Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आपल्या कामाची कुणालाच किंमत नाही, असं तुम्हाला वाटतं का?

Webdunia
- झारिया गॉर्वेट
1970च्या दशकाच्या सुरुवातीला तुम्ही 'बर्नआउट' पीडित असल्याचं म्हटलं असतं तर काही जणांनी तुमच्याकडे आश्चर्याने पाहिलं असतं, हे निश्चित.त्या काळात अनौपचारिक पद्धतीने हा शब्दप्रयोग अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांसाठी वापरला जायचा.
 
उदाहरणार्थ मेंदूची सक्रियता कमी होणं. सतत पार्ट्यांना जाणाऱ्यांमध्ये ही सर्वसामान्य बाब होती.
 
न्यूयॉर्कमध्ये जर्मन-अमेरिकी मानसशास्त्रज्ञ हर्बर्ट फ्रायडेनबर्गर यांनी 1974 मध्ये पहिल्यांदा व्यसनाधीन आणि बेघर लोकांच्या एका क्लिनिकमध्ये या आजाराचं निदान केलं. मात्र, ते व्यसनाधीन व्यक्तींचा विचार करत नव्हते.
 
क्लिनिक चालवणारे स्वयंसेवक अनेक समस्यांना तोंड देत होते. त्यांच्याकडे काम खूप होतं. मात्र, त्यांच्याकडे प्रेरणा नव्हती आणि मानसिकदृष्ट्या ते थकलेले होते.
 
सुरुवातीला त्यांना हे काम खूप नफा मिळवून देणारं वाटलं होतं. मात्र, आता त्यांची फार चिडचिड होऊ लागली होती. ते खिन्न झाले होते. रुग्णांची नीट काळजी घेणं, त्यांना जमत नव्हतं.
 
विश्वव्यापी आजार
फ्रायडेनबर्गर यांनी या गंभीर अवस्थेला 'दीर्घकाळ अधिक काम केल्याने येणारा थकवा' म्हटलं. याचं वर्णन करण्यासाठी त्यांनी 'बर्नआउट' शब्द वापरला. हा शब्द लगेच लोकप्रिय झाला. आज जगभरात हा शब्द वापरला जातो.
 
बर्नआउट किती व्यापक आहे, याची आकडेवारी येणं खूप अवघड आहे. 2018 साली एकट्या ब्रिटनमध्ये 5,95,000 लोक कामाच्या तणावाने ग्रस्त होते.
 
खेळाडू याने ग्रासले आहेत. 'यूट्यूब स्टार' ग्रासले आहेत. उद्योजक चिंतेत आहेत. स्वतः फ्रायडेनबर्गर यांनादेखील हा त्रास झाला होता.
 
गेल्या महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या विश्वव्यापी समस्येला आजार असल्याचं जाहीर केलं.
 
आजारांच्या वर्गीकरणाच्या आंतरराष्ट्रीय मॅन्युअलमध्ये याला सततच्या कामाच्या ताणातून उद्भवणारा सिन्ड्रोम म्हटलं आहे.
 
WHO नुसार बर्नआउटची तीन तत्वं आहेत - थकवा, नोकरीचा कंटाळा आणि खराब कामगिरी याकडे दुर्लक्ष करणं आणि त्यावर उपचार घ्यायला उशीर करणं धोकादायक आहे. इतर कुठल्याही आजाराप्रमाणे हा आजार वाढू दिला आणि उशिरा उपचार घेतले, तर त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही.
 
कामाचा कंटाळा
तुम्हाला एकूणातच खूप कंटाळा आला आहे, हे कसं कळणार. आयर्लँडच्या डब्लिन काउंटीमधल्या मानसोपचारतज्ज्ञ सिओबन मरे म्हणतात, "बर्नआउटच्या सुरुवातीची लक्षणं बरीचशी उदासीनतेसारखी असतात."
 
मरे यांनी 'द बर्नआउट सोल्युशन' नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्या मद्य आणि साखर याचा अतिवापर टाळण्याचा सल्ला देतात. थकवा दूर होत नसेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
 
सकाळी 10 वाजेपर्यंत झोपल्यानंतरही झोपायची इच्छा होत असेल किंवा फिरायची इच्छा होत नसेल तर हे काळजीचं कारण समजावं. ही लक्षणं दिसू लागल्यास मरे डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देतात.
 
त्या म्हणतात, "उदासीनता आणि बर्नआउटच्या सुरुवातीची स्थिती सारखी असते. बर्नआउट हा आजार मानण्याची खूप घाई असते. मात्र, अजूनही तो सिन्ड्रोम मानला गेला आहे."
 
दोघांचं वेगळेपण जाणणाऱ्या व्यावसायिक डॉक्टरांची मदत घेणं महत्त्वाचं आहे. कारण उदासीनतेवर उपचाराचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, बर्नआउटवर सर्वोत्तम उपचार हा अजूनही जीवनशैलीत बदल करणे, हाच आहे.
 
तुम्ही बर्नआउटच्या जवळ आहेत, हे तुम्ही कसं ओळखालं?
मरे म्हणतात, "खरंतर ताण खूप महत्त्वाचा आहे आणि अधीर होणं, चांगलं काम करण्याची प्रेरणा देतं."
 
"मात्र, एखाद्या व्यक्तीला सातत्याने ताण येत असेल आणि बेचैन वाटत असेल ती बर्नआउटची लक्षणं असतात."
 
उदारणार्थ, तुम्ही काम करत असलेल्या मोठ्या प्रोजेक्टचा विचार करा. त्याविषयी विचार केल्यावर उत्तेजित झाल्यासारखं वाटणं, सामान्य बाब आहे. त्या विचारांनी तुमची झोप उडाली असू शकते.
 
मात्र, तो प्रोजेक्ट संपल्यावरही तुम्हाला बेचैन वाटत असेल तर तुम्ही निश्चितच बर्नआउटच्या उंबरठ्यावर आहात.
 
मरे म्हणतात, "दुसऱ्या दिवशीही तुम्ही बेचैन असाल तर तुम्ही तो वाढण्यात हातभार लावत आहात."
 
बर्नआउटच्या जवळ पोचल्याचं आणखी एक लक्षण म्हणजे चिडचिडेपणा.
 
तुम्हाला असं वाटत असेल की, तुमच्या कामाची किंमत नाही, तुम्ही सामाजिक जीवनापासून अलिप्त राहू लागला असाल आणि निराश वाटत असेल तर आताच सावध व्हा.
 
कामावर परिणाम
लंडनमधल्या मानसोपचारतज्ज्ञ आणि बर्नआउटतज्ज्ञ जॅकी फ्रान्सीसी वॉकर म्हणतात, "बर्नआउटच्या उंबरठ्यावर उभी व्यक्ती भावनिकदृष्ट्या सुन्न आणि मानसिक दुरावा अनुभवत असते. जणू त्यांच्यात आयुष्यातल्या सामान्य बाबींमध्ये सहभागी होण्याचीही क्षमता नाही."
 
वॉकर बर्नआउटच्या एका शेवटच्या लक्षणावर लक्ष देण्याचा सल्ला देतात. हे लक्षण आहे कामाची गुणवत्ता खालवल्याची भावना.
 
त्या म्हणतात, "लोकं म्हणतात, हा तू नाही. मी असा नाही. मी तर एक्स, वाय, झेड, सगळी कामं करू शकतो."
 
"मात्र, शारीरिक क्षमता कमी होत असेल तर ती व्यक्ती सामान्य क्षमतेने काम करत नाही, हे स्वाभाविक आहे."
 
मस्लक बर्नआउट इव्हेंटी (MBI) ही चाचणी बर्नआउट मोजण्यासाठी आखण्यात आली आहे.
 
सर्वात व्यापक वापर एमबीआय-जनरल सर्वेचा होता. या सर्वेत थकवा आणि चिडचिडेपणासोबतच काम करताना तुम्ही किती चांगल्या पद्धतीने विचार करू शकता, हेदेखील मोजतात.
 
हा सर्वे पहिल्यांदा 1981 मध्ये प्रकाशित झाला होता. तेव्हापासून आजवर अनेक संशोधनात त्याचा वापर झालाय.
 
असं असलं तरी हा सर्वे बर्नआउट सर्वोच्च पातळीवर असल्यावर सर्वाधिक उत्तम परिणाम देतो. मात्र, बर्नआउटच्या जवळपास असल्यावरही याचा निश्चितच वापर करू शकतो.
 
बर्नआउटपासून बचाव कसा करावा?
बर्नआउटला रोखण्याचा सर्वोत्तम उपाय आहे त्याच्या मूळ कारणाचं समूळ उच्चाटन.
 
मरे विचारतात, "तुमच्या आयुष्यात जे सुरू आहे ते तुम्ही अस्थायी किंवा स्थायी स्वरुपात घडू देऊ शकता का? उदाहरणार्थ, काळजी सोडून भरपूर झोप घेतल्याने बर्नआउटच्या शारीरिक लक्षणांवर मात करता येते."
 
वॉकर तीन टप्प्यांचा एक प्रोग्राम सुचवतात. यात एखादी व्यक्ती काय करू इच्छिते आणि जेव्हा तिला ते काम करायला सांगितलं जातं, तेव्हा त्या व्यक्तीला काय वाटतं, यातला फरक ओळखण्याचा समावेश आहे.
 
"कधी-कधी असं यामुळे होतं की तुम्ही परफेक्ट होण्याचा प्रयत्न करता किंवा मग तुम्हाला या गोष्टीची भीती असते की लोक तुम्हाला जेवढं सक्षम समजतात ते सिद्ध करण्यासाठ तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागेल."
 
कधी-कधी कामाच्या ठिकाणची परिस्थिती हीदेखील समस्या असू शकते.
 
2018 साली अमेरिकेच्या 7,500 कामगारांवर करण्यात आलेल्या गॅलोप अभ्यासानुसार कामाच्या ठिकाणी गैरव्यवहार, कामाचा सहन न होणारा भार आणि एखाद्या व्यक्तीच्या भूमिकेविषयी अस्पष्टता यामुळे बर्नआउट होतो.
 
कामगारांना मॅनेजरची मदत मिळत नसेल आणि वेळेचं प्रेशर टाकण्यात येत असेल तरीही ताण वाढतो.
 
मूल्यांचा आमना-सामना
वॉकर म्हणतात, "आणखी एक मुद्दा आहे. तो म्हणजे कंपनीच्या मूल्यांचा वैयक्तिक मूल्यांशी मेळ न बसणं. यामुळे ताणाची भावना निर्माण होते. कारण, त्यांना ते करावं लागतं, ज्यावर त्यांचा विश्वास नाही."
 
काही प्रकरणांमध्ये, काही व्यक्ती बाहेरची कामं करून स्वतःचं समाधान करून घेतात. मात्र, अनेकदा अशी माणसं कंपनी किंवा व्यवसाय बदलण्याचा निर्णय घेतात.
 
बर्नआउटचं कारण काहीही असो, मरे यांचा सल्ला एकच आहे तो म्हणजे स्वतःविषयी दयाळू रहा.
 
मरे यांच्या अनुभवानुसार बर्नआउट नावाच्या साथीचं प्रमुख कारण सर्वच हवं असण्याची (हव्यासाची) संस्कृती आहे.
 
सर्वकाही मिळवणं शक्य नाही
तुम्ही सार्वजनिक जीवनातही सक्रीय आहात, तुमच्या व्यवसायातले मोठमोठे प्रोजेक्टही पूर्ण करत आहात आणि फिट राहण्यासाठी तुम्ही निश्चित केलेलं लक्ष्यही तुम्ही पूर्ण करत आहेत, हे सर्वच नेहमीच शक्य होतं असं नाही.
 
अशावेळी प्राधान्यक्रम ठरवणं गरजेचं आहे. स्वतःपासून खूप जास्त अपेक्षा ठेवू नका.
 
इतर कुणी घर आणि ऑफिसमध्ये, खाजगी आणि सार्वजनिक आयुष्यात, सगळीकडे परिपूर्ण दिसत असतील तर कदाचित ते खोटं असू शकतं किंवा मग त्यांना इतर कुठून मदत मिळत असावी.
 
तुम्हाला वाटत असेल की तुम्ही बर्नआउट क्लबमध्ये सामिल होण्याच्या उंबरठ्यावर आहात तर एक पाऊल मागे जा. काय चुकतंय ते ओळखा आणि स्वतःला या दुष्टचक्रातून सोडवा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख