Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कबुतरांची विष्ठा आरोग्यासाठी हानिकारक आहे?

Webdunia
सोमवार, 18 जानेवारी 2021 (18:37 IST)
मयांक भागवत
बीबीसी मराठी प्रतिनिधी
 
कबूतर...मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये मोठ्या संख्येने आढळून येणारा पक्षी. महानगरात तर चौका-चौकात कबूतरखाने आढळून येतात.
 
पण या कबुतरांमुळे लोकांचं आरोग्य धोक्यात येतं. कबुतरांपासून सामान्यांना होणारा संसर्ग वाढलाय. लोकांमध्ये श्वसनाचे विकार वाढल्याचा इशारा डॉक्टर सातत्याने देत आहेत.
 
मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये सामान्यांनी कबुतरांचा प्रश्न वारंवार उपस्थित केला होता. राज ठाकरेंच्या मनसेने दादरचा कबुतरखाना बंद करण्याची मागणी केली होती.
 
2019 मध्ये, यूकेच्या ग्लास्को हॉस्पिटलमध्ये कबुतरांच्या विष्ठेतून झालेल्या संसर्गामुळे एका मुलाचा मृत्यू झाला होता.
 
त्या मुळे कबुतरांची विष्ठा आरोग्यासाठी हानिकारक आहे? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
कबुतरांच्या विष्ठेतून बुरशी पसरते?
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कबुतरांच्या विष्ठेत बुरशी आणि जीवाणू असतात. ज्यामुळे लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.
 
कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस आणि क्रायटोकॉकस प्रकारची बुरशी सामान्यत: आढळून येते. कबुतरांची विष्ठा पडलेल्या मातीत ही बुरशी सापडते.
 
त, 'कबुतरांची विष्ठा आणि पंख श्वसनाच्या आजारांना कारणीभूत आहेत. कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस बुरशी आढळून येते. यामुळे अलर्जी होऊ शकते, अस्थमा देखील होण्याची शक्यता असते.'
 
यामुळे आजार कसा होतो?
श्वसनविकार तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कबुतरांच्या विष्ठेतील ही बुरशी श्वासातून शरीरात गेल्यानंतर लोकांना याचा संसर्ग होऊ शकतो.
 
ग्लास्को हॉस्पिटलमध्ये झालेल्या मुलाचा मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करताना तज्ज्ञांना, कबुतरांच्या विष्ठेचे काही कण रूममध्ये आढळून आले. स्कॉटलॅंडचे आरोग्य सचिव जेन फ्रीमन सांगतात, 'हे कण डोळ्यांना दिसू शकत नव्हते.'
 
हे किती जोखमीचं आहे?
 
डॉक्टर सांगतात, 'अनेकांना याचा त्रास होत नाही. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यांना फुफ्फुसात संसर्ग होतो.'
 
क्रायटोकॉकसचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही.
 
कबुतरांच्या विष्ठेमुळे कोणते आजार होतात?
 
डॉ. विजय वारद पुढे सांगतात, कबुतरांच्या विष्ठेमुळे, राइनायटिस, त्वचेची अॅलर्जी, डोळे लाल होणं, सायनसायटिस यांसारखे आजार होण्याची शक्यता असते.
 
तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे, कबुरतांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे विकार वाढल्याचं दिसून आलं आहे. या आजारांचं वेळीच निदान आणि उपचार केले नाहीत तर श्वसनमार्गाचे गंभीर आजार होऊ शकतात.
 
कबुरतांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या गंभीर आजारांची माहिती देताना डॉ. वारद सांगतात, कबुतरांच्या विष्ठेमुळे
 
हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया
श्वसननिलिकेला सूज येणं
फुफ्फुसांना सूज येणं
क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (श्वसनमार्गाचे गंभीर आजार) यांसारखे गंभीर आजार
'श्वसन नलिकेला सूज आल्याने अस्थमाग्रस्त रुग्णांना गंभीर स्वरूपाचा शॉक येण्याची शक्यता असते,' असं ते पुढे म्हणतात.
 
कबुतरांची विष्ठा किती धोकादायक?
 
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कबुतरांच्या विष्ठेतील कण हवेत मिसळतात. ही प्रदूषित हवा श्वसनाद्वारे शरीरात गेल्यास किंवा प्रदूषित पाण्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते.
 
सॅलमोनेला जीवाणूंमुळे डायरिया होण्याची शक्यता असते. हे पक्षांच्या विष्ठेमध्ये असतं.
 
मुंबईत कबुतरांच्या विष्ठेची समस्या
 
मुंबईत कबुतरांच्या विष्ठेची समस्या काही वर्षांपूर्वी राजकीय मुद्दा बनला होता. राज ठाकरेंच्या मनसेने लोकांच्या आरोग्याला त्रास होत असल्याने दादर कबुतरखाना बंद करण्याची मागणी केली होती.
 
कबुतरांच्या वाढत्या त्रासामुळे खार परिसरातील रहिवाशांनी कबुतरखाना बंद करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पालिकेने खारचा कबुतरखाना बंद केला होता.
 
टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने कबुतरांच्या विष्ठमुळे मुंबईत दोन महिलांची फुफ्फुसं निकामी झाल्याची बातमी जानेवारी 2020 मध्ये दिली होती.
 
ज्यात मुंबईतील छाती विकारतज्ज्ञ डॉ. उन्मिल शहा यांनी, या दोन्ही महिलांना हायपर सेन्सिटिव्ह न्युमोनिया किंवा पर्यावरणामुळे फुफ्फुसं निकामी झाल्याची माहिती दिली होती.
 
मुंबईतील कबुतरांच्या समस्येमुळे होणाऱ्या आजारांबाबत बोलताना फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. कपिल राठी सांगतात, 'मुंबई हवेत आद्रता जास्त असल्याने आणि कबुतरांची संख्या खूप असल्याने कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आजारांचे रुग्ण आढळून येतात. कबुतरांच्या विष्ठेमुळे लोकांना अस्थमाचा जास्त त्रास होतो.'
 
कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या आजारांची लक्षणं काय? डॉ राठी सांगतात, कफ, सर्दी, श्वास घेण्यास अडथळा ही श्वसनाच्या विकारांची लक्षणं आहे. रुग्ण आल्यानंतर आम्ही त्यांना कबुतरांना अन्न देता का? त्यांच्या विष्ठेशी संपर्क येतो का असे प्रश्न विचारतो. जेणेकरून याबाबतची माहिती मिळू शकते.
 
कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारा हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया जीवघेणा आहे. याचं कारण, यात फुफ्फुसं निकामी होतात, असं डॉ राठी सांगतात.
 
पुण्यातील परिस्थिती काय?

कबुतरांची विष्ठा आणि पखांमुळे होणाऱ्या आजारांबाबत डॉ. विजय वारद यांनी अभ्यास केला होता.
 
संशोधनातून काय आढळून आलं?
 
पुणे आणि आसपासच्या परिसरातील 5 ते 12 वर्ष वयोगटातील 1100 मुलांवर अभ्यास करण्यात आला
37 टक्के मुलांना कबुतरांच्या विष्ठेतून पसरणाऱ्या बुरशीमुळे अॅलर्जी झाली
39 टक्के मुलांना पंखामुळे अॅलर्जी झाल्याचं समोर आलं
पुणे महापालिकेने पर्यावरणाबाबत जारी केलल्या 2017-18 च्या रिपोर्टमध्ये कबुरतांच्या समस्येबाबत माहिती दिली होती.
 
पुणे महापालिकेचा रिपोर्ट

कबुतरांच्या संपर्कात आल्याने नागरीकांचं आरोग्य धोक्यात येत आहे.
कबुतरांच्या पिसांमुळे श्वसनाचे विकार वाढत आहेत.
विष्ठेमुळे बुरशी (फंगस) संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं
विष्ठा आणि पिसांमधून बाहेर पडणाऱ्या जंतूमुळे हायपर सेन्सिटिव्ह न्युमोनियाचे आजार वाढत आहेत
कबुतरांना धान्य न टाकण्याचं आवाहन नागरीकांना करण्यात येत आहे
हा संपूर्ण रिपोर्ट इथे वाचू शकता.
 
हैद्राबादमध्ये कबुतरांना अन्न देण्यास मनाई

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, 2019 मध्ये हैद्राबाद पालिका प्रशासनाने लोकांना कबुतरांना अन्न देऊ नका असं आवाहन केलं होतं.
 
'कबुतरांमुळे लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये श्वसनाचे विकार बळावण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्यांनी कबुतरांना अन्न देऊ नये' अशी पालिकेने सूचना केली होती.
 
पक्षांच्या विष्ठेशी संपर्क झाल्यास खबरदारी घेणं गरजेचं आहे.
हात धुणं आणि खाण्यापूर्वी, हात तोंडाजवळ नेताना त्वचा स्वच्छ करणं गरजेचं आहे.
पक्ष्यांना खाणं दिल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत.
रोगप्रतिकारशक्ती कमी असेल किंवा एचआयव्हीसारखा आजार असल्यास पक्षांची विष्ठा स्वच्छ करू नये.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख