदी-शहा यांच्या शेकडो सभा होऊनही त्यांना बाजी मारता आली नाही? ममता बॅनर्जींनी भाजपला कसं रोखलं? या प्रश्नांची उत्तरं बीबीसी मराठीनं राजकीय विश्लेषकांशी बोलून शोधण्याचा प्रयत्न केला.
 
'बंगाली अस्मितेचा पुरेपूर वापर'
एनडीटीव्ही वृत्तवाहिनीचे व्यवस्थापकीय संपादक मनोरंजन भारती हेही पश्चिम बंगालमध्ये काही दिवस वृत्तांकन करून आले. तसंच, गेली काही दशकं ते पश्चिम बंगालच्या राजकीय घडामोडीही पत्रकार म्हणून पाहत आलेत.
 
मनोरंजन भारती म्हणतात, बंगालची अस्मिता विरूद्ध इतर असं नेरेटिव्ह ममता बॅनर्जी यांनी व्यवस्थिपणे तयार केलं.
 
ते पुढे सांगतात, "ममता बॅनर्जी बंगाली भाषेतच भाषण करायच्या, त्या व्यासपीठावरून लोकांच्या दिशेनं फुटबॉल फेकायच्या. बंगाली अस्मितेची जेवढी म्हणून काही प्रतिकं होती, त्यांचा पुरेपूर वापर त्यांनी केला."
 
"ही निवडणूक ममता बॅनर्जी यांनी स्पष्टपणे एकटी लढणारी महिला, बंगाली अस्मिता विरूद्ध बाहेरून आलेले नेते अशी केली होती. मोदी आणि शहा यांना रोखण्यासाठी पश्चिम बंगालच्या जनतेचं मन वळवण्यात इतकं मोठं दुसरं शस्त्र नव्हतं. ममता बॅनर्जी यांनी याचा नेमका फायदा करून घेतला," असंही मनोरंजन भारती सांगतात.
 
'महिलांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा'
पत्रकार पार्थ एम. एन. हे निवडणुकीच्या निमित्तानं काही दिवस वृत्तांकनासाठी पश्चिम बंगालमध्ये होते. ते सांगतात, "पश्चिम बंगालमधील महिला मोठ्या संख्येत ममता बॅनर्जींच्या मागे उभ्या राहिल्या. महिलांचं इतकं समर्थन मिळणं म्हणजे एकूण मतदारांपैकी निम्मी संख्या झाली. याचा मोठा फायदा ममता बॅनर्जींना निवडणुकीत झाल्याचं आता निकालातून दिसून येतंय."
 
वृत्तांकनादरम्यान महिला मतदारांशी बोलताना झालेला एक संवाद सांगताना पार्थ एम. एन. म्हणतात, "कुणाही महिलांना विचारलं की, ममता बॅनर्जींनी काय केलं? तर त्या त्वरित सांगतात, दीदी ने चावल दिया. लॉकडाऊनच्या काळात ममता बॅनर्जींनी थेट घरांपर्यंत अन्नधान्य पोहोचवलं होतं."
 
कोलकात्यातील वरिष्ठ पत्रकार प्रभाकर मणि तिवारी म्हणतात, "ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लागू केलेल्या योजना अधिक ठळकपणे आपल्या भाषणांमध्ये नमूद केल्या. विशेषत: अन्न-धान्यासंदर्भातल्या योजनांचा उल्लेख त्या करत असत. तुमच्या कुटुंबाची मला काळजी आहे, हा संदेश महिला वर्गापर्यंत निश्चितपणे पोहोचला. यातून महिलांचा पाठिंबा मिळण्यास मोठी मदत झालं असं म्हणता येईल."
 
मनोरंजन भारती याच मुद्द्यावर सांगतात, "जितकं मी पश्चिम बंगालला ओळखतो आणि या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा पश्चिम बंगालमध्ये फिरलो, त्यावरून एक निश्चित की, महिला तृणमूलच्या सायलेंट व्होटर होत्या. नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जींना 'दीदी ओ दीदी' म्हटलं, ते कुणाही महिलेला आवडलं नाही. यामुळे महिलांच्या मनात ममता बॅनर्जींबद्दल मोठी सहानुभूती निर्माण झाली होती, जी मतदानातून आणि आता निकालातून दिसून आलीय."
 
ममता बॅनर्जी म्हणजेच तृणमूल काँग्रेस असं गणित आहे. त्याच पक्षाच्या सर्वेसर्वा आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकप्रकारे ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे देशभरातून पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी येणारे नेते अशी झाली होती. अशावेळी त्या एकाकी पडल्याची चर्चा होत होती. पण आता निकाल पाहिल्यावर या एकाकी लढतीचा त्यांना फायदाच झाल्याचं चित्र आहे.
 
एकाकीपणे लढत असल्यानं सहानुभूती
प्रभाकर मणि तिवारी सांगतात, "बरेच नेते तृणमूल काँग्रेस सोडून गेले. ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीपासूनच या नेत्यांना गद्दार म्हटलं. पण तितक्यावर त्या थांबल्या नाहीत, तर या लढाईत आपल्याला कसं एकटं पाडलं गेलंय आणि आपण तरीही लढत आहोत, असा संदेश लोकांपर्यंत त्यांनी पाठवला."
 
त्याचसोबत आणखी एक मुद्दा इथं प्रभाकर मणि तिवारी उपस्थित करतात, तो म्हणजे भाजपच्या हिंदुत्त्वाच्या मुद्द्याचा.
 
तिवारी म्हणतात, "भाजपनं हिंदुत्त्वाचा मुद्दा उचलून ममता बॅनर्जींवर हल्ले करत होते. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाल्या की, देशातली एकटीच महिला मुख्यमंत्री आहे, म्हणून हे हल्ले केले जात आहेत."
 
म्हणजे, भाजपची ओळख बनलेल्या हिंदुत्त्वाच्या मुद्द्यालाही ममता बॅनर्जींनी आपल्या सहानुभूतीत परावर्तित करण्यात यश मिळवलं.
 
याबाबत मनोरंजन भारती म्हणतात, "पश्चिम बंगाल हे माँ दुर्गा कालीचं क्षेत्र आहे. तिथं स्त्रियांची पूजा होते. तिथं श्रीराम कुणी ऐकलं नव्हतं. भाजपनं तिथं हिंदुत्त्वाचा मुद्दा नेला आणि ममता बॅनर्जींना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा भाजपचा डाव त्यांच्यावरच उलटला आणि एकट्या लढणाऱ्या ममता बॅनर्जींना सहानुभूती मिळाली."
 
'भाजपची संघटना नसण्याचा ममतांना फायदा'
मात्र, पार्थ एम. एन. म्हणतात, "पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्त्वाचा स्वतंत्र मतदार नाहीच असं म्हणता येणार नाही. भाजपनं आताही 3 जागांवरून कित्येक पटींची मारलेली उडी याच मतदारांवर आहे, असं म्हणता येईल. संघटनात्मक बांधणी भाजपची नसल्यानं मतदारांना मतदानकेंद्रांपर्यंत नेण्यात ते यशस्वी झाले नाहीत. त्याचा फायदा ममता बॅनर्जींना झाला."
 
पार्थ एम. एन. यांनी भाजपच्या संघटनात्मक बांधणीचा मुद्दा उपस्थित केला. ममता बॅनर्जींना इथेही मोठा फायदा झाल्याचं दिसून येतं. विशेषत: भाजपचं पश्चिम बंगालमध्ये मोठा चेहरा नसल्याने बसलेला फटका.
 
"भाजपची संघटनात्मक ताकद ग्राऊंड लेव्हलवर दिसून येत नाही. प्रत्यक्षपणे मतदारांपर्यंत पोहोचणं किंवा बूथ मॅनेजमेंट याबाबतीत भाजप मजबूत दिसून आल्या नाहीत. राज्याचं प्रतिनिधित्व करणारा कुणीही तगडा स्थानिक नेता नसणं, तिथली भाषा बोलणारा मोठा नेता नसणं अशा गोष्टींचा फटका भाजपला बसला आणि याच गोष्टींचा ममता बॅनर्जींनी फायदाही करून घेतला," असं पार्थ एम. एन. सांगतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'भाजप निवडणूक निकालांबाबत आत्मपरिक्षण करेल'