Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अफगाणिस्तानला मागे टाकून म्यानमार अफू उत्पादनात 'नंबर वन' कसा बनला?

Webdunia
शुक्रवार, 15 डिसेंबर 2023 (13:16 IST)
-को को आँग
संयुक्त राष्ट्रांनी नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, म्यानमार हा अफू उत्पादन करणारा जगातील आघाडीचा देश बनला आहे. यापूर्वी अफगाणिस्तान अफूचं सर्वाधिक उत्पादन करणारा देश होता.
 
म्यानमार हा सुवर्ण त्रिभुज प्रदेशाचा भाग आहे. अवैध अंमली पदार्थांच्या व्यापारासाठी जगातील सर्वात कुप्रसिद्ध केंद्र असलेल्या या देशाच्या सीमा लाओस आणि थायलंडला लागून आहेत.
 
या प्रदेशात खसखशीची लागवड केली जाते. त्यानंतर त्यातून अफू आणि हेरॉईन असे घातक अमली पदार्थ तयार केले जातात.
 
म्यानमार हा युद्धग्रस्त देश आहे आणि अफूच्या उत्पादनात तो आघाडीवर असण्याची अनेक कारणं आहेत.
 
1. विनाशकारी गृहयुद्ध
म्यानमार ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. 1948 मध्ये म्यानमारला स्वातंत्र्य मिळालं. तेव्हापासून तिथल्या सरकारमध्ये आणि सीमेवरील पर्वतीय प्रदेशात राहणाऱ्या वांशिक अल्पसंख्याक गटांमध्ये संघर्ष सुरू आहे.
 
2021 मध्ये झालेल्या लष्करी उठावाने देशाचं विभाजन झालं.
 
देशात लोकशाहीची पुनर्स्थापना करण्याची मागणी सुरू होती. त्यासाठी शांततापूर्ण निदर्शनं सुरू असताना लष्कराने हिंसाचार करून हे आंदोलन मोडून काढलं.
 
पुढे थायलंड, चीन आणि भारताच्या सीमेवरील म्यानमार विरोधी पक्षांचे कार्यकर्ते बंडखोरांमध्ये सामील झाले, तर काही सैन्याविरुद्ध लढण्यासाठी लष्करी प्रशिक्षण घेतल्यानंतर नागरी भागात परतले.
 
त्यांनी पीपल्स डिफेन्स फोर्स (पीडीएफ) म्हणून ओळखल्या जाणार्‍या सशस्त्र गटाची उभारणी केली.
 
दरम्यान, कॅरेन, काचिन, केर्नी आणि चिन सारख्या मजबूत लष्करी गटांनी राष्ट्रीय एकता सरकार (एनयूजी) सोबत युती करण्याचा निर्णय घेतला. या सरकारची स्थापना निवडून आलेल्या प्रशासनाद्वारे करण्यात आली होती. मात्र सत्तापालट करून हे सरकार उलथवून टाकण्यात आलं.
 
अमली पदार्थांचं जगातील सर्वात मोठं केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या या प्रदेशात राहणारे सर्वच गट या संघर्षात सामील झाले नाहीत.
 
सत्तापालटानंतर जवळजवळ तीन वर्षांनी, वांशिक सशस्त्र गटांनी समर्थन दिल्यानंतर पीडीएफ ही मुख्य लढाऊ शक्ती बनली.
 
इथे मोठ्या प्रमाणावर संघर्ष सुरू आहे आणि सैन्याला सुवर्ण त्रिभुज प्रदेशासह अनेक भागात नियंत्रण राखण्यात अपयश आलं आहे.
 
2. अफगाणिस्तानात अफूवर बंदी
अफगाणिस्तान हा अफूचं उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये सर्वात मोठा देश होता.
 
पण तालिबानने एप्रिल 2022 मध्ये लागवडीवर बंदी घातल्यापासून, अफगाणिस्तानमधील उत्पादनात कमालीची घट झाली आहे.
 
संयुक्त राष्ट्रांच्या 2023 च्या अफगाणिस्तान अफू सर्वेक्षणानुसार, 2022 मध्ये अफूचे उत्पादन 6,200 टन होतं. 2023 मध्ये ते 333 टन इतकं घसरलं, म्हणजे उत्पादनात 95 टक्के घट झाली.
 
दुसरीकडे, याच कालावधीत म्यानमारचे उत्पादन 36% ने वाढून 1,080 टन झाले.
 
थोडक्यात म्यानमारचं उत्पादन जरी वाढलं असेल तरी अफगाणिस्तानच्या उत्पादनाचा दर जास्त होता.
 
म्यानमारमध्ये सुरू असलेल्या अस्थिरतेमुळे तेथे अफूचे उत्पादन वाढतच जाईल अशी चिंता आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झाली आहे.
 
3. अफूच्या वाढत्या किंमती
अफगाणिस्तानमध्ये अफूच्या लागवडीवर बंदी आल्यापासून अफूच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. कच्चा माल म्हणून उत्पादकांना अफूसाठी सरासरी प्रति किलोग्राम मागे 355 डॉलर मोजावे लागायचे. संयुक्त राष्ट्रांच्या मते, अफूची सध्याची किंमत 2022 च्या तुलनेत 75% जास्त आहे.
 
जगात पसरलेल्या कोविड-19 साथरोगानंतर , लष्करी शासकांचे गैरव्यवस्थापन आणि गृहयुद्ध यांमुळे म्यानमारची अर्थव्यवस्था सतत घसरत गेली. त्यामुळे अफूच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याची ठरली.
 
त्याच्या जगभरातील पुरवठ्याच्या कमतरतेमुळे सुवर्ण त्रिभुज प्रदेशातील अफूची मागणीही वाढली आहे.
 
4. शेतकऱ्यांसाठी मोठी संधी
म्यानमारमध्ये साखर, रबर आणि फळांचं पीक घेऊन अफूचे उत्पादन कमी करण्याचे प्रयत्न केले गेले. परंतु या पिकांचं उत्पादन कठीण आणि अफू उत्पादनापेक्षा कमी फायदेशीर आहे.
 
या पर्यायी पिकांची दुर्गम भागातून बाजारपेठेत वाहतूक करणं अवघड आहे, तर खरेदीदार स्वत: अफू खरेदी करण्यासाठी शेतात जातात, त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाचतो.
 
देशात सुरू असलेल्या उठावामुळे म्यानमारला आंतरराष्ट्रीय मदतीचा ओघ कमी झाला आहे. त्यामुळे गरीब शेतकऱ्यांना उत्पन्नाचे पर्यायी स्रोत शोधणं अवघड झालं आहे.
 
मानवी हक्कांचं उल्लंघन आणि लष्करी राज्यकर्त्यांच्या उत्तरदायित्वाच्या अभावामुळे, अफू उत्पादन आणि इतर अंमली पदार्थांचे उच्चाटन करण्यासाठी म्यानमारला फारसा आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळत नाहीये.
 
5. प्रादेशिक अशांतता
सुवर्ण त्रिभुज प्रदेश हा अनेक दशकांपासून गुन्हेगारीचं केंद्रबिंदू आहे. यामध्ये अंमली पदार्थांची निर्मिती, अवैध शस्त्रास्त्र व्यापार, जुगार, मानवी तस्करी आणि ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर घडत आहेत.
 
म्यानमारच्या दुर्गम पर्वतीय प्रदेशांच्या सीमांवर मजबूत सुरक्षा नसल्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे.
 
म्यानमारसमोरील अनेक समस्यांपैकी एक म्हणजे अफूचे उत्पादन थांबविणे. लष्करी उठावामुळे देशाची राजकीय, आर्थिक आणि सामाजिक स्थिती खालावली आहे.
 
सध्याचे लष्करी सरकार देशावर नियंत्रण ठेवण्यासाठी धडपडत आहे, परंतु अंमली पदार्थांच्या समस्येचा सामना करणं त्यांच्या सध्याच्या धोरणात नाही.
 
जुनता सैनिक आणि जातीय सशस्त्र गटांसह बरेच लोक, त्यांच्या प्रदेशातून जाणाऱ्या व्यापाऱ्यांवर कर लावून अंमली पदार्थांच्या अवैध उत्पादनातून नफा मिळवतात. त्यामुळे अफूची शेती आणि व्यापार थांबवण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. याउलट या व्यापारासाठी अस्थिर वातावरण हा उत्पन्नाचा एक फायदेशीर स्त्रोत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments