Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लोकसभा 2019 : नरेंद्र मोदींकडून विरोधकांची दारूशी तुलना, अखिलेश यादवांचाही पलटवार

Webdunia
गुरूवार, 28 मार्च 2019 (16:22 IST)
सपा, बसप आणि आरएलडी या उत्तर प्रदेशातल्या पक्षांची तुलना 'सराब' म्हणजे दारूशी केल्यानंतर पंतप्रधान नरेद्र मोदींवर आता विरोधकांकडून टीका केली जात आहे. मेरठमध्ये झालेल्या रॅलीत मोदींनी ही टीका केली आहे.
 
"समाजवादी पक्षाचा 'स', राष्ट्रीय लोकदलाचा 'र' आणि बहुजन समाजवादी पक्षाचा 'ब' या तीन पक्षांचं आद्याक्षरं मिळून सराब शब्द तयार होतो. ही दारू तुमचा नाश करेल. उत्तर प्रदेशच्या हितासाठी शराब म्हणजेच दारू चांगली नाही. देशहितासाठी शराब म्हणजेच दारू चांगली नाही," असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला.
 
त्यावर, सराब आणि शराब यातला फरक न समजू शकणारी माणसं द्वेष पसरवतात. टेलिप्रॉम्प्टरने त्यांचा खरा चेहरा उघड केला, अशा शब्दांत अखिलेश यादव यांनी मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे.
 
पंतप्रधानपदी विराजमान असणाऱ्या व्यक्तीला असं बोलणं शोभा देतं का? तीन राजकीय पक्षांना पंतप्रधान शराब म्हणाले. पंतप्रधानांनी असं का बोलावं? लोकांना हे पटेल का? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.
 
"तुमचे शब्द मागे घ्या आणि 130 कोटी जनतेची माफी मागा. अन्यथा देश आणि उत्तर प्रदेशातली जनता तुम्हाला माफ करणार नाही," असं सुरजेवाला यांनी सांगितलं.
 
बहुजन समाज पक्षा आणि मायावती यांच्याशी आमचे मतभेद आहेत. तरीही आम्ही मायावतीजी असा त्यांचा उल्लेख करतो. पंतप्रधान ड्रामा किंग आहेत आणि अपयशी अभिनेते ठरले आहेत असं ते पुढे म्हणाले.
 
सबूत चाहिए या सपूत चाहिए
पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर माझ्यावरच टीका होऊ लागली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
 
जे लोक पुरावा मागत आहेत तेच देशाला आव्हान करत आहेत. जनतेला ते म्हणाले, "आपको सबूत चाहिए या सपूत चाहिए. जो सबूत मांगते है वो सपूत को ललकारते है," असं मोदी म्हणाले. (तुम्हाला पुरावे हवेत की देशाचे सुपूत्र हवे आहेत, जे पुरावा मागतात ते सुपूत्रांना आव्हानच देत आहे.) मेरठ येथील सभेत पंतप्रधानांनी म्हटले.
 
लष्कराच्या शौर्याचा वापर निवडणूक प्रचारासाठी करू नका असं निवडणूक आयोगाने सांगितल्यानंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरठ येथील सभेत सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख केला.
 
"चौकीदारच्याच सरकारने सर्जिकल स्ट्राइक केली, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. भारत हा अंतराळातली महाशक्ती बनला आहे असं देखील मोदी म्हणाले. भारताने कालच अॅंटी सॅटेलाइट मिसाइलची चाचणी केली. त्यांच्या या भाषणाची तपासणी निवडणूक आयोगाकडून होणार आहे. त्यांच्या भाषणाची चौकशी होण्याआधीच मोदींनी दुसऱ्या सभेत लष्कराच्या शौर्याचा प्रचारात वापर केला म्हणून वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत.
 
"भाजप नेते नितीन गडकरी यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की लष्कराची कामगिरी हा राजकारणाचा विषय नाही. देशाची सुरक्षा इतर गोष्टींच्या वर आहे त्यामुळे हा विषय राजकारणाचा वा श्रेयाचा बनता कामा नये," त्यांच्या या वक्तव्याच्या दुसऱ्याच दिवशी मोदींनी सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख केला आहे.
 
जर महामिलावटी सरकार आलं तर देशाचं नुकसान होईल असं त्यांनी म्हटलं. जेव्हापासून योगी आदित्यनाथ याचं सरकार राज्यात आलं आहे तेव्हापासून गुंडांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं मोदी म्हणाले.
 
जर महागठबंधनचे सरकार आलं तर पुन्हा जुनीच स्थिती निर्माण होईल असं ते म्हणाले.
 
जे लोक खाते उघडू शकले नाहीत ते खात्यात पैसे काय टाकणार?
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल डीआरडीओच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आणि नंतर मोदी यांना जागतिक रंगमंच दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावर मोदींनी राहुल यांच्यावर टीका केली. मी सॅट बद्दल म्हणजेच सॅटेलाइटबद्दल बोलत होतो आणि काही बुद्धीवान लोकांना असं वाटत होतं की नाटकाच्या सेटबद्दल बोलत होतो. अशी टीका मोदींनी केली.
 
राहुल गांधी यांनी किमान वेतन योजना लागू करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यावरही मोदींनी शरसंधान साधलं. ते म्हणाले जे लोकांचे बॅंकेचे खाते उघडू शकले नाहीत ते लोकांच्या खात्यात काय पैसे टाकणार.

संबंधित माहिती

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

पुढील लेख
Show comments