नितीन श्रीवास्तव
चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर बंदी घालणं भारताला परवडू शकतं?
डायबेटिस, ब्लडप्रेशर, थायरॉईड, शरीरात कुठेही आलेली गाठ किंवा तत्सम आजाराकरता तुम्हाला औषध घ्यावं लागतं का?
कोलेस्टेरॉल वाढल्याने तुमच्या ओळखीतल्या कोणालातरी डॉक्टरांनी काही आठवड्यांचा गोळ्यांचा कोर्स पूर्ण करायला सांगितला का? कारण कोलेस्टेरॉल वाढणं हृदयासाठी चांगलं नसतं.
सर्दी, खोकला, कणकण, ताप यासाठी तुम्ही पॅरासिटॅमोल घेतली असेल. खूप दिवस व्हायरल इन्फेक्शन कायम राहिलं तर डॉक्टरांनी तुम्हाला अँटिबायोटिक्सचा कोर्स करायला सांगितला असेल.
तुमच्या घरात, नातेवाईकांमध्ये, मित्रमैत्रिणींच्या घरी कोणाला कॅन्सर झाला असेल तर त्यांना केमोथेरपी देण्यात येईल.
वर नमूद केलेल्या सर्व आजारांच्या औषधांमध्ये चीनचा वाटा असेल.
भारत-चीन वाद
एकमेकांशी घनिष्ठ व्यापारी संबंध असलेल्या भारत-चीन दरम्यान सीमेजवळच्या प्रदेशात झालेल्या हिंसक घटनेमुळे दोन्ही देशांचे संबंध दुरावले आहेत.
लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) तणावपूर्ण परिस्थिती आहे. गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांदरम्यान झालेल्या संघर्षात वीस भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता.
किती सैनिक गमावले यासंदर्भात चीनतर्फे अधिकृत काहीही सांगण्यात आलेलं नाही. तब्बल 45 वर्षांनंतर एलएसी इथे दुसऱ्या देशाच्या फौजेकडून भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला.
चीनच्या कृत्याचा भारतात मोठ्या प्रमाणावर निषेध झाला. चीनमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी वाढू लागली. मात्र केंद्र सरकारने अशा पद्धतीचं कोणतंही धोरण अवलंबलेलं नाही.
रेल्वे आणि टेलिकॉम मंत्रालयाने भविष्यात चीनकडून होणारी आयात कमी करण्यासाठी पावलं उचलली आहेत.
कन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात CAITने बहिष्कार टाकण्यात येईल अशा चीनमध्ये उत्पादित 500 हून अधिक वस्तूंची यादीच सादर केली आहे.
देशभरात अनेक ठिकाणी चीनमध्ये उत्पादित वस्तूंवर बहिष्कार टाकावा यासाठी आंदोलनंही करण्यात आलं.
चीनची औषधं भारतात
गेल्या दोन दशकात भारत आणि चीनमधील व्यापार 30 पटींनी वाढला आहे. 2001 मध्ये भारत-चीन व्यापार 3 अब्ज डॉलर इतकाच होता. 2019च्या अखेरीपर्यंत भारत-चीन व्यापाराचं प्रमाण 90 अब्ज डॉलरपर्यंत गेलं आहे.
वाढत्या व्यापारात औषधांचा वाटा सर्वाधिक आहे. गेल्या दशकभरात औषधांच्या आयातीचं प्रमाण 28 टक्क्यांनी वाढलं आहे.
भारतीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2019-20नुसार भारत चीनकडून 1,150 कोटी रुपयांचे फार्मा प्रॉडक्ट्स आयात करतो. या कालावधीत चीनहून भारतात झालेल्या आयातीचं मूल्य 15,000 कोटी रुपये होतं.
जेनरिक औषधांच्या निर्मितीत भारताचा अव्वल क्रमांक आहे. 2019 मध्ये भारताने 201 देशांना जेनेरिक औषधं विकली आणि अब्जावधी रुपयांची कमाई केली.
मात्र, आजही भारत ही औषधं तयार करण्यासाठी चीनवर अवलंबून आहे. औषधांच्या निर्मितीसाठी भारत चीनकडून अॅक्टिव्ह फार्मासिटिकल इनग्रेडिएंट्स आयात करतो. औषधं बनवण्यासाठीचा कच्चा माल या नावाने ओळखला जातो. त्याला 'बल्क ड्रग्ज' असंही म्हटलं जातं.
औषध निर्मिती क्षेत्रातील जाणकार सांगतात की, भारतात औषधांच्या निर्मितीसाठी आयात होणाऱ्या कच्च्या मालापैकी 70 टक्के चीनहूनच येतो.
Competitive Studies: Lessons from China या पुस्तकाचे लेखक आणि गुजरात फार्मा असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर जयमन वासा यांच्या मते, चीनच्या आयातीविना आपली अडचण होऊ शकते.
भारत सरकार जोपर्यंत फार्मा पार्क किंवा झोन तयार करत नाही तोपर्यंत चीनची बरोबरी करणं अवघड आहे. कारण त्यांनी या क्षेत्रात जोरदार आघाडी घेतली आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागेल.
भारतात API चं उत्पादन अत्यंत कमी आहे आणि जे एपीआय देशात तयार होतं, त्याला अंतिम स्वरुप देण्यासाठी काही वस्तू चीनहून आयात कराव्या लागतात.
भारतीय कंपन्या API किंवा बल्क ड्रग्स प्रॉडक्शनसाठी चीनवर अवलंबून आहे.
आंतरराष्ट्रीय फार्मा अलायन्सचे सल्लागार आणि जायडस कॅडिला ड्रग कंपनीचे माजी उत्पादन प्रमुख एसजी बेलापूर यांच्या मते, चीनहून मोठ्या प्रमाणावर API आयात करण्याचं कारण कमी किमती हे आहे. चीनहून येणाऱ्या बल्क ड्रग्जच्या किमती अन्य देशांच्या तुलनेत 30 ते 35 टक्क्यांनी कमी असतात.
अँटिबायोटिक आणि कॅन्सवरच्या उपचारांमध्ये लागणाऱ्या औषधांच्या बाबतीत भारत चीनवर अवलंबून आहे.
डायबेटिस, ब्लड प्रेशर, थायरॉईड, गाठ, व्हायरल इन्फेक्शन यासाठी देण्यात येणाऱ्या औषधांसाठी लागणारा कच्चा माल, अनेक प्रकारची सर्जिकल उपकरणं या धर्तीवर चीनहून भारतात आयात होणाऱ्या फार्मा उत्पादनांची यादी न संपणारी आहे.
जाणकारांच्या मते भारतात पेनिसिलिन आणि अॅजिथ्रोमायसीन सारख्या अँटिबायोटिकच्या उत्पादनात वापरण्यात येणारे 80 टक्के बल्क ड्रग किंवा कच्चा माल चीनहून आयात केला जातो.
वीजेची भूमिका
चीनमधील औषधांचे निर्मात्यांशी नियमितपणे भेट घेणारे आणि ड्रग रिसर्च मॅन्युफॅक्चरिंगचे विशेषज्ञ डॉ. अनुराग हितकारी यांच्या मते चीनहून बल्क ड्रग किंवा कच्च्या मालाची आयात करण्याचं कारण म्हणजे त्यांनी किमतीमध्ये राखलेली व्यावसायिकता.
ते पुढे सांगतात, 'API तसंच बल्क ड्रग्जच्या उत्पादनात वीजेचा मुद्दा महत्त्वाचा असतो. काही वर्षांपूर्वी चीनमध्ये वीजेची किंमत भारताच्या तुलनेत कमी होती. ज्यामुळे एकूण किंमत कमी राहत असे. चीनची फार्मा इंडस्ट्री देशातल्या विद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या संशोधन प्रकल्पांवर लक्ष ठेवून असत. विद्यापीठात होणारं संशोधन हा औषध निर्मिती क्षेत्राचा कणा आहे. नवं संशोधन परिणामकारक आहे हे लक्षात येताच त्याला दैनंदिन उपयोगात आणण्यात चीन वाकबगार आहे'.
जेजियांग, गुआंगडांग, शांघाय, जियांगसू, हेबेयी, निंगशिया, हारबिन या चीनमधील भागांमधून भारताला कच्चा माल पुरवला जातो.
या ठिकाणी तयार होणाऱ्या कच्च्या मालाला बीजिंग, शांघाय तसंच हाँगकाँगच्या बंदरांच्या माध्यमातून भारतात पोहोचवलं जातं.
आता उरतो चीनहून येणाऱ्या बल्क ड्रग्जच्या दर्जाचा. एसजी बेलापूर सांगतात, 'सुरुवातीला काहीही तक्रार नव्हती. मात्र आता भारतीय ग्राहकांना व्हेंडर कोण आहे याकडे कसोशीने लक्ष ठेवावं लागतं. योग्य काळजी घेतली नाही तर कच्च्या मालाची गुणवत्ता अत्यंत खराब निघू शकते.
सीमेवर झालेल्या संघर्षामुळे चीनहून आयात होणाऱ्या वस्तूंवरील अवलंबत्व कमी करण्याची मागणी आता पहिल्यांदाच होत नाहीये.
2017 मध्ये डोकलाम इथं भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार संघर्ष झाला होता. त्यावेळीही चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर बंदी घालण्यात यावी, असं म्हटलं गेलं होतं.
देशातल्या फार्मा इंडस्ट्री विश्वातही चीनविरोधी सूर पाहायला मिळाला. मात्र देशातल्या अॅक्टिव्ह फार्मासिटिकल इनग्रेडिएंट्स API मध्ये आत्मनिर्भरता आणण्याची आवश्यकता आहे. मात्र, आकडेवारीवर नजर टाकली तर चीनमधून होणाऱ्या आयातीत जराही घट झालेली नाही.
2019 मध्ये चीनच्या वुहान प्रांतातून कोरोना विषाणूचं संक्रमण आणि लॉकडाऊनच्या बातम्या यायला सुरुवात झाली तेव्हा भारतीय फार्मा क्षेत्रात भूकंपसदृश परिस्थिती निर्माण झाली. कच्च्या मालाविना, बल्क ड्रग्जविना जेनेरिक औषधांचं उत्पादन शक्य नव्हतं.
गुजरात फार्मा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जयमन वासा यांच्या मते कोव्हिड-19 संकट भारतीय फार्मा सेक्टरसाठी मोठी संधी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. औषधांच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं आवश्यक आहे. त्यासाठी सरकारच्या मदतीची गरज आहे.
बल्क ड्रग्ज संदर्भात आत्मनिर्भर होण्यासाठी प्रदीर्घ वेळ लागत असेल तर आपल्याकडे चीनव्यतिरिक्त कोणते पर्याय उपलब्ध आहेत?
आंतरराष्ट्रीय फार्मा अलायन्सचे सल्लागार एसजी बेलापूर यांच्या मते, भारताला चीनमधून होणारी आयात कमी करायची असेल तर स्पेन, इटली, स्वित्झर्लंड तसंच दक्षिण अमेरिकेतील देशांकडून कच्चा माल आयात करता येईल. पण या कच्च्या मालाची किंमत अधिक असेल.
भारतात अक्टिव्ह फार्मासिटिकल इनग्रेडियंट्स म्हणजेत बल्क ड्रग्जच्या भूतकाळ आणि भविष्यासंदर्भात डॉ. अनुराग हितकारी म्हणतात, भारतात प्रदूषणासंबंधी क्लिअरन्स घ्यावे लागतात. ज्यामध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार, पर्यावरण मंत्रालय यांच्याकडून परवानग्या मिळवाव्या लागतात.
कच्चा माल किंवा बल्क ड्रग्ज तयार करण्याचा विचार करणारे छोटे आणि लघु उद्योग परवानग्या मिळण्याच्या जटिल प्रक्रियेपासून दूर राहू इच्छितात. आता परिस्थिती थोडी बदलते आहे. कारण प्रदूषणासंदंर्भात परवानग्या मिळवण्याच्या प्रक्रियेत सुधारणा झाल्या आहेत.