Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माझ्या घराच्या भिंतींवर लिहिण्यात आलं, तू दहशतवादी आहेस - प्रवीण कुमार

माझ्या घराच्या भिंतींवर लिहिण्यात आलं, तू दहशतवादी आहेस - प्रवीण कुमार
, शुक्रवार, 6 ऑगस्ट 2021 (22:51 IST)
शहबाझ अनवर
जवळपास 32 वर्षांचा एक तरुण हायवेवर चालत जात आहे. त्याच्या हातात एक तिरंगा आहे. तसंच त्याच्याकडं एक ट्रॉली बॅगही आहे. रिमझिम असो वा जोरदार पाऊस त्याची पावलं थांबतच नाहीत.
 
सहारनपूर ते मेरठ आणि दिल्ली दरम्यान अनेक लोकांनी गेल्या काही दिवसांत ठिकठिकाणी हे दृश्य पाहिलं आहे. हा तरुण नेमकं असं का करतोय, अशी उत्सुकताही लोकांमध्ये निर्माण झाली.
 
सामाजिक छळामुळं त्रस्त असलेल्या प्रवीण कुमार यांच्या जीवनाशी संबंधित ही कहाणी असल्याचं समोर आलं आहे.
 
याच प्रवीण कुमार यांची जून महिन्यात उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएस (अँटी टेररिस्ट स्क्वाड) नं धर्मांतराच्या मुद्द्यावर चौकशी केली होती.
 
त्यांचं नाव दिल्लीमध्ये असलेल्या इस्लामिक दावा सेंटर नावाच्या संस्थेत धर्मांतर करणाऱ्या तरुणांच्या यादीत होतं, आणि ते प्रवीण कुमारचे अब्दुल समद बनले होते असं पोलिसांचं म्हणणं आहे.
 
एटीएसनं जवळपास आठवडाभर चौकशी केल्यानंतर प्रवीण कुमार यांना क्लीनचीट दिली आणि घरी परत पाठवलं. पण त्यानंतर प्रवीण यांच्याबरोबर जे काही घडलं ते अत्यंत आश्चर्यकारक असं होतं.
 
"एटीएसनं मला क्लीन चीट दिली होती. मी 30 जूनला घरी परत आलो. पण त्यानंतर गावात लोक माझ्याबरोबर विचित्र वर्तन करायला लागले होते," असं प्रवीण कुमार म्हणाले.
"माझ्या घराच्या भिंतीवर मी दहशतवादी असल्याचं लिहिण्यात आलं. एका कागदावर लिहून तो माझ्या घरात फेकण्यात आला होता. त्यावर लिहिलं होतं, तुम्ही पाकिस्तानी दहशतवादी आहात, पाकिस्तानात निघून जा," असंही त्यांनी सांगितलं.
 
सहारनपूर पोलिसांनीही त्यांनी क्लीनचीट दिल्याचं मान्य केलं आहे.
"एटीएसचे अधिकारी प्रवीण सिंह यांना चौकशी करण्यासाठी घेऊन गेले होते. तिथून त्यांना क्लीन चीट मिळाली आहे. इतर तपशीलवार माहिती एटीएसच्या अधिकाऱ्यांकडंच आहे.
 
माझ्या माहितीनुसार त्यांना क्लीनचीट देण्यात आली आहे," असं बीबीसीबरोबर बोलताना सहारनपूर जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या नागल पोलिस ठाण्याचे प्रभारी बीनू सिंह म्हणाले.
 
एटीएसनं केली प्रवीण यांची चौकशी
दिल्लीच्या इस्लामिक दावा सेंटरशी संलग्न असलेल्या उमर गौतम आणि जहांगीर आलम यांच्यावर बळजबरी धर्मांतराचे आरोप झाले होते.
 
जेव्हा त्याठिकाणी चौकशी केली तेव्हा त्यांना तिथं प्रवीण कुमार यांच्या नावाचं एक प्रमाणपत्र मिळालं, असं एटीएसनं सांगितलं.
या प्रमाणपत्रावर प्रवीणचा फोटो लावलेला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार या प्रमाणपत्रात प्रवीण कुमार यांचं धर्मांतर करून ते अब्दुल समद बनल्याचा आणि त्यांनी इस्लाम स्वीकारल्याचा उल्लेख होता.
 
"ते प्रमाणपत्र माझंच होतं. मला त्यावेळी नैराश्यानं ग्रासलेलं होतं. मला शांतता हवी होती. त्यामुळं मी 19 नोव्हेंबर 2019 ला घर सोडून निघून गेलो होतो.
 
मी याबाबत माझ्या आई वडिलांना किंवा पत्नीलाही काहीच सांगितलं नाही. मोबाईलही बंद ठेवला होता," असं प्रवीण यांनी याबाबत बोलताना सांगितलं.
 
घरून निघाल्यानंतर प्रवीण इस्लामिक दावा सेंटरमध्ये कसे पोहोचले, याबाबतही त्यांनी सांगितलं. "मी इंटरनेटमधून एक कार्ड काढलं होतं. त्यात इस्लामिक दावा सेंटरचा पत्ता होता. मी त्याठिकाणी पोहोचलो आणि सुरुवातीचे काही दिवस मी तिथंच राहिलो."
 
"त्याठिकाणी कुरआनपासून ते वेदांपर्यंत सर्व पुस्तकं ठेवलेली होती. मी स्वेच्छेनं तिथं गेलो होतो. दोन दिवसांनी माझी भेट उमर गौतम आणि जहांगीर आलम यांच्याशी झाली. मी काही पुस्तकांचा अभ्यास केला आणि प्रवीणचा अब्दुल समद बनलो."
 
या चर्चेदरम्यान ते स्वेच्छेनं त्याठिकाणी गेले होते असं प्रवीण सातत्यानं म्हणत होते. त्यांना कोणीही बोलावलेलं नव्हतं असं त्यांनी सांगितलं. मात्र त्याचवेळी ते वारंवार असंही म्हणत होते की, या काळात ते नैराश्याच्या समस्येचा सामना करत होते. त्यांनी धर्मांतर स्वेच्छेनं केलं होतं. त्यांच्यावर कोणत्याही नेत्यानं बळजबरी केली नव्हती, किंवा त्यांना काही आमिषही दाखवलं नव्हतं.
 
'मला न्याय हवा'
पेशानं शिक्षक आणि यूजीसी नेट परीक्षा पास असलेले प्रवीण कुमार न्याय मिळण्याची मागणी करत आहेत. त्यासाठी त्यांनी सहारनपूरहून 27 जुलैला यात्रा सुरू केली. गेल्या रविवारी सुप्रीम कोर्टाच्या जवळ ही यात्रा संपली.
या पदयात्रेला प्रवीण यांनी सामाजिक न्याय यात्रेचं नाव दिलं आहे. पण प्रवीणबरोबर नेमका काय अन्याय झाला, असा सवाल प्रवीणला करण्यात आला. त्यावर, "एटीएसनं सर्वात आधी माझी 21 जूनला घरीच चौकशी केली. अधिकारी माझ्या घरी पोहोचले होते. त्यानंतर 24 जूनपर्यंत माझ्या घरीच माझी चौकशी होत होती. त्यानंतर 29 जूनपर्यंत लखनऊमध्ये माझी चौकशी करण्यात आली," असं प्रवीण यांनी सांगितलं.
 
"अधिकाऱ्यांनी विदेशातून येणारा निधी, दहशतवादी कारवायांमध्ये सहभागाची शंका याबाबत मला प्रश्न विचारले. माझी चौकशी अनेक तास सुरू होती. पण नंतर मला क्लीन चीट देण्यात आली. त्यानंतर मला घरी पाठवण्यात आलं," असं प्रवीण सांगतात.
 
प्रवीण कुमार परत घरी आले तेव्हा त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली. प्रवीण यांच्या मते, एटीएस अधिकारी 21 जूनला चौकशीसाठी आले त्यानंतर गावात त्यांच्याबाबत अनेक अफवा उठायला सुरुवात झाली होती.
 
"मी राष्ट्रवादी विचारसरणी असणारा व्यक्ती आहे. कवी आहे, शिक्षक आहे आणि लेखकही आहे. पण 12 जुलैच्या रात्री माझ्या घराच्या भिंतीवर जेव्हा दहशतवादी लिहिण्यात आलं आणि पाकिस्तानात निघून जा अशी चिठ्ठी फेकण्यात आली, तेव्हा मी प्रचंड रडलो.
 
मनात आत्महत्येचा विचार आला. पण मला वाटलं की, मी न्याय मिळवेल, सामाजिक दृष्ट्या होणाऱ्या छळावर मी न्याय मिळवेल. याच विचारानं मी 27 जुलैपासून सामाजिक न्याय यात्रा सुरू केली.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी निवेदन दिल्यानंतर मी जवळपास 200 किलोमीटर दूर असलेल्या दिल्लीच्या सुप्रीम कोर्टाकडं पायीच निघालो. रविवारी मी दिल्लीला पोहोचलो," असं प्रवीण म्हणाले.
 
'मी नैराश्यात होतो'
प्रवीण कुमार 19 नोव्हेंबर 2019 ला घरी न सांगताच निघून गेले होते.
 
त्यांनी मोबाईलही स्विच ऑफ ठेवला होता. "मी घरातून निघालो तेव्हा प्रचंड तणावात होतो. मला शांतता हवी होती. त्यानंतर मी इस्लामिक दावा सेंटरला पोहोचलो. मी काही दिवस वाराणसीतही राहिलो.
 
मी स्वेच्छेनं अब्दुल समदही बनलो. त्याठिकाणी काही लोकांनी माझ्यावर उपचारही केले. त्यानंतर मी बरा झालो. जानेवारी 2020 मध्ये मी घरी परतलो. त्यावेळी कुटुंबीय मला पाहून आनंदी झाले. त्यांनी मला अचानक बेपत्ता होण्याबाबत विचारलं तर, मी त्यांना सर्वकाही खरं-खरं सांगितलं," असं प्रवीण म्हणाले.
 
प्रवीण अब्दुल समद बनले असल्याचं नातेवाईकांना समजलं, तर त्यांनी नाराजी दर्शवली. प्रवीण यांना तुम्ही आता प्रवीण कुमार आहात की, अब्दुल समद असंही आम्ही विचारलं. तर त्यावर "मी त्या काळात नैराश्यात होतो. आता जेव्हाही संधी मिळते तेव्हा मी ध्यान किंवा मेडिटेशन करतो. यापेक्षा जास्त मी काय सांगू," असं ते म्हणतात.
 
प्रवीण यांना अधिक स्पष्ट उत्तर देण्यास सांगितलं, तर त्यांनी ते टाळलं.
 
प्रवीण बोलताना वारंवार नैराश्यात असल्याचं सांगतात. एका प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी नैराश्य येण्यामागचं कारणही सांगितलं.
 
गावात त्यांच्या भावाचं रेशनचं दुकान होतं. काही गावकऱ्यांचे रेशन कार्ड बंद झाले होते. ते त्यांच्या भावामुळं बंद झाल्याचा संशय गावकऱ्यांना होता. तिथूनच वाद सुरू झाले आणि त्यानंतर प्रवीण यांच्यासह त्यांचे भाऊ आणि कुटुंबातील काही सदस्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती.
 
"ही 2015 ची गोष्ट आहे. माझ्या भावाचं रेशनचं दुकान होतं. सरकार त्यावेळी अपात्र कुटुंबांचे रेशन कार्ड बंद करत होतं. त्यामुळं गावकऱ्यांना माझा भाऊ आणि कुटुंबाबाबत गैरसमज झाला. त्यांनी भावावर कमी राशन देण्याचा आरोप केला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोरही भांडण झालं.
 
त्यानंतर माझ्या आणि कुटुंबाच्या काही जणांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली. पण ज्यादिवशी भांडण झालं त्यादिवशी मी हरिद्वारमध्ये होतो आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. या संपूर्ण प्रकरणात कट करून मला अडकवण्यात आलं, असं ते सांगतात.
 
नंतर प्रवीण नेट परीक्षा उत्तीर्ण झाले तेव्हा गुन्ह्यात त्यांचं नाव असल्यानं जोपर्यंत यातून सुटत नाही तोपर्यंत सरकारी नोकरी मिळणार नाही, असं त्यांना सांगण्यात आलं. "मी 2020 मध्ये नेट परीक्षा उत्तीर्ण झालो होतो.
 
प्रचंड अभ्यास केल्यानंतर मी पास झालो. पण एवढ्या परीश्रमानंतरही मी यशस्वी झालो नाही, कारण माझ्या विरोधात खटला सुरू होता."
 
प्रवीण गावातील काही लोकांना घेऊन ज्यांनी खटला दाखल केला होता, त्यांच्याकडं गेले. पण त्यांनी यावर तोडगा काढण्यास स्पष्टपणे नकार दिला.
 
प्रवीण आणि त्यांच्या कुटुंबातील इतर तीन सदस्यांच्या विरोधात गावातील नरेंद्र ताराचंद यांनीच 2015 मध्ये गुन्हा दाखल केला होता. स्वतः ताराचंद यांनी बीबीसीला याबाबत माहिती दिली.
 
"2015 मध्ये प्रवीण यांच्या कुटुंबीयांशी रेशनच्या प्रकरणावरून मारहाण झाली होती. या प्रकरणात प्रवीण यांच्या नावचाही समावेश आहे. मी अजूनही हा खटला लढत आहे," असं त्यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
 
"मी त्याच दिवसापासून डिप्रेशनमध्ये जायला लागलो. मी कितीही परिश्रम केले तरी मी यशस्वी होऊ शकणार नाही, असं मला वाटू लागलं. तेव्हापासूनच मी शांतता मिळावी या शोधात राहू लागलो,'' असं प्रवीण सांगतात.
 
योगी आणि मोदींवर पुस्तक लिहिलं
प्रवीण 2003 मध्ये इस्लामिया इंटर कॉलेज देवबंदमधून दहावी उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर जनता इंटर कॉलेज नागल, सहारनपूरमधून 12वी आणि कलिराम डिग्री कॉलेजमधून पदवी पूर्ण केली.
एमए केल्यानंतर ते 2020 मध्ये नेट परीक्षा उत्तीर्ण झाले. सध्या ते पीएचडीची तयारी करत आहेत.
 
"माझ्यामध्ये राष्ट्रवादाची भावना अगदी ठासून भरलेली आहे. मी जेव्हा नेट परीक्षेची तयारी करत होतो, त्यावेळी चौधरी कलिराम कॉलेजमध्ये अध्यापनाचं कामही करत होतो. मी लेखक आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर 2016 मध्ये 'नमो: गाथा मोदी' आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर एक अशी दोन पुस्तकंही लिहिली आहेत. पण आता त्यांची नावं सांगू शकत नाही,'' असं प्रवीण म्हणाले.
 
सध्या प्रवीण एका साखर कारखान्यात केन डेव्हलपमेंट सुपरवायझरचं काम करत आहेत.
 
प्रवीणबाबत काय म्हणतात गावकरी
प्रवीणबाबत त्यांचे गावातील मित्र आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांचे विचार अत्यंत चांगले आहेत.
 
"प्रवीण आणि मी आम्ही एकत्र शिकलेलो आहोत. तो अत्यंत चांगल्या स्वभावाचा मुलगा आहे. आम्ही दोघांनी नेटची परीक्षा एकत्रित दिली. पण प्रवीण पास झाले आणि मी मात्र पास झालो नाही.
 
प्रवीण काही काळ घरातून गायब होते. पण खरं तर ते आजारी होते. एटीएस अधिकारी चौकशीसाठी पोहोचले तर आम्हाला आश्चर्य वाटलं.
 
पण प्रवीण कायम आमच्याशी अभ्यासाबाबतच बोलत होते," असं प्रवीणचे एक मित्र हिमांशू यांनी बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं.
प्रवीण यांचे आणखी एक मित्र जॉनी यांनीदेखील ते सामाजिक छळानं अत्यंत त्रस्त होते, असं सांगितलं.
 
"मी गेल्या काही काळात प्रवीण यांना फार भेटू शकलो नाही. आम्ही दोघांनी एकत्रच बीए केलं आहे. प्रवीण यांनी नेहमी गावाचं नाव उंचावलं आहे. मी त्यांच्या शेजारीच राहतो," असं ते म्हणाले.
 
प्रवीण यांची न्याय यात्रा योग्यच असल्याचं जॉनी म्हणतात.
 
''आम्ही प्रवीण यांच्या न्याय यात्रेबाबत बातम्यांमध्येच ऐकलं आणि पाहिलं आहे. जवळपास दोन वर्षांपूर्वी आम्ही प्रवीण यांच्याबरोबर शिक्षक म्हणून काम करत होतो. ते नेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. अत्यंत हुशार आहेत. त्यांचं व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळं आहे. त्यांच्या खासगी विषयांवर ते कधीही माझ्याशी बोलले नाहीत. त्यांचं केवळ नेट परीक्षा उत्तीर्ण होणं, हे एकच स्वप्न होतं असं त्यांचे सहकारी शिक्षक पूरन म्हणाले.
 
'आम्हाला बातम्यांमधून समजलं'
प्रवीण यांच्याबद्दल गावातील कुणालाही काही अडचण नव्हती असं गावचे प्रधान (सरपंचांसारखी मुख्य व्यक्ती) म्हणाले.
 
प्रवीण यांच्या भिंतीवर दहशतवादी असं कुणी लिहिलं, कुणी चिठ्ठी टाकली याबाबत त्यांना काहीही माहिती नसल्याचा, दावा त्यांनी केला. गावात कुणाबाबतही असा काही विषय नसल्याचंही ते म्हणाले.
 
''भिंतीवर कुणी काही लिहिलं असल्याचं, मी गावात ऐकलं नाही. गावात प्रवीण यांच्याशी कुणाचं तसं शत्रुत्वही नाही. जर त्यांच्याबरोबर असं काही घडलं असेल, तर त्यांनी आधी गावातील जबाबदार लोकांसमोर हा मुद्दा मांडायला हवा होता," असंही ते म्हणाले.
 
प्रवीण कुमार यांचं कुटुंब माध्यमांच्या प्रश्नांनी त्रस्त झालं असून त्यांना काहीही बोलायची इच्छा नाही.
 
एटीएसच्या चौकशीनंतर त्यांच्या गावात कधीही माध्यमांचे प्रतिनिधी येतात. त्यामुळं कुटुंबीयांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
 
त्यांचे वडील शेतकरी आहेत तर कुटुंबात पत्नीबरोबरच दोन मुलंही आहेत. एक भाऊ आणि एक बहीण असून त्यांचं लग्न झालं आहे.
 
त्यांचे वडील गावचे प्रधानही होते. वडिलांना याबाबत काहीही बोलण्याची इच्छा नसल्याचं ते सांगतात. भिंतीवर दहशतवादी असं लिहिण्यात आलं तेव्हा वडिलांनीच ते स्वच्छ केल्याचं प्रवीण यांनी सांगितलं.
 
प्रवीण पुढं काय करणार?
प्रवीण यांची ही न्याय यात्रा रविवारी 1 ऑगस्ट रोजी दिल्लीच्या सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचून संपली.
 
"मी समाजाकडून होणाऱ्या छळाला त्रासून न्यायाच्या मागणीसाठी यात्रा सुरू केली होती. अशा छळानं कुणाला त्रास होऊ नये किंवा अन्याय होऊ नये, यासाठी मी लवकरच वकिलांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल करणार आहे," असं प्रवीण म्हणतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिमाचल प्रदेशमध्ये चालकाच्या समजूतदारपणामुळे मोठा अपघात टळला