Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नरेंद्र मोदींचा बांगलादेशचा दौरा भारतासाठी का महत्त्वाचा? बांगलादेशात विरोध का?

नरेंद्र मोदींचा बांगलादेशचा दौरा भारतासाठी का महत्त्वाचा? बांगलादेशात विरोध का?
, शुक्रवार, 26 मार्च 2021 (11:52 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारपासून बांगलादेशच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. भारतासोबत बांगलादेशचे संबंध बिघडलेले असताना नरेंद्र मोदींचा हा दौरा होत आहे.
 
पंतप्रधान मोदी हे बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात आहेत. त्यासोबतच बांग्लादेशचे पहिले राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांच्या 100 व्या जयंतीच्या कार्यक्रमातही मोदी सहभागी होतील.
 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या परराष्ट्र विषयांच्या सल्लागार गौहर रिझवी यांच्याशी इंडियन एक्स्प्रेसने संवाद साधला होता.
 
यामध्ये ते म्हणतात, "भारत हा बांगलादेशचा महत्त्वाचा शेजारी आहे. भारताला डावलून चीनसोबत संबंध ठेवणं, यावर आमचा विश्वास नाही."
 
बांगलादेश चीनसोबतच्या कोणत्याही संबंधांचा परिणाम भारतासोबतच्या संबंधांवर होऊ देणार नाही. चीनसोबतचे बांगलादेशचे संबंध फक्त गुंतवणूक आणि विकास योजनांपुरतेच मर्यादित आहेत, असंही रिझवी यांनी सांगितलं.
 
शिवाय, बांगलादेश प्रमाणाबाहेर कर्ज घेणार नाही. आम्ही श्रीलंकेसोबत घडलेल्या प्रकारातून शिकवण घेतली आहे, असंही रिझवी म्हणाले.
 
NRC हा भारताचा देशांतर्गत विषय असल्याचं वक्तव्यही रिझवी यांनी केलं आहे. "या प्रकरणात बांगलादेश का हस्तक्षेप करेल? द्विपक्षीय संबंधांमध्ये हा विषय चर्चेला आणण्याचं काय कारण आहे, असे प्रश्न त्यांनी विचारलं."
 
तिथे काही व्यक्ती बांग्लादेशी असल्याचं निदर्शनास आलं असेल तर आम्ही त्याला परत घेण्यास तयार आहोत. पण त्याबाबत आम्हालाही खात्री पटली पाहिजे. ही सर्वसामान्य पद्धत आहे, असं ते म्हणाले.
 
भारत कधीच बळाचा वापर करणार नाही. म्यानमारमध्ये होत असलेला प्रकार भारतात होईल, असा आम्ही कधीच विचार करू शकत नाही, ही भारताच्या कामाची पद्धत नाही, असंही रिझवी म्हणाले.
 
मोदींच्या दौऱ्याला स्थानिकांचा विरोध
पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशला जाण्याआधीच तिथल्या काही लोकांनी त्यांच्या दौऱ्याचा विरोध केला आहे.
 
मात्र, एका गटाच्या विरोधामुळे चिंतेचं कारण नाही, असं बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांनी म्हटलं आहे.
 
ते म्हणाले, "काही जणांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ढाका दौऱ्याविरोधात मोहीम उघडली आहे. मात्र, चिंतेचं कारण नाही. बांगलादेश एक लोकशाही असलेलं राष्ट्र आहे. इथे जनतेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे."
 
ढाका ट्रिब्यून' या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार परराष्ट्र मंत्री ए. के. अब्दुल मोमेन एका पत्रकार परिषदेत म्हणाले, "जनता आमच्यासोबत आहे. केवळ काही लोक या दौऱ्याचा विरोध करत आहेत आणि त्यांना तो करू द्यावा. या मुद्द्यावरून चिंता करण्याचं कुठलंही कारण नाही."
 
विरोध करणारे कोण आहेत?
असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेनुसार शुक्रवारी बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये मुस्लीम आणि विद्यार्थी संघटनांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 26 मार्चच्या दौऱ्याचा विरोध करत रॅली काढली.
 
असोसिएट प्रेसच्या वृत्तानुसार शुक्रवारच्या नमाज पठणानंतर जवळपास 500 मुस्लिमांनी ढाक्यातील बैतुल मोकार्रम मशिदीबाहेरच्या रस्त्यावर मोर्चा काढला. रॅलीच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. यावेळी निदर्शकांच्या हातात कुठलंही बॅनर नव्हतं आणि ते कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत, याचीही माहिती देण्यात आली नव्हती.
 
त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरचा अवमान केला. या मोर्च्यात भारतविरोधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. काही निदर्शकांच्या हाती पोस्टर होते. त्यावर लिहिलं होतं - 'गो बॅक मोदी, गो बॅक इंडिया.'
 
याव्यतिरिक्त डाव्या विचारसरणीच्या जवळपास 200 विद्यार्थी कार्यकर्त्यांनी ढाका विद्यापीठाबाहेर मोर्चा काढला. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या आमंत्रणावरून या दौऱ्यावर गेले आहेत.
 
निदर्शक पंतप्रधान शेख हसिना यांच्यावरही टीका करत आहेत. नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करायला नको होतं, असं त्यांचं म्हणणं आहे.
 
मोदी सरकारच्या धोरणांवर नाराजी
नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) या दोन कायद्यांचा बांगलादेशमध्ये विरोध होतोय. सीएए कायद्याविषयी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असल्याचं म्हटलं होतं. यावर बांगलादेशने तीव्र आक्षेप नोंदवला होता.
 
बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री ए. के. अब्दुल मोमेन म्हणाले होते, "हिंदूंवर अत्याचार होत असल्याचं म्हणणं अनावश्यक आणि चूक आहे. बांगलादेशमध्ये आहे तसा जातीय सलोखा असणारी राष्ट्रं मोजकीच आहेत. आमच्याकडे कुणी अल्पसंख्याक नाही. सर्व समान आहेत. शेजारील राष्ट्र म्हणून परस्पर मैत्रीपूर्ण संबंध खराब होतील, असं भारत काहीही करणार नाही, अशी आशा आम्ही बाळगतो. हा विषय नुकताच आमच्यासमोर आला आहे. आम्ही या मुद्द्याचा काळजीपूर्वक अभ्यास करू आणि त्यानंतरच भारताशी यावर चर्चा करू."
 
भारताच्या या दोन्ही नव्या कायद्यांचा विषय बांगलादेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बीएनपीनेही उचलला होता. बांगलादेश नॅशनल पार्टी (बीएनपी) बांगलादेशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. बीएनपीचे सरचिटणीस मिर्जा फखरूल इस्लाम आलमगीर यांनी 16 डिसेंबर 2019 रोजी भारतातील आसाम राज्यात एनआरसीमुळे बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका असल्याचं म्हटलं होतं.
 
इस्लाम आलमगीर यांनी म्हटलं होतं, "भारताच्या एनआरसी कायद्याची आम्हाला चिंता वाटते, असं आम्ही याआधीच सांगितलं होतं. भारताच्या एनआरसीमुळे बांगलादेशच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाला धोका असल्याचं आम्हाला वाटतं."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'त्या' क्षेपणास्त्रांमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर, उत्तर कोरियाचा दावा