कोरोना व्हायरसमुळं आरोग्यासह आर्थिक संकटही गडदत होताना दिसतंय. देशव्यापी लॉकडाऊनमुळं नोकरदार वर्ग तर अधिक अडचणीत सापडल्याचं दिसून आल्यानं केंद्रीय कामगार मंत्रालयानं EPF संदर्भात मोठं पाऊल उचललंय.
सुमारे सहा कोटी EPF खातेदार आपापल्या खात्यातून पैसे काढू शकतात. मात्र, त्यासाठी सरकारनं काही अटीही ठेवल्या आहेत. एबीपी न्यूजनं ही बातमी केलीय.
तीन महिन्याची बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता किंवा खात्यातील एकूण रकमेपैकी 75 टक्के रक्कम, यातील जी रक्कम छोटी असेल, ती काढता येईल. ही रक्कम परत करण्याची आवश्यकता नाहीय म्हणजेच नॉन-रिफंडेबल आहे.
28 मार्च 2020 पासून ही योजना लागू असेल, असं केंद्रीय कामगार मंत्रालयानं पत्रकात म्हटलंय. तसंच, ज्या कर्मचाऱ्यांनी रक्कम काढण्यासाठी अर्ज केला असेल, त्यावर तातडीनं कार्यवाही करण्याचे आदेशही देण्यात आलेत.