Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पहलू खान झुंडबळी प्रकरण: 'आमच्या घरात गेले काही दिवस चूल देखील नाही पेटली'

पहलू खान झुंडबळी प्रकरण: 'आमच्या घरात गेले काही दिवस चूल देखील नाही पेटली'
, शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019 (10:18 IST)
विनीत खरे
14 ऑगस्टच्या संध्याकाळी 5 वाजता पहलू खान यांच्या मुलाच्या मोबाईलची बेल वाजली.
 
गेल्या काही दिवसांपासून त्यांना झोप लागली नव्हती. 14 ऑगस्टला त्यांच्या वडिलांच्या पहलू खान यांच्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाचा निकाल येणार होता.
 
पण, फोनवर वकिलांचं बोलणं ऐकून ते सुन्न झाले. न्यायालयानं या प्रकरणातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी सुटका केली होती.
 
4 खोल्यांच्या घरात बसलेल्या इरशाद यांच्या चेहऱ्यावर निराशा होती.
 
निर्णय आल्यापासून घराक चूल पेटली नव्हती. पण, असं कधीपर्यंत चालणार? आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा मात्र तिथं स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली दिसत होती.
इरशाद यांना कधीही रडू कोसळेल, असं त्यांच्याशी बोलताना जाणवत होतं.
 
इरशाद सांगतात, "ही बातमी ऐकल्यापासून डोक्यात दुसरा काही विचारच येत नाहीये. आम्हाला न्यायाची अपेक्षा होती, पण न्यायालयानं आरोपींची निर्दोष मुक्तता केली."
 
अडीच वर्षांपूर्वी एप्रिल 2017मध्ये कथित गोरक्षकांनी पहलू खान यांना मारहाण केल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
 
तेव्हा पहलू खान, इरशाद, त्यांचा एक भाऊ आणि गावतील 2 जण जयपूरइथून गाय खरेदी करून गावाकडे येत होते. त्यांना वाटेत अडवून कथित गोरक्षकांनी त्यांच्याकडील पैसे हिसकावून घेतले आणि जबर मारहाण केली.
 
यात पहलू खान यांच्या डोक्याला जबर मार लागला होता. काही कालावधीनंतर त्यांचा मृत्यू झाला.
 
मग माझ्या वडिलांना कुणी मारलं?
भारतात गेल्या काही वर्षांत वर्तमानपत्रांमध्ये इरशाद, अखलाक, अन्सारी यांच्यासारख्यांच्या बातम्या सातत्यानं दिसून येत आहेत.
 
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ह्युमन राईट्स वॉचच्या अहवालानुसार, "मे 2015 ते डिसेंबर 2018 दरम्यान भारतातल्या 12 राज्यांमध्ये जवळपास 44 लोकांची हत्या करण्यात आली, यात 36 मुस्लीम होते. याच काळात 20 राज्यांत 100 प्रकरणांत जवळपास 280 जण जखमी झाले होते."
 
"सगळ्यांना निर्दोष सोडण्यात आलं आहे. तर मग माझ्या वडिलांना कुणी मारलं? पोलीस किंवा कोर्टानं आम्हाला आरोपी कोण आहे हे सांगावं. व्हीडिओत दिसत असूनसुद्धा आरोपींना सोडण्यात आलं, याचं आम्हाला खूप दु:ख आहे. आम्हाला यामुळे धक्का बसला आहे," इरशाद सांगतात.
webdunia
अडीच वर्षांपूर्वी पहलू खान यांच्या घरात 7 ते 8 गायी, काही म्हशी होत्या. दुधाच्या विक्रीतून ते महिन्याला 20 ते 25 हजार रुपये कमवत.
 
आता मात्र त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. घरात एकच म्हैस आहे. इरशाद गेल्या अडीच वर्षांपासून न्यायालयामध्ये चकरा मारत आहेत.
 
गेल्या अडीच वर्षांत मदत म्हणून मिळालेले 10 ते 12 लाख रुपये आणि घरातील पैसा सगळं काही खटल्यासाठी खर्च झाले. त्यांनी सगळं काही सोडून दिलं आणि वडिल्यांच्या केसवर लक्ष केंद्रित केलं.
 
आता त्यांचा घरखर्च गावातील माणसं, नातेवाईक आणि मित्रांच्या भरवशावर सुरू आहे.
 
ते सांगतात, "वडील गेल्यानंतर सगळा पैसा या केससाठी खर्च झाला. आम्हाला न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे. गाव आणि नातेवाईकांच्या मदतीमुळे हे अडीच वर्षं आम्ही काढू शकलो."
 
ज्या व्हायरल व्हीडिओमुळे ही बाब जगासमोर आली, त्या व्हीडिओला पुरावा मानण्यास न्यायालयानं नकार दिला. कारण प्रयोगशाळेत या व्हीडिओची चौकशी झाली नाही, तसेच कायद्याच्या कसोटीवर या व्हीडिओची विश्वासार्हता सिद्ध झाली नाही, असं वकील सांगतात.
 
"हा व्हीडिओ आम्ही किंवा आमच्या माणसानं थोडीच बनवला आहे, तो बनावट कसा काय असू शकतो," इरशाद प्रश्न विचारतात.
webdunia
'आमचं सर्वस्व गेलं'
इरशाद यांच्या मागील प्लास्टिक खुर्चीवर त्यांची आई जैबुना बेगम बसलेल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर छोटा होत्या.
 
इरशाद यांच्यासोबत बोलताना असं वाटत होतं की, ते बोलत तर माझ्यासोबत आहेत, पण त्यांचं मन दुसरीकडेच होतं. बोलता-बोलता त्यांचं लक्ष हातातील मोबाईलकडे जात होतं आणि ते पुन्हा विचार करायला लागत होते.
 
"मी असा नव्हतो. अशी परिस्थिती माझ्यावर कधीच आली नव्हती. घराची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे," ते सांगतात.
 
"झोपच येत नाही, झोप तरी कशी येणार म्हणा. गेल्या अडीच वर्षांपासून मी या केससाठी धावत आहे, तेव्हा कुठे निकालाचा दिवस आला होता. आता असा निर्णय सुनावण्यात आला आहे. यापेक्षा आम्ही मेलो असतो तर चांगलं झालं असतं. अशा भारतात राहून आम्ही करायचं काय? आरोपी माझ्या वडिलांना मारहाण करत आहेत असं दिसत असूनही त्यांना निर्दोष सोडलं. हे आम्ही कसं काय स्वीकारावं?" ते पुढे सांगतात.
 
इरशाद यांची आई जैबुना सांगतात, "गेल्या अडीच वर्षांमध्ये आयुष्य जणू संपलं आहे. न्यायालयाकडून न्याय मिळेल, असं आम्हाला वाटत होतं. पण, न्याय मिळाला नाही. अडीच वर्षांत आम्ही बरबाद झालो, आमचा माणूसपण गेला, यापेक्षा वाईट ते काय असू शकतं?"
 
"कालपासून आमच्याकडे कुणीच जेवण केलं नाही. ते लोक मात्र आनंद साजरा करत आहेत. यात आमचं सर्वस्व लुटलं गेलं," त्या पुढे सांगतात.
 
या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यावर इरशाद यांचं कुटुंब ठाम आहे.
 
"जोपर्यंत जीवात जीव आहे, लढत राहू. ज्या दिवशी ते आम्हाला संपवतील, त्याच दिवशी आम्ही केस सोडू," इरशाद सांगतात.
 
पण, उच्च न्यायालयात जाण्यापूर्वी कनिष्ठ न्यायालयात याचा प्रकरणाचा निकाल असा कसं काय लागला हे समजून घेणं गरजेचं आहे.
 
आरोपी आणि पीडित दोन्ही बाजूंकडून पोलिसांवर टीका होत आहे.
 
"गोरक्षणाच्या नावाखाली झालेल्या मारहाणीच्या प्रकरणांध्ये पोलिसांनी सुरुवातीला जवळपास सगळ्याच प्रकरणांमध्ये चौकशी थांबवली, प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष केलं आणि इतकंच काय तर हत्यांवर पांघरूण घालण्यास मदत केली. पोलिसांना त्वरित चौकशी आणि संशयितांना अटक न करता पीडित, त्यांचे कुटुंबीय आणि साक्षीदारांविरोधात तक्रारी दाखल केल्या," असं 'भारतातील हिंसात्मक गोरक्षण' या ह्यूमन राइट्स वॉचच्या अहवालात म्हटलं आहे.
 
या प्रकरणाच्या चौकशीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मी दोन्ही बाजूच्या वकिलांशी चर्चा केली.
 
पहलू खान यांच्या कुटुंबीयांचे वकील कासिम खान यांच्या मते, "या प्रकरणातील आरोपींच्या निर्दोष मुक्ततेसाठी पोलिसांची कथित सौम्य कारवाई, कमकुवत चार्जशीट आणि राजकीय वक्तव्यं कारणीभूत आहे."
 
व्हायरल व्हीडिओच्या सत्यतेसंबंधी निर्माण झालेले प्रश्न असतील, पहलू खान यांच्या हत्येपूर्वी बचाव पक्षाचे वकील हुकूमचंद शर्मा यांनी उपस्थित केलेले प्रश्न असतील, अथवा दोन दवाखान्यांच्या डॉक्टरांची पहलू यांच्या मृत्यूविषयी वेगवेगळे रिपोर्ट असतील, या प्रकरणात पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
 
कासिम खान यांच्या मते, "या हत्येची चौकशी सुरुवातीला पोलिसांनी केली, नंतर सीआयडीनं. यांची चार्जशीट इतकं कमकुमत होती की, बचाव पक्षाची बाजू भक्कम झाली."
 
"या प्रकरणात रमेश सिंह सिनसिनवार, परिमल सिंह गुजर आणि रामस्वरूप शर्मा या तीन पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली," असं कासिम सांगतात.
 
या चौकशीविषयी अधिक विचारण्यासाठी मी या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही.
 
याशिवाय तत्कालीन गृहमंत्री गुलाब चंद कटारिया यांच्याशीसुद्धा संपर्क होऊ शकला नाही.
 
चौकशीसंबंधित एका पोलीस सुत्राला मी विचारलं की, व्हायरल व्हीडिओची सत्यता का पडताळण्यात आली नाही आणि त्याला फॉरेन्सिक लॅबमध्ये का पाठवण्यात आलं नाही, तेव्हा उत्तर मिळालं की, "घटनेशी संबंधित फोटो पोलिसांनी न्यायालयासमोर ठेवले होते. लग्नाचा व्हीडिओ आणि लग्नाच्या फोटोत काही फरक असतो का?"
 
या घटनेची चौकशी दोन संस्थांनी का केली, यावर ते म्हणाले, "मला याबद्दल काही माहिती नाही. कदाचित मीडियात हे प्रकरण जास्तच हायलाईट झालं असावं."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बहिणीचा अंत्यविधी, रक्षा बंधन त्याच दिवशी दोघा भावनांचा मृत्यू