Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कबीर सिंह चित्रपट वाद : "मी सतत नकार देऊनही माझ्या एक्स-बॉयफ्रेंडने बळजबरी केली"

Webdunia
गुरूवार, 18 जुलै 2019 (09:47 IST)
मी 'अर्जुन रेड्डी' चित्रपट अमेझॉन प्राईमवर आला तेव्हाच पाहिला होता. चित्रपटात पूर्णपणे पुरुषी विचारसरणीचा पगडा होता. मात्र, सिनेमा तेलगू भाषेतला असल्यानं कदाचित मी त्या सिनेमाशी कनेक्ट होऊ शकले नाही.
 
"मात्र, 'अर्जुन रेड्डी'चा हिंदी रिमेक 'कबीर सिंह' रिलीज झाला, त्यावर चर्चा होऊ लागली आणि चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी यांची मुलाखत व्हायरल व्हायला लागल्यावर मी पुन्हा एकदा माझ्या भूतकाळात गेले. तिथे केवळ वेदना होत्या...आपल्या जोडीदाराकडून होणाऱ्या शारीरिक हिंसेच्या वेदना."
 
संदीप यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलं होतं, "दोन व्यक्तींमध्ये एकमेकांना मारण्याचं, शिव्या देण्याचं स्वातंत्र्य नसेल तर कदाचित ते खरं प्रेमच नाही."
 
त्यांच्या या वक्तव्याने माझ्या जुन्या आठवणी आणि जवळपास भरत आलेल्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या.
 
आता माझी कहाणी ऐका... शंभर टक्के खरी कहाणी...
 
माझ्या एक्स-बॉयफ्रेंडने माझ्यावर बळजबरी केली होती. मी सतत 'नाही' म्हटल्यावरसुद्धा. तेव्हा तर आमचं नातं जेमतेम सुरू झालं होतं आणि मी सेक्ससाठी मानसिकरित्या तयार नव्हते.
 
मी रडत होते. कारण सेक्सचा पहिला अनुभव बळजबरीचा असावा, हे मला नको होतं. कुणालाही हे नकोच असेल. मला रडताना बघून तो फक्त एवढंच म्हणाला, "बेबी, कंट्रोल होत नव्हतं."
 
त्याच्या मनात कायम ही शंका होती की माझे आधीही कुणाशी तरी संबंध होते. तो बरेचदा मला असं काही बोलायचा ज्यामुळे मला वाईट वाटायचं. त्याला सहमतीने ठेवलेले शरीरसंबंध आणि बळजबरीने होणारं लैंगिक शोषण यात काही फरकच वाटायचा नाही.
 
या शारीरिक, लैंगिक आणि भावनिक हिंसेने माझ्यावर इतका खोल परिणाम झाला, की माझ्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले.
 
मला वाटायचं या सर्वातून बाहेर पडण्याचा केवळ एकच मार्ग आहे आणि तो आहे आत्महत्या. तो कधीही माझ्याजवळ यायचा. माझी स्वतःची स्पेसच उरली नव्हती. मी कधी त्याच्याऐवजी स्वतःला प्राधान्य दिलं तर तो मलाच अपराधी भावना द्यायचा.
 
परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की मला काऊन्सिलरची मदत घ्यावी लागली. डॉक्टरांनी सांगितलं, "मला नैराश्य आणि 'बॉर्डर लाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर'ने ग्रासले आहे." थेरपीनंतरच मी या नात्यातून बाहेर पडू शकले.
 
दरम्यानच्या काळात तोसुद्धा दुसऱ्या शहरात गेला. हे नातं संपल्यानंतर मला कळलं, की तो मला फसवत होता. तो माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता त्यावेळी त्याचे इतरही काही मुलींशी संबंध होते. मी त्याला कॉल करून जाब विचारल्यावर तो मला 'यूज अँड थ्रो मटेरियल' म्हणाला.
 
मी या नात्यात का होते?
तुम्हाला प्रश्न पडला असेल, की इतकं सगळं होऊनही मी या नात्यात का होते?
 
या नात्यातून बाहेर पडणं कठीण होतं कारण तो मला थांबवण्यासाठी कुठल्याही थराला जायचा. तो माझ्या पीजी (मी जेथे पेइंग गेस्ट म्हणून राहायचे) पर्यंत यायचा. माझ्यासमोर याचना करायचा, माफी मागायचा. माझे आई-वडील किंवा पीजीमधली मंडळी या प्रकरणात पडू नये, असं मला वाटायचं.
 
माझ्याबाबतीत जे काही घडत होतं तो हिंसाचार होता, हे मी बराच काळ मान्यच करू शकले नाही. माझ्या विवेकबुद्धीपुढे आणि त्याचा खरा चेहरा मला दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्या मैत्रिणींपुढे मी त्याला पाठीशी घालत राहिले.
 
इतकं सगळं होऊनही मी त्या नात्यात का राहिले. ते नातं तोडलं का नाही, असा विचार तुम्ही करत असाल.
 
तो जे बोलायचा त्याला मी 'अंतिम सत्य' मानायचे. तो जेव्हा जेव्हा मला 'नालायक' म्हणायचा. मी त्याच्यावर विश्वास ठेवायचे.
 
भारतीय समाजात स्त्रीला 'कुटुंबाची प्रतिष्ठा' मानलं जातं. आपलं प्रेम आणि नातं लपवणं आपल्याला रोमँटिक वाटतं. प्रेम, नातं आणि सेक्स याविषयी निकोप, खुली चर्चा खूपच कमी वेळा होताना दिसते.
 
प्रेम कसं करावं, हे आपण सिनेमात बघून शिकतो आणि चित्रपटांचा प्रभाव खूप मोठा असतो. त्यामुळे हे चित्रपट तरुणांच्या मनात प्रेमाची अशीच संकल्पना रुजवतात.
 
बरीच पुरूष मंडळी पॉर्न बघून सेक्सविषयी एक संकुचित दृष्टिकोन बनवतात, हे तसंच काहीसं आहे. ती समज अपरिपक्व आणि वास्तवापासून खूप दूर असते. कारण सेक्सबद्दही वास्तविक आयुष्यात खूप कमी चर्चा होते.
 
दिग्दर्शक संदीप रेड्डी यांनी अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, "संताप सर्वात खरी भावना आहे आणि प्रेमसंबंधात लोकांना आपल्या जोडीदाराला कधीही स्पर्श करण्याचं, चुंबन घेण्याचं, शिव्या देण्याचं आणि मारण्याचं स्वातंत्र्य असतं."
 
रेड्डी यांचा हा दावा मला मुळातच स्त्रीविरोधी वाटतो.
 
'स्त्रिया, ज्या हे सर्व निमूटपणे सहन करतात'
इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अशा गोष्टी बहुतांशी पुरूषच करतात. मग ते जोडीदाराला कधीही स्पर्श करणं असो किंवा मग मारझोड करणं आणि हे सगळं सहन करते ती स्त्री.
 
रेड्डी हे 'नॉर्मल' आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
आमच्या मनात कधीच अशी भावना आली नाही किंवा आम्ही असं कधीच करणार नाही, असं सांगून काही लोक कबीर सिंहच्या भूमिकेचं समर्थन करण्याचा प्रयत्न करत आहेत. या माणसांना खरोखर असं वागणारे पुरूष माहितीच नाहीत.
 
ज्यांनी स्वतः कधीही जवळच्या नात्यात असा हिंसाचार सहन केलेला नाही आणि कदाचित कधीच सहन करणारही नाही, असे सुसंपन्ना लोक कबीर सिंहचं समर्थन करणारे आहेत.
 
संदीप रेड्डींचे प्रेक्षक चित्रपटाचा पूर्ण आनंद लुटतात. कबीर जेव्हा प्रीतीला मारतो तेव्हा टाळ्या वाजवतात. कबीर आपल्या मोलकरणीला पळवतो तेव्हा ते हसतात. जिथे एका गरीब स्त्रिला काचेचा ग्लास तोडल्याची शिक्षा म्हणून मारहाण करण्यासाठी पळवलं जातं, अशा दृश्यावर ते हसतात.
 
कबीर सिंह चाकू दाखवून एका मुलीला कपडे काढायला सांगतो त्या सीनवर प्रेक्षक हसतात.
 
या प्रेक्षकांना कुठल्याही मुलीला तिची परवानगी न घेता तिचं चुंबन घेण्यात काहीच गैर वाटत नाही. त्यांच्या जिभेवर 'फेमिनिस्ट' हा शब्दच द्वेष भावनेसह येतो. ते चित्रपटात दाखवण्यात आलेल्या हिंसाचाराकडे लक्ष वेधणाऱ्यांना 'सुडो' म्हणतात. जसं दिग्दर्शक संदीप रेड्डी म्हणतात.
 
रेड्डी म्हणतात प्रेम 'अनकन्डीशनल' असतं. म्हणजे त्यात कुठलीच अट नसते. कुठलीच सीमारेषा नसते. ते वारंवार म्हणतात की, ज्या लोकांना चित्रपट आवडला नाही त्यांनी कधीच कुणावर 'अनकन्डीशनल' प्रेम केलेलंच नाही.
 
मात्र, मी अशा अनेक स्त्रियांना ओळखते, अशा अनेक तरुणींना ओळखते ज्यांनी रेड्डी यांच्या संकल्पनेतलं 'अनकन्डीशनल' प्रेम भोगलं आहे. ज्यांना जखमा झाल्या, ज्यांच्यावर अॅसिड टाकून त्यांना जाळण्यात आलं, ज्यांच्या शरीर आणि आत्म्याला वेदना देण्यात आल्या अशा अनेक स्त्रिया आहेत.
 
प्रेम 'अन्कन्डिशन्ल' किंवा अटींशिवाय असायला नको. यात काही अटी असायलाच हव्या. उदाहरणार्थ- एकमेकांप्रती आदर, सहमती आणि स्पेस. हे नसेल तर प्रेम म्हणजे हिंसाचार सुरू ठेवण्याचं एक कारण आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख