बास्केटबॉल जगतातील महान खेळाडू अशी ख्याती असलेल्या कोबी ब्रायंटचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतात झालेल्या या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला. कोबी ब्रायंट हे आपल्या मुलीसोबत आणि कर्मचाऱ्यांसोबत खासगी हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते.
जगातील महान खेळाडूंपैकी एक
बास्केटबॉल जगतातील पाच महान खेळाडू कोण जर असा प्रश्न विचारला तर त्यात ब्रायंट यांचंही नाव यावं अशी त्यांची ख्याती होती. ब्रायंट यांच्या निधनावर जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
ब्रायंट यांच्या मृत्यूने फक्त अमेरिकेतीलच नाही तर इतर देशातील क्रीडाप्रेमींनी शोक व्यक्त केला आहे. प्रिती झिंटा, करण जोहर, जसप्रीत बुमराह, युवराज सिंह, सर विवियन रिचर्ड्स यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
'एका महान बास्केटबॉल खेळाडूच्या अशा मृत्युमुळे मला दुःख झालं आहे. काळ किती अनिश्चित असतो हेच या घटनेत दिसतं,' असं ट्वीट युवराज सिंहने केलं आहे.
बराक ओबामांनी म्हटलं आहे, की ब्रायंट महान खेळाडू होता. त्यांची 13 वर्षांची मुलगी गियानाचा अपघात झाल्यामुळे तर मिशेल आणि मला अतीव दुःख झालं आहे.
बास्केटबॉलचा जादूगर कोबी
कोबी ब्रायंट पाच वेळा नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन अर्थात NBA चे चॅम्पियन होते. बास्केटबॉलच्या इतिहासातील सर्वात महान खेळाडूंपैकी एक म्हणून कोबी ब्रायंट यांचं नाव घेतलं जातं.
ब्रायंट यांच्या मृत्यूनंतर NBA नं निवेदन प्रसिद्ध केलं आहे. "कोबी ब्रायंट आणि त्यांची 13 वर्षांची मुलगी गियाना यांच्या दुःखद निधनामुळे आम्हाला सर्वांनाच प्रचंड धक्का बसला आहे. असामान्य प्रतिभा जेव्हा जिंकण्यासाठी समर्पित भावनेनं मैदानावर उतरते तेव्हा काय होतं, हे गेली 20 वर्षे कोबीने आपल्याला दाखवून दिलं.
आपल्या 20 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत कोबी ब्रायंट नेहमीच लॉस एंजेल्स लाकेर्ससोबतच खेळले होते.
एप्रिल 2016 मध्ये कोबीनं आपली निवृत्ती जाहीर केली होती. 2008 मध्ये त्यांनी कोबीनं NBA चा सर्वोत्तम खेळाडू हा किताब पटकावला होता.
त्यासोबतच त्यांनी दोन वेळा NBA फायनल्समध्ये MVP चा किताबही मिळवला होता.
कोबीच्या नावावर दोन वेळा NBA स्कोअरिंग चॅम्पियनचा किताब आणि दोन वेळा ऑलिंपिकमध्ये चँपियन बनण्याचीही कामगिरी आहे.
कोबीनं 2006 या वर्षी टोरंटो रॅप्टर्स विरुद्धच्या मॅचमध्ये 81 पॉइंट्स मिळविले होते. हा त्यांच्या कारकिर्दीतला मैलाचा दगड होता.
बास्केटबॉल ते ऑस्करपर्यंत
ब्रायंट यांनी बास्केटबॉलमध्ये तर अनेक अॅवॉर्ड मिळवले होतेच, पण त्यासोबतच त्यांनी एक ऑस्कर पुरस्कारही मिळवला होता.
कोबे यांनी 2015 साली बास्केटबॉलला एक प्रेमपत्र लिहिलं होतं. या पत्रावरच 'डिअर बास्केटबॉल' नावाची एक शॉर्ट अॅनिमिटेड फिल्मही बनविण्यात आली होती. या फिल्मला ऑस्कर पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं.