-अनघा पाठक
22 डिसेंबर 1997 ला ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची बैठक बंगळुरूमध्ये चालली होती. बैठकीत काय होणार याची ममता बॅनर्जींना कुणकुण लागली आणि त्यांनी तातडीने एक पत्रकार परिषद बोलवली. या आधीचे चार महिने ममता बॅनर्जी आणि बंगाल काँग्रेस दोघांसाठी नाट्यमय ठरले होते.
या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांनी आपण नवा पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली. पक्षाचं नाव होतं 'ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस'.
ही पत्रकार परिषद चालू असतानाचा ममता बॅनर्जींना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केलं असल्याची घोषणा झाली. पण काँग्रेस इथेही ममतांपेक्षा एक पाऊल मागे राहिली. पक्षाने ममतांना निलंबित करण्याआधीच त्यांनी स्वतःहून पक्षाला रामराम केला होता.
काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेत्यांना तोवर समजत होते की, त्यांची राजकीय खेळी यशस्वी ठरली आहे आणि त्यांनी ममता बॅनर्जींना नव्या पक्षाची नोंदणी करण्यापासून थांबवलं आहे. आता ममतांच्या निलंबनानंतर तोंडावर आलेली पश्चिम बंगालची निवडणूक त्यांना अपक्ष म्हणूनच लढवावी लागेल. स्वतःवर खूश असणाऱ्या काँग्रेसच्या काही नेत्यासाठी ममता बँनर्जींची ही पत्रकार परिषद म्हणजे एक धक्काच होता.
पत्रकार आणि लेखिका शुतापा पॉल यांनी ममता बँनर्जींच्या आयुष्यावर लिहिलेल्या 'दीदी - द अनटोल्ड ममता बँनर्जी' या पुस्तकातला हा प्रसंग आहे.
या पत्रकार परिषदेत जे घडलं त्याची बीजं 5 वर्षांपूर्वीच कोलकात्यातल्या महाराष्ट्र निवासात पेरली गेली होती.
नक्की झालं काय होतं?
ममता बॅनर्जींच्या कारकीर्दीची सुरुवातच डाव्या पक्षांना असणाऱ्या कठोर विरोधातून झाली होती. शुतापा लिहितात, "ममतांना जसजशी वरची पदं मिळाली तसतसे त्यांचे पश्चिम बंगाल काँग्रेस नेतृत्वाशी खटके उडायला लागले. ममतांचं म्हणणं होतं की पश्चिम बंगालमधली काँग्रेस केंद्रात सत्तेची समीकरणं जुळवता यावी म्हणून राज्यात डाव्यांशी जुळवून घेत होती. त्यांच्यात एक अस्पष्ट असा करार होता आणि काँग्रेसचा उद्देश डाव्यांचा संपूर्ण पराभव हे नव्हतं."
डाव्यांशी समझौता करणं ममता बॅनर्जींसाठी अशक्य होतं असंही शुतापा म्हणतात.
पश्चिम बंगालमधलं राजकारणं कायमच आक्रमक राहिलं आहे. या राज्याच्या इतिहासात निवडणुकांच्या वेळी इथे हिंसा झाल्याची अनेक उदाहरणं आहेत. ममता बॅनर्जींचा राजकीय स्वभावही आक्रमक होता, त्यामुळे तत्कालीन काँग्रेसमध्ये दोन गट पडले. एक मवाळ नेत्यांचा आणि एक ममतांना पाठिंबा देणाऱ्या जहाल आक्रमक कार्यकर्त्यांचा. जहाल गटाला मवाळ राजकारण मंजूर नव्हतं तर मवाळांना काहीही करून ममता बॅनर्जींचं पक्षातलं वाढतं महत्त्व कमी करायचं होतं.
ममता बनर्जींना बाजूला करणं ही मवाळ गटाची डोकेदुखी होऊन बसली होती, कारण ममता बॅनर्जींना आधी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी पश्चिम बंगाल युथ काँग्रेसच्या अध्यक्ष केलं आणि त्यांच्या हत्येनंतर नरसिंहराव सरकारमध्ये काही काळ त्यांना मंत्रिपदही मिळालं. पण राजीव गांधींच्या हत्येनंतर ममतांचा काँग्रेसमधला भक्कम पाठिंबा हरवला होता.
1992 साली पश्चिम बंगालचे तत्कालीन प्रदेशाध्यक्षपद सिद्धार्थ शंकर रॉय भारताचे राजदूत म्हणून अमेरिकेत गेले. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
ममता बँनर्जींना काँग्रेस पक्षातली जुन्या आणि नव्या पिढीतली जनरेशन गॅप खटकतच होती. त्यांच्या 'माय अनफर्गेटेबल मेमरीज' या पुस्तकात त्या लिहितात, "पक्षाच्या नेतृत्वात पोकळी निर्माण झाली होती आणि पुढे काय करायचं याचा पक्षाला अंदाज नव्हता."
ममता काँग्रेस पक्षाचं नरमाईचं धोरणं स्वीकारायला मात्र तयार नव्हत्या. आपल्या पुस्तकात त्या लिहितात, "माणिकटोलामधून माझा उमेदवार उभा करायचा नाही असं पक्षातल्या मोठ्या नेत्यांनी मला सांगितलं. त्यांचं म्हणणं होतं की CPI(M) कडून ही ऑफर आली होती. त्या बदल्यात ते मला दक्षिण कलकत्यात त्रास देणार नाहीत. मी म्हटलं त्यांना सांगा मला हवा तितका त्रास द्या, पण माणिकटोलात माझाच उमेदवार उभा राहील."
त्या काळात त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं खरं, पण पक्षात त्यांचं महत्त्व कमी कमी होतं चाललं होतं. पश्चिम बंगाल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची लढाई सुरू झाली होती.
पश्चिम बंगालमधले आणखी एक मोठे नेते सोमेन मित्रा यांचं नाव आघाडीवर होतं.
पण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं आपल्या हातात यावी अशी ममता बँनर्जींची मनोमन इच्छा होती. त्याकाळात ममता बँनर्जी आणि काँग्रेसचं वार्तांकन करणारे कोलकात्यातले जेष्ठ पत्रकार आशिष घोष म्हणतात, "ममतांनी आपली सारी ताकद पणाला लावायचं ठरवलं."
पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं की पक्षाचे मोठे नेते वैयक्तिक पातळीवर जरी आपल्याला पाठिंबा देणार असल्याचं म्हणत असले तरी एकत्रितपणे आपल्या विरोधात गेले आहेत. याचमुळे प्रणव मुखर्जी आणि ममता बॅनर्जी यांचे संबंध बिघडले. दोघांनी या गोष्टीचा आपआपल्या पुस्तकात उल्लेख केला आहे.
आपल्या 'द कोएलिशन इयर्स' या पुस्तकात प्रणव मुखर्जी लिहितात की, "मी त्यांना (ममता बॅनर्जी) यांना काँग्रेस अध्यक्षपदाची निवणूक कशी घ्यावी यासाठी काही निरिक्षणं नोंदवण्यासाठी भेटायला बोलावलं होतं. त्या आधी बिनविरोध निवडणूक घ्या असं म्हणत होत्या. पण अचानक चालू बैठकीत त्या चिडल्या आणि त्यांनी माझ्यावर तसंच इतर नेत्यांवर त्यांच्या पाठीमागे षड्यंत्र रचल्याचा आरोप केला. त्यांनी खुल्या निवडणुकांचीही मागणी केली."
तर ममता बॅनर्जी आपल्या 'माय अनफर्गेटेबल मेमरीज' या पुस्तकात लिहितात की, "पक्षाचे सगळेच नेते तिथे उपस्थित होते आणि त्यांनी प्रणवदांना माझ्या विरोधात भडकवलं. ते बैठकीत माझ्यावर चिडले आणि माझ्यावर ओरडले. मला खूप वाईट वाटलं."
पश्चिम बंगालच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक खुली होणार आणि ममता त्यात उतरणार हे स्पष्ट झालं.
इथूनच ममतांच्या राजकीय कारकीर्दीची दिशा बदलली.
"कोलकत्यातलं महाराष्ट्र निवास ममता बॅनर्जींच्या भवानीपूरमधल्या घरापासून फार लांब नाहीये. इथल्या महाराष्ट्र निवासाला मोठा इतिहास आहे. 1930 च्या दशकात याची स्थापना झाली. स्वातंत्र्य चळवळ जोरात असताना इथे मोठ्या प्रमाणावर शिवाजी उत्सव (शिवजयंती) साजरी व्हायची," घोष अधिक माहिती देतात.
महाराष्ट्र निवासात एक मोठं सभागृह आहे, हे सभागृह वेगवेगळ्या समारंभांसाठी भाड्याने दिलं जात असे. याच सभागृहात ममता बॅनर्जींचं राजकीय भवितव्य निश्चित करणारी निवडणूक पार पडली.
"1992 ची पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेसची निवडणूक इथेच झाली. सोमेन मित्रा आणि ममता बँनर्जी आमनेसामने उभे ठाकले होते. याची माध्यमांत खूप चर्चा होती कारण अनेक वर्षांनंतर अशी प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक होत होती. सोमेन मित्रांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी केली होती, त्यांचा अभ्यास पक्का होता. तर दुसऱ्या बाजूला ममतांनी भावनिक हाक दिली. काँग्रेस CPI(M) च्या हातातलं बाहुलं झालं आहे असं म्हणता त्या निवडणुकीत उतरल्या होत्या," घोष सांगतात.
हे मतदान गुप्त पद्धतीने झालं होतं. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत ममता बँनर्जी हरल्या.
आशिष घोष या घडामोडींवर लक्ष ठेवून होते. त्यांच्या मते ममता बॅनर्जींना काँग्रेसमधल्या आपल्या भवितव्याची चुणूक या निवडणुकीत दिसली. "यानंतर काँग्रेसचं राजकारण ममता आणि सोमेन मित्रा यांच्या अवतीभोवतीच फिरलं. महाराष्ट्र निवासातली ती निवडणूक ममतांच्याच नाही, पश्चिम बंगालच्या राजकारणातला टर्निंग पॉईंट ठरली. आम्हाला सगळ्यांना दिसलं की ममता CPI (M) ला मात देण्यासाठी स्वतःचा पक्ष काढणार."
घोष अधोरिखित करतात की महाराष्ट्र निवासातल्या त्या दिवशी ममता पक्षापेक्षा मोठ्या होताना दिसल्या. त्या काँग्रेसचा मार्ग सोडणार हे जवळजवळ निश्चित झालं होतं. "ते फक्त कधी होणार याची वाट पहायची होती."
तृणमूलच्या दिशेने
त्या दिवशी कोलकत्याच्या महाराष्ट्र निवासात ममता बॅनर्जींचा विजय झाला असता तर कदाचित पश्चिम बंगालचं आजचं चित्र वेगळं असतं. ममता बॅनर्जी काँग्रेसमध्येच राहिल्या असत्या. त्यांनी काँग्रेसला डाव्यांच्या विरोधात विजयही मिळवून दिला असता. पण नियतीच्या मनात वेगळंच काही होतं.
आपल्या पराभवानंतर ममता बॅनर्जी नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळातही अस्वस्थ होता असं शुतापा पॉल लिहितात.
"पश्चिम बंगालमधले सत्ताधारी डावे आणि विरोधी पक्षांच्या सततच्या हिंसक संघर्षामुळे पंतप्रधान नरसिंह रावांनी ज्योती बसूंचं सरकार बरखास्त करावं अशी ममतांची इच्छा होती. पण नरसिंह रावांसाठी सरकार बरखास्त करण्याचा पर्यायच नव्हता," शुतापा आपल्या 'दीदी - द अनटोल्ड ममता बँनर्जी' या पुस्तकात लिहितात.
25 नोव्हेंबर 1992 ला पश्चिम बंगाल युथ काँग्रेसच्या अध्यक्ष या नात्याने त्यांनी कलकत्याच्या (आताचं कोलकाता) ब्रिगेड परेड ग्राऊंडमध्ये भलीमोठी सभा आयोजित केली. या रॅलीत त्यांनी CPI(M) ची 'मृत्यूघंटा वाजवण्याचं' आवाहन केलं.
ममतांच्या सभेला मोठी गर्दी झाली. इथे आलेले लोक ममता बॅनर्जींसाठी आले होते. या सभेचं ममता आपल्या पुस्तकात वर्णन करताना म्हणतात, "मी त्या दिवशी भावनातिरेकाने थरथरत होते. लांब लांबच्या खेड्यांतून काँग्रेसचा झेंडा पाठीवर घेऊन लोक आले होते. ही तीच लोक होती ज्यांचं डावे पक्ष सतत दमन करत आले होते. मला या लोकांना निराश करायचं नव्हतं. या लोकांना उभारी देणारा असा संदेश द्यायचा होता की ज्यामुळे त्यांना डाव्यांच्या विरोधात लढण्याची हिंमत मिळेल."
या सभेत ममतांनी आपण नरसिंह राव मंत्रिमंडळातून राजीनामा देत असल्याची घोषणा केली. आपला रस्ता बनवायला ममतांनी सुरुवात केली होती.
सोमेन मित्रा आणि ममता बॅनर्जी या दोन्ही गटात खटके उडत होतेच. पण 1996 च्या लोकसभा निवडणुकीत या दोन्हा गटांचे वाद जगजाहीर झाले. ममतांचा गट आधीपासूनच स्वतःला तृणमूल काँग्रेस म्हणत होता. लोकसभेच्या वेळेस उमेदवार ठरवण्यावरून या दोन्ही गटांमध्ये वाद झाले होते. आता पाळी विधानसभा निवडणुकांची होती.
शुतापा लिहातात, "काँग्रेसच्या 416 उमेदवारांच्या यादीत एकही नाव ममतांच्या गटातल्या उमेदवाराचं नव्हतं. सुरुवातीला ममतांना पाठिंबा देणारे प्रियरंजन दासमुन्शींसारखे नेतेही त्यांच्यापासून वेगळे झाले होते. ममता पुन्हा एकदा बाजूला पडल्या होत्या. पाच वर्षांपूर्वी प्रदेशाध्यक्ष पदाच्या वेळेस केलेली चुक त्या पुन्हा करणार नव्हत्या. ममता पक्षादेश धुडकावून सभा घ्यायला लागल्या. त्यांच्या सभांना गर्दी जमायला लागली. सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांचा पाठिंबा त्यांना होता."
ममता बॅनर्जींना पक्षातून निलंबित करण्याच्या गोष्टी व्हायला लागल्या पण काहीच स्पष्ट होत नव्हतं. काँग्रेस पक्षश्रेष्ठी आणि ममता बॅनर्जी यांच्यात तह घडवण्यासाठी सोनिया गांधींनी मध्यस्थी केली. सोनिया आणि ममता 12 डिसेंबर 1997 ला भेटल्या. ममता या भेटीविषयी आपल्या पुस्तकात लिहितात, "सोनिया गांधींनी मला सांगितलं की अशा अवघड काळात आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे."
सोनिया गांधीच्या आश्वासनानंतरही ममतांना इतर काँग्रेस नेत्यांनी सहकार्य केलं नसल्याचं शुतापां पॉल यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं आहे.
"काँग्रेस नेत्यांची योजना होती की निवडणूक आयोगाची नवीन पक्ष नोंदणीची तारीख निघून जाईपर्यंत ममतांना वाटाघाटींमध्ये गुंतवून ठेवायचं. पण ममता धोरणी होत्या. त्यांनी कोणालाही न सांगता, आपल्या अगदी विश्वासू माणसांकरवी पक्ष नोंदणीची प्रक्रिया सुरू केली होती. ममतांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही या गोष्टीची कुणकुण नव्हती.
22 डिसेंबरला ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या बैठकीतल्या काही पत्रकारांना कुणकुण लागली की आज इथे ममतांना निलंबित करण्याचा निर्णय होणार आहे. ममतांना हे कळताचक्षणी त्यांनी पत्रकार परिषद बोलवली आणि काँग्रेसचा निर्णय यायच्या एक तास आधी नव्या पक्षाची घोषणा केली. ममता काँग्रेसपासून वेगळ्या झाल्या होत्या," शुतापा सविस्तर लिहितात.
कोलकात्यातला महाराष्ट्र निवासात ममतांच्या राजकीय कारकीर्दीची बीजं पेरली गेली होती. त्या महाराष्ट्र निवासाला त्या आजही विसरलेल्या नाहीत. कलकत्त्यातल्या महाराष्ट्र मंडळाच्या डॉ राखाडे यांनी मला सांगितलं की, "तृणमूलच्या स्थापनेनंतर पक्षनेत्यांची पहिली बैठक महाराष्ट्र भवनातच झाली. त्यानंतरही तृणमूलच्या बैठका इथे होत राहायच्या. हा सिलसिला तृणमूल भवन बनेपर्यंत चालू होता."
ममता बॅनर्जींनी आजही महाराष्ट्र भवनाशी असलेलं नातं टिकवून आहेत. "त्या दरवर्षी न चुकता गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी इथे दर्शनासाठी येतात," डॉ. राखाडे सांगतात.