Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोविदांना विम्याचं कवच, राज्य सरकार भरणार प्रिमिअम, राज्य सरकारची घोषणा

Webdunia
मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (21:05 IST)
राज्य सरकारनं आज तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यानुसार यंदा राज्य सरकार गोविदांना विम्याचं कवच देणार आहे. 10 लाखांच्या विम्याचं कवच राज्य सरकार गोविदांना देणार आहे. त्याचा प्रिमीयमसुद्धा राज्य सरकार भरणार आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंगळवारी यांची घोषणा केली आहे. बुधवारपासून राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.
 
त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या घोषणा केल्या. तसंच विरोधकांवर टीकासुद्धा केली.
 
लता मंगेशकर यांच्या नावाने सुरू केलं जाणारं आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय 28 सप्टेंबरला लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
तसंच यंदाच्या 15 ऑगस्टला 75 वर्षं पूर्ण केलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आता मोफत एसटी प्रवास करता येणार आहे.
 
या दोन घोषणासुद्धा मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
 
तसंच राज्य सरकारने बुधवारी राज्यभरात सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम आयोजित केला आहे.
 
यावेळी मुख्यंत्र्यांना संतोष बांगर यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी "कायद्यासमोर सर्व समान आहेत. आम्ही कोणत्याही चुकीच्या गोष्टींचं समर्थन करत नाही. ते व्हीडिओ तपासले जातील. जर कोणी दोषी आढळले तर कारवाई होईल," असं आश्वासन शिंदेंनी दिलं.
 
शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
विरोधकांनी राज्य सरकारला दिलेल्या पत्राची मुख्यमंत्र्यांनी खिल्ली उडवली आहे.
 
विरोधकांचं पत्र वाचल्यावर त्यांनी अंतिम आठवडा प्रस्ताव दिलाय की काय असंच वाटलं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
 
तर उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करताना "जे काम अडिच वर्षांपूर्वी व्हायला पाहिजे होतं. ते आता आम्ही केलं आहे. आम्ही आता दुरुस्ती केली आहे," असा टोला शिंदेंनी लगावला आहे.
 
आधीच्या सरकारच्या कामांना स्थगिती दिल्याच्या विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना "अत्यावश्यक सेवेतल्या कुठल्याही कामाला आम्ही स्थिगिती दिलेली नाही. आकसापोटी कुठलाही निर्णय रद्द करणार नाही," असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
 
विरोधकांनी एकजुटीचा विचार करावा - फडणवीस
या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना टीकेची तोफ डागली.
 
"विरोधीपक्षांनी 7 पानी पत्र दिलं आहे. त्यातील पहिली चार पानं आम्ही दिलेल्या पत्रातलीच आहेत. विरोधीपक्षांना विसर पडला आहे की दीड महिन्यांपूर्वी ते सत्तेत होते. त्यांनी जे जे केलं नाही त्या अपेक्षा त्यांनी आमच्याकडून व्यक्त केल्या आहेत. मी आश्वासन देतो की त्या आम्ही पूर्ण करू," असं फडणवीस यांनी म्हटलंय.
 
तसंच अजित पवारांनी मंत्र्यांच्या नाराजीवरून केलेल्या टीकेला उत्तर देताना "आमच्या सरकराची चिंता करण्यापेक्षा विरोधीपक्षांनी त्यांच्या एकजुटीची चिंता करावी," असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं आहे.
 
तसंच आधीच्या सरकारच्या कुठल्याही निर्णया स्थिगीती दिलेली नाही आम्ही त्यांचं पुनरावलोकन करत आहोत, असंसुद्धा फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

संबंधित माहिती

घाटकोपर होर्डिंग प्रकरण : मलब्यामधून खराब अवस्थेत निघाल्या 73 गाड्या, 4 दिवसानंतर रेस्क्यू ऑपरेशन संपले

4 जूनला निवृत्त होतील PM, उद्धव ठाकरेंनी मोदींच्या बॅक टू बॅक रॅलीवर उठवले प्रश्न

नाल्यात सापडला 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह, संतप्त लोकांनी शाळा पेटवली

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर एअर इंडियाच्या विमानाला अपघात, 180 प्रवासी सुखरूप बचावले

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होईल पाऊस, IMD ने घोषित केला अलर्ट

पुढील लेख
Show comments